प्राविण्य गावांमध्ये, विद्यार्थी शहरांमध्ये?

By Sandesh Prabhudesai
15 June 2013 17:55 IST

यंदाच्या दहावीच्या परीक्षेत साडेपाच हजार जास्त मुले उत्तीर्ण झाली आणि त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी मुलांची मारामार झाली. त्यावर उपाय म्हणून एका वर्गातील मुलांची संख्या 50 वरून 60 करून वा वर्ग  वाढवून हा प्रश्न सोडविण्याची धडपड सध्या शिक्षण खात्याने चालविलेली आहे. दहावीत जास्त मुले होती याचा अंदाज शिक्षण खात्याला गेल्या वर्षीच यायला हवा होता व त्यानुसार त्यांनी अकरावीच्या प्रवेशाची व्यवस्था पूर्वनियोजित करायला हवी होती असा सूरही सध्या ऐकू येत आहे. त्यात चूकही काही नाही.

परंतु त्याहूनही जास्त महत्वाची एक गोष्ट शिक्षण खात्याच्या नजरेतून सुटलेली दिसते. यंदाच्या दहावीच्या निकालाच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यास ते कुणालाही लक्षात येईल. परंतु अजूनपर्यंत तरी शिक्षण खात्यातील कोणीही याकडे लक्ष दिलेले नाही. मुळात या प्रश्नामुळे आज गोव्यात सामाजिक व सांस्कृतिक समस्या उभी राहिलेली आहे. तीसुद्धा या विश्लेषणानंतर त्यावर उपाययोजना केल्यास सुटू शकते.

मुक्तीनंतरच्या 50 वर्षात गोव्यात शिक्षणक्षेत्रात कमालीची प्रगती झाली. आज तर मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून कोणत्याही प्रकारच्या हालअपेष्टा काढण्याची तयारी असलेले कित्येक पालक सापडतात. त्यात प्रामुख्याने कल आहे तो गावातील बाडबिस्तारा गुंडाळून शहरात जावून राहण्याचा. गावात रोजगार वा व्यवसायाच्या संधी नाहीत म्हणून शहरात जावून राहणाऱ्यांची संख्या वाढलेली आहेच. परंतु त्याचबरोबर केवळ मुलांच्या शिक्षणासाठी गावातून शहरात जावून राहणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. त्यात गावात शिकवणारे शिक्षकसुद्धा आहेत. त्यामुळे शहरातील शाळांवर कमालीचा ताण आलेला आहे. शहरातील शाळांच्या एकेका वर्गात सरासरी 100 ते 200 मुले असतात तर गावातील वर्गात 10 ते 30.

जनगणनेचा अहवाल पडताळून पाहिल्यास आपल्या डोक्यात लख्ख प्रकाश पडेल. 1960 मध्ये ग्रामीण लोकसंख्या 5.32 लाख होती. आज 2011 च्या जनगणनेत तीच ग्रामीण लोकसंख्या 5.51 लाख आहे. म्हणजे 50 वर्षांत ग्रामीण लोकसंख्येत केवळ साडेतीन टक्के वाढ. दुसऱ्या बाजूने शहरी लोकसंख्या 1960 मध्ये होती केवळ 94,000. आज ती 9 लाखांवर पोचलेली आहे. म्हणजे जवळजवळ 850 टक्के वाढ. अर्थात, यात बिगरगोमंतकीयांचाही भरणा असेलच. परंतु एवढ्या प्रमाणात नव्हे.

टक्केवारीच्या दृष्टीने पाहिल्यास शहरी लोकसंख्या 15 टक्के तर ग्रामीण 85 टक्के अशी परिस्थिती 1960 मध्ये होती. आज 2011 च्या जनगणनेत हेच प्रमाण अचूक उलटे झालेले आहे. 62 टक्के शहरी तर 38 टक्के ग्रामीण. 1991 पासून ग्रामीण लोकसंख्या वाढत नाही तर कमीच होत चाललेली आहे. (1991 मध्ये -6 टक्के, 2001 मध्ये -2 टक्के तर 2011 मध्ये –19 टक्के). गेल्या दहा वर्षात गोव्याची ग्रामीण लोकसंख्या 1.26 लाखांनी कमी झालेली आहे. तर शहरी लोकसंख्या 2.36 लाखांनी (35 टक्के) वाढलेली आहे.

त्यात आपण आणखीन एक समज करून घेतलेला आहे तो म्हणजे सरकारी शाळा या केवळ गरीब व कामगार वर्गातील मुलांसाठी असतात तर खाजगी (प्रायव्हेट) शाळा इतरांसाठी. त्यामुळे तर खाजगी शाळांतील मुलांची संख्या प्रमाणाबाहेर वाढत चाललेली आहे. पणजीच्या मुष्टिफंडसारख्या शाळेत तर यंदा 226 मुले दहावीच्या परीक्षेसाठी बसलेली होती. गावातील व कित्येक सरकारी शाळांमध्ये पाचवी ते दहावी मिळून 226 मुले मिळणे कठीण.

या पार्श्वभूमीवर यंदाचा दहावीचा निकाल काय सांगतो? एकूण 383 शाळांतील 39 शाळांचा निकाल 100 टक्के लागला. त्यातील दोन वास्कोच्या व एकेक मडगाव व पणजीच्या सोडल्यास इतर सर्व शाळा ग्रामीण भागातील. शिवाय त्यात सहा शाळा चक्क सरकारी. उसगावची सरकारी शाळा तर बहुतांश बिगरगोमंतकीयांच्या मुलांचाच भरणा असलेली असते असे म्हणतात. त्यांचाही निकाल 100 टक्के लागला. ओल्ड गोव्यालाही अशीच एक खाजगी शाळा आहे. तिथे एकही मूळ गोमंतकीय शिकत नाही. सगळे गाड्या भरभरून पणजीला जातात. तिथे शिकतात ती केवळ बिगरगोमंतकीय कामगारांची मुले. यंदासुद्धा या शाळेचा निकाल 75 टक्के.

केवळ एक वा दोन मुले नापास झालेल्या आणखीन 58 शाळा आहेत. त्याही बहुतेक सर्व ग्रामीण भागातल्याच. त्यातही 16 सरकारी शाळांचा समावेश. काणकोणातील सादोळशे गावात चालणाऱ्या सरकारी शाळेने तर दुसऱ्यांदा 100 टक्के निकाल काढला. गोव्याच्या सीमेवरील काणकोणच्या निराकार संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या दोन्ही शाळांचा निकाल यंदा 100 टक्के लागला. त्यातील माशेच्या शाळेचा तर लागोपाठ दुसऱ्या वर्षी 100 टक्के. पेडणेच्या कोरगावमध्ये चालणाऱ्या कमलेश्वर हायस्कूलच्या दोन्ही शाळांनीही 100 टक्के निकाल काढला.

काय धडा घ्यायचा आपण यातून? कोणत्या शाळांचा दर्जा जास्त? ग्रामीण की शहरी शाळांचा? एकेका वर्गात 40 ते 60 पर्यंतसुद्धा मुले असणाऱ्या शाळांतून जास्त चांगले शिक्षण मिळेल की 10 ते 20 मुले असलेल्या शाळांतून? शहरातील शाळांतून केवळ खोगीरभरती केली जाते आणि ग्रामीण शाळांतून मुले कमी असल्यामुळे मुलांवर जास्त लक्ष केंद्रित करणे शक्य होते हे तर आहेच. परंतु म्हणून या आकडेवारीनंतर एकदम टोकाची दुसरी भुमिका घेणेही चुकीचे होईल. कारण शिक्षकांच्या शिकवण्यालासुद्धा एक मर्यादा असते. आपणच शहरातील शाळांमध्ये प्रवेशासाठी गर्दी करतो व नंतर शिक्षकांना दोष देत असलो तर ते चुकीचे ठरेल. शहरी शाळांमध्ये साधनसुविधा जास्त चांगल्या असतात तर ग्रामीण शाळांतून त्या नसतात असा युक्तिवाद केला तर तोही रास्त ठरणार नाही. उलट शहरातील काही शाळांना स्वतःची मैदानेसुद्धा नसतात.

साधनसुविधांबरोबरच आपण आपल्या मुलांच्या ट्यूशनवरही अमाप पैसा ओततो. अशा प्रकारचे ट्यूशनचे प्रकार ग्रामीण भागातून सापडत नाहीत. उलट ज्या ग्रामीण शाळांचा निकाल उत्तम लागलेला आहे तिथले शिक्षक आपल्या मुलांसाठी फुकट एक्स्ट्रा वर्ग घेतात. शिवाय वर्गात मुले कमी असल्याने त्यांच्यावर वर्गातच लक्ष केंद्रित करणे शक्य होते. वेगळ्या ट्यूशनची गरजही भासत नाही. शहरी शिक्षणसंस्थांसाठी शिक्षण हा निव्वळ धंदा झालेला आहे असाही मुद्दा कुणी उपस्थित करेल. परंतु त्या शाळा अवघ्याच. गावामध्ये शिक्षण चांगले मिळत असूनसुद्धा तिथे मुले नसतात तर शहरातील शाळांतून प्रमाणाबाहेरील संख्येमुळे चांगले शिक्षण देणे शक्यच नसते अशी परिस्थिती सध्या तरी आहे. त्यामुळेच शहरांपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी जास्त सुसंस्कृतसुद्धा बनतो.

या सर्व गोष्टींचा आणखीनही खोलवर विचार करून शिक्षणासाठी शहरीकरणाकडे वळण्याची ही प्रथा उलटी करण्यावर गोव्याचे शिक्षणतज्ञ विचार करतील का? यावर योग्य ती उपाययोजना करून प्रत्येक शाळेतील प्रत्येक मुलावर लक्ष केंद्रित करण्याची शिक्षणपद्धती सुरू होईल का? झाली तरच गोव्याची धडगत आहे. अन्यथा नॉलेज सुपरपावरचीही बस गोव्याला चुकेल हे निश्चित.

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs