निर्भय संवेदनशील सामुहिक जबाबदारी

By Sandesh Prabhudesai
26 January 2013 08:30 IST

दिल्लीच्या बलात्कार प्रकरणावर भारतभर वादळ उठल्यापासून आणि वास्कोतील अल्पवयीन मुलीवर झालेले बलात्कार प्रकरण जरा जास्तच उजेडात आल्यापासून आपणा सर्वांच्याच मनातील असुरक्षितता वाढली आहे का? आपणा सर्वांनाच सर्वच पुरुषांची भीती वाटू लागली आहे का? लोकांवरील आपला विश्वास उडू लागला आहे का? आपल्या मुलांना आता आपण जिवापलीकडे जपले पाहिजे ही भावना मनात दृढ होवू लागली आहे का? मुलींना एकटे बाहेर पाठविण्याचे धाडस आपणाला होत नाही का? आपली मुले शाळेतून परत येईपर्यंत आपले मन थाऱ्यावर नसते का? आपल्या मुलांना – आणि खास करून मुलींना – आपण जास्त स्वातंत्र्य द्यायचे नाही असा आपण निश्चय वगैरे केलेला आहे का? तसे आपण आपल्या मुलांजवळ बोललो आहोत व त्यांना खडसावून सांगितले आहे का? आपल्या मुलांवर बंधने घालण्यापासून आता पर्याय नाही या निर्णयाप्रत आपण आलो आहोत का?

तसे असेल तर ही गोष्ट जास्त धोकादायक आहे. बलात्काराहूनही जास्त धोकादायक. अर्थात, म्हणून मुलांना निर्बंध सोडावे आणि बिनधास्त रहावे असा याचा अर्थ बिलकूल नव्हे. निष्काळजी तर बिलकूल राहू नये. बेफिकिर तर नव्हेच नव्हे. काळजी हवी, परंतु चिंता नको. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात जसा फरक असतो तसा सुरक्षा आणि अतिसुरक्षा यातही असतो. सुरक्षा हवीच. परंतु ती स्वातंत्र्यावर घाला घालणारी बंदिवासी नसावी. शिस्त हवी, परंतु ती बंधनात जखडून ठेवणारी नसावी. दोन-तीन दशकांपूर्वी आपण सर्वच जण रस्त्यावरून मित्र-मैत्रिणींसमवेत हसत खिदळत शाळेत जात असू. त्यातून आपणामध्ये एक प्रकारची निर्भय वृत्ती तयार झाली होती हे आपण कुणीच नाकारणार नाही. शिवाय त्यातून सामुहिकतेची एक फार मोठी जाणीव आपणा सर्वांमध्ये सामुहिकरित्या तयार झाली होती. आजही गावातून मुले तशीच शाळेत जातात. परंतु शहारांतून हा प्रकार जवळजवळ बंदच झालेला आहे.  स्कूटर वा गाडीतून मुलांना शाळेत पोचविणे ही आधुनिक संस्कृती बनली आहे. त्यात सरकारने बालरथ आणल्यापासून तर चालत शाळेत जाणे हा गुन्हा बनलेला आहे. त्यात आणखीन भर म्हणजे बलात्कार प्रकरणांवर उठलेले नवीन वादळ. आता तर चालण्यावरच बंधने आली तर त्यात नवल नव्हे. यातून आपण आपल्या मुलांना अतिसुरक्षित तर करीत नाही ना, या गोष्टीवर आपण अंतर्मुख होवून विचार करायला हवा. सुरक्षा सामुहिकतेमध्ये आहे की एकटेपणामध्ये यावरही विचार व्हायला हवा.

दिल्लीत काही विकृतांनी भर दिवसा चालत्या बसमध्ये केलेल्या बलात्कार प्रकरणावर प्रसार माध्यमांनी वादळ उठवले तेव्हा त्या मुलीचे नाव लपवताना तिला नाव दिले – निर्भया. तो प्रकारच एवढा क्रूर होता की ती जगू शकली नाही. लागोपाठ वास्कोत चक्क सात वर्षांच्या दुसरीत शिकणाऱ्या धिटुकलीवर बलात्कार झाला. त्यामुळे गोव्यात तर सर्वत्र भीतीची लाटच पसरली. आता दिल्लीची ती निर्भया गेली आणि दुसरी-तिसरीतील मुलगीही असहाय झाली म्हणून निर्भया ही संकल्पनाही मेली का? आता आपण आपल्या मुलांना निर्भय बनवणार की बंधनांच्या जोखडात बांधून ठेवून त्यांना आणखीनही घाबरट बनवणार? या संपूर्ण प्रकरणातून आपण काय शिकणार? मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायला हवे ही भावना आणखीनही प्रबळ बनविणार की अशी आगळीक करणाऱ्यांची मुस्कटे फोडून काढण्याचे धैर्ये तिच्यामध्ये जागवणार? तिला निर्भया बनविणार, की असहाय? तिच्यामध्ये सामुहिक सामर्थ्य तयार करणार की फक्त एकटीने मूग गिळून सर्व काही सोसण्याचे?

या दोन्ही प्रकरणांच्या गाजावाजानंतर गोव्यात सर्वत्रच सुरक्षेच्या उपायांवर चर्चा सुरू झालेली आहे ही गोष्ट फारच चांगली आहे. शिक्षण खात्याने फारच विचारपूर्वक मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत. विद्यार्थ्यांना आणि खास करून मुलींना कशी सुरक्षा द्यावी इथपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव तयार करण्यापर्यंत बहुतांश गोष्टींचा त्यात समावेश आहे. पणजीमध्ये झालेल्या एका बलात्कार प्रकरणानंतर घडवलेल्या विष्णू वाघ सभागृह समितीनेही काही चुकीच्या प्रकारांवर उजेड टाकलेला आहे. इतर स्वयंसेवी संस्थांनीही चांगल्या सूचना केलेल्या आहेत. शिवाय विविध स्तरांवर सर्व बाजू विचारात घेवून उहापोह चालूच आहे. जागृत समाजाचे हेच तर लक्षण आहे. ते दिसतेही आहे.

परंतु यातून आणखीन एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे खास करून शाळेतील शिक्षक व व्यवस्थापनामध्ये आजकाल आलेली जबाबदारीविषयीची मरगळ. शिक्षकी पेशा हे मिशन असते व शाळा चालवणे हे मिशनरी कार्य याचा आपणाला हल्लीच्या काळात विसर पडत चालला होता का?. त्याचीच जाणीव दिल्ली आणि वास्कोच्या प्रकरणांनी आपणाला करून दिली आहे का? या गोष्टींचा परामर्ष घेताना आमदार विष्णू वाघ यांनी एका छोट्याशा परंतु महत्वाच्या गोष्टीवर छान प्रकाश टाकलेला आहे. शाळा सुटल्यावर मुलांआधी शिक्षक बस पकडायला धावतात व आपापल्या गाड्या घेवून निघून जातात. मुले मागेच रहातात. म्हणजेच शिक्षक आपली जबाबदारी पार पाडत नाहीत. शाळांची व्यवस्थापने कुठे तरी चुकतात. मुलांच्या सुरक्षेपेक्षा शाळेचे नाव वाचविण्यासाठी जास्त धडपडतात. आणि त्यातून मग वास्कोत झाले तसे कायमचे बदनाम होतात. वास्कोच्या या प्रकरणातून शिक्षक वर्गामध्ये विद्यार्थ्याला सुरक्षा देण्याच्या व निर्भय बनविण्याच्या जबाबदारीची जाणीव वाढली तर त्यासारखे दुसरे या जनआंदोलनाचे यश नाही.

आणखीन एक फार मोठी जबाबदारी आहे ती प्रसार माध्यमांची. बलात्काराची ही प्रकरणे काही तशी नवी नव्हेत. परंतु दिल्लीच्या बलात्कार प्रकरणानंतर असले सगळेच प्रकार अचानक हेडलाईन व्हायला लागले. काहींनी तर ते मसालेदारसुद्धा करायला सुरवात केली. त्यातून बलात्कारी विकृतांच्या ह्रदयात धडकी भरेल की त्यांच्या वासना आणखीन जागृत होतील याकडेसुद्धा लक्ष दिले नाही. यापूर्वी अशी प्रकरणे होत नव्हती असे नव्हे. परंतु त्यांना एवढी प्रसिद्धी मिळत नव्हती. ‘एक बातमी’ याहून बलात्कारांच्या प्रकरणांना जास्त महत्व दिले जात नव्हते. प्रसार माध्यमे याबाबतीत आज आहेत तेवढी संवेदनशील नव्हती हे आपण मान्य करायलाच हवे. आज खरी गरज आहे ती असल्या प्रकारांना भरभरून प्रसिद्धी देण्याची नव्हे, तर असे अश्र्लाघ्य प्रकार परत होवू नयेत म्हणून हवी असलेली जनजागृती करण्याची. त्या दृष्टीने प्रसार माध्यमांनी सेन्शेनलायज नव्हे तर सेन्सिबल बनणे जास्त महत्वाचे आहे. तेव्हाच या जनआंदोलनांना एक दिशा मिळेल. आपण सर्वच जण जबाबदार बनू. संवेदनशील बनू. आपल्या मुलांना स्वतंत्र विचारांचे बनवू. त्यांच्यामध्ये सामुहिक स्वातंत्र्याचे सामर्थ्य निर्माण करू. पुढची पिढी खऱ्या अर्थाने निर्भय बनवू.

(दैनिक हेराल्ड मध्ये प्रसिद्ध)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs