नेटबूक करू दे ज्ञान-शक्तीची क्रांती

By Sandesh Prabhudesai
20 June 2013 12:21 IST

यंदापासून आधी पाचवी व सहावी व नंतर णववीच्या विद्यार्थ्यांना नेटबूक देण्यास सुरवात होईल. गेल्या वर्षी नोंदणी केलेल्या व यंदा सहावी व सातवीत पोचलेल्या मुलांना त्यांचे वितरण केले जाईल. तदनंतर यंदाच्या पाचवी व णववीच्या मुलांनाही वर्षअखेरपर्यंत नेटबूक देण्याची योजना आहे. म्हणजे अंदाजे दर वर्गात 20 हजारांचा आकडा धरल्यास 80 हजार मुलांच्या हातात याच एका वर्षात मिनी लॅपटॉप येईल. पुढच्या पाच वर्षात कमीत कमी दोन लाख. त्यानंतर अकरावीच्या मुलांना लॅपटॉप देण्याची योजना बंद होईल की काय याविषयी अजूनपर्यंत तरी निर्णय झालेला नाही. परंतु सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वाय-फायने कनेक्ट करण्याचेही सरकारने ठरवले आहे.

मुलांना नेटबूक द्यायचे की टॅब्लेट यावर सुरवातीला निर्णय झाला नव्हता. या छोट्या लॅपटॉपना काय म्हणतात याविषयीही अधिकाऱ्यांना ठावूक नव्हते. विधानसभेत तर एक दिवस मुलांना नोटपॅड देणार अशीच चर्चा झाली. नोटपॅड नावाचे संगणकच नाहीत. मुळात नोटपॅड हे विंडोजमध्ये उपलब्ध असलेले टेक्स्ट एडिटरचे सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे पाचवी व सहावीच्या मुलांच्या मनात प्रचंड गोंधळ होता. कारण या सगळ्या सॉफ्टवेअरची व सर्व प्रकारांच्या संगणक व टेब्लेटची खडानखडा माहिती आजच्या मुलांना आहे. परंतु आमचे राजकारणी आणि अधिकारी, तसेच बहुतांश शिक्षक व पालकही याबाबत अनभिज्ञ आहेत हे कटू सत्य आपणाला मान्य करावेच लागेल. आणि या अशा प्रौढवर्गीय अशिक्षित वा अर्धशिक्षित वातावरणात गोवा सरकार हे नेटबूक वितरित करीत आहे. शेवटी मुलांना बहुतेक 15 ऑगस्टपासून नोटबूकपेक्षा कमी क्षमता असलेले, परंतु टेब्लेटपेक्षाही जास्त प्रभावी असलेले नेटबूक देण्यात येतील यावर शिक्कामोर्तब झालेले आहे.

हे नेटबूक शैक्षणिक सॉफ्टवेअरनी सुसुज्ज असतील असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले आहे. प्रत्यक्षात कोणती शैक्षणिक सॉफ्टवेअर लोड करावीत याविषयीचा पक्का निर्णय शिक्षण खात्याने अजून घेतलेला नाही. त्यामुळे या नेटबूकचा उपयोग मुलांना शिकण्यासाठी कसा काय होईल याविषयी अजून सुस्पष्टता नाही. परंतु त्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतील असे वाटत नाही. कारण अशी कित्येक शैक्षणिक सॉफ्टवेअर कधीच तयार झालेली आहेत. एनसीईआरटीकडे ती उपलब्धही असतील. त्यामुळे त्यातून ई लर्निंग सुरू झाल्यास उद्या गोव्यात चमत्कार घडू शकतो.

साधी गोष्ट म्हणजे मुलांकडे असलेली सगळी पाठ्यपुस्तके ई बूकच्या स्वरुपात नेटबूकवर लोड केली जाऊ शकतात. त्यात या पुस्तकांसाठी एनिमेशनचा वापर केल्यास ती आणखीनही ज्ञानवर्धक होवू शकतात. कारण शब्दांनी व केवळ चित्रांनी समजावून सांगितलेले प्रयोग मुले प्रत्यक्ष नेटबूकवर अनुभवू शकतात. विषयांशी संबंधित काही नामवंत शिक्षकांची डेमोन्स्ट्रेशन्स लोड केल्यास तर ती मुलांना पर्वणीच होवू शकते. शिवाय पाठ्यक्रमाबाहेरील इतर शिक्षणाविषयीची माहिती, चित्रे, सिनेमा, गेम्स अशा कित्येक गोष्टींतून मुलांच्या सर्वांगीण विकासास अनुरूप अशी सर्व माहिती नेटबूकवर व शाळेच्या लायब्ररी सर्व्हरवर उपलब्ध करून दिली जावू शकते. एक केंद्रीय स्वरुपाची वेबसाईट तयार केल्यास मुलांना डाउनलोड करण्यासाठी कितीतरी गोष्टी दिल्या जावू शकतात. त्याशिवाय इंटरनेटचा वापर करून संवादात्मक स्वरुपाचे (इंटरएक्टिव्ह) कार्यक्रमही केले जावू शकतात. या सर्व गोष्टींना मर्यादाच नाही. स्काय इज द लिमिट.

परंतु याची सुरवात नक्की कुठून केली जाईल त्याविषयी अजून कोणतीच सुस्पष्टता शिक्षण खात्यात दिसत नाही. ती येईपर्यंत कदाचित एक वर्ष जावूही शकते. पण ते वाया जावू  नये. तोपर्यंत नेटबूकच्या योग्य आणि परिपूर्ण वापरासाठी आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षण शिक्षक व विद्यार्थ्यांना देण्यास सुरवात करावी. कळस आहे, परंतु पायाच नाही अशी अवस्था नको. उदाहरणच घ्यायचे झाल्यास संगणकीय स्क्रीनबरोबर की बोर्डही मिळावा व संग्रहीत जागा (स्टोरेज) मिळावी म्हणून सरकारने टेब्लेटऐवजी नेटबूक देण्याचा निर्णय घेतला. परंतु संगणकाचे की बोर्ड कसे वापरावे याचे प्रशिक्षण धड शिक्षकांनाही नाही आणि विद्यार्थ्यांना तर अजिबात नाही.

तेव्हा विद्यार्थ्यांना नेटबूक देताना शिक्षण खात्याने एक सक्ती करावी. की बोर्डवर टाईप करण्याचे प्रशिक्षण आधी शिक्षकांना द्यावे व नंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना. एका वर्षात की बोर्ड शिकले नाहीत तर नेटबूक परत. कारण यापूर्वीही संगणक आले. अकरावीच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांनाही मिळाले. पण सगळे एकबोटे. हाताची दहाही बोटे वापरून की बोर्डवर टाईप करणारे हाताच्या बोटांवर मोजावे इतके. त्यामुळे इंटरनेट सोडून संगणकातील इतर प्रोग्राम्सही वापरणाऱ्यांची संख्या अवघीच. संगणक घरी असूनसुद्धा टाईप करण्यासाठी डीटीपी ऑपरेटरच्या दारात गर्दी. हे संगणकीय परावलंबित्व सरकारने आधी दूर करावे. की बोर्ड शिकण्याची सक्ती करून. त्यांना स्वावलंबी बनवून.

कोंकणी-मराठीच्या प्रेमावर भाषणे भरपूर झाली. भांडणेही भरपूर झाली. या नेटबूकने विधायक कार्याची एक फार मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आता जगातील कोणत्याही भाषेसाठी संगणकावर वेगळ्या सॉफ्टवेअरची गरज नाही. विंडोजवर तर सर्व भाषा उपलब्ध आहेत. हिन्दी, मराठी आणि कोंकणीसुद्धा. सर्व काही युनिकोडमध्ये. त्यामुळे संगणकावर टाईप केलेला देवनागरी मजकूर आपण इंग्रजी वा रोमीइतक्याच सहजतेने कुठेही पाठवू शकतो. कोणत्याही प्रोग्रामध्ये वापरू शकतो. ई मेल करू शकतो. वेबसाईटवर लोड करू शकतो. फेसबूकवर वापरू शकतो. त्यासाठी इन्स्क्रिप्ट हा अवघ्या अर्ध्या तासात शिकू शकणारा सीडॅकने तयार केलेला की बोर्ड सर्वमान्य झालेला आहे. मुलांना त्याचेही शिक्षण सक्तीचे करावे.

त्यामुळे संगणकातून केवळ इंग्रजीकरण होण्याचा धोका टळेल. मुले एकाचबरोबर रोमी लिपीतून व देवनागरी लिपीतून लिहिणाऱ्या कित्येक भाषांचा वापर करू शकतील. केवळ इंग्रजीच्या मागे धावण्याच्या वृत्तीमुळे एकेकाळचा बहुभाषिक गोवा हळूहळू लोप पावू लागलेला आहे. पोर्तुगीज काळात सुशिक्षित गोंयकाराला किमान पाच भाषा येत. गोवा मुक्तीनंतर ती संख्या, पोर्तुगीज शिकणे बंद झाल्याने चारांवर गेली. आज ती एक वा दोनांवर गेलेली आहे. या नेटबूकद्वारे दोनही की बोर्ड शिकवले तर गोव्यात नकळत एका फार मोठ्या सायलंट क्रांतीचे पर्व सुरू होईल. इंग्रजीबरोबरच कोंकणी, मराठी व हिंदीतील ई-सॉफ्टवेअर, प्रोग्राम्स, सिनेमा, एनिमेशन्स, खेळ अशा सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्यास मुलांच्या ज्ञान-शक्तीत कमालीचा बदल होईल.

मात्र यासाठी गोवा प्रशासनातील सर्व संबंधित खात्यांना व अकादमींना शैक्षणिक क्षेत्रातील कामे हाती घ्यावी लागतील. म्हणजे शिक्षण खात्यांबरोबरच कला आणि संस्कृती खाते, राजभाषा खाते, कला अकादमी, कोंकणी अकादमी, मराठी अकादमी, दाल्गाद अकादमी, तियात्र अकादमी, एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा, नाट्यसंस्था, शिक्षक संस्था, शिक्षणतज्ञ, साहित्यिक, कलाकार आणि गोवा विद्यापीठालासुद्धा यात महत्वाची भुमिका बजावावी लागेल. जर तसे झाले तर गोवा एक वेगळाच इतिहास निर्माण करू शकेल. एक नेटबूक गोव्याला एक आगळाच ‘नेट’ आणेल. वेगळाच ‘झेत’ आणेल. ही सायलंट क्रांती गोव्याचे रंगरूपच बदलून टाकील...

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

One programme that can be definitely loded on these net beek is the educational software from Azim Premji Foundation.It is excellently designed for self learning .I have used it for my students and it is wonderful.

- Urvee Phaldesai, Mashem | 24 th June 2013 18:10

 

A very good & thought provoking article. learning of typing is a must for any computer user. Hope Goa govt will give some serious thought ove ryour suggestions.

- Shekhar Gaitonde, Panaji | 24 th June 2013 10:59

 

Related Blogs