दगडी प्रेक्षक संस्कृती

By Sandesh Prabhudesai
19 July 2015 10:35 IST

अकरा कोटींच्या महाराष्ट्रापेक्षा 15 लाखांच्या गोव्यात मराठी चित्रपट महोत्सव जास्त लोकप्रिय होत चाललेला दिसतोय. याचं कारण केवळ चांगलं आयोजन वा अस्सल गोमंतकीय आदरातिथ्य एवढंच नाही, तर मुख्यतः महोत्सवाला मिळणारा प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सगळेच चित्रपट कलाकार फार कोतुकानं ही गोष्ट सांगतात. गोवा ही तशी मुळातच कलासक्त भूमी आहे. म्हणूनच तर इफ्फीसारखा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवसुद्धा इथं सहजगत्या रिगला. अजूनही हवी तशी सिनेमा संस्कृती इथं रुजलेली नसली तरी प्रेक्षक संस्कृती मूळ धरू लागली आहे यात दुमत नाही. ती पूर्वीपासूनच होती, परंतु कलाकृती म्हणून गणला जाणारा सिनेमा कसा असावा, आणि कसा असू नये, याबद्दल हल्ली सर्रास चर्चा होताना ऐकू येते. केरळातला प्रेक्षक याहूनही जास्त चौकस आणि चिकित्सक आहे असे म्हणतात. कारण त्याला कित्येक वर्षांचा इतिहास आहे. त्यामानाने गोव्यात ही जाणीव इफ्फी सुरू झाल्यापासून गेल्या केवळ दहा वर्षांत निर्माण झालेली आहे.

मराठी नाटकांचीही एके काळी अशीच परिस्थिती होती. महाराष्ट्रात मिळत नाही तो प्रतिसाद गोव्यात मिळतो असे सगळेच नाट्यकलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक सांगायचे. प्रभाकर पणशीकर तर म्हणे आर्थिक चणचण सुरू झाली की ‘तो मी नव्हेच’ बाहेर काढून गोव्याचा एक दौरा करून यायचे. आणि गोव्याचा कलाप्रेमी प्रेक्षकही ते नाटक परत परत पहायचा. महाराष्ट्रात बुडालेली काही नाटके केवळ गोव्याच्या दौऱ्यावर तरली असेही कुठेतरी वाचल्याचे आठवते. आज मराठी नाटक पहाण्याजोगे राहिलेले नाही. उलट मराठी चित्रपटाने कलात्मक ‘श्र्वास’ घ्यायला लागल्यापासून नवनवीन उंचीची शिखरे गाठायला सुरवात केलेली आहे. ‘वळू’ काय, ‘राजा हरिश्र्चंद्र’ काय, ‘टाइम पास’ काय, ‘कोर्ट’ काय वा ‘किल्ला’ काय, एकेक विषय काळजाला भिडणारे आणि डोके भंडावून सोडणारे. काही प्रक्षोभक तर काही अगदीच तरल. आता तर ‘बायोस्कोप’ सारख्या प्रयोगातून कवितेला चित्रपटरूप देण्याचा राष्ट्रीय पातळीवरील विक्रम मराठी चित्रपट करायला निघालाय. आणि हे सगळे प्रयोग गोव्याचा प्रेक्षक डोक्यावर घेतोय. म्हणूनच 200-300 प्रतिनिधींतनं सुरू झालेला मराठी चित्रपट महोत्सव आता हजारांचा आकडा पार करायला लागलाय.

बघे आणि प्रेक्षक यांच्यात फरक असतो. बघे हे अचानक आलेले असतात तर प्रेक्षक पूर्वनियोजित येतात. प्रेक्षकांना आपणाला काय बघायचंय ते ठावूक असतं, बघे काय चाललंय ते बघुया या कुतुहलातनं येतात. अचानक काही तरी झालं म्हणून बघे डोकावतात, प्रेक्षक मात्र आपणाला काय पहायचंय ते ठरवूनच आलेला असतो. या दोहोंमध्ये, अर्थातच, प्रेक्षक जास्त महत्वाचा. कारण तो विचारपूर्वक आलेला असतो. म्हणूनच त्याची प्रतिक्रिया जास्त महत्वाची. गोव्यात इफ्फीला, मराठी चित्रपट महोत्सवाला, फेस्टिव्हल ऑफ आयडियाजला, विचारवेध संमेलनाला, इंटरनॅशनल सेंटरच्या लिट फेस्टला, संगीत संमेलनांना, गोवा विद्यापीठात येणाऱ्या विचारवंतांच्या व्याख्यानाला वा साध्या पुस्तक प्रकाशनालासुद्धा गर्दी करणारा प्रेक्षक हा जाणीवबद्ध असतो. तो दिवसेंदिवस वाढतो आहे. त्याच्या या वृद्धिंगत होणाऱ्या अभिरूचीला दिशा देणारा कुठलाच फोलो अप गोव्यात नंतर होत नाही हे मात्र गोव्याचे केवळ दुर्दैव नव्हे तर वैचारिक दिवाळखोरी म्हणायची का?

त्यात भर म्हणून बघेवजा प्रेक्षक नावाचीही एक जात गोव्यात निर्माण व्हायला लागलीय. त्याला या असल्या फेस्टिव्हलच्या गाभ्याशी काहीही देणे-घेणे नसते. ज्या फेस्टिव्हलना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे अशा ठिकाणी आपले अस्तित्व दाखवण्याची व मिरवण्याची त्याची अखंड धडपड चालू असते. म्हणूनच इफ्फीचे चित्रपट बघण्यासाठी एक दमडी मोडत नसलेला हा बघ्या प्रेक्षक इफ्फीच्या उद्घाटन समारंभाचे पास मिळविण्यासाठी सर्व प्रकारची धडपड करतो. हे समारंभ कला अकादमीच्या हजारभरांच्या प्रेक्षागृहातून तीन-चार हजारांच्या स्टेडियममध्ये हलविण्याची परिस्थिती आयोजकांवर आणतो. त्यानंतर मात्र संपूर्ण महोत्सवात तो कोठेच दिसत नाही. कारण तो अभिरुचीसंपन्न प्रेक्षक म्हणून आलेला नसतो, केवळ आपली प्रतिष्ठा मिरवण्यासाठी आलेला एक बघ्या असतो. दुर्दैवाने ही संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

परंतु हाच आहे का गोव्याचा खरा प्रेक्षक? हीच आहे का गोव्याची खरीखुरी प्रेक्षक संस्कृती? आणि त्याची ती दिलखुलास दाद देण्याची संस्कृती आहे का अजून टिकून? गोव्यात व्यावसायिक नाटकांपेक्षा हौशी नाटके जास्त होतात. (की होत असत?) आयोजकांनी फुकटात दाखवलेले संगीताचे वा इतर कार्यक्रम तर चिक्कार होतात. इथे येण्याची कुणावरही सक्ती नसते. पाहिजे तेव्हा या, पाहिजे तेव्हा जा. आवडलं नाही तर मध्येच उठून निघून जा. इथंच खरा अभिरूचीसंपन्नच प्रेक्षक सापडतो. विद्यार्थी दशेत असताना आम्ही रस्ता नाट्य करायचो तेव्हा आम्हाला हे जातिवंत प्रेक्षक चिक्कार सापडायचे. बघे म्हणून गर्दीत डोकावायचे आणि नाटकात पूर्णतया समरस होऊन जाताना आमच्या टोपीत 80 च्या त्या काळात शंभराची नोट दिलदारपणे टाकून जायचे. नाटक संपल्यानंतर अर्धा अर्धा तास आमच्याशी चर्चा करीत वा हुज्जत घालत रहायचे. बसमध्ये वा फेरी बोटीत गाणी म्हणालयला सुरवात केली तर दिलखुलास दाद द्यायचे.

या सर्वात म्हापशाचा प्रेक्षक सर्वात जास्त समरस होणारा असे एकदा प्रभाकर पणशीकरांनीच सांगितले होते. का, तर ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकात औरंगजेबाची भुमिका करताना त्यांना म्हापश्याच्या प्रेक्षकांनी चक्क चपला फेकून मारल्या. तो आपणास मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार होता असेही ते अभिमानाने सांगायचे. म्हापशात रस्ता नाट्य करताना आम्हालाही असाच अनुभव आला होता. त्यात टोपी घातलेला पुढारी लोकांसमोर वर्तुळाकार फिरत त्यांना वेगवेगळी आमिषे देतो. एवढ्यात (आमच्यातलाच एक) प्रेक्षक येऊन त्याची कॉलर पकडतो, टोपी हिसकावून घेतो आणि त्याला हाकलून लावतो असा सीन होता. आमचा ‘तो’ प्रेक्षक येण्यापूर्वीच भलताच एक प्रेक्षक आला आणि त्याची टोपी हिसकावून घेऊन त्याने त्या पुढाऱ्याला अक्षरशः हाकलून लावले. हा अशी उत्स्फूर्त दाद देणारा कलासक्त प्रेक्षक आता विरळा होत चालला आहे का?

मात्र एके ठिकाणी हा प्रेक्षक अजून जिवंत आहे. तो म्हणजे तियात्रामध्ये. कोणतेही कांतार आवडले तर तो नुसत्या टाळ्या वाजवून थांबत नाही वा वन्स मोअरही देत नाही. सगळे सभागृह शिट्यांनी दणाणून सोडतो. कुणीही काहीही न सांगता कांतारिस्ट परत येऊन गायला लागतो. ही खरी दिलखुलास दाद. एम बॉयर तर आपले कांतार रचतानाच पाच कडव्यांची रचायचे. तीन आधी गाण्यासाठी आणि दोन परत-परत शिट्ट्या वाजवल्यावर गाण्यासाठी. दिलखुलास दाद देण्याच्या भारतभर कित्येक पद्धती आहेत. कोण टोप्या उडवतात तर कोण फेटे. प्रेक्षकाची ही दाद हा कलाकाराचा खरा गौरव असतो. बिचकत बिचकत वाजवलेल्या टाळ्या हा खरे तर कलाकाराचा अवमान असतो. परंतु दुर्दैवाने आपण आज टाळ्यांचेसुद्धा रेशनिंग करतोय. टाळ्या वाजवण्यासाठी आपले हात उत्स्फूर्तपणे उठत नाही, शिट्टी वाजवण्यासाठी तोंडात बोटे घालायचे तर सोडूनच द्या.

खुल्या मैदानावरील कलाप्रकार सभागृहातील भिंतीमध्ये बंदिस्त झाले आणि आपणही आपणाला फुटकळ प्रतिष्ठांमध्ये बंदिस्त करून घेतले. आवडलेल्या कलाविष्कारासाठी दिलखुलासपणे टाळ्या वाजवणे, आवडलेल्या विनोदाला तोंड फोडून बिनधास्त हसणे वा काळजाला घाव पडलेल्या सीनसाठी बिनदिक्कत रडणे या भावनाविष्कारांना आपणच आता मुरड घातलेली आहे. आपण हळूहळू पुढच्या रांगेत बसणारे हाय क्लास प्रेक्षक व्हायला लागलोय. संवेदनशून्य. मख्ख. दगडी पुतळे. थोडक्यात – आपणातला संवेदनशील व दिलखुलास प्रेक्षक आपणच मारून टाकतोय. आपण – दिवसेंदिवस – दगड बनतोय! प्रतिष्ठित दगड!!!

(हा लेख लोकमत गोवा आवृत्तीच्या 19 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाला)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs