मरावे; परि इंद्रियरुपी उरावे

By Sandesh Prabhudesai
19 January 2015 18:22 IST

माणूस मरण पावला की त्याच्यावर अंत्यसंस्कार करायचे ही आपली संस्कृती. विधिवत अंत्यसंस्कार केले की मृत व्यक्तीचा आत्मा स्वर्गात पोचतो हा आपला समज. तो किती खरा, किती खोटा यावर वाद आहे. परंतु एका गोष्टीवर खचितच वाद नाही. तो म्हणजे मृत व्यक्तीचा देह कुठेच जात नाही. तो इथेच या धरणीवर राहतो. तेव्हा त्या देहावर अंत्यसंस्कार करण्याचे वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळे प्रकार आहेत. कुणी अग्नी देतात, कुणी मातीत दफन करतात, कुणी मृतदेह उंच मनोऱ्यावर नेऊन ठेवून पक्ष्यांना बहाल करतात तर कुणी समुद्रांत माश्यांच्या तोंडी देतात. असे एक ना अनेक प्रकार. परंतु आपल्या प्रिय व्यक्तीचा देह सत्कारणी लागावा ही प्रत्येकाची इच्छा असते. आपली स्वतःचीही असते.

यातूनच धार्मिक अंत्यसंस्कार नकोत, देहदान करणे हाच आपला मानवधर्म असे मानण्याचीही नवीन संस्कृती मूळ धरू लागली आहे. आणि ही नवसंस्कृती रुजविणारी पिढी आजची नाही, कालची आहे. गेल्याच आठवड्यात देवेंद्र, सचिन व विकास कांदोळकरांचे 93 वर्षांचे वडील सोनू कांदोळकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी आपला देह गोवा मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलला दान केला. पेडण्यातील कातुर्ली-तुयें गांवातील हे पहिलेच देहदान. परंतु तिथल्या तरुण वर्गाने कसलीही तक्रार न करता या नवसंस्कृतीचे स्वागत केले. देहदानाचा पाया गोव्यात नक्की कुणी घातला ठाऊक नाही. परंतु कांदोळकरांचे मामा व पेडण्यातील शेतकरी पुढारी नामदेव हरमलकर यांनी किमान 15 वर्षांपूर्वी देहदान केल्याचे आठवते.

एक आदर्श शिक्षक म्हणून आजही ज्यांना आदरभावनेने पाहिले जाते ते स्वातंत्र्यसैनिक व राष्ट्र सेवा दलाचे पुढारी रामदास फेणे यांनी तर प्रतिज्ञापत्र वगैरे तयार करून देहदान केले होते. मडगावचे आणखीन एक स्वातंत्र्यसैनिक व कम्युनिस्ट नेते प्रभाकर घोडगे यांनीही देहदान केले होते. ‘गोमंतक टाइम्स’चे संस्थापक संपादक मोहन राव निवृत्तीनंतर गोव्यातच स्थायिक झाले व त्यांनीही आपला देह गोमेकाला दान केला. ही बहुतेक सगळी पिढी 1910 ते 1930 च्या काळात जन्मलेली. 1952 मध्ये जन्माला आलेले सेवा दलाचे माशेलातील नारायण आवटे यांचीही देहदानाची इच्छा त्यांच्या कुटुंबाने आदरपूर्वक पूर्ण केली होती. म्हणजे तरुण असताना या बहुतेकांवर समाजवादी, साम्यवादी वा गांधीवादी विचारसरणीचा पगडा होता. विचारसरणी वेगवेगळ्या, परंतु एका निर्णयावर मात्र ठाम एकमत. मृत्यूनंतरही आपला देह सत्कारणी लागावा ही सदिच्छा.

हल्लीच मडगावचे एक स्वातंत्र्यसैनिक व समाजसेवक मधुकर मोर्डेकर यांचे निधन झाले. त्यांनी तर केवळ देहदानच नव्हे तर आपली इंद्रिये दान करण्याचे प्रतिज्ञपत्र तयार करून ठेवले होते. मृत्यू झाल्याबरोबर त्यांचे डोळे काढले गेले. परंतु इतर इंद्रिये मृत झाल्याने दान करणे शक्य झाले नाही. मात्र त्यांच्या इच्छेनुसार गोमेकाला देहदान केले गेले. अश्या सर्व प्रागतिक गोष्टींसाठी मडगाव शहर सर्वात पुढे असते. सुप्रसिद्ध उद्योजक व लेखक दत्ता दामोदर नायक यांच्या मातोश्री लीलावती नायक यांना 87 व्या वर्षी 2007 मध्ये मृत्यू आला तेव्हा त्यांच्या इच्छेनुसार वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाली – सुखद निधन. वयाच्या 75 वर्षांनंतर मिळणारा प्रत्येक दिवस हा बोनस मानावा व मृत्यू येईल तो दिवस सुखद मानावा हे सकारात्मक तत्वज्ञान कालची पिढी आम्हाला देवून गेली. आता त्याहून पुढचे सकारात्मक पाऊल टाकण्याची जबाबदारी कुणाची?

2007 साली रमेश गवस यांना राष्ट्रीय पातळीवरील आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांच्या इष्टमित्रांनी पर्वरीच्या आझाद भवनमध्ये एक स्नेहसोहळा आयोजित केला होता. त्यावेळी आम्ही जवळजवळ 70 जणांनी मृत्यूनंतर आपला देह व इंद्रिये दान करावीत असे प्रतिज्ञापत्र लिहून दिले होते ते याच सकारात्मक भावनेने. परंतु प्रत्यक्षात आज जेव्हा आम्ही देहदानाचे सोपस्कार करण्यासाठी जातो तेव्हा केवळ शवविच्छेदनासाठी देह गोमेकोला बहाल केला जातो. रोटरी क्लबच्या पुढाकारामुळे आज नेत्रदानाची व्यवस्था झालेली आहे. कारण मृत्यू आल्यावर पाच-सहा तासात डोळे काढणे शक्य असते. परंतु इतर इंद्रिये – म्हणजे हृदय, यकृत, मूत्रपिंड वगैरे काढायचे असल्यास ह्रदयाची धडधड चालू असणे महत्वाचे असते. मेंदू मृत पावल्यावर ही इंद्रिये काढण्याची प्रक्रिया हॉस्पिटलमध्ये करावी लागते.

मजा म्हणजे यासाठी केंद्र सरकारने जो कायदा केलेला आहे तो खुद्द गोव्याच्या शिफारसीवरून. गोव्याबरोबर महाराष्ट्र व हिमाचल प्रदेशच्या विधानसभांनी याबाबत ठराव घेऊन केंद्र सरकारला पाठवला व त्यानुसार 1994 साली भारतीय संसदेने ट्रान्स्प्लांट ऑफ ह्युमन ऑर्गन्स ऍक्ट संमत केला. म्हणजे शारिरिक इंद्रियांचा प्रतिरोपण कायदा. तो गोव्यात लागू झाल्यास दोन दशके होऊन गेली. परंतु या कायद्यानुसार तयार करावी लागणारी कोणतीही यंत्रणा आजतागायत गोव्यात उभी झालेली नाही. या समाजपयोगी कायद्याची अंमलबजावणीही झालेली नाही आणि त्यासाठी आवश्यक ती संस्कृतीही समाजात अजून रुजलेली नाही. केवळ आरोग्य खात्यात गेल्यार प्रतिज्ञापत्राचा नमुना फॉर्म तेवढा मिळतो.

त्यामानाने त्यानंतर आपल्या राज्यात हाच कायदा केलेल्या तामिळनाडू राज्यात गेल्या तीन वर्षांत विविध इंद्रियांची 1400 प्रतिरोपणे झाली तर केरळात किमान 500 झाली असे तेथे काम करून आलेले गोव्याचे डॉ अमोल म्हालदार सांगतात. केरळात तर इंद्रिये काढण्याची व इंद्रियांचे प्रतिरोपण करण्याची खास केंद्रे उभारली गेलेली आहेत. परंतु गोव्यात या कायद्याखाली आवश्यक असलेल्या शासकीय पातळीवरील समित्यासुद्धा स्थापन केलेल्या ऐकिवात नाहीत. या कायद्यानुसार देहदान वा इंद्रिये दान करणाऱ्या व्यक्तीने नमुन्यात दिल्यानुसार अर्ज भरावे लागतात. त्यानुसार हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेऊन मेंदू मृत झाल्याबरोबर व्हँटिलेटरवर ठेऊन परत कुटुंबियांची लिखित परवानगी घेतली जाते व ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन परवानगी दिलेली इंद्रिये काढली जातात. हृदय पूर्णतया बंद होण्यापूर्वी.

मृत व्यक्तीची मूत्रपिंडे वा डोळे काढल्यास दोन व्यक्तींना नवजीवन मिळते, हृदय, यकृत, गुडघे, कमरेचे हाड वा पेशीसुद्धा काढल्यास इंद्रियागणिक किमान आणखीन एकेका व्यक्तीला नवजीवन प्राप्त होऊ शकते. ते काढल्यावर देह दान करण्याचीही सक्ती नाही. हवा तर देह धार्मिक अंत्यसंस्कारांसाठी घेऊन जावा अथवा विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी हॉस्पिटलला दान करावा. ती ज्याची त्याची इच्छा. यासारखे दुसरे पुण्यकर्म कोणते असेल? आरोग्याच्या क्षेत्रात कित्येक गोष्टींमध्ये संपूर्ण भारतात गोव्याचा पहिला क्रमांक लागतो. त्यासाठी आम्ही बक्षिसेही पटकावली आहेत. मात्र इंद्रियदानाच्या या पुण्यकर्मात मात्र आम्ही मागे का? त्यासाठी हवी ती यंत्रणा तयार करण्यात प्रशासन मागे का? आत्मा असतो यावर ज्यांचा ठाम विश्र्वास आहे त्यांच्या आत्म्याला तर या सत्कृत्यातून शांती मिळेल की नाही? आपण मेल्यावरसुद्धा इंद्रियरुपे कुणाच्या तरी देहात वास करून राहू ही कल्पनाच किती सुखावह आहे! माझ्यामुळे चार जीवांना नवसंजीवनी मिळत असेल तर ती न देण्याएवढे आम्ही गोंयकार खचितच कृतघ्न नाही आहोत. आहोत का? तर मग ही नवसंस्कृती समाजामध्ये रुजविण्यात आम्ही-तुम्ही मागे का?

(हा लेख लोकमत गोवा आवृत्तीच्या 18 जानेवारी 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाला)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs