बलात्काराचे आम्हीही सामाजिक गुन्हेगार

By Sandesh Prabhudesai
28 December 2012 13:10 IST

दिल्लीच्या सामुहिक बलात्कारावर सध्या संपूर्ण देश पेटून उठला आहे. तसे हे काही पहिलेच प्रकरण आहे असे नाही. आमच्या भारत देशाला सामुहिक बलात्कारांची ‘उज्वल’ परंपरा आहे. आणि या परंपरेचे पाईक होवून ही सामुहिक बलात्कारांची साखळी अजूनही तशीच चालू आहे. सामुहिक बलात्कार केवळ वासना भागविण्यासाठी होतात असे नव्हे. धडा शिकविण्यासाठी होतात. जरब बसविण्यासाठी होतात. सूड घेण्यासाठी होतात. आयुष्यातून उठविण्यासाठी होतात. आणि दिल्लीत झाला तसा केवळ ‘मजा’ लुटण्यासाठीही होतात. या भारत देशाने जमीनदारांनी दलित-पिडितांवर केलेले सामुहिक बलात्कार सोसलेले आहेत. तथाकथित उच्चवर्णियांनी केलेले सामुहिक बलात्कार सोसलेले आहेत. उच्चवर्गियांनी लोकांमधला असंतोष चिरडून टाकण्यासाठी केलेले सामुहिक बलात्कार सोसलेले आहेत. सत्ताधारी राजकारणी वा त्यांच्या शूरवीर पुत्रांनी केलेले सामुहिक बलात्कार सोसलेले आहेत. आणि संरक्षणासाठी तैनात केलेल्या सेनेने निरपराधांवर केलेले सामुहिक बलात्कारही सोसलेले आहेत. चित्रपटांतून बलात्कारांचे उदात्तीकरण करून कामवासनांना उद्युक्त करण्याचे महान कार्य सेन्सॉर बोर्डाने तर इमानेइतबारे केलेले आहे. या सर्वांचाच परिणाम म्हणून दिल्लीतील घटनेनंतर संपूर्ण समाजातच संतापाची लाट उसळलेली आहे. जशी अण्णा हजारेंच्या लोकपाल विधेयकाच्या मागणीचे निमित्य घेवून भ्रष्टाचाराविरुद्ध उसळली, जवळजवळ तशीच.

सामुहिक वा वैयक्तिक पातळीवर छेड काढण्यापासून बलात्कार करण्यापर्यंतच्या सर्व प्रकारच्या कामांध प्रकारांना आळा बसावा म्हणून सर्वोच्च न्यायालयाने आदेश देवून सरकारी व खाजगी आस्थापनांमध्ये  लैंगिक आक्रमणांची चौकशी करणाऱ्या समित्या स्थापन करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. विशाखा विरुद्ध राजस्थान सरकार या खटल्यानंतर हा आदेश दिल्याने या समित्यांनाही विशाखा समिती असेच नाव पडलेले आहे. तरीही आजपर्यंत या विशाखा समित्या कित्येक आस्थापनांमध्ये स्थापनच केलेल्या नाहीत. परंतु जिथे स्थापन केलेल्या आहेत तिथे बऱ्याच प्रमाणांत लैंगिक आक्रमणांवर आळा बसलेला आहे. यात केवळ शारिरिक संबंधच नव्हे तर लैंगिक उपभोगाची नुसती मागणी करणे, लैंगिक शब्द वापरणे, लैंगिक चित्रे वा चित्रफिती दाखवणे वा इतर कोणत्याही प्रकारचे लैंगिक चाळे वा वागणूक दिसली तरीसुद्धा कारवाई करण्याचा आदेश आहे. या समित्या आता तरी सर्वत्र स्थापन व्हायला हव्यात. लैंगिक छळाच्या तक्रारी नोंदवून घेणाऱ्या पोलिसांचीही मानसिकता बदलायला हवी. बलात्कार करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे. मात्र महिला संघटनांनी शिक्षेच्या प्रकारापेक्षा बलात्काराचा आरोप सिद्ध करण्याची प्रक्रिया आणखीन कार्यक्षम बनविण्याची मूलभूत मागणी लावून धरलेली आहे. वृत्तपत्रे व टीव्ही चॅनल्सवर या सर्व गोष्टींवर अभ्यासपूर्ण चर्चा आजही चालू आहे.

या सर्व गोष्टी जरुरीच्या असल्या तरी एका महत्वाच्या गोष्टीकडे मात्र या चर्चेत बहुतांश दुर्लक्ष केलेले जाणवते. मुळात बलात्कार हा एक शारिरिक हल्ला आहे. मारहाण जसा एक शारिरिक हल्ला तसाच हाही एक शारिरिक हल्ला. हात-पाय तोडण्याचे वा डोकी फोडण्याचे जसे प्रकार होतात तसाच हाही एक प्रकार. हे एक गुन्हेगारी कृत्य आहे. त्यात गुन्हेगाराला शिक्षा करणे महत्वाचे असतेच. परंतु इतर शारिरिक हल्ले व बलात्कार यात आपण समाज एक फार मोठा फरक करतो. इतर प्रकारचे शारिरिक हल्ले झाले की आपण केवळ हल्ला करणाऱ्याला दोषी ठरवतो व हल्ल्यात बळी पडलेल्या व्यक्तीला पूर्ण सहानुभूती दाखवतो. मात्र बलात्कार झाल्यानंतर गुन्हेगारापेक्षाही या गुन्ह्यात बळी पडलेल्या निरपराध्याला समाज जास्त मोठी शिक्षा करतो. ती स्त्री असेल मग तर ती बदनामच ठरवली जाते. बलात्काराला तर आपण पर्यायी शब्द म्हणून चक्क अब्रू लुटणे हा शब्द वापरतो. तिचे शील भ्रष्ट झाले असे संबोधून तिला समाजापासून वेगळे वागवतो. तिच्याकडे एक भ्रष्ट व्यक्ती म्हणून पहातो. आपण स्वच्छ आणि ती अस्वच्छ अशा दृष्टीने पहातो. तिला कलंकित समजतो. ही आपली सामाजिक वृत्ती कितपत योग्य आहे? तिचा अब्रूशी संबंध लावणे कितपत बरोबर आहे?  एका निरपराध्यावर झालेल्या शारिरिक हल्ल्याला सामाजिक कलंक मानणे नितीमत्तेला धरून आहे का? हीच का आपली प्रागतिक नितीमत्ता? हाच का आपला मानवतावादी दृष्टिकोण?  

लैंगिक स्वरुपाचे शारिरिक संबंध केवळ विवाहानंतरच असावेत हा एक सामाजिक प्रघात आहे. हा प्रघात तोडून विवाहपूर्व शारिरिक संबंध ठेवणे वा विवाहबाह्य संबंध ठेवण्याचे प्रकार गेली कित्येक शतके अव्याहतपणे चालू आहेत. त्यातील काही व्यक्तींच्या व पुराणपुरुषांच्या संबंधांचे तर आपण उदात्तीकरणसुद्धा केलेले आहे. अशा संबंधांना आपण त्या व्यक्तीच्या अधिकारांचे मोजपाप करून वेगवेगळी स्थाने देतो. परंतु समाज त्यांना कलंकित अजिबात मानीत नाही. त्यांची अब्रू जातही नाही आणि कमीही होत नाही. त्यांना कोणी गुन्हेगारही मानीत नाही. मात्र कुणीतरी शारिरिक हल्ला (बलात्कार) केला तर त्या निरपराध व्यक्तीला मात्र आपण कलंकित का मानतो? तिच्या अब्रूवरच घाला पडला असे का समजतो? तिच्याशी आता कोण लग्न करणार असा प्रश्र्न सहजपणे कसा काय विचारतो? तिला बदनाम का करतो? म्हणजे चोरीछुपे जाणीवपूर्वक सर्व काही करणारे अब्रूदार, आणि काहीही चूक नसताना ज्यांच्यावर शारिरिक हल्ले होतात ते अब्रू घालवलेले? हे कसले अजब तर्कशास्त्र?

आज बलात्काराविरुद्ध भारतभर संतापाची लाट उसळलेली आहे. ती योग्यही आहे. न्याय्य आहे. परंतु हे सर्व करताना हे बलात्कारी नराधम आमची अब्रू लुटत आहेत, आम्हाला बदनाम करीत आहेत, आम्हाला कलंकित करीत आहेत, आम्हाला जीवनातून उठवीत आहेत असा आक्रोश केला तर मात्र तो योग्य ठरणार नाही. तसे असेल तर मग हे बलात्काराचे ‘नकारात्मक उदात्तीकरण’ ठरेल. तुम्ही बलात्कारी गुन्हेगारांना पकडा, परंतु आम्ही मात्र आमची सामाजिक मानसिकता बदलणार नाही आणि बलात्कारात बळी पडलेल्यांकडे बघण्याची आमची कलंकित दृष्टीही बदलणार नाही ही भुमिकाच मुळात चुकीची ठरेल. आम्हालाही आमची दृष्टी बदलावीच लागले. अन्यथा, जेवढे बलात्कारी गुन्हेगार आहेत तेवढेच आम्हीही बलात्काराचे सामाजिक गुन्हेगार ठरू. बलात्कारात बळी पडलेल्यांवर सामाजिकदृष्ट्या मानसिक बलात्कार करणारे सामाजिक गुन्हेगार!

(दैनिक हेराल्ड मध्ये प्रसिद्ध)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs