बाउन्सर्व की दहशतवादी सेना?

By Sandesh Prabhudesai
27 June 2013 17:24 IST

आणिबाणीला काल 38 वर्षे पूर्ण झाली. आज जसा अण्णा हजारेंचा दबदबा आहे तसा 1975 च्या काळात जयप्रकाश नारायण यांचा होता. त्यांच्या संपूर्ण क्रांतीच्या घोषणेला प्रतिसाद देवून गुजरात व बिहार ही राज्ये तरुण वर्गाच्या संघर्षाने पेटली होती. तो वणवा नंतर भारतभर पसरला. त्यातूनच आणिबाणी जाहीर झाली. सर्व काँग्रेस विरोधकांना व संपूर्ण क्रांतीवाल्यांना बंदिवासात टाकले गेले. परंतु नंतर आलेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी सपशेल आपटल्या. जनता पक्षाच्या कडबोळ्याचे सरकार आले. तेही सपशेल आपटले. परंतु जयप्रकाशांचा करिश्मा बराच काळ टिकला. कारण त्यांनी केवळ राजकारण केले नाही. विधायक आणि क्रांतीकारक स्वरुपाचे समाजकारणही केले.

बिहारातील चंबळच्या खोऱ्यात त्या काळी दरोडेखारीला ऊत आला होता. जयप्रकाशांनी या दरोडेखोरांशी संवाद सुरू केला. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून कित्येक दरोडेखोरांनी आत्मसमर्पण केले. सरकारी मदतीने त्यांचे पुनर्वसनही करण्यात आले. बऱ्याच वर्षांनंतर अशाच पद्धतीने आत्मसमर्पण केलेली फूलन देवी राजकारणातसुद्धा उतरली. अशा प्रकारचा प्रयोग याआधी विनोबा भावेंनीही केला होता. त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. किरण बेदी या कार्यक्षम महिला पोलीस अधिकाऱ्याने तर तिहार तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांचे पुनर्वसन केले होते. हल्लीच गोव्यात गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंटस्ट्रीजने वेश्याव्यवसायातील बायकांना प्रशिक्षित करून त्यांना लॉंड्रीच्या व्यवसायाकडे वळवले. अशी एक ना अनेक, कित्येक उदाहरणे देता येतील.

गुन्हेगारांचे पुनर्वसन हे अत्यंत मौल्यवान स्वरुपाचे समाजकार्य आहे. हे लोक मुळात गुन्हेगार नसतात. एक तर भावनेच्या भरात कधीकधी त्यांच्याकडून गुन्हा घडतो अथवा परिस्थितीशी संघर्ष करता करता ते गुन्हेगारीकडे वळतात. गुन्हेगारी वृत्तीचे गुन्हेगार तसे कमीच असतात. परंतु त्यांना गुन्हेगारी जगताकडून दूर नेणे महत्वाचे असते. त्यांच्यातील धाडसी वृत्ती, बेदरकारपणा, कुठेही धडक देण्याची हिंमत, स्वतःविषयीचा प्रचंड आत्मविश्वास या गोष्टींना विधायक वळण देणे महत्वाचे असते. विघातक नव्हे. त्यांच्यातील गुन्हेगारी वृत्ती बळावेल व तिला आणखीनच अधिकृत बळ मिळेल अशा गोष्टींकडे तर त्यांना वळवणे जास्तच धोकादायक. अशा गोष्टींना खागजी पातळीवरही प्रोत्साहन मिळता कामा नये आणि शासकीय पातळीवरही अशा धोकादायक गोष्टींकडे काणाडोळा करता कामा नये.

या सर्व पार्श्वभूमीवर गोमंतकियांच्या गळयातले ताईत बनलेले सामाजिक कार्यकर्ते डॉ ऑस्कर रिबेलो यांच्यावर बाउन्सर्सनी पणजीच्या रस्त्यावर हल्ला केला हे फारच चांगले झाले. त्यामुळे एका महत्वाच्या गोष्टीला वाचा फुटली. आयनॉक्सच्या बाजूला असलेल्या बाजारात जाण्याच्या जोडरस्त्यावर एका सिनेमाचे शुटिंग चालू होते. आणि त्यासाठी भाड्याने आणलेले हे बाउन्सर्स मांडवी नदीलगतच्या मुख्य रस्त्यावर लोकांना अडवीत होते. आपल्या पुढ्यातच एका लहान मुलाला घेवून जाणाऱ्या बाईला या बाउन्सर्सनी मुख्य रस्त्यावर ढकलून दिले ते पाहून डॉ ऑस्कर भडकले व त्यांनीही तोच रस्ता क्रॉस करण्याचे ठरवले. अर्थातच, बाउन्सर्सनी त्यांच्याशीही धक्काबुक्की केली. त्यांच्या शर्ट फाडला. भडकलेल्या डॉ आस्करनी मोबाईलवरून इतर कार्यकर्ते, पत्रकार आणि पणजीच्या महापौरांना बोलावल्यावर हे धट्टेकट्टे बाउन्सर्स पळून गेले. पोलिसांनी नंतर त्यांना पकडून अटक केली.

सर्वसाधारण सुरक्षा रक्षक असते तर त्यांनी आधी रस्त्यावरून जाणाऱ्यांना सिनेमाच्या शुटिंगची कल्पना दिली असती. दुसऱ्या बाजूने जाण्याची विनंती केली असती. अशा विनंतींना धुडकावून जबरदस्तीने शुटिंगमध्ये अडथळा आणणारा गोमंतकीय चुकून सापडेल.  परंतु हे बाउन्सर्स यातली कोणतीही सभ्य गोष्ट करीत नव्हते. ते सुरक्षा रक्षक कसे वागतच नव्हते. भक्षकासारखेच त्यांचे वागणे होते. त्यांच्या वागणुकीतील गुन्हेगारी वृत्ती स्पष्ट दिसत होती. असतीलही कदाचित ते पूर्वीचे गुन्हेगार. आता सुरक्षा एजन्सीमध्ये बाउन्सर्स म्हणून झाले असतील दाखल कदाचित. परंतु हे त्यांचे पुनर्वसन खचितच नव्हते. उलट माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखाच तो प्रकार होता. त्यामुळे अधिकृपणे रस्ता अडवून ते येणाऱ्या-जाणाऱ्याला धमकावत होते. त्यांच्याशी दादागिरी करीत होते. गुंडगिरी करीत होते.

या घटनेनंतर आता मुख्यमंत्र्यांनी सिनेमाच्या शुटिंगच्या ठिकाणी बाउन्सर्स ठेवण्यावर बंदी आणणार असल्याचे घोषित केले आहे. परंतु इथे प्रश्न शुटिंगचा नाहीच आहे. हे बाउन्सर्स आज जळी स्थळी काष्ठी पाषाणी दिसतात. जिथे जिथे अनैतिक कृत्ये घडत असतात वा बेकायदेशीर घटना घडत असतात तिथे सामान्य लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी हे बाउन्सर्स तैनात केले जातात. कसिनोंवर ठेवलेले बाउन्सर्स कोणाचे म्हणून विचारणा झाल्यावर म्हणे कसिनो ऑपरेटरपासून सुरक्षा एजन्सीपर्यंत सर्वांनीच हात वर काढले. बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतलेले भलेभले आज हे बाउन्सर्स घेवून फिरत असतात. काळ्या कृत्यांशी थेट संबंध असल्यामुळेही असेल कदाचित, परंतु त्यांचा अधिकृत वेषही संपूर्ण काळाच असतो. त्यात चेहरामोहरा काळा असला तर तो बाउन्सर आणखीनच वजनदार वाटतो. कारण समोरच्याच्या काळजात धडकी भरवणे हाच तर त्याचा मूळ उद्देश असतो.

सुरक्षा ही संकल्पना वेगळी आणि दहशत पसरवणे वेगळे. आज गोव्यातही कित्येक अधिकृत सुरक्षा कंपन्या आहेत. कित्येक पोलीस अधिकाऱ्यांनी वा निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी सुरक्षा कंपन्या सुरू केलेल्या आहेत. तिथेही धट्टेकट्टे व कोणाशीही सामना करण्याची ताकद असलेले लोक लागतात. परंतु कोणत्याही कठीण प्रसंगाचा सामना करण्यासाठी ही सुरक्षा असते. दहशत पसरवण्यासाठी नव्हे. म्हणूनच तर सुरक्षा रक्षक व बाउन्सर अशा दोन वेगवेगळ्या संकल्पना तयार करण्यात आलेल्या आहेत. सुरक्षा रक्षकांना धमक्या देता येत नाहीत, विनाकारण धक्काबुक्की करता येत नाही, शिवीगाळ करणे त्यांचा धर्म नाही. म्हणून ही बाउन्सर्स नावाची वेगळी जमात तयार करण्यात आलेली आहे.

तेव्हा या जमातीला कितपत अधिकृत मान्यता द्यावी यावरही मुख्यमंत्री आणि त्यांच्या पोलीस खात्याने विचार करावा. या जमातीत दाखल होणाऱ्यांची पार्श्वभूमी तपासून पहावी. यात खरोखरच रक्षक असतात की गुन्हेगारी वृत्तीचे भक्षक असतात त्याची तपासणी करावी. ही नुसती सुरक्षा ऱक्षणाची एजन्सी आहे की पोलिसांना समांतर अशी दहशतवादी सेना आहे त्याचाही विचार करावा. नक्षलवाद्यांच्या नायनाट करण्यासाठी सरकारी आशिर्वादाने छत्तीसगढमध्ये सलवा जुडम या नावाने अशीच सेना काढण्यात आली तेव्हा याच दहशतवादी कारणासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी आणली. आज बाउन्सर्सच्या नावाने हीच सलवा जुडमची नवी जमात दहशत पसरवत आहे. तिचाही बंदोबस्त व्हायलाच हवा. अन्यथा अनैतिक कृत्ये करणाऱ्यांचा एक नवीन उच्चवर्गीय दहशतवाद गोव्यात सुरू होईल.

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

Human rights commission, govt., police, press, and everybody else are out screaming all guns when a famous guy is abused. Nobody cares when common men is attacked and abused everyday. This is clear case of law being applied differently to different people.

- J. Kelkar, Goa | 28 th June 2013 17:40

 

Related Blogs