ताठ कणा, ताठ बाणा; अर्थात, पंढरी मास्तर!

By Sandesh Prabhudesai
23 September 2014 12:10 IST

“शाळेचा कार्यक्रम बरोब्बर 5.30 वाजता सुरू होणार आहे. तुला भाषण आहे. तेव्हा तू 5.15 पर्यंत पोचायला हवेस,” शाळेच्या हेडमास्तरांनी मला फर्मावले.

“मास्तर, पणजीहून माशेला पोचायला कमीत कमी दोन तास लागतात. मला काम अर्ध्यावर सोडून तीन वाजताच निघावे लागेल. कसे शक्य आहे? सहा पर्यंत पोचतो,” माझी मखलाशी.

“पंढरी मास्तर कार्यक्रमाला येणार आहेत,” मख्ख नजरेने हेडमास्तरांनी तोंडावर एकच वाक्य फेकले.

“अरे बापरे, मग मी पाच वाजताच पोहोचतो,” माझ्या सर्व कामांचा माझा मीच त्रिफळा उडवीत सपशेल लोटांगण. दुपारचे जेवण आटोपून मी अडीचलाच गाडीत स्टेअरिंगवर. झक मारीत.

माशे, काणकोणच्या माझ्या निराकार विद्यालयातून उत्तीर्ण होऊन पंधरा, वीस आणि तीस वर्षे झालेल्या कुठल्याही माजी विद्यार्थ्याचा हा संवाद असू शकतो. पर्यायच नसतो. पंढरी मास्तरांचा दराराच तसा असतो. उशिरा पोचलो तर आता ते रागावणार नाहीत, डोळेही वटारणार नाहीत, पण तरीही त्यांच्या वक्तशीरपणाला आव्हान देण्याचे धाडस त्यांच्या कोणत्याही माजी विद्यार्थ्यामध्ये असणार नाही.  

त्यांचे आता वय झालेय. आज तर ते 84 संपवून 85 व्या वर्षात प्रवेश करणार. गावातल्या शाळेत वा कोणत्याही संस्थेत ते कुणीच नाहीत. गावातसुद्धा आता क्वचितच येतात. पण तरीही जेव्हा येतात तेव्हा तो कार्यक्रम उशिरा सुरू करण्याचे धाडस करेल तो धाडसी नव्हे, उर्मट ठरेल. कृतघ्न ठरेल. पंढरी मास्तरांनी घालून दिलेल्या वक्तशीरपणाच्या शिस्तीचा तो उपमर्द ठरेल.

त्यांचे अधिकृत नाव गोपाळ व्यंकटेश प्रभू. परंतु फक्त कागदोपत्री. सर्वामुखी मात्र फक्त पंढरी मास्तर. फक्त शाळेत वा गावात नव्हे. संपूर्ण गोवाभर. आले किती, झाले किती, शिस्तीचे धडे देऊन गेले किती. परंतु पंढरी मास्तरांच्या शिस्तीत जी आपुलकी होती ती मात्र कुणीच दिली नाही. म्हणूनच त्यांच्या शिस्तीला आणि वक्तशीरपणाला आजही आदर आहे. कोठेही कसलेही पद नसतानासुद्धा त्यांच्या अस्तित्वाचा दरारा आजही टिकून आहे.

“बी अ चेंज” ही आजकालची घोषणा आम्ही शाळेत असतानाच बाळकडू कशी पंढरी मास्तरांच्या वागण्यातून शिकलो होतो. “लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण” ह्या उक्तीचा अर्थ काय असे विचारले तर आमच्यातला वात्रटपणा आपसात बोलताना कित्येक मास्तर-बाईंकडेच सरळ बोट दाखवून मोकळा व्हायचा. पण पंढरी मास्तरांकडे पाहून मात्र आम्ही एकच उक्ती शिकलो – “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाउले”. पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जगणे जमले नाही.  आयुष्यात मी कितीही यश मिळविले तरी त्याचा काडीचाही उपयोग नाही. पंढरी मास्तरांपुढे मी सपशेल पराभवी. त्यांची ती निस्वार्थी आणि समर्पित वृत्ती अंगोपांग बाणविणे शेवटपर्यंत जमले नाही ही खंत मरेपर्यंत काळजात ठसठसत राहणार आहे.

उत्कृष्ट शिकवतो तो उत्कृष्ट शिक्षक नव्हे. शिक्षणातली सगळी मानवी मूल्ये स्वतः आचरणात आणतो आणि एक महाकाय वटवृक्ष कसा उभा राहून तुम्हाला सावळी देत वाढवतो व मग आपल्या सावटातून ढकलून देऊन तुम्हालाही उंच उंच जायला मदत करतो तो खरा शिक्षक. म्हणूनच कुठल्याही उच्च पदावर पोचलेला वा गाड्या उडवत फिरणारासुद्धा विद्यार्थी या पांढरा सदरा-लेंगा घालून फिरणाऱ्या व्यक्तीपुढे आपसूकच नतमस्तक होतो.

पंढरी मास्तरांची मी अनेक रुपे पाहिली आहेत. माझ्या आई-वडिलांसोबत कार्य केलेले तेही एक स्वातंत्र्यसैनिक. आमचा-त्यांचा निकटचा घरोबा. माझ्या आईला ते चारचौघांमध्ये शोभावहिनी म्हणायचे तर खाजगीत ताई. त्यांची आपुलकीची भांडणे अनुभवतच मी लहानाचा मोठा झालो. शाळेतले हे करारी आणि कठोर व्यक्तिमत्व माझ्या आईपाशी बोलताना हळुवार आणि संवेदनशील झालेले मी पाहिले आहे. आवाज चढवून कोणत्या तरी सामाजिक मुद्यावर एकामेकांशी भांडून गेल्यावर चारच दिवसात परत तेवढ्याच आत्मीयतेने चहाचे घुटके घेत हसत-खेळत बोलतानाही पाहिले आहे. म्हणूनच असेल कदाचित, मी कोणाशीही आयुष्यभराची दुष्मनी करूच शकलो नाही. मनात अनंतकालीन कटुता ठेऊन जगूच शकलो नाही. आपल्या मतांवर ठाम राहून माणसे जोडण्याची कला आम्ही त्यांच्याकडूनच शिकलो.

कधीही कोठे काही चुकीची गोष्ट चाललेली असेल तर कोणाचाही मुलाहिजा न बाळगता बेधडक उभे राहून सांगण्याची वृत्ती आम्ही विद्यार्थी संघटनेत होतो म्हणून आमच्यामध्ये आली असे कित्येकांना वाटते. चूक! आम्ही ती पंढरी मास्तरांकडून शिकलो. जे पटले नाही ते बेधडक सांगायचे आणि जे पटलेय त्यात झोकून द्यायचे हा त्यांचा खाक्या. अट्टाहास असेल, पण हटवादीपणा नाही. ठामपणा असेल, पण हट्टाग्रह नाही. उगाचच वैयक्तिक हेव्यादाव्यातून केलेला आत्मकेंद्रीत अहंकारी विरोधही नाही. जो काही विरोध असेल तो तात्विक. प्रश्र्न संपला, विरोध संपला. परत सगळे – एकामेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ.

पंढरी मास्तरांनी केव्हा केवळ स्वतःचा असा विचार केलाच नाही. केला तो शाळेचा, शाळेतल्या विद्यार्थ्यांचा, त्यांच्या भवितव्याचा, गावाचा, तालुक्याचा, राज्याचा, देशाचा आणि संपूर्ण विश्र्वाचा. हे विश्र्वचि माझे घर असे म्हणत त्यांनी आमच्या माशे-लोलये गावात आपले विश्र्व उभे केले. एकेक झाड लावून व त्याचे स्वतः संगोपन करून त्यांनी आमचे निराकार मैदान उभे केले. एकेक विद्यार्थी हेरून व त्याच्यात मानवी मुल्यांचे रोपण करीत त्यांनी गोव्याला मार्गदर्शक असे नागरिक उभे केले. चुकून जर आम्ही समाजासाठी म्हणून काही थोडे-बहुत करत असू तर ती सरळ पंढरी मास्तरांना दिलेली गुरुदक्षिणा समजावी.

हा माणूस जगलाच तसा. आपण, आपली बायको, आपल्या तीन मुली असा संसार या अवलियाने कधी केलाच नाही. म्हणून काही आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्षही केले नाही. पण त्यांचे कुटुंब एवढे लहान कधी नव्हतेच मुळी. म्हणूनच तर बायको अकाली वारली, मुली लग्न होऊन गेल्या आणि मास्तरही निवृत्त झाले तेव्हा त्यांनी सरळ आपले घर शाळेचे वसतीगृह बनविण्यासाठी दिले व आपणच निर्णय घेवून निघून गेले फोंड्याच्या स्नेह मंदिरात. मुलींचा विरोध झुगारून आपणहून स्नेह मंदिरात जाऊन राहिलेला कदाचित हा एकमेव बाप असेल. मनात येईल तेव्हा मुलींकडे जाऊन राहतात, अन्यथा संपूर्ण स्नेह मंदिराचे व्यवस्थापन सांभाळतात. व्यवस्थापन कसे करावे याचे चालते-बोलते उदाहरण म्हणजे पंढरी मास्तर.

वय वाढले म्हणून माणूस म्हातारा होत नसतो. पंढरी मास्तर कधीच म्हातारे झाले नाहीत. आजही नाहीत. एका समर्पित वृत्तीने त्यांनी स्वतःला गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिले. गोवा स्वतंत्र झाल्यावर शिक्षण क्षेत्रात झोकून दिले. राजकारणापासून चार हात दूर राहून. पण नंतर इंदिरा गांधीनी आणिबाणी लादून भारतीय लोकशाहीला काळिमा फासला. संपूर्ण देश खवळला. जनता पार्टीची स्थापना झाली. निवडणुका झाल्या त्यावेळी जनता पार्टीची उमेदवारी स्विकारून काणकोणातून निवडणूक लढवली. दुर्दैवाने ते निवडणूक हरले. परंतु काणकोणातील युवकांमध्ये खदखदणाऱ्या असंतोषाचे प्रतिनिधित्व तेव्हा वयस्कर असलेल्या या चिरतरुणाने केले. नंतर मात्र राजकारणाकडे पाठ फिरवली ती कायमचीच.

मात्र निराकार विद्यालयाला अवकळा आली तेव्हा वीस-पंचविशीतील प्रशांत नायक, प्रसाद लोलयेकर, भुषण प्रभुगावकर, नंदा सतरकर असे कित्येक युवक शाळा पुनुरुज्जिवीत करण्यासाठी पुढे सरसावले. त्यांना साथ देण्यासाठी हा ‘चिरतरुण’ परत पुढे सरसावला. त्यांच्या आशिर्वादाने केलेल्या श्रमांना फळ आले. आज निराकार शिक्षणसंस्था ही गोव्यातील एक अत्युत्तम संस्था बनलीय तर त्याचे श्रेय पंढरी मास्तऱांनाही तेवढेच जातेय हे लक्षात असू द्या.

अजूनही हे व्यक्तिमत्व तेवढेच चिरतरुण आहे. वयोमानुसार शरिराने थकलेय, परंतु मनाने अजिबात नव्हे. अजूनही तोच ताठ कणा आणि तोच ताठ बाणा. तीच पाठीवर कौतुकाची दणदणीत थाप. पंढरी मास्तर स्वतः एक उत्कृष्ट अभिनेता आणि दिग्दर्शकही. अजूनही वाटतेय, आम्ही नाटकातील पात्रे आहोत, आणि पंढरी मास्तरांच्या दिग्दर्शनाखाली आम्ही आमच्या भुमिका पार पाडीत आहोत. चुकलो तर कानाखाली वाजेल या आदरयुक्त भीतीनेच या गोव्याच्या रंगमंचावर वावरत आहोत. आमची भुमिका पार पाडीत आहोत. इमानेइतबारे. झोकून देऊन. ताठपणे. ठामपणे. आमचा दिग्दर्शक तो. पंढरी मास्तर.

मास्तर, चुकलं माकलं माफ करा. जमेल तेवढे आम्ही करतोय. तुमची पाठीवर थाप असली तर अजून काही करू याची खात्री ठेवा. तुम्ही आम्हाला हवात एवढं मात्र लक्षात ठेवा.

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

सुंदर लेख

- Mangaldas Bhat, Cancon | 07 th October 2019 10:13

 

Related Blogs