‘गावठी’ खाद्यसंस्कृतीचा ठेवा

By Sandesh Prabhudesai
15 March 2015 13:26 IST

‘पोटपुजा’ या उषा वामन बाळे यांच्या गोमंतकीय खाद्यपदार्थांच्या कोंकणी पुस्तकाने गोव्यात एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. अवघ्या 18 दिवसांत दुसरी आवृत्ती. खुद्द संजना पब्लिकेशन्सलासुद्धा हा आश्र्चर्याचा धक्काच होता. इंटरनेटवर आणि खास करून फेसबूकवरून या पुस्तकाचा प्रकाशनपूर्व प्रसार करून शेकडो प्रती प्रकाशनाआधीच आरक्षित केल्या गेल्या. अगदी पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि अमेरिकेमध्येसुद्धा. काहींनी तर दहा-पंधरा-वीस-तीस अशा प्रती घेऊन आपल्या जगभरातील नातेवाईकांना पाठवून दिल्या. गोव्यातील काही प्रतिष्ठित पुस्तक विक्रेत्यांनी प्रती मागवून घेतल्या. त्याशिवाय हे पुस्तक इंग्रजीतून यावे ही मागणी वाढत चालल्याने प्रिंटर्स डेव्हिल्सच्या सपना सरदेसाय आता कामाला लागल्या आहेत.

असे काय आहे या पुस्तकामध्ये? गोमंतकीय खाद्यपदार्थांचे काय हे पहिलेच पुस्तक आहे? यापूर्वीही अस्सल गोमंतकीय खाद्यपदार्थांची कित्येक पुस्तके आलेली आहेत. या पुस्तकातही एकूण 253 पाककृती आहेत. मात्र त्यातील कित्येक शाकाहारी आहेत. आपण गोमंतकीय मासळीप्रिय असलो तरी मासळीच्या पाककृतींमध्ये विविधता असते ती केवळी मासळीची. परंतु शाकाहारी पाककृतींची विविधता या पुस्तकामध्ये सापडते. कित्येक पाककृती तर प्रचलितसुद्धा नसलेल्या आणि तरीही तोंडात पाणी आणणाऱ्या. परंतु याहूनही फार मोठी अशी गोमंतकीय समाजाची गरज या पुस्तकाने भागवलीय. ब्रेकफास्टाचे पाच आठवड्यांचे तर जेवणाचे आठ आठवड्यांचे वेळापत्रक. तेही कोणत्याही खाद्यपदार्थाची पुनरावृत्ती नसताना. एकत्र कुटुंब पद्धती एका बाजूने नामशेष पावलेली असतानाच नवरा-बायको दोघेही कामावर जाणारी बहुतांश कुटुंबे गोव्यात सापडतील. बायको गृहिणीच असली तरीही एकत्र कुटुंब नसल्याने घरकामाचा बोजा तिच्या एकटीवरच पडतो. अशा वेळी ‘उद्या काय रांधायचे?’ हा सर्वात मोठा यक्षप्रश्र्न या पुस्तकाने सोडवलेला आहे. म्हणूनच हे पुस्तक हातोहात खपतेय.

वेळापत्रकाचे पहिले पुस्तक, 18 दिवसांत दुसरी आवृत्ती काढणारे पहिले पुस्तक असे कित्येक विक्रम या पुस्तकाने प्रस्थापित केले यात शंकाच नाही. परंतु अस्सल पारंपारिक गोमंतकीय खाद्यपदार्थांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे कामही या पुस्तकाने केले. आणि त्याचीच प्रचिती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी आली. यावेळी प्रकाशनाच्या वतीने दिनेश मणेरकर यांनी एक चर्चासंत्र पणजीत आयोजित केले. “पारंपारिक गोमंतकीय खाद्यपदार्थांतील पौष्टिकता.” या चर्चासत्रात केटरिंग महाविद्यालयाचे संजीव कडकडे व म्हापसाच्या आझिलो हॉस्पिटलच्या आहारतज्ञ तृप्ती नेवरेकर पॅनलवर होत्या तर होम सायन्स महाविद्यालयाच्या प्रा वर्षा नाईक व आयुर्वेदिक डॉक्टर रेष्मा बाळे प्रेक्षकांमध्ये होत्या. त्याशिवाय इतरही तज्ञ मंडळी व संजय तळवडकरसारखे खवय्येही होते. त्या सर्वांनीच वेळापत्रक बनवताना या पुस्तकात पौष्टिकतेचा समतोल सांभाळल्याबद्दल उषा बाळेंचे अभिनंदन केले व गोमंतकीय खाद्यपदार्थ पौष्टिकतेने कसे भरलेले आहेत तेही शास्त्रीयदृष्ट्या पटवून दिले. म्हणजे प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट्स, व्हिटामिन्स, फॅट्स, फायबर वगैरे वगैरे.

गोव्यात आजकाल आहारातील विविधता वाढलेली असली तरी त्याचवेळी कोणते खाण-जेवण आरोग्यदायक आहे याबाबतही जाणकार गोमंतकीय जागृत झालेला आहे. पंजाबी, गुजराती, दाक्षिणात्य, चायनीज, कॉंटिनेंटल हे प्रकार तर सर्वच रेस्टॉरंटमधून सर्रास पहायला मिळतात. एखाद्या समारंभातील बुफेही असेच असतात. त्यामानाने अल्प प्रमाणात असतात ते पारंपारिक गोमंतकीय खाद्यपदार्थ. गोमंतकीय पाककृतींमध्ये विविधता नसते हा गैरसमज ‘पोटपुजा’ने पुरता फोल ठरवलेला आहे. त्याचबरोबर गोव्यातील वातावरण लक्षात घेऊन त्यानुसार आमच्या पूर्वजांनी या पाककृती तयार केलेल्या असल्याने त्या आपल्या आरोग्यास पोषकच ठरतात. त्यामुळेच आपले आरोग्य ठणठणीत रहात असे व आपले पूर्वज वयाची नव्वदी वा शंभरीसुद्धा सहजरित्या पूर्ण करीत असत हे आता आहारतज्ञ ठासून सांगू लागले आहेत. अशक्तपणा, डायबेटिस, मूत्रपिंडविकार, ह्रदयविकार ते कॅन्सरपर्यंतचे सगळे आजार आपल्या आहाराशी संबंधित आहेत आणि गोमंतकीय पारंपारिक खाद्यपदार्थ खाल्ल्यास या आजारांवर नियंत्रण ठेवणे सहज शक्य आहे असे सर्वच तज्ञांना वाटते. परिसंवादाचाही हाच सूर होता.

तसे पाहता गोमंतकीय पारंपारिक पाककृती या पूर्णतया गोमंतकीय नाहीतच मुळी. ‘पोटपुजा’ पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभावेळी बोलताना उद्योजक व विचारवंत दत्ता दामोदर नायक यांनी हा फुगा उदाहरणांसहित फोडला. शीत-कडी हा गोमंतकीय संस्कृतीचा जणू काही प्राणच. परंतु भाताचा हा तांदूळ दक्षिण पूर्व  आशियातून आला तर गहू, बटाटे, टॉमेटो, अननस, पपया लॅटिन अमेरिकेतून आल्या. मिर्ची चिलीहून आली तर कांदा इजिप्तमधून, लवंग इंडोनेशियातून, तिखी श्रीलंकेतून, केळी इंग्लंडमधून, पेरू पेरूतून तर काजू ब्राझिलमधून आले. अशीच विविध माहिती त्यांनी दिली. त्याशिवाय गोव्यावर एकूण 16 राजवटींनी राज्य केले. त्यातील कोण दक्षिणेचे द्रविड संस्कृतीतले तर कोण उत्तरेच्या आर्य संस्कृतीतले. शिवाय मुसलमान व पोर्तुगीज या दोन परदेशी राजवटीही. सर्वच किमान 150 वर्षांच्या. त्यातून एक मिश्र पद्धतीची खाद्यसंस्कृती गोव्यात रुजली. परंतु ती आजकाल अशिक्षित गणल्या जाणाऱ्या आमच्या पूर्वजांनी आंधळेपणाने स्वीकारली नाही. गोव्याच्या वातावरणाचा अभ्यास करून त्यांनी त्यात योग्य ते बदल केले आणि त्यातून आपल्या आरोग्यास पोषक अशा पाककृती बनवल्या. दुर्दैवाने आज स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या आम्ही या शास्त्रशुद्ध खाद्यप्रकारांकडे पाठ फिरविली आहे. शिवाय आरोग्यास अपायकारक असलेल्या खाद्यपदार्थांवर दणादण ताव मारायला सुरवात केल्याने विविध प्रकारच्या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

गोमंतकीय पाककृतींइतकी विविधता भारतातील आणखीन कुठल्याच खाद्यपदार्थांमध्ये मिळणे बहुधा कठीण. परंतु त्याचे मार्केटिंग आम्ही करीत नाही. गोव्याच्या कुठल्याही रेस्टॉरेंटमध्ये गेल्यास अवघ्याच काही गोमंतकीय पाककृती, त्याही अगदी शेवटी, मेन्यू कार्डमध्ये सापडतील. खतखते आहे का वा मणगणे, पायस मिळेल का म्हणून विचारल्यास आपण त्या गिह्राइकास चक्क हसतो. उलट केरळात गेल्यास त्यांचे पारंपारिक पदार्थ कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये आपणास मेन्यू कार्डवर सर्वात आधी अभिमानास्पदरित्या मिळतील. प्रत्यक्षात आमच्याकडे आहे ते वर्ल्ड कुझ्यिन. पण ते जगाला द्यायचे सोडून आम्ही जगाच्या इतर भागातील उसनी खाद्यसंस्कृती विकत आहोत. हा खरे म्हणजे आमचा कर्मदरिद्रीपणा. हातचे सोडून पळत्यामागे धावण्याचा.

आणि घरीही तीच परावलंबी वृत्ती. गावठी भाजी-पाला खाणाऱ्यास गावठी म्हणून हिणविले जाते. प्रत्यक्षात गावठीतला रुचकरपणा बेळगाव-कोल्हापूरच्या भाजीपाल्यात मिळत नाही. आणि पौष्टिकता तर नाहीच नाही. उलट यांचे विपुल उत्पादनही आपण बंद केलेले आहे. एके काळी मोरजीचा कांदा, मयडेंची मंयडोळी केळी, मयेची चवळी, ताळगांवचा नाब, आगशीचे वांगे,  पर्राचे कलिंगड, सांतिस्तेव्हची भेंडी, कुंकळयेचे अननस, फोंड्याची काकडी, काणकोणची मिर्ची, गांवडोंगरीचें चिबड, चांदर-कुडतरीचा आंकूर, पेडणेचा फेजांव अशी न संपणारी यादी आपणाकडे होती. आज या उत्पादनाचे प्रमाण पाच ते दहा टक्केसुद्धा नाही. त्यामुळे ते कमालीचे महाग झालेले आहे. मात्र त्याची मागणी हळूहळू वाढत चाललेली आहे.

गोव्याच्या खाद्यसंस्कृतीत जागतिक स्वरूप घेण्याची ताकद आहे. पण ती तशी व्हायची असेल तर ‘गावठी’ हा गोव्याचा मंत्र व्हायला हवा. घराघरात ती रुजायला हवी. गोव्यातील प्रत्येक रेस्टॉरंटच्या मेन्यू कार्डवर तिने स्वाभिमानाने मिरवायला हवे. तीच असेल आमच्या सांस्कृतिक वारश्याची पूजा – पोटपूजा!

 

(हा लेख लोकमत गोवा आवृत्तीच्या 15 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाला)

 

 

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs