युवा महोत्सवाची जनसंस्कृती

By Sandesh Prabhudesai
28 January 2015 11:34 IST

जानेवारी-फेब्रुवारी हे विद्यार्थी व युवकांसाठी महोत्सवांचे दोन महिने असतात. ते संपले की मग पुस्तकात डोकी खुपसायची ती एप्रिल-मे पर्यंत. रिफ्रेश्ड मन घेऊन अभ्यासाला लागायचं. ही आता खास करून गोव्याच्या विद्यार्थी वर्गाची संस्कृतीच झालीय. त्यात भर म्हणून सरकारी पातळीवरील युवा महोत्सव, काणकोणच्या आदर्शचा लोकोत्सव व कोंकणी भाशा मंडळाचा गोवा युवा महोत्सव यांचीही त्यात भर पडते. केवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या महोत्सवाचा पाया, मी जर चुकत नसेन तर, गोवा इंजिनिरयरिंग कॉलेजने ‘हॅपनिंग्स’ मधून 1980च्या दशकात घातला. त्यानंतर कित्येक महाविद्यालयांनी महोत्सव सुरू केले व ते अंतर्धानही पावले. इंजिनियरिंग कॉलेजचा ‘हॅपनिंग्स’ तर कित्येक वर्षांनी यंदा परत सुरू होतोय. आणखीनही आहेत. धेंपो कॉमर्सचा ‘कॅओस’, साळगावकर कायदा महाविद्यालयाचा ‘तत्वा’, आर्किटेक्चरचा ‘विस्तारा’, गोवा मेडिकल कॉलेजचा ‘प्लॅक्सक’, गोवा विद्यापीठाचा ‘युथेसिया’ व चौगुलेने यंदापासून सुरू केलेला ‘तथास्तु’. कॉलेजचे हे महोत्सव म्हणजे नुसत्या नाच-गाण्यांच्या स्पर्धा नसतात. एकेक धमाल आयडियास घेऊन मुले स्पर्धा तयार करतात. त्यात आपल्या अफलातून कल्पनाशक्तीची भर घालून मुले-मुली कधी कधी चक्क तोंडात बोटे घालायला लावतात. त्यांच्या व्हिज्युयलायझेशनला तर आकाशसुद्धा ठेंगणे वाटते.

अर्थात या सर्वात उठून दिसतो तो कोंकणी भाशा मंडळाचा गोवा युवा महोत्सव. कधीही खंड पडू न देता सातत्याने गेली 20 वर्षे हा महोत्सव चालतोय. सरकारी महोत्सवात 500 च्या आसपास स्पर्धक असले तर इथे किमान 2500 स्पर्धक असतात. उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये व युवकांचे ग्रुप्स. या महोत्सवाची संस्कृती मात्र इतर महोत्सवांपेक्षा वेगळी आहे. धोल-ताशे वाजवायला येत नाही त्याला या महोत्सवात अडाणी मानले जाते. गोव्याच्या विविध भाशा वा बोली येत नाहीत आणि गोव्याविषयी जास्त काही माहीत नाही तो युवा तर या महोत्सवात बोंडेर ठरतो. कोंकणी भाशा मंडळाचा असला तरी कोंकणीच पाहिजे असे बंधनही कित्येक स्पर्धांमध्ये नसते. तरीही प्रकट होताना ज्यादा टेन्शन येत नसल्यामुळे स्पर्धक कोंकणीचाच वापर करून जातात. मातृभाषेच्या ताकदीचा दृष्टांत त्यांना त्यातूनच घडतो. इथे दिव्याखाली अंधार नसतो.

गोवा युवा महोत्सवाचा गाभा केवळ कोंकणी भाशा हा नसतो. कोंकणी अस्मिता हा मात्र खात्रीने असतो. आणि ही अस्मिता संकुचित प्रादेशिकतेत गुंतून पडू नये याची दक्षता घेतच कित्येक स्पर्धांचे विषय निवडले जातात. त्यामुळे विश्र्वात्मकतेचा व मानवतेचा साक्षात्कार घडवीतच दोन दिवस युवा शक्तीचा एक आगळाच जल्लोष मुक्त मनाने इथे चाललेला असतो. धर्मातील बुवाबाजीपासून राजकारणातील ढोंगबाजीपर्यंत आणि समलिंगी संबंधापासून मुंडकार विधेयकापर्यंत कोणताच विषय गोवा युवा महोत्सवात वर्ज्य नसतो. कविता, गीत, संगीत, लोककला, नृत्य, नाट्य, तियात्रातला ट्रियो, वक्तृत्व, चित्रकला, शिल्पकला, सिनेमा, वेषभूषा, गोव्यावरील प्रश्र्नमंजुषा असे विविध प्रकार चौकटीबाहेरील स्पर्धांतून युवकांच्या कल्पनाशक्तीला आव्हान देत असतात. म्हणूनच अटीतटीच्या स्पर्धेतून या सर्जनशीलतेचा खणखणाट एकाच वेळी कित्येक मंडपातून अव्याहत चालू असतो.

गेल्या वर्षाचे विजेते ‘अंत्रूज घुडयो’ व केपे सरकारी महाविद्यालयाची यंदाच्या महोत्सवात शेवटपर्यंत अटीतटीची स्पर्धा चालू होती. शेवटी केपे महाविद्यालय विजेते ठरले. उपविजेतेपद पटकावलेला ‘अंत्रूज घुडयो’चा युवक-युवतींचा संपूर्ण ग्रुप आपला चषक स्वीकारण्यासाठी मंचावर आला व जाहीररित्या ‘थ्री चिअर्स टू केपे महाविद्यालय’ अशी घोषणा देऊन खाली उतरला. ‘मुश्तायकी’सारकी हजरजबाबीपणाचा कस लावणारी स्पर्धा चालू असताना धेंपेच्या अंतरा भिडेने विचारलेल्या प्रश्र्नाला ‘अंत्रूज’च्या ह्रषिकेष कदमने अफलातून उत्तर दिले तेव्हा प्रेक्षक सोडा, भर मंचावर अंतरानेच हाताने इशारे करीत ह्रषिकेषची वाहवा केली. पहिला दिवस संपेपर्यंत संपूर्ण मंडपात आनी मंडपाबाहेरही काही बेजबाबदार विद्यार्थ्यांनी फेकून दिलेल्या प्लास्टिक बाटल्या इतस्ततः पडलेल्या होत्या. एक छोटीशी सूचना करण्याचा अवकाश, कुंकळ्ळीच्या सीईएस महाविद्यालयाच्या मुला-मुलींनी दहा मिनिटांत संपूर्ण परिसरच साफ करून टाकला. त्यांना बघून इतरही युवा-युवती स्वच्छता मोहिमेत साफ झाले. कसलाही गाजावाजा न करता. युवा महोत्सवाची ही दिलदार संस्कृती खरोखरच डोळ्यात पाणी आणणारी होती.

1995 साली हा महोत्सव सुरू झाला त्यावेळी ‘फेस्त करतात’ अशी अवहेलना करीत काही कोंकणी म्हालगड्यांनीच युवकांना घरचा अहेर दिला होता. आजही कित्येक तथाकथित म्हालगडे या मंडपात पायसुद्धा ठेवत नाहीत. परंतु याच महोत्सवातून युवा साहित्य संमेलन साकारले. गोव हितराखण मंच सुरू झाला. ‘म्हादय बचाव’चा नारा देत विद्यार्थी व युवा रस्त्यावर उतरले. भाषा माध्यम प्रश्र्नावरील युवकांचें आंदोलन रस्ता नाट्ये करीत याच महोत्सवातून उभे झाले. प्रमोद मुतालिकाची राम सेने गोव्यात येतेय ही बातमी धडकल्याबरोबर याच महोत्सवातील युवक-युवती खबरदार म्हणत उभ्या ठाकल्या. युवतींचे प्रश्र्न मांडणारी ‘चित्रंगी’ युवकांनाही सोबत घेऊन याच महोत्सवातून उभी झाली. गोव्यातील बिनराजकीय स्वरुपाची स्वतंत्र विद्यार्थी चळवळही आता यातूनच साकारू लागलेली आहे. गोव्यातला प्रत्येक ज्वलंत सामाजिक प्रश्र्न या महोत्सवात चर्चिला जातो. आंधळेपणाने नव्हे, डोळसपणे आणि बेधडक मते मांडून. कधीकधी कडाक्याने भांडूनसुद्धा.

स्पर्धेच्या माध्यमातून युवा महोत्सवाने केवळ कलाकार, लेखक, वक्तेच तयार केले नाहीत. तळमळीने कार्य करणारे कार्यकर्ते व संघटकही तयार केले. म्हणूनच तर शासकीय पातळीवरील युवा महोत्सव आयोजित करण्यासाठी यंदा गोवा युवा महोत्सवाच्या युवक-युवतींना आमंत्रित केले गेले होते. गेल्या 20 वर्षात एका गोवा युवा महोत्सवाने जे कार्यकर्ते व संघटक तयार केले तेवढे गोव्याच्या इतर कोणत्याच राज्य पातळीवरील सर्वच संस्थांनी मिळून केले नसतील. 3000 मुले-मुली एकाच वेळी 10-12 ढोल-ताशे बडवीत आपल्याच धुंदीत नाचत असतात तेव्हा मंचावरून ‘ढोल बंद करा’ अशी विनंती केल्याबरोबर दोन मिनटांत संपूर्ण मंडप शांत होतो. कारण याच महोत्सवातील स्पर्धकांची किमान पाचवी पिढी युवा महोत्सवाच्या आयोजनात आघाडीवर आहे. ते सर्वजण मिळून महोत्सव सुरू होतानाच हातात हात घालून शिस्तबद्धतेची शपथच घेतात – व ती पाळतातही.

दुसऱ्या बाजूने कालचे कार्यकर्ते वा संघटक आज सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, साहित्यिक अशा विविध क्षेत्रात चमकू लागले आहेत. नाटक-सिनेमांपासून शैक्षणिक संस्थांपर्यंत सर्वत्र. कारण युवा महोत्सवाची निरपेक्ष संस्कृती पुढे नेत तन-मन-धन अर्पित करून ते कार्य करीत आहेत. एका बाजूने आत्मकेंद्रीत समाज घडत असताना दुसऱ्या बाजूने या महोत्सवातून सामाजिक जाणीव ठेवून कार्य करणारा युवा वर्गही तेवढ्याच संख्येने तयार होत आहे. अमेरिका वा युरोपकडे डोळे लावून बसलेला नव्हे, डोळ्यात तेल घालून गोव्याचे रक्षण करण्यासाठी तयार झालेला. वेळ येते तेव्हा तो अचानक ज्वालामुखीसारखा उफाळून येतो आणि मग सत्ताधारी धरून सगळयांचीच बोबडी वळते. युवकांमध्ये ही जनमानस-केंद्रित संस्कृती जागती ठेवणाऱ्या गोवा युवा महोत्सवाला म्हणूनच लाख लाख सलाम!

 

(हा लेख लोकमत गोवा आवृत्तीच्या 25 जानेवारी 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाला)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

Thank you. Nice information. Youth programmes help development of character in young adults.

- Sandesh, Mumbai | 04 th February 2015 00:04

 

Related Blogs