टॅब्लेट योजना नव्हे, अज्ञान गुंडाळुया

By Sandesh Prabhudesai
17 May 2015 21:36 IST

1. एक दिवस आठवीत शिकणारी माझी मुलगी घरी रडवेला चेहरा घेऊन तोंड फुगवून बसली होती. काय तर तिला दुसऱ्या दिवशी वर्गात एक महत्वाची असाइनमेंट होती, परंतु ती आपले विज्ञानाचे पुस्तकच शाळेत विसरून आली होती. गोव्यात आपण आता एन् सी ई आर टीचीच पुस्तके वापरत होतो. मी त्यांच्या वॅबसायइटवर गेलो, तिथनं आठवीचं विज्ञानाचं पुस्तक अवघ्या काही मिनिटांत डाउनलोड केलं आणि तिला बोलावून विचारलं, “हेच का तुमचे पुस्तक?” पुस्तक बघून तिची कळी लगेच खुलली. मी काय सुचवतोय ते तिला लगेच लक्षात आलं. धावतच जाऊन तिनं आपली टॅब्लेट उघडली, पुस्तक डाउनलोड केलं आणि लागली कामाला... 

2. माशे गावातील माझ्या निराकार विद्यालयाने मला विद्यार्थी आणि पालकांसमोर त्यांना दिलेल्या टॅब्लेटचे उपयोग आणि दुरुपयोग यांवर बोलण्यास सांगितले. मी टॅब्लेटमध्ये घुसलो आणि हादरलोच. तिथे शिक्षणाचा खजिनाच तिळा तिळा न करतासुद्धा दार उघडून तयार होता. माझे 90 टक्के पावर पॉइंट प्रेझेंटेशन टॅब्लेटच्या फायद्यांवरच तयार झाले. तेव्हाचे शिक्षण संचालक अनिल पवार या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होते. त्यांनी तर हे टॅब्लेटचे फायदे संपूर्ण गोवाभर पोचवण्याचा विचार बोलून दाखवला. कार्यक्रम संपल्यानंतर कित्येक शिक्षक व पालकांनी मला भेटून सांगितले – आम्हाला या गोष्टी ठाऊकच नव्हत्या. तुमचे भाषण ऐकून आम्ही अक्षरशः हादरलो....

3. माझे हे प्रेझेंटेशन आधी मुख्याध्यापकांसमोर व्हावे आणि नंतर शाळा-शाळांतून असे पवारांना वाटले आणि त्यांनी हेडमास्टर्स असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याला माझ्याशी बोलायला लावले. मी त्यांना फोनवरच काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या पदाधिकारी हेडमास्तरची एकच ठाम भुमिका होती – सरकारने आम्हाला विश्र्वासात घेतल्याशिवाय या टॅब्लेटस विद्यार्थ्यांना वाटल्या आहेत. तेव्हा त्याचा फायदा असूदे वा नसूदे, आमचा या विषयाशी काहीही संबंध नाही. एका शिक्षणतज्ञाचे हे महान विचार ऐकून आता हादरण्याची पाळी माझी होती...

आणि आता शेवटी सरकारने ही टॅब्लेट योजनाच गुंडाळण्याचे ठरवले आहे. अजून रद्द केलेली नाही, परंतु स्थगित ठेवलेली आहे. बहुतेक ही योजना का सुरू केलीय हेच शिक्षण खात्याला ठाऊक नव्हते, त्यामुळे ती का स्थगित ठेवायची याचीही ठोस कारणे त्यांना ठाऊक नाहीत. टॅब्लेटचा उपयोग करण्यापेक्षा गेम्स खेळण्यात आणि इतर गोष्टींसाठी त्याचा दुरुपयोगच होतो हा मुद्दा एवढा प्रखऱ बनला की शेवटी ही योजना गुंडाळण्यात आली. ई-शिक्षणाचा पायाच खणून काढला. मग काही वर्षांनी आपण परत एकदा ओरडू – आम्हाला विकासाची ही बस चुकली आणि ती बस चुकली!

मुले टॅब्लेटचा उपयोग करत नाहीत हे खरे आहे. पण मग मूलभूत प्रश्र्न हा येतो, की टॅब्लेटचा उपयोग काय हे तरी किती लोकांना ठाऊक आहे? पालक वा शिक्षकांचे सोडून द्या, खुद्द शिक्षण खात्यातील किती लोकांना ठाऊक आहे? वा किती शिक्षणतज्ञांनी त्यावर विचार केलेला आहे? ही टॅब्लेट देताना शिकण्यासाठी म्हणून एक एज्यु-टॅब नावाचे एप्लिकेशन घालून मुलांना दिले. त्यात होता केवळ अभ्यासक्रम, काही न चालणारे व्हिडियो व हँगमॅनसारख्या शैक्षणिक गेम्स. आजकाल पुस्तके आणि वह्यांनी भरलेली बॅग पाठीवर मारून जाणे हेच शिक्षणाचे पहिले ओझे झालेले आहे. ती सर्व पाठ्यपुस्तके एका टॅब्लेटमध्ये मावू शकतात ही साधी गोष्टसुद्धा लक्षात घेतली गेली नाही. उलट टॅब्लेट शाळेत घेऊन यायची नाही हीच सक्त ताकीद देण्यात आली. मग मुले काय ती टॅब्लेट घरी ठेऊन तिची पूजा करणार? त्यांनी ती आपणास हवी तशी वापरल्यास मुले का दोषी?

प्रत्यक्षात पाठ्यपुस्तके सोडाच, 8 वा 16 जीबीचे कार्ड घातले तर शेकडो पुस्तके या एका टॅबमध्ये ठेवता येतात. एन सी ई आर टीची तर सगळी पुस्तके फुकट डाउनलोड करता येतात. त्याच धर्तीवर गोव्यात छापलेलीही पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देता येतात. त्याशिवाय अवांतर वाचनाची कित्येक ई-बूक्स फुकटही मिळतात व ज्यांना परवडते ते ऑनलाइन विकतही घेऊ शकतात. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची एक-एक भली मोठी लायब्ररीच एका छोट्या टॅबमध्ये! शिक्षकांना नोट्स द्यायचे असतील वा होमवर्क द्यायचा असेल तर तो डिक्टेट करण्यात वेळ वाया घालवण्याचे कारण नाही. एक तर शाळेने वॅबसाइट तयार करून तिथे प्रत्येक शिक्षकाने आपले नोट्स वा होमवर्क घालावेत वा फुकटात उपलब्ध असलेले आपापले ब्लॉग्स तयार करावेत. विद्यार्थ्यांचाही वेळ वाचेल आणि शिक्षकांचे श्रमही. हे सगळे करण्यासाठी सिम कार्डवर नॅटपॅक पाहिजे वा घरी ब्रॉडबँड पाहिजे असेही नाही. प्रत्येक शाळेत वायफाय उपलब्ध करून देण्याची तयारी झालेलीच आहे. ती लगेच कार्यान्वित करावी.

मुलांना हव्या असलेल्या कित्येक गोष्टी या टॅबवर हाताशी उपलब्ध आहेत. कॅलक्युलेटर आहे. एक आणि दोन नव्हे, शेकडो शब्दकोश (डिक्शनरी) आहेत. सर्व भाषांतील. त्यांची एप्लिकेशनस् उपलब्ध आहेत. त्यांवर पैसे खर्च करण्याची गरज नाही. फुकट. शिवाय विकिपिडिया वा यू ट्यूबवर गेल्यास इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित वगैरे कित्येक कठीण विषय सोपे करून शिकवणारी प्रात्यक्षिके आहेत, गेम्स आहेत आणि फोटो आणि व्हिडियोंनी भरलेली रंजक माहितीही आहे. जगातल्या सर्व भाषा कशा लिहाव्यात आणि त्याचे उच्चार कसे असावेत यावर चिक्कार व्हिडियो उपलब्ध आहेत. एवढेच कशाला, इंग्रजी आणि देवनागरी टायपिंग कसे करावे याचीही व्हिडियो प्रात्यक्षिके आहेत. टायप करायला शिकणे ही आजची गरज आहे. हे सर्व काही टॅब्लेटवर आहे.

टॅब्लेटवरील गेम्सबद्दल आपल्या मनात एक आकस आहे आणि मुले सतत गेम्सच खेळत असतात ही आपली तक्रारही आहे. परंतु या गेम्स महत्वाच्या असतात म्हणून शिक्षण खात्याने एज्यु-टॅब मध्ये सुद्धा गेम्स घालून दिलेल्या आहेत. शिवाय विद्यार्थ्यांना गरजेच्या असलेल्या शेकडो एज्युकेशनल गेम्स टॅब्लेट्सवर आहेत. त्याचा एक वेगळा विभागच आहे. यातल्या काही गेम्समुळे गणित वा विज्ञानासारखे किचकट विषय सोपे होऊन जातात, कौन बनेगा करोडपतीसारख्या काही गेम्समुळे आपले सामान्य ज्ञान वाढते, मुलांची एकाग्रता, आव्हानांना सामोरे जाण्याची वृत्ती आणि इंटेलिजंट कोशंट (आयक्यू) वाढविणाऱ्याही गेम्स आहेत. मात्र त्याचबरोबर मारामारी करणाऱ्या, अपघात करीत जाणाऱ्या वा उगाचच वेळ घालवणाऱ्याही गेम्स यात आहेत. त्यातल्या कुठल्या चांगल्या आणि कुठल्या वाईट हे मात्र समजून घेणे महत्वाचे आहे.

टॅब्लेटचे एक नव्हे कित्येक उपयोग आहेत. पण त्यातले उपयोगी कोणते आणि घातक कोणते हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी पालक व शिक्षकांनीही टॅब्लेट शिकणे अत्यंत गरजेचे आहे. समाजात डोळ्यांसमोर असणाऱ्या कित्येक घातक गोष्टींपासून आपण आपल्या मुलांना दूर ठेवत नाही का? आपण ते करू शकतो, कारण आपणाला त्यातले बरे-वाईट ठाऊक असते. टॅब्लेट हे नवीन तंत्रज्ञान आहे. समजत नसेल तर या वयातसुद्धा ते शिकून घेण्याची जबाबदारी शिक्षकांचीही आहे आणि पालकांचीही. ज्यांचे पालक शिक्षित नसतील त्यांची जबाबदारी शिक्षक घेत नाहीत का? तसाच प्रकार टॅब्लेटबाबतही करावा लागेल. जेव्हा आपण शिकू तेव्हा आपल्याच लक्षात येईल त्यातल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी. आणि मग टॅब्लेटमुळे मुलांचेही शिक्षण सोपे, जलद होईल आणि पालक व शिक्षकांचेही जीवन तणावमुक्त होईल. फक्त त्यासाठी हवी शिकण्याची तयारी आणि नव्या तंत्रज्ञानाचे स्वागत करण्याची तयारी.

आपले आरोग्य सुधारण्यासाठी आपण टॅब्लेट घेतोच. आपल्या मुलांचे शैक्षणिक आरोग्य सुधारण्याचे औषध म्हणजे ‘ही’ टॅब्लेट आहे. यातून एक नवीन शैक्षणिक संस्कृती तयार होईल. डिजिटल संस्कृती. त्यात आपण मागे पडून अजिबात चालणार नाही. कारण ही संस्कृतीच आपले भवितव्य घडवणार आहे. खरे म्हणजे टॅब्लेटची योजना गुंडाळून आपण आपले स्वतःचे अज्ञान झाकण्याचा प्रयत्न करीत आहोत, आपल्या मुलांचे भवितव्य उज्वल करण्याचा नव्हे. गरज आहे ती आपण - म्हणजे शिक्षक, पालक, शिक्षणतज्ञ, शिक्षण अधिकारी आणि राजकारण्यांनी – सज्ञानी होण्याची. विधानसभा पेपरलेस केल्यापासून ई-संस्कृतीचे फायदे आमदारांना उमजलेच आहेत. तेच शैक्षणिक क्षेत्रातही येऊ द्या. त्यासाठी शिक्षक व पालकांना सज्ञानी करण्याची योजना हाती घेणे आवश्यक आहे. त्याऐवजी टॅब्लेट योजना गुंडाळणे ही केवळ वैचारिक दिवाळखोरीच नव्हे, आत्मघात आहे!

(हा लेख लोकमत गोवा आवृत्तीच्या 17 मे 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाला)

 

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs