विरोधाची संस्कृती

By Sandesh Prabhudesai
28 July 2015 10:33 IST

स्वतः एक सिद्धहस्त लेखक व कलाकार असलेले गोवा कला अकादमीचे अध्यक्ष विष्णू सुर्या वाघ यांच्या कल्पनेतून अखंड 48 तासांचे भारतीय कवींचे काव्य होत्र साकार झाले व 23 ते 25 जुलै पर्यंत ते संपन्नही झाले. सर्व भाषांतील आणि सर्व प्रकारच्या कविता या 48 तासांत सादर झाल्या. या काव्य होत्रासाठी महाराष्ट्रातील कित्येक कवी व गीतकार आल्याने त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उठले. सकारात्मक आणि नकारात्मकही. त्यात एक बातमी होती. महाराष्ट्रातील मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी कवी व कलाकार या काव्य होत्रात सामील होणार आहेत म्हणून कॉ गोविंद पानसरे अभिवादन समितीने त्यावर आक्षेप घेतला होता. कारण आयोजनाचे सुत्रधार विष्णू वाघ भाजपाचे आमदार आहेत, तेव्हा हे साहित्य व कलेचे भगवेकरण आहे. प्रत्यक्षात हे काव्य होत्र क़ॉ गोविंद पानसरे व डॉ नरेन्द्र दाभोळकर यांना समर्पित करण्यात येत आहे असे उद्घाटनालाच आयोजकांनी घोषित केले. बहुतेक या बातमीचा परिणाम असावा.

माझ्या मनात प्रश्र्न उभे राहिले ते साधे सरळ होते. केवळ उजव्या विचारसरणीच्या कवींना या काव्य होत्रासाठी आमंत्रित केले असते तर त्यावर भगवेकरणाचा आरोप करणे तर्कशुद्ध होते. ज्या अर्थी महाराष्ट्रातील मार्क्सवादी व आंबेडकरवादी कवी व कलाकार या काव्य होत्रात सामील होत आहेत त्याअर्थी काव्य होत्र भगवे होणे शक्यच नव्हते. आणि महाराष्ट्रातल्या छोट्या-मोठ्या कवी व कलाकारांना आपली वैचारिक निष्ठा विकायचीच होती तर गोव्यात काय काव्य होत्राच्या नावे निष्ठा विकायचा बाजार भरलेला होता? मांडवी नदीच्या संगमावर काय भगव्या विचारसरणीच्या विचारस्तोत्रांचा मंत्रोच्चार करीत तमाम मार्क्सवादी व आंबेडकरवाद्यांचे निष्ठांतरण करण्याचा सोहळा आयोजित केला होता? त्यासाठी भाजपावाल्यांनी काय गोव्यात नवीन भगवी तपोभुमी उभारलेली आहे? आणि तिथे जाऊन या तमाम मार्क्सवादी व आंबेडकरवादी कवी व कलाकारांनी मार्क्स व आंबेडकारांचा उद्धार करीत काय मनूचा व हेडगेवारांचा जयजयकार केला? की त्यांची उजवी विचारसरणी उचलून धरली? शेवटी त्या सर्वांनीच आपल्या लिखाणाला कसलीही मुरड न घालता या काव्य होत्रात आपल्या विचारसरणीच्याच कविता सादर केल्या ना? मग हा एवढा आक्षेपाचा खटाटोप कशासाठी?

कला अकादमी ही सरकारी संस्था आहे. ज्या पक्षाचे सरकार असते त्या पक्षाचा कोणी तरी आमदार वा मंत्री कला अकादमीचा अध्यक्ष होतो. स्थापनेपासून आतापर्यंत मगो, काँग्रेस व भाजपावाल्यांची वर्णी इथे लागलेली आहे. पण म्हणून आपल्याच पक्षाची विचारसरणी कला अकादमीतून ठळकपणे घुसडण्याचे धाडस आजपर्यंत तरी कुणी केलेले नाही. कारण कार्यकारी मंडळावर लेखक-कलाकार मंडळी असतात. त्यांना सर्वांनाच वश करणे कठीण असते. कारण ते कुठल्याच संस्थात्मक कोषात बांधले गेलेले नसतात. पुरस्कार, टूर्स वा इतर प्रकल्प देऊन लेखक व कलाकारांना लाचार करण्याचा प्रयत्न होतो, नाही असे नाही. आणि भाजपाने सत्तेवर आल्यापासून खास करून शिक्षण व कलेच्या क्षेत्रात आपल्या विचारसरणीची माणसे घुसडवण्याचा प्रयत्न चालूच ठेवलेला आहे, नाही असे नाही. म्हणूनच तर डॉ अमर्त्य सेनसारख्या जगद्विख्यात विद्वानाने नालंदा विश्र्वविद्यालयाचा राजिनामा दिला. आणि गजेंद्र चौहानसारख्या भगव्या व्यक्तीला फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचा अध्यक्ष केला म्हणून तर विद्यार्थी रस्त्यावर आलेले आहेत. पण म्हणून सगळीकडे हेच चाललेले आहे असे गृहितच धरून उचलली जीभ लावली टाळ्याला असे करणे किती उचित? शेवटी अशा संस्थांनी राजकारणविरहित रहाणे हीच तर लोकशाहीची गरज आहे ना?

हा प्रश्र्न केवळ राजकीय विचारसरणीपुरताच मर्यादित नाही. आजकाल विरोध करण्याची एक नवीन संस्कृती तयार झालेली आहे. जो आपल्या विचारसरणीचा नाही तो आपला विरोधक. मग त्याने केलेल्या चांगल्या उपक्रमांनासुद्धा विरोध करायचा. का? कारण आम्ही विरोधक. आणि जो आपल्या विचारसरणीचा आहे त्याला पूर्ण पाठिंबा. त्याने भ्रष्टाचार केला, चोरी केली व सत्तेचा वापर करून सरकारी तिजोरीवर दरोडा घातला तरी त्याचे समर्थन. वा मूग गिळून गप्प बसायचे. मला 1987 मध्ये झालेल्या विनयभंग प्रकरणाच्या आंदोलनाची आठवण झाली. तत्कालीन सभापती दयानंद नार्वेकराविरुद्ध संपूर्ण गोवा त्यावेळी पेटून उठला होता. मात्र तेव्हाच यशस्वी झालेल्या कोंकणी राजभाषेच्या आंदोलनातील पुढाऱ्यांनी नार्वेकरांना पाठिंबा दिला होता. का? कारण राजभाषा आंदोलन काळात ते कोंकणीच्या बाजूने उभे राहिले होते. म्हणजे कोंकणीला पाठिंबा देणाऱ्यांना विनयभंग करण्याची पूर्ण मुभा. मला आमच्या जाण्टेल्यांची कोंकणी म्हण आठवलीः “नाक खंय आनी आदोळी खंय?”

याऐवजी कोणीही समाजोपयोगी गोष्ट करतो त्या गोष्टीला पाठिंबा द्यायचा आणि समाजविघातक गोष्टी करतो त्या गोष्टीला विरोध करायचा ही संस्कृती आपण का अंगिकारू शकत नाही? परवाच मला एक एस्एम्एस् आला. भारतीय संविधनातील सर्वोत्कृष्ट सुधारणा आणिबाणीच्या काळात झालेल्या होत्या. खास करून वैज्ञानिक दृष्टिकोणासारख्या मूलभूत कर्तव्यांच्या सुधारणा नुरुल हसनसारख्या व्यक्तीमुळे होऊ शकल्या. प्रश्र्नच नाही. पण म्हणून त्यासाठी आणिबाणीचा काळ हा सर्वात जास्त सुधारणावादी काळ होता असे म्हणायचे का? आणि त्यासाठी काँग्रेसचा जयजयकार करायचा का? आणि मग इंदिरा गांधींची हत्या करण्यास शीख अतिरेकी कारणीभूत होते म्हणून दंगलीच्या नावे निरपराध शिखांची कत्तल करण्याच्या निर्दयी कृत्याला पाठिंबा द्यायचा का? आणि गुजरात औद्योगिक दृष्ट्या संपन्न केला म्हणून हजारो निरपराध मुसलमानांची कत्तल करणाऱ्या गुजरात दंगलीचे भाजपा समर्थकांनी समर्थन करायचे का? शेवटी हे सगळे राजकारण असते आणि कुणी तरी आमची दिशाभूल करून त्यावर आपली स्वार्थाची पोळी भाजून घेत असते हे आपण लक्षातच घेणार नाही का?

तसे असते तर मग सतीविरोधी कायदा आणला वा बालविवाहाची वयोमर्यादा वाढवली म्हणून आमच्या विद्वान पुढाऱ्यांनी ब्रिटीशविरोधी आंदोलन उभारलेच नसते. प्रागतिक राज्यकर्ते म्हणून त्यांचा जयजयकार करून त्यांचेच राज्य पाहिजे म्हणून चळवळ केली असती. आपला देश कधी स्वतंत्र झालाच नसता. पोर्तुगीज सिव्हिल कोड समानतेचे तत्व सांगतो म्हणून गोवा मुक्त झाल्यावर आपण आजही तो चालूच ठेवला आहे. पण म्हणून त्यासाठी पोर्तुगिजांचीच राजवट इथे चालूच रहावी अशी भुमिका आमच्या स्वातंत्र्यसैनिकांनी घेतली असती तर? जेकब नांवाचे एक निवृत्त लष्करी अधिकारी राष्ट्रपती राजवटीत गोव्याचे राज्यपाल होते तेव्हा त्यांनी प्रशासन उत्कृष्टपणे चालवले व म्हादय, नेत्रावळी अशी सर्व जंगले अभयारण्ये म्हणून घोषित करून आमची निसर्गसंपत्ती शाबूत ठेवली. पण म्हणून काय निवडणुकाही नकोत आणि लोकप्रतिनिधींचे राज्यही नको, राष्ट्रपती राजवट ठेवूनच लोकशाही राबवावी अशी मागणी करणे योग्य ठरेल का?

पण म्हणून विरोध करायचाच नाही का? नक्की करावा. परंतु तो व्यक्तिनिष्ठ (सबजेक्टिव्ह) नसावा, वस्तुनिष्ठ (ऑबजेक्टिव्ह) असावा. व्यक्ती, पक्ष, संघटना, राज्य, देश अशा निकषांवर विरोध करणे कितपत बरोबर? यातूनच तर युद्धे होतात ना? म्हणजे गोव्यात परप्रांतीय येतात म्हणून त्यांच्या नावे बोटे मोडायची, आपल्या अधोगतीसाठी त्यांना जबाबदार धरायचे आणि मग नोकरी-धंद्यासाठी परप्रांतात निघून जायचे आणि तिथे परप्रांतात इंटरनेटवर बसून गोव्यात होणाऱ्या परप्रांतियांच्या लोंढ्यावर टीका करीत बसायचे. त्याऐवजी लोक आणि समाज या गोष्टी डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येक घटनेचे, कृतीचे वा कृत्याचे विश्र्लेषण केले तर? निष्ठा व्यक्ती वा माझ्या मायभूमीशी नाही तर त्या मायभूमीवर रहाणाऱ्या लोकांशी आणि सर्वसामान्य समाजाशी ठेवायची आणि प्रत्येक गोष्टीकडे पहायचे. आपला विरोधाचा दृष्टिकोणच बदलून जाईल. मुळात आपला दृष्टिकोणच विशाल बनून जाईल. गवसणी घालण्यासाठी आपणालाच एक संपूर्ण विश्र्व लाभेल. आपल्याच नकळत कुंपण घालून घेतलेल्या डबक्यातून आपण बाहेर येऊ. बेडकाऐवजी डॉल्फिन बनू. बदकाऐवजी गरूड बनू. संकुचिताऐवजी विश्र्वव्यापी बनू. बघा विचार करून. जमलं तर एका नव्या विरोधी संस्कृतीचा साक्षात्कार आपणालाच होईल. लोकली ग्लोबल!

(हा लेख लोकमत गोवा आवृत्तीच्या 26 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाला)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs