डिजिटल युग बदलतेय ज्ञानार्जनाची संस्कृती

By Sandesh Prabhudesai
17 August 2013 14:33 IST

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात एक धक्कादायक बातमी वाचायला मिळाली. अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ हे वृत्तपत्र ‘अमेझॉन.कॉम’ या इंटरनेटवरील ई-शॉपिंग करणाऱ्या जगप्रसिद्ध वेबसाईटचे संस्थापक मालक जेफ बेझॉस यांनी 25 कोटी डॉलर्सना विकत घेतले. गेली 136 वर्षे चालणाऱ्या या वृत्तपत्राची परंपरा फारच प्रेरणादायक आहे. 1970 साली या वृत्तपत्राच्या बॉब वूडवर्ड व कार्ल बर्नस्टाईन या दोन पत्रकारांनी शोध पत्रकारितेतून वॉटरगेट प्रकरण फोडले होते व त्यामुळे अमेरिकेचे तक्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना राजीनामा द्यावा लागला होता. गेल्या वीस वर्षांत या वृत्तपत्राच्या छापील आवृत्तीचा खप 8 लाखांवरून 4 लाखांवर घसरला. गेली सात वर्षे त्यांचे जाहिरातीचे उत्पन्न सातत्याने घसरतच आहे. आज ते केवळ साडेपाच कोटी डॉलर्स आहे. अवघ्या एका वर्षात या वृत्तपत्राचे एकूण उत्पन्न 28 कोटी डॉलर्सवरून अवघ्या 13 कोटी डॉलर्सवर घसरले आहे. इंटरनेटच्या युगात वावरणारे बेझॉस आता ‘वॉशिंग्टन पोस्ट’ छापील वृत्तपत्र म्हणून चालविणार की केवळ इंटरनेट आवृत्तीच चालवणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेले आहे.

कारण गेली 80 वर्षे प्रभावी पत्रकारितेचे उदाहरण संपूर्ण जगाला घालून देणाऱ्या ‘न्यूजवीक’ या वृत्त-मासिकाची छापील आवृत्ती या वर्षाच्या सुरवातीपासून कायमची बंद करण्यात आलेली आहे. सुमारे दीड कोटी नवीन वाचक ‘न्यूजवीक’ची इंटरनेट आवृत्ती वाचण्यासाठी भेट देतात. एका वर्षात त्यांचे इंटरनेटवरील हिट्स 70 टक्क्यांनी वाढले. मात्र दुसऱ्या बाजूने छापील आवृत्तीचा खप प्रचंड प्रमाणात घसरत गेला. म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला. अमेरिकेच्या 50 राज्यांमध्ये  मिळून सुमारे 3300 वृत्तपत्रे चालतात. त्यातील 166 वृत्तपत्रे गेल्या दोन वर्षात कायमची बंद झाली. जवळजवळ 35 हजार वृत्तपत्र कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुह्राड कोसळली. ‘यूएस्ए टुडे’ हे अमेरिकेतील सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र 17 लाख लोक विकत घेवून वाचतात तर ‘न्यूयॉर्क टाइस्म’ची डिजिटल आवृत्ती आठ लाखांच्या घरात वर्गणी देवून इंटरनेटद्वारे वाचली जाते. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये कागदावरील वाचनाची जागा आता संगणक, टेब्लेट व मोबाईलने घेतलेली आहे. यातील अवघीच काही वृत्तपत्रे इंटरनेट आवृत्तीसाठी मासिक वर्गणी घेतात. मात्र बहुतेक सगळी वृत्तपत्रे वा मासिके विनामूल्य वाचकांना उपलब्ध करून देतात. अशावेळी वृत्तपत्र विकत घेवून वाचणारे कमी होत गेले तर त्यात नवल काय?

इंटरनेट वापरणारा भारत तिसरा

लोकसंख्येच्या दृष्टीने बघितल्यास जागतिक पातळीवर इंटरनेटचा सर्वाधिक वापर चीनमध्ये केला जातो. सुमारे 57 कोटी लोक इंटरनेट वापरतात, परंतु लोकसंख्येच्या प्रमाणात केवळ 42 टक्के. दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकेचा नंबर लागतो. 25 कोटी लोक इंटरनेट वापरणाऱ्या या देशात टक्केवारीच्या प्रमाणातही अमेरिकेत 81 टक्के लोक इंटरनेटवर असतात. तिसरा क्रमांक लागतो भारताचा. आपल्या देशात 15 कोटी लोक इंटरनेटचा वापर करतात. मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात केवळ 13 टक्के. 2011 च्या जनगणनेनुसार हे प्रमाण केवळ तीन टक्के घरांमध्ये केंद्रित झालेले आहे. त्यात कार्यालयांचाही समावेश आहे. गोव्यात हेच प्रमाण अचूक उलटे आहे. इथे 13 टक्के घरांमध्ये इंटरनेटचा वापर होतो. म्हणजे तीन लाखांतील सुमारे 41 हजार घरे. मात्र भारतात मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जनगणनेनुसार 60 टक्क्यांच्या जवळपास लोक मोबाईल वापरतात. गोव्यात तर हे प्रमाण 77 टक्क्यांवर आहे. म्हणजे जवळजवळ अडीच लाख घरांतून मोबाईल आहेत.

आजकाल बोलण्याशिवाय इतर कित्येक गोष्टी मोबाईलवर होतात. त्यात तो स्मार्ट फोन असला तर त्यावर इंटरनेट, ईमेल आणि जीपीआरएस वा थ्रीजीवर चालणाऱ्या मोबाईलवरील एप्लिकेशन्स आणखीनही कित्येक गोष्टी स्वस्तात मिळवून देतात. शिवाय तोच मोबाईल वा टेब्लेट कार्यालय वा घरातील वायफायशी जोडलेला असल्यास टीव्ही चॅनल्स धरून सगळ्या गोष्टी फुकटात वाचायला, ऐकायला वा बघायला मिळतात. 126 कोटींच्या आमच्या देशात आज 43 कोटी युवक आहेत. म्हणजे प्रत्येक तिसरी व्यक्ती युवा आहे. 2021 पर्यंत युवकांची संख्या 47 कोटींवर जाईल असा अंदाज आहे. म्हणजे जगातील सर्वात युवा देश असेल भारत. ही संपूर्ण पिढी इंटरनेट, मोबाईल वा टेब्लेटमय झालेली आहे. ही युवा पिढी वाचत नाही हा समज साफ चुकीचा आहे. उलट तो कालच्या पिढीहूनही जास्त वाचतो. परंतु सर्व काही फेसबूकसारख्या सोशल नेटवर्कवर अथवा मोबाईल वा टेब्लेटवर. ई-बूक वाचणाऱ्यांची संख्या तर दिवसेंदिवस वाढतच आहे. तिथे त्यांना वृत्तपत्रातील बातम्याही मिळतात आणि त्याशिवाय वृत्तपत्रांत येत नाहीत अशाही बातम्या तिथे चघळल्या जातात.

फेसबूकची वाचन संस्कृती

फेसबूकवर आपण ओळखतच नसतो अशी जगभरातल्या ‘मित्रां’ची एक साखळी तयार होते. त्याद्वारे एकाने टाकलेला ‘स्टेटस’ या साखळीद्वारे ‘व्हायरल’ होवून पसरत जातो. त्यात वैयक्तिक गोष्टी असतात, कुटुंबातल्या असतात, मित्रपरिवारातल्या असतात, संस्था वा कार्यालयीन असतात व शिवाय सामाजिक विषयांशी संबंधितही असतात. त्यावर मुक्तकंठाने चर्चा होते. एकामेकांचे कौतुक व वादविवादही होतात. हे सगळे मित्र कधीकधी एकामेकांवर तुटूनही पडतात. वेगवेगळ्या विषयांवर गट तयार केले जातात. वेगवेगळ्या संस्थांची पाने तयार केली जातात. ती ‘लाईक’ केली की आपण त्या गटांचे वा पानांचे सभासद होतो. तिथे तर कित्येक गंभीर विषयांवर उलटसुलट चर्चा होतात.

या डिजिटल चमत्कारातून भारतातले पहिले जनआंदोलन उभे राहिले ते गोव्यात. प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाच्या प्रश्नावर गोमंतकीय युवकांनी ग्रूप तयार केला आणि व अवघ्या दोन दिवसात त्याचे दहा हजार सभासद झाले. त्यातूनच त्यांनी आंदोलन उभे केले. रस्ता नाट्याची स्र्किप्ट त्यांनी फेसबूकवर टाकली आणि गोव्यात तीन ठिकाणी नटसंच उभे राहिले. प्रमोद मुतालिकांच्या राम सेनेला गोव्यात येण्यास विरोध करणारा असाच एक ग्रूप फेसबूकवर तयार झाला आणि त्यातून त्यांच्या बैठका होवून आणखीन एक आंदोलन उभे राहिले. त्याची दखल घेवून सरकारला राम सेनेविरुद्ध भुमिका घ्यावी लागली. लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारेंनी दिल्लीत आंदोलन उभारले तेही असेच सोशल मिडिया नेटवर्कमधून भारतभर पसरले आणि लाखो युवक रस्त्यावर उतरले. अर्थात, त्यात इंटरनेटहूनही जास्त प्रभाव पडला तो टीव्ही चॅनल्सचा. तरीही एका फेसबूकवरील इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या पानाचे भारतभरातून 10 लाख सदस्य आजसुद्धा आहेत.

टीव्ही चॅनल्सही होतायत डिजिटल

एका बाजूने इंटरनेटचा असा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे तर दुसऱ्या बाजूने टीव्ही चॅनल्सनी आपल्या आयुष्याची परिक्रमाच उलटीपालटी करून टाकलेली आहे. भारतात एकूण 515 टीव्ही चॅनल्स आहेत. त्यात दीडशेहून जास्त चॅनल्स बातम्यांचे आहेत. सर्वाधिक 54 चॅनल्स एका हिंदी भाषेतील आहेत. इंग्रजी न्यूज चॅनल्स आहेत 20. त्यानंतर तेलगू 16, तामीळ 10, कन्नड व बंगाली प्रत्येकी 8, मराठी, गुजराती, आसामी व मल्याळम प्रत्येकी 7 तर पाचाहून कमी जवळजऴ सगळ्याच भारतीय प्रादेषिक भाषांतून आहेत. जगभरातील मंदीच्या लाटेचा फटका भारताला बसला त्याच वर्षी दिल्लीत एक भोजपुरीतील बातम्यांचा चॅनल सुरू झाला व वर्षभरात त्याने नफासुद्धा कमावला.

हे सगळे सॅटॅलायट चॅनल्स. त्यामानाने एकही सॅटॅलायट चॅनल उभा राहू शकला नाही तो गोव्यात. इथले केबलवर चालणारे चॅनल्ससुद्धा प्रचंड तोट्यात चालत आहेत. अत्यंत कमी कर्मचारी वर्ग घेवून चालवलेले चॅनल्स तेवढे थोडाफार नफा कमावू शकतात. परंतु हा नियम नव्हे; गोवा हा अपवाद. मात्र या टीव्ही चॅनल्सनीही आज स्वतःच्या वेबसाईट तयार केलेल्या आहेत. त्यावर छापील मजकूरही असतो आणि व्हिडियोही. शिवाय काही राष्ट्रीय पातळीवरील चॅनल्सना टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स जेवढे मिळत नाहीत त्याहून जास्त हिट्स त्यांच्या वेबसाईटना मिळतात. शिवाय आता मोबाईल आणि टेब्लेटवरही हे चॅनल्स सहजगत्या मिळतात. आजच्या घडीला त्यांची डाउनलोडिंग किंमत जरा महाग आहे. परंतु वायफाय असल्यास ही किंमत लागत नाही. आणि उद्या डायरेक्ट डाउनलोडिंगसुद्धा स्वस्त केल्याशिवाय पर्यायच राहणार नाही.

वृत्तपत्रांचे इंटरेनेटीकरण अपरिहार्य

या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतात आजच्या घडीस छापील वृत्तपत्रांचेच राज्य चालते. आठ हजारांच्या आसपास हिंदी वृत्तपत्रांचा वाचक आहे 16 कोटी. दीड हजारांच्या आसपास असलेली इंग्रजी वृत्तपत्रे साडेपाच कोटी लोक वाचतात. त्यानंतर क्रमांक लागतो तो हजारभर उर्दू वृत्तपत्रांचा. त्यानंतर गुजराती 761, तेलगू 603, मराठी 521, बंगाली 472, तामीळ 272, ओरिया 245, कन्नड 200, मल्याळम 192 अशी ही आकडेवारी कमी होत जाते. परंतु सर्वच भारतीय भाषातील वृत्तपत्रे मिळून सुमारे 33 कोटी लोक अजूनही कागदावरील वृत्तपत्रे वाचतात. मात्र वृद्ध वाचक मरण पावला तर त्या प्रमाणात नवीन युवक वाचक तयार होत नाही. त्यामुळे हा वाचकवर्ग दिवसेंदिवस कमी होत चालला आहे हेही तेवढेच सत्य आहे.

दुसऱ्या बाजूने बहुतेक सर्वच वृत्तपत्रांना आपली डिजिटल आवृत्ती इंटरनेटवर आणण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. तीही दोन प्रकारांची. एक रोजचे वृत्तपत्र जशास तसे ई-पेपर म्हणून वृत्तपत्राच्या वेबसाईटवर लोड करणे व दुसरी सातत्याने बातम्या अपडेट करत राहणारी प्रत्यक्ष इंटरनेटची वृत्तपत्रीय वेबसाईट तयार करणे. परंतु एवढेच करून आजकाल भागत नाही. या वृत्तपत्रांना आपापले पान फेसबूकवर तयार करावे लागते. कारण आजचा युवक फेसबूकमधून वृत्तपत्राकडे जातो. थेट वृत्तपत्राच्या वेबसाईटवर येणारे त्यामानाने कमीच. त्याशिवाय महत्वाच्या बातम्या गूगल प्लस, लिंक्डईन असा सोशल मिडिया नेटवर्कवरही लोड कराव्या लागतात. त्याशिवाय ट्विटर हा तर आणखीनच अनोखा प्रकार. तो संगणकापेक्षा मोबाईल व टेब्लेटवर जास्त लोकप्रिय आहे. आजकाल सगळ्याच भाषा मोबाईलवर मिळतात. त्यामुळे कित्येक वृत्तपत्रांनी मोबाईल एप्लिकेशन्स तयार केलेली आहेत. शिवाय ट्विटरसाठीही एप्लिकेशन्स तयार केलेली आहेत. ती मोबाईल वा टेब्लेटवर उतरवली की फुकटात बातम्यांचा रतीब दिवसरात्र चालू असतो. ट्विटरवर तर एका ओळीची बातमी आणि खाली तिला संपूर्ण बातमीची लिंक. हवी असली तर क्लिक करा आणि बातमी वाचा, ऐका वा प्रत्यक्ष व्हिडियोमधून बघा. नाहीतर पुढची वन-लाईनर बातमी वाचा.

हे एवढे सगळे मोफत आणि सहजगत्या मिळत असताना रोज सकाळी वृत्तपत्र विकत घेवून वाचण्याची संस्कृती किती काळ टिकून रहाणार हा प्रश्न विचारण्याचीही गरज नाही. वाचन संस्कृती खात्रीने लोप पावणार नाही. परंतु कागदावर छापलेले वाचण्याची संस्कृती जास्त काळ टिकून राहील असे वाटत नाही. हातात घेवून फिरण्याची वा गुंडाळण्याची गरज नाही, फाटण्याची भीती नाही आणि भिजण्याचीही शक्यता नाही. सगळे काही संगणकावर, मोबाईलवर वा टेब्लेटवर. शिवाय जगात कुठेही जा, तुमचे वृत्तपत्र तुमच्या मोबाईलवर सतत तुमच्याबरोबर राहील. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वा देशात गेलो म्हणून आपले आवडीचे वृत्तपत्र आता कसे वाचायचे हाही प्रश्न नाही.

शेवटी वृत्तपत्र हे प्रसार माध्यमातील एक माध्यम आहे. एकामेकांशी संवाद साधणे हा माध्यमाचा स्थायी भाव आहे. तो काही अक्षर निर्मितीपासून सुरू झाला नव्हता. ख्रिस्तपूर्व 2000 सालात कधीतरी अक्षराचा शोध लागला. त्यापूर्वी आणि नंतरसुद्धा कित्येक हजारो वर्षे मौखिक माध्यमांद्वारेच जनसंवाद साधला जाई. खास करून कलाविष्कारांच्या गायन, नृत्य, नाटक अशा लोककलांच्या विविध माध्यमांतून. छपाईचा शोध लागण्यास तर 1452 साल उजाडावे लागले. आशियातला पहिला छापखाना गोव्यात पोर्तुगिजांनी सुरू केला तो 1556 साली सुरू केला. म्हणजे सोळाव्या शतकात. त्यानंतर वाचन संस्कृती खऱ्या अर्थाने बहरली. पण म्हणून त्यापूर्वीची हजारो वर्षे अडाणीपणाची होती असे म्हणण्याचा मूर्खपणा कुणी करणार नाही. कित्येक शोध लावले गेले, अश्मयुगापासून कित्येक संशोधनांद्वारे मानवी संस्कृतीचा विकास होत गेला. या संपूर्ण चित्तथरारक आणि प्रेरणादायी अशा मानवी जीवनाच्या प्रवासातील छापील वाचन संस्कृतीचा काळ हा केवळ पाचशे-सहाशे वर्षांचा.

संस्कृती तीच, बदलताहेत उपकरणे

पूर्वी दगडांवर, धातूंवर, लाकडावर, पानांवर लिहीत लिहीत कागदावर लिहायची परंपरा सुरू झाली. त्यानंतर छापील परंपरा. आज तीच अक्षरे इंटरनेटद्वारे संगणक, मोबाईल, टेब्लेटवर लिहिलेली आपणाला वाचायला मिळतात. कालपर्यंत दृकश्राव्य माध्यमासाठी आपणाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी जावून ते पहावे व ऐकावे लागे. नंतर रेडियो, ग्रामोफोन, टेप, कॅसेट, सीडी अशी श्राव्य माध्यमांची उपकरणे येत गेली. मात्र आधी सिनेमा व नंतर टेलिव्हिजनने दृकश्राव्य माध्यमांतून नवीन क्रांतीकारी उपकरणे तयार झाली, सॅटेलाईट तंत्रज्ञानाने संपूर्ण जग आपणापुढे आणले. नंतर व्हीसीडी आणि डीव्हीडी. आता त्यानंतर इंटरनेट, मोबाईल, टेब्लेट हे नवे तंत्रज्ञान. शिवाय एमपीथ्री आणि एमपीफोर.

मात्र एक गोष्ट खरी. तंत्रज्ञानाच्या या युगात संपर्क माध्यमाची उपकरणे कितीही बदलली तरी शेवटी शब्द, अक्षरे, श्रवण व दृक (पाहणे) हे चिरंतनच असणार. वाचण्याची, ऐकण्याची वा बघण्याची माध्यमे वा उपकरणे बदलतील. परंतु ती संस्कृती मात्र टिकून राहील. त्यातील अर्थकारण बदलेल. परंतु समाजकारण आणखीनही प्रगल्भ होईल. कदाचित वाचन, श्रवण व बघण्याच्या पद्धती बदलतील, परंतु ज्ञानार्जनाची संस्कृती कदापि बदलणार नाही. उलट ती आणखीनही वृद्धिंगत होईल. या दृष्टिकोणातून आपण या माहिती युगाच्या तंत्रज्ञानाकडे बघितले तर आपल्या मनातले प्रश्न आपसूकच सुटतील. या टीव्ही आणि इंटरनेटमुळे वाचन संस्कृतीचा ह्रास होत चाललेला आहे वा ज्ञानार्जनाची भूक मरत चाललेली आहे असा शंख करीत आपण बसणार नाही. आजच्या पिढीजवळ बसा, त्यांना समजून घ्या आणि तुम्हाला कळेली की त्यांना आपणाहून जास्त ज्ञान आहे. केवळ परीक्षेत पास होण्याच्या ज्ञानापेक्षाही जास्त ज्ञान त्यांच्यापाशी आहे (अर्थात, त्यात वाईट गोष्टींचे ज्ञानसुद्धा आले, जसे ते कालही होते.)

या संपूर्ण पार्श्वभूमीवर आपण आजच्या वृत्तपत्रांकडे बघितले तर आपल्या लक्षात येईल की वृत्तपत्रांना एक मर्यादा असते. मात्र या डिजिटल माध्यमांना मर्यादा नाही. ते अमर्याद ज्ञानाचे खजिने आहेत. या रेसमध्ये टिकायचे असेल तर आपणास जुने तेचे सोने म्हणून त्याला मिठी मारून बसता येणार नाही. छापील वृत्तपत्रे वा पुस्तकांचे महत्व कमी होणार नाही. केवळ ते वाचण्याची उपकरणे बदलतील. बदलत आहेत. बदललेली आहेत. त्यानुसार आपणालाही बदलावे लागेल. जशा आमच्या हजारो वर्षांच्या पिढ्या बदलल्या, त्याचप्रमाणे. चला, या बदलांचे मनापासून स्वागत करुया.

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs