गोवा बनतोय आत्मकेंद्रितांची प्रयोगशाळा

By Sandesh Prabhudesai
05 January 2015 09:58 IST

संस्कृती म्हणजे जीवनशैली. जगण्याची पद्धत. वैयक्तिक जीवनपद्धती आणि सामुहिक जीवनपद्धती या दोहोंचाही मिलाफ. संस्कृती जेवढी आपली स्वतःची असते तेवढीच ती आपणा सर्वांचीही असते. कौटुंबिक असते तेवढीच सामाजिकही असते. आणि ती परावर्तित होते सर्वच गोष्टींतून. आपल्या चालण्या-बोलण्यातून, आपल्या वेषभूषेतून, आपल्या खाण्या-पिण्यातून, आपल्या नाचगाण्यातून, आपल्या गीत-संगीतातून आणि आपल्या उत्सवी आविष्कारातूनही. संस्कृती ही मानवाचा धर्म असते, परंतु अमकाच एक धर्म ही मानवाची संस्कृती बनू शकत नाही. कारण संस्कृती धर्मबंधनांच्या पलिकडची असते. ती समूहाची असते. हा समूह विविधधर्मी असला तरी त्यांची संस्कृती एक असते. तिला मग आपण आपापल्या धर्माच्या बासनात बांधतो आणि कधीकधी त्या बासनालाच संस्कृती असे संबोधून स्वतःची दिशाभूल करून घेतो. संस्कृती ही धर्मातून नव्हे तर सभोवतालच्या वातावरणातून घडते. हे वातावरण आर्थिक परिस्थितीतून घडते. अर्थकारणातून सामाजिक परिस्थिती निर्माण होते व त्याचा परिणाम आपल्या जीवनपद्धतीवर होतो. म्हणजे, अर्थातच, आपल्या संस्कृतीवर होतो. आपल्याच नकळत आपली संस्कृती बदलत जाते.

भारतात आज एक नवीन संस्कृती रुजू लागली आहे. सर्व धर्मांना छेदून जाणारी नवीन संस्कृती. बदलत्या भारताची बदलती संस्कृती. बदलत्या अर्थकारणाची ‘अर्थ’पूर्ण संस्कृती. उदारीकरण आणि जागतिकीकरण यातून घडत गेलेली नवीन संस्कृती. ग्लोबल व्हिलेजच्या साक्षात्कारातून घडत चाललेली संस्कृती. माहिती तंत्रज्ञानाच्या स्फोटातून घडलेली संस्कृती. कधी धुरकटलेली, कधी भरकटलेली तर कधी शास्त्रशुद्ध विचारांनी नटलेली, सजलेली आधुनिक विचारांचीही संस्कृती.

जुने जाऊ द्या मरणा लागुनी

जाळुनी किंवा पुरुनी टाका

सडत ना एक्या ठायी ठाका

सावध! ऐका पुढल्या हाका

खांद्यास चला खांदा भिडवुनी

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस केशवसुतांनी लिहिलेली ही कविता आज एकविसाव्या शतकातही तेवढीच लागू होते. कारण पुराणमतवादी भारतीय संस्कृतीचा बदलत्या आधुनिक संस्कृतीशी गेले शतकभर चाललेला हा संघर्ष आज जास्तच प्रखर बनलेला आहे. खास करून प्रचंड वेगाने बदलत चाललेल्या अर्थकारणामुळे 15 ते 35 वयोगटातील तरुण पिढी इलेक्ट्रोनिक आणि डिजिटल संस्कृतीचा अविभाज्य भाग बनत चाललेली आहे. टीव्ही, इंटरनेट, मोबाइल या नवसंस्कृतीमुळे आधुनिक पिढी बिघडत चालली आहे असा कंठशोष करणाऱ्या वयस्कर पिढीलाही प्रत्यक्षात या इलेक्ट्रोनिक आणि डिजिटल संस्कृतीची चटक लागलेली आहे. टीव्ही, संगणक, इंटरनेट, मोबाईल या सर्वांच्याच गरजा बनलेल्या आहेत. त्यात वाईट काहीच नाही. परंतु तिला वाईट म्हणणे ही या वयस्क पिढीची संस्कृती बनली आहे. कारण या बदलातील चांगले काय आणि वाईट काय याची स्पष्ट जाणीव आम्हालाच नाही ही आपणच स्वतःला फसवून लपवलेली वस्तुस्थिती आहे.

नाताळाचा मोसम सुरू झाल्यावर 1 जानेवारीपर्यंत नववर्षाच्या स्वागताचा उत्सव साजरा करण्यासाठी गोव्यात भारतीय युवा पर्यटकांची जी गर्दी होते ती याच संस्कृतीची परिणती. प्रचंड प्रमाणात लोकप्रिय झालेले ‘सनबर्न’ वा ‘सुपरसोनिक’ सारखे इलेक्ट्रोनिक म्युझिक डान्स (ईडीएम) फेस्टिव्हल ही त्याची अपत्ये. तेथे चालणारा हजारो युवक-युवतींचा जल्लोष वा तेथे वाजवले जाणारे संगीत ही आपली भारतीय संस्कृती नाही असे म्हणताना या फेस्टिव्हलना पाश्र्चात्य संस्कृती म्हणून हिणवणे ही आजकालची फॅशन झालेली आहे. शांतिनिकेतनमध्ये शिकणाऱ्या माझ्या मुलाबरोबर त्याचा एक फ्रेंच विद्यार्थी मित्र आलेला होता. त्याच्यासाठी ‘सनबर्न’ हे एक अप्रूप होते. कारण त्यांच्या फ्रान्समध्येही ही नाचगाणी आणि ईडीएम त्यांच्या ख्रिसमस संस्कृतीचा भाग नव्हेत. ते म्हणे ख्रिसमस आणि नववर्षाची रात्र कुटुंबामध्ये साजरी करतात. सामुहिकरित्या ते नववर्षाच्या स्वागताचा आनंद उपभोगतात तो विजेची रोषणाई व फटाक्यांच्या आतषबाजीचा. बीबीसीची यंदाची बातमी तर सांगते की नववर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्या व डान्सांची रेलचेल झाली ती प्रामुख्याने आशिया खंडामध्ये. खास करून चीन आणि भारतासारख्या प्रगत देशांमध्ये - ही आमची नवीन अर्थसंस्कृती!

ईडीएम मध्ये रंगमंचावर गायक नसतो, डिस्क ज्यॉकी असतो. या डीजेपुढे वाद्ये नसतात. ऑडियो मिक्सर आणि म्युझिक प्लेयरचा मिलाफ असलेले टर्नटेबल ही त्याची संपदा. त्यातून वेगवेगळी गाणी आणि वेगवेगळे संगीताचे ट्रॅक्स एकामेकांत मिक्स करून आणि त्यांचा वेग कमीजास्त करून अखंडपणे पायांना थिरकत ठेवणे हे डीजेंचे कलाकौशल्य. एखादा गायक अखंडपणे जास्तीत जास्त तासभर गाऊ शकतो. परंतु एखादा डीजे वेगवेगळ्या रेकोर्डेड गायकांना आणि वेगवेगळ्या रेकोर्डेड संगीतांना एकत्र आणून या इलेक्ट्रोनिक माध्यमांद्वारे तोंडात बोटे घालायला लावणारे संगीत तयार करून सहजरित्या चार-चार तास रिझवू शकतो. त्यात भर म्हणजे या संगीताच्या ताला-सुरावर चालणारे प्रकाशझोतांचे नृत्य. त्यातून संपूर्ण वातावरणच धुंद बनते. ह्रदयांच्या ठोक्यांशी स्पर्धा करीत चालणाऱ्या या कानठळ्या बसवणाऱ्या संगीताच्या ठेक्यांवर नाचणारा अक्षरशः बेधुंद बेभानच बनतो. स्वतःला व स्वतःभोवतीच्या जगाला विसरून जातो. आत्ममग्न बनून स्वतःला हरवून बसतो.  

वाद्यांच्या तालावर व संगीताच्या सुरांवटीवर गीते गात सामुहिकरित्या नाचणे ही केवळ आजकालची संस्कृती नाही. पुराणकालापासून ती चालत आलेली आहे. संगीताचा जन्मच या सामुहिक आविष्कारातून झाला. प्रत्येक श्रमजिवीच्या श्रमकार्याचा ताल व नाद सामुहिकरित्या घुमला आणि त्यातून संगीत जन्माला आले. लोकसंगीत हा सामुहिक संगीताचा आविष्कार आहे. प्रभूचरणी केलेल्या प्रार्थना, आरत्या, अभंग, भजने, सुफी संगीत ही सगळी सामुहिक प्रक्रियेतूनच घडली. कधी कधी केवळ संगीत तर कधी कधी सोबत नृत्याविष्कारही. तेच सामुहिक संगीत मग लग्नासारख्या इतर विधींमध्येही आले. मग असू देत त्या हळद लावताना गायच्या ओव्या वा ख्रिश्र्चन समाजात होणारे काजाराचे डान्स. सर्वच धर्मांचे प्रकार वेगवेगळे असतील, परंतु यातील समान धागा एकच असतो – या सर्वच विविध संगीत प्रकारांत एक सामुहिक भावना असते.

अचूक हीच सामुहिक जाणीव या नवीन संगीताच्या जल्लोषात नष्ट होत चाललेली आहे. ईडीएम मध्ये रंगमंचापुढे हजारोंचा जमाव असतो. गोव्यातील ‘सनबर्न’ व ‘सुपरसोनिक’ साठी तर भारतातूनच नव्हे, जगभरातून लाखो लोक येतात. सर्व राज्यांचे, देशांचे, धर्मांचे आणि वंशांचे. केवढा भव्य समूह. परंतु त्यांची भावना सामुहिक नसते. उलट ती पूर्णतया व्यक्तिगत असते. आत्ममग्न असते. आत्मकेंद्रीत असते. स्वतःमध्ये जग विसरायला लावणारा हा तथाकथित कलेक्टिव्ह इव्हेंट असतो. हे या नवीन अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब. ही अर्थव्यवस्था मी-माझे-मला ही नवीन संस्कृती रुजवतेय. आम्ही-आमचे-आम्हाला ही भावना नष्ट होतेय. जत्रेत एकट्याच भटकणाऱ्या भटक्यासारखी ही स्थिती असते. स्वताला स्वतःमध्ये शोधण्याची ही व्यर्थ धडपड असते. प्रत्यक्षात आपण स्वतः स्वतःमध्ये नसतोच कधी. समूह म्हणून आम्ही असतो. हा समाज आम्हाला घडवतो, वाढवतो व पुढे नेतो. परंतु दुर्दैवाने आज आम्ही दिवसेंदिवस या समाजात एकटे होत चाललो आहोत. जुने काय ते जाळून वा पुरून टाकीत चालले आहोत खरे, परंतु नवीन हाका आम्हाला एकूच येत नाहीत. मग खांद्याला खांदा भिडवून पुढे जायचे सोडूनच द्या. तीच आत्ममग्न वृत्ती या ईडीएम मध्ये परावर्तित होत आहे. आणि या आत्मकेंद्रित संस्कृतीची पाळेमुळे आणखीनच जास्त खोलखोल रुतविण्याचे काम आमचा गोवा करीत आहे. आत्मकेंद्रितांची प्रयोगशाळा बनून....

 

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs