माधवीच्या अमृत-‘मंथन’ला सलाम

By Sandesh Prabhudesai
20 December 2014 05:14 IST

माधवी सरदेसाय म्हणजे संपूर्ण जगभर पसरलेल्या कोंकणीच्या महासागरात केलेल्या समुद्र मंथनातून बाहेर निघालेले अमृत. माधवी म्हणजे अमृताचा अखंड वाहणारा झरा. हे अमृत प्रत्येकाच्या ओंजळीत भरभरून ओततच ती जगत आलेली आहे. मग ती असो कोंकणी शिक्षणाची ओंजळ, कोंकणी भाषाशास्त्राची ओंजळ, कोंकणी चळवळीची ओंजळ, कोंकणी साहित्याची ओंजळ वा तिच्या विद्यार्थ्यांची, आप्तमित्रांची वा कुटुंबियांची ओँजळ. तिच्याशी देण्यासारखे भरपूर आहे, घेणाऱ्याची ओँजळच हवी. माधवीच्या ‘मंथन’ या पुस्तकाला जाहीर झालेला यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार म्हणूनच मला वेगळा वाटतोय. (रविन्द्र केळेकारांपासून आजपर्यंत साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेल्या सर्व पुरस्कारप्राप्त वंदनीय साहित्यिकांची क्षमा मागून). या पुरस्कारातून साहित्य अकादमीने माधवीला काही दिलेलं आहे असं मला वाटत नाही. साहित्य अकादमीने तिचं हे अमृत-’मंथन’ प्राशन करून अकादमी अमृतमय केलेली आहे. कुणालाही हे जरा अतीच झालं असं वाटेल. माधवी आज कॅन्सरसारख्या आजाराशी संघर्ष करतेय म्हणून भावनाविवश होऊन मी हे लिहिलेलं आहे असंही कुणी म्हणेल. अजिबात नाही. माझ्या सर्व भावनांवर पूर्णपणे ताबा ठेवून मी हे विधान करतोय.

केवळ साहित्यिक प्रतिभा असली, भाषाप्रभुत्व असलं, माणूस शब्दप्रभू असला वा त्याच्यापाशी भन्नाट कल्पना वा एकाहून एक सरस गोष्टींचा खजिना असला म्हणून तो प्रतिभावंत साहित्यिक बनू शकत नाही. साहित्यिकच कशाला, प्रतिभावंत कलाकारही होऊ शकत नाही. त्यासाठी हा साहित्यिक वा कलाकार मनानं निर्मळ असावा लागतो, खुल्या दिलाचा असावा लागतो, स्वतःशी व जगाशी प्रामाणिक असावा लागतो. माधवी भोंदू नाही, आत्मकेंद्रित नाही, ती कुणाला तोडूच शकत नाही. म्हणूनच तिची प्रत्येक साहित्यकृती ही इतरांपेक्षा आगळी-वेगळी वाटते, काळजाला भिडते, त्या साहित्यकृतीतनं दिलेला विचार आयुष्यभर डोक्यात ठाण मांडून बसतो. मग ती ‘मिठा कणी’ सारखी तरल भावभावनांची इटुकलीच पण विश्र्वव्यापी कविता असेल वा ‘मंथन’सारख्या संशोधनपर लेखांचा संग्रह असेल. तिच्या विचारांना जेवढी खोली आहे तेवढीच त्यांची व्याप्ती आहे. ‘मंथन’ मधील एकेक लेख आपणाला सगळ्या प्रकारचे संदर्भ देत सत्य काय ते सांगतात, विचार करायला प्रवृत्त करतात, पण माणुसकीच्या मुळांना घट्ट पकडूनच ते गगनभरारी घेतात. कारण माणुसकी हाच माधवीच्या जगण्याचा धर्म आहे. यामुळेच तिची कोणतीही साहित्यकृती अजरामर बनून जाते.

35 वर्षांनंतर मला आजही स्पष्ट आठवतंय. विद्यार्थी चळवळीत आंदोलने व्हायची, संघर्ष व्हायचे, कधीकधी आमच्यातच भांडणं व्हायची. कॉलेजमध्ये, नाटकाच्या ग्रुपमध्ये वा युनियनमध्ये. कधीकधी दिवसभराचा ताण तर कधीकधी नुसतं फालतू फ्रस्ट्रेशन. यावेळी फ्रेशनर हवा असायचा. तो मिळावा म्हणून मडगावातील गार्डनच्या कट्ट्यावर आम्ही बसून रहायचो. चौगुले कॉलेजची बस येईल, तिच्यातून माधवी उतरेल, आमच्याशी येऊन खळाखळा हसत बोलेल आणि आमचं टेन्शन क्षणार्धात गुल होऊन आम्ही ताजेतवाने होऊ म्हणून. आजही माधवी नुसती फोनवर बोलली तरी फ्रेश वाटतं. तिचं साहित्य वाचताना तर माधवीच बोलतेय असं इमॅजिन करून मी वाचतो. त्याचा आनंद काही वेगळाच असतो.

साहित्य अकादमीचा पुरस्कार हा अमूकच एका साहित्यकृतीला मिळणारा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. त्यानंतरचा पुरस्कार म्हणजे साहित्य-जीवनाचा गौरव करणारा ज्ञानपीठ पुरस्कार. कधीकधी साहित्य अकादमीसाठी निवडलेलं पुस्तकच लेखकाचं सर्वोत्कृष्ठ पुस्तक असतं असं काही नाही. त्याआधीही चांगली पुस्तके आलेली असतात आणि काही नंतरही येतात. निवड करण्यासाठी लेखक-समिक्षकांची जंत्रीच असते. कितीतरी टप्पे असतात. त्यातून तावून सुलाखून निघेल त्यालाच हा पुरस्कार जाहीर होतो. अशावेळी ही सगळी लोकं केवळ एकाच पुस्तकाची नव्हे तर त्या साहित्यिकाच्या साहित्य-प्रवासाचीही दखल घेत असावीत अशी माझी एक भाबडी कल्पना. (मला ठावूक नाही). परंतु माधवीच्या बाबतीत हा प्रश्र्नच येत नाही. कारण तिच्या सगळ्याच साहित्यकृती उत्कृष्ठ आहेत. त्यात माणुसकीचा ओलावा आहे. निर्मळ मनाचे निनाद आहेत. आणि सोबत आ वासून वाचत जावे असे अफलातून संशोधन आहे. (या संशोधनाचे संदर्भ शेवटी न देता वाक्यागणिक दिले ते मला आवडले नाहीत. कारण त्यातनं वाचकाचा फ्लो जातो. पण ती शेवटी माधवी-स्टायल.) आमच्या सगळ्या चुका पोटात घालून चांगल्या गोष्टींचं तोंडभरून कौतुकच करणाऱ्या माधवीच्या ह्या इरिटेशनसाठी मीही एक वाचक म्हणून माधवीला वाचताना माफ करून टाकलं होतं.

‘मंथन’ हा तसा पाहिला तर लेखसंग्रह. खास करून काही व्यक्तींवर लिहिलेला. त्यात सेबेश्तियांव रुदोल्फ दाल्गाद, एदुआर्द जुजे ब्रुन द सौज, शणैं गोंयबाब, टी बी कुन्हा, शांताराम आमोणकार, रविन्द्र केळेकार, मनोहरराय सरदेसाय अशी गोमंतकीय व्यक्तिमत्वे येतात तशीच महात्मा गांधी, ज्याँ पॉल सार्त्र, रविन्द्रनाथ टागोर, काकासाहेब कालेलकर, राममनोहर लोहिया अशीही व्यक्तिमत्वे येतात. माधवी या व्यक्तिमत्वांविषयी लिहिताना केवळ त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या चौकटीत स्वतःला बंदिस्त करून घेत नाही. ती ऐतिहासिक पार्श्र्वभूमीत जाते, तत्कालीन राजकीय परिस्थितीत जाते, त्यांच्या तत्वज्ञानात घुसते आणि तरीही त्यांच्या स्वभावगुणांचे पैलू आपणासमोर मांडीत आम्हा वाचकांना एका वेगळ्याच विश्र्वात घेऊन जाते. भाषा, साहित्य, अस्मिता, शिक्षण, राजकारण, इतिहास अशा सगळ्याच विषयांचा परामर्ष घेत माधवी लिहीत जाते. केवळ व्यक्तिनिष्ठ नव्हे तर परिपूर्णरित्या वस्तुनिष्ठ बनून. आणि तरीही एक साहित्यकृती वाचल्याचा आनंद देऊन जाते. ही असली कसरत केवळ माधवीच करू शकते. कारण पिंड संशोधकाचा असला, मेंदू अभ्यासकाचा असला तरी तिचं मन संवेदनशील मानवाचं आहे. म्हणूनच ‘मंथन’ला एक वेगळं परिमाण आहे.

ही कसरत बऱ्याचदा रविन्द्रबाब केळेकार करायचे. म्हणूनच माधवी ‘जाग’ या त्यांच्या मासिकाची आधी कार्यकारी आणि नंतर पूर्णतया संपादक होऊ शकली. ‘जाग’ ला रविन्द्रबाबांनी जी उंची आणून दिली होती तिथनं माधवी घसरली नाही ती यासाठीच. उलट तिनं आपल्या लिखाणातल्या एका आगळ्याच संवेदनशीलतेतून हे मासिक वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवलं. ते रविन्द्रबाबांनाही जमलं नव्हतं हे आज रविन्द्रबाब असते तर त्यांनी देखील प्रांजळपणे कबूल केलं असतं. आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सगळ्यांचे आभार मानताना माधवी कला आणि संस्कृती संचालनालयानं पुस्तक प्रसिद्ध केलं आणि 25 हजार रुपयांचं मानधनही दिलं हे बिनदिक्कत सांगून टाकते. कारण तिनं कधीच कसलीच लपवाछपवी केलीच नाही. तिच्या या खुल्या मनाची आपण सर्वचजण आपल्याशी तुलना करून बघूया. म्हणजे आपसूकच आपण कोठे वा माधवी कोठे ते आपणाला उमगेल. आणि मग माधवीची कुठलीही साहित्यकृती श्रेष्ठ का याचा साक्षात्कार आपणाला आपसूकच होईल.

कधीकधी वाटतं की माधवी कॅन्सरशी झुंज देतेय की हिनं समाजातल्या वाईट प्रवृत्तींचं सगळं विष प्राशन केलंय त्यामुळं तिच्यावर ही परिस्थिती ओढवलीय? चळवळीतले सगळे रुसवे-फुगवे तिनं पचवले. आपल्या माणसांच्या सगळ्या चुका पोटात साठवल्या. सगळ्यांशी जुळवून घेतलं. प्रत्येकातलं चांगलं ते शोधून काढून वेचून घेतलं. वाईट ते सगळं आपणच पिवून टाकलं आणि अमृत तेवढं आम्हाला दिलं. हरवत चाललेलं माणूसपण ती आपल्या व्यक्तिमत्वानं सगळ्यांना प्रसाद कशी वाटीत असते. सगळ्यांनाच प्रफुल्लित करते. आपल्या वागण्यातनं, लिखाणातनं आणि ‘मंथन’ सारख्या साहित्यकृतीतनंही. हे फार कठीण असतं. पण माधवीला बघितल्यावर वाटतं – अशक्यप्राय असं काहीच नसतं. ते आपणही आत्मसात करू शकू का असा प्रश्र्न पडतो आणि विंदा करंदीकरांची ती कविता आठवते –

देणाऱ्याने देत जावे

घेणाऱ्याने घेत जावे

घेता घेता एक दिवस

देणाऱ्याचे हात घ्यावे

माधवीतल्या साहित्यिकाचा हा सर्वश्रेष्ठ गुण आपण किती घेऊ शकू ते शेवटी आपलं आपणच ठरवायचं आहे. परंतु या पुरस्काराच्या निमित्यानं या गुणी साहित्यिकावर लिहायची संधी मिळाली आणि आपोआपच एक आत्मपरिक्षण होऊन गेलं. म्हणूनच माधवीच्या ‘मंथन’ला माझा सलाम. तिच्या साहित्य अकादमी पुरस्काराला माझा प्रणाम. तिच्यासारखं मोकळं आणि खुलं मन आम्हालाही मिळो हीच काय ती प्रार्थना!

(हा लेख 20 डिसेंबर 2014 रोजी लोकमत गोवा आवृत्तीत प्रसिद्ध झाला.)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

एका कोकणी लेखिकेवर फार सुंदर मराठी लेख. समरसून लिहिलेला. सहृदय संदेश देणारा संदेशीय शैलीतील.....

- नंदकुमार कामत, गोवा विश्वविद्यालय | 23 rd December 2014 12:56

 

Related Blogs