सोशल मिडिया दांभिक की ओपन?

By Sandesh Prabhudesai
06 April 2015 21:14 IST

जागतिक रंगभूमीच्या निमित्याने पणजीच्या अभिव्यक्ती युवा जागृती या संस्थेने सुनापरान्तामध्ये एक छोट्याशा नाटकाचा प्रयोग केला. ‘फेस... ऑफ... लायन’. अनघा देशपांडेनं लिहिलेलं, युवा कलाकारांनी इम्प्रुवाइज केलेलं आणि साईश देशपांडेनं नटवलेलं. विषय होता आजचा आणि रोजचाच. सोशल नेटवर्कचा. म्हणजे फेसबूक, ट्विटर, गूगल प्लस, इन्स्टाग्राम ते वॉट्स ऍप पर्यंत सगळं काही. मागे बॅकड्रॉपमध्ये भली मोठी जाळी. नॅट. आणि सर्व कलाकार डोळ्यांवर मास्क – बुरखा – घालून. प्रत्येकाच्या हातात मोबाइल मस्ट. तोंडांतनं बोलायच्या डायलॉगपेक्षा सोशल मिडियावरील चॅट जास्त. म्हणून संगणक आणि प्रोजेक्टरचा वापर करून हे सगळे संवाद छोट्याशा पडद्यावर दाखवले होते. मस्तपैकी प्रायोगिक शो. वेगवेगळ्या प्रसंगांचा कोलाज. शेवटी काहीजण सोशल नेटवर्कला विटतात, निषेध करतात, परंतु सर्वांना जाळ्यात पकडून ठेवून प्रयोग संपतो. डिस्टर्बही करतो.

सगळी मुले-मुली एकत्र बसलेली, पण सगळ्यांच्या माना खाली – मोबायलवर केंद्रित. कुणीच कुणाशी प्रत्यक्ष तोंड उघडून बोलत नाही. मात्र सगळे मोबायलवर व्हर्चुअल चॅट करण्यात गुंग. खोलीचं दार बंद करून तासन् तास चाललेलं मुलाचं चॅट आणि यातलं ओ की ठो कळत नसल्याने आई-वडिलांची होणारी घालमेल. ऑनलाईन असूनसुद्धा चॅटवर न आल्यामुळे झालेले गैरसमज आणि त्यातनं भांडणं. चॅटचा फायदा घेऊन इतर मित्रांनी जिगरी दोस्तांची लावलेली भांडणं. दुसऱ्याचा फोटो अपलोड करून कार्यशून्य मुलानं स्वरुपसुंदर मुलीला घातलेली भुरळ व सत्य उघडकीस आल्यावर दिलेली जस्टिफिकेशन्स. फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर वापरून तयार केलेले मुलीचे पोर्नोग्राफिक फोटो आणि त्यातनं उभं झालेलं सायबर क्राइमचं रामायण. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनातला दुस्वासी चेहरा आणि टाइमलायनवर दाखवलेला सोज्वळ चेहरा यांच्यातली भोंदूगिरी.

हे फक्त नाटकात घडत नाही. प्रत्यक्षात आमच्या सभोवताली सर्वत्र आज हेच घडतंय. घरात, दारात, कार्यालयात, शाळा-कॉलेजात, बस स्टॉपवर, बसमध्ये आणि कुठेही. ही आपली नवीन डिजिटल संस्कृती. ज्यांना हे कळत नाही ते त्यातले नेगेटिव्हज शोधून काढून सोशल नेटवर्कवर टीका करीत फिरणार. त्यांनाच मग जेव्हा ते जमायला लागतं तेव्हा तेही हळूच फेसबूक वा वॉट्स ऍपच्या प्रेमात पडणार आणि मग त्यांच्या टीकेची धारही हळू हळू बोथट होत जाणार. युवा पिढीच्या बाबतीत मात्र वेगळं. त्यांच्यात टीकाकार चुकून कोणी तरी. कारण एकेक नवीन पिढी ही डिजिटल पिढी म्हणूनच तयार होतेय. बोलणे, हसणे, खिदळणे, वादावादी करणे, रुसणे, भांडणे अशा क्रियापदांपेक्षा टेक्स्टिंग, मॅसेजिंग, चॅटिंग, वॉट्सऍपिंग, लायकिंग, फोलोविंग, अनफोलोविंग, अनफ्रँडिंग ही त्यांची नवीन क्रियापदे. आणि या क्रियापदांतनं घडत चाललेली नवीन संस्कृती.

हल्लीच वॉट्स ऍपवर एक विचार इथून तिथे फिरत होता. वॉट्स ऍप हा क्लोज ग्रूप असल्याने आपण तिथे मनमोकळेपणाने बोलतो. परंतु त्याच गोष्टीवर फेसबूकसारख्या जाहीर नेटवर्कवर बोलताना आपला नूर बदलतो. अचूक हीच गोष्ट या नाटकातूनही दाखवण्यात आली होती. सगळी पात्रे मास्क घातलेली. मनात एक आणि स्टेटस भलतेच. माझ्या काही मित्रांच्या मते सगळे सोशल नेटवर्क म्हणजे दांभिकांचे क्लब्स आहेत. आपणाला न आवडलेली गोष्टसुद्धा ‘लायक’ करणारे. आणि कुणी आपणास मिळालेल्या बक्षिसाचा फोटो घातला तर, ‘मिळाले असेल वशिला लावून’ असे मनात म्हणतो आणि त्याच्याबद्दल असूयाही बाळगतो, परंतु फेसबूकवर मात्र – ‘हे बक्षीस तुलाच कसे योग्य होते’ आणि ‘यातनं या बक्षिसाचाच सन्मान झालाय’ वगैरे वगैरे. सर्वात आधी ‘लायक’ तर हे यश त्याला मिळू नये म्हणून सर्व प्रकारचे प्रयत्न करणाऱ्यांचे. त्याचबरोबर सोशल नेटवर्कवर उलटाही प्रवास चालतो. एखाद्याविषयी सहानभूती असली तरी तो आपला विरोधक असल्याने जाहीररित्या त्याच्यावर टीका करणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेने आपण निर्दय बनून त्याच्यावर तुटून पडतो. त्याला नामोहरम करतो. खास करून सामाजिक वा राजकीय प्रश्र्नांवर हे हमखास पहायला मिळते. त्यासाठी गँगअपसुद्धा होतो. काही राजकीय पक्षांनी तर त्यासाठी पगारी नोकरदार ठेवलेत.

हे सगळं जरी खरं असलं तरी एक प्रश्र्न रहातोच. ही बुरखाधारी संस्कृती या सोशल नेटवर्कमुळे तयार झालीय का? फेसूबक, ट्विटर, गूगल प्लस, वॉट्स ऍप वगैरे आपणाला दांभिक बनवत चालले आहेत का? माझ्या मते तरी अजिबात नाही. ही दांभिक संस्कृती हा मानवी प्रवृत्तीचा भाग आहे. या कृतींमागे असूया, फायदा, स्वार्थ, महत्वाकांक्षा, बडेजाव अशा अनेक प्रवृत्ती कारणीभूत असतात. आणि या प्रवृत्ती आपण युगानयुगे पहातच आहोत. त्यावरनं घडलेली रामायणे आणि महाभारते आपले पुराणग्रंथ बनलेले आहेत. तोंडावर गोड गोड हसणे आणि मागून त्यांचेच पाय ओढून आपण ती जागा बळकावून बसणे ही मानवी विकृती तेव्हापासून आजतागायत चालूच आहे. ही महान मानवी परंपरा पुढे नेण्यासाठी आता माहिती तंत्रज्ञानाने आणखीन काही नवीन माध्यमे तयार केली आहेत एवढेच. कालपर्यंत आपण खलबते करणे, अफवा पसरवणे, विष कालवणे, षडयंत्र रचणे असले मार्ग अवलंबत होतो. आजही ते अवलंबितोच. परंतु सोशल मिडियामुळे तो मार्ग थोडा सुकर झालाय. दुसऱ्याला बदनाम करणे आजकाल जास्त सोपे झालेय. लोकांना भडकावण्यात तर सोशल मिडियाचा हात धरणारा कुणीच नसेल.

थोडक्यात – संस्कृती तीच आहे, माध्यमे तेवढी नवीन, एवढाच काय तो फरक.

या झाल्या नकारात्मक गोष्टी. मात्र सकारात्मक दृष्टीने आपणे सोशल मिडियाकडे बघितले तर त्यातून एक नवीन फार चांगली संस्कृती रुजायला लागली आहे असेच आपणाला जाणवेल. कालपर्यंत आपल्याच कंपूमध्ये गुरफटलेला माणूस अनोळखी माणसाशीसुद्धा दोस्ती करायला लागलाय. त्यातून व्हर्चुअल का असेना, परंतु नवीन मित्रांचा गोतावळा वाढत चाललाय. माणूस दिवसेंदिवस ओपन होत चाललाय. आपले दैनंदिन जीवन सार्वजनिक बनवू लागलाय. एकामेकांच्या आनंदात सहभागी होऊ लागलाय. बर्थडेला विश करण्यापासून मृत्यूवेळी शोक प्रगट करण्यापर्यंत तो परत एकदा कम्युनिटी स्पिरिट अंगिकारायला लागलाय. पूर्वी गावात व छोट्या असलेल्या शहरात हे कम्युनिटी स्पिरिट बघालयला मिळायचे. एखाद्याचे लग्नकार्य व घराची दुरुस्ती हासुद्धा सार्वजनिक उपक्रम असायचा. परंतु हळूहळू गावे ओस पडायला लागली, शहरातील माणूस घरातून वा चाळीतून फ्लॅट संस्कृतीत घुसला आणि आपापल्या दाराआड गडप झाला. एकामेकांपासून तुटायला लागला. आत्मकेंद्रित व्हायला लागला. एककल्ली व्हायला लागला.

सोशल मिडिया आज या भिंती तोडायला लागलीय. या एककल्लीपणातून एकदम सोशल होणे शक्य नाही. म्हणून तो कधीकधी सोशल असण्याचा आव आणतो. त्यामुळे दांभिक वाटतो. असतोही. परंतु ही संक्रमणावस्था आहे. नवीन पिढी त्यामानाने जास्त सोशल होऊ लागलीय. दांभिकपणा सोडून देऊन पूर्णतया सार्वजनिक व्हायला एक-दोन पिढ्या नक्की जातील. त्या प्रक्रियेत सर्व प्रकारच्या वृत्ती-प्रवृत्ती आपणाला आढळतील. अशावेळी फक्त त्यातील नकारात्मक प्रवृत्तींकडे बोट दाखवून आपण काय करतोय? आपल्यामध्येही लपलेल्या नकारात्मक प्रवृत्तीचे आणि विकृतीचे अप्रत्यक्षरित्या समर्थन? त्यापेक्षा आपण या सोशल मिडियाच्या सकारात्मक अंगांकडे मुक्त मनाने पाहुया. ओपन मायंडेड होवुया. त्यातनं सोशल मिडियाच्या सकारात्मक अंगांना बळकटी मिळेल. आणि सर्वांनीच जर असं केलं तर – कदाचित – काल गावात हरवून आलेलं सार्वजनिक मन परत जागं होईल. एक नवी सार्वजनिक संस्कृती घरा-घरातून वसू लागेल. कदाचित. जर आपण आपलं मन मुक्त केलं तर, आणि तरच.

(हा लेख लोकमत गोवा आवृत्तीच्या 5 एप्रिल 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाला)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs