औद्योगिक विकासाचे ‘हातचे सोडून पळत्यामागे’

By Sandesh Prabhudesai
18 November 2012 21:57 IST

मायनिंग बंद झाले वा कालच्या प्रमाणात मंदावले तर गोव्यासाठी पर्यायी अर्थव्यवस्था कोणती यावर सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.  1961 साली गोवा मुक्त झाला त्यावेळी मायनिंग हाच गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा होता. तसेच झुआरी एग्रो, एमआरएफ, गोवा शिपयार्ड, सिबा गायगी अशा काही प्रमुख उद्योगांमुळे गोव्यात रोजगार निर्माण झाला. आखाती देशात सुरू झालेला ओढा आजही चालू आहे. त्याशिवाय गोवा मुक्तीपासून आजपर्यंत रोजगार देणारा प्रमुख मालक म्हणजे गोवा प्रशासन. आजच्या घडीला 50 हजारांहून जास्त गोमंतकीय सरकारी कर्मचारी आहेत. सरासरी प्रत्येक सव्हिसावा गोमंतकीय सरकारी नोकर आहे. सरकारी नोकऱ्यांसाठी लाच देण्याचा व त्या लाचेवर गब्बर होण्याचा राजकीय उद्योग तर आजही चलतीत आहे.

त्यानंतर 1980 च्या दशकापर्यंत कारखाने घालण्यासाठी केंद्र सरकारकडून भांडवली अनुदान देण्याची योजना चालू राहिली.  औद्योगिक दृष्ट्या मागासलेले राज्य म्हणून गोव्यातील उद्योगांना वीस वर्षे आयकरात सूट मिळाली. विक्री करातही सूट होती. त्याचा फायदा मध्यम स्वरुपाच्या व छोट्या उद्योगांनी घेतला. परंतु ही सूट संपली आणि कित्येक उद्योगांनी गोव्यातून गाशा गुंडाळला. त्यातल्या त्यात भरभराटीला आला तो फार्मा उद्योग. खुद्द गोवा सरकारच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार 1975 ते 1980 या पाच वर्षांत छोट्या उद्योगांमध्ये प्रचंड वाढ झाली. परंतु नंतर ती खालावतच गेली. 2005 ते 2010 या पाच वर्षांत तर केवळ सहा टक्क्यांनी छोट्या उद्योगांत वाढ झाली. आजच्या घडीला गोव्यात 7505 छोटे उद्योग अधिकृतरित्या नोंद केलेले आहेत. परंतु अर्थतज्ञांच्या मते हा आकडा 2500 हून जास्त नाही. हे खरे असेल तर ही चिंतेची बाब आहे.

1980 पासून गोव्यात बहरला तो पर्यटन उद्योग. शॅक्स आणि भाड्याच्या खोल्यांपासून पंचतारांकित रिसोर्टपर्यंत चहूबाजूंनी तो वाढतच गेला. परंतु त्यात जास्त भर दिला गेला तो किनारी पर्यटनावर. त्याहूनही जास्त म्हणजे विकृत पर्यटनावर. त्याचाच परिणाम म्हणून ड्रग्स, रेव्ह पार्ट्या, अर्धनग्न पर्यटक, एकेका देशाने काबीज केलेले किनारे, मसाज पार्लरच्या नावे चालणारा वेश्याव्यवसाय, पिडोफिल्स या नावाने ओळखले जाणारे लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणारे पर्यटक, इलेक्ट्रोनिक व लायव्ह कसिनोंवर खेळणारे जुगारी पर्यटक अशा सर्व प्रकारच्या विकृत वृत्तीच्या पर्यटकांसाठी गोवा हे नंदनवन बनले. या अजगरी स्वरुपाच्या पर्यटनाला आळा घालणे ही आज सर्वांच्याच आवाक्याबाहेरील गोष्ट झालेली आहे. याला पर्याय म्हणून स्थायी स्वरुपाचा पर्यटन उद्योग विकसित व्हायला हवा ही चर्चा गेली दोन दशके चालू आहे. त्यासाठी ग्रीन टुरिझम, स्पोर्टस् टुरिझम, एडव्हेंचर टुरिझम, हॅरिटेज टुरिझम अशा पर्यायी पर्यटनाचे प्रयोग सुरू झालेले आहेत. काहीजण त्यात यशस्वीही झालेले आहेत. परंतु त्याला हवा तेवढा प्रशासकीय आणि राजकीय पाठिंबा मिळत नसल्याने कासवाच्या गतीने हे पर्यायी पर्यटन वाढत आहे.

या सर्व पार्श्र्वभूमीवर गोव्याच्या अर्थव्यवस्थेचे प्रत्यक्ष चित्र  दिसते आहे ते मात्र वेगळेच आहे. जगातील कोणतीही अर्थव्यवस्था ही तीन प्रमुख क्षेत्रात विभागली जाते. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र व तृतीय क्षेत्र. नैसर्गिक साधनसंपत्ती हेच उत्पादन म्हणून घेवून त्याची विक्री करून चालतो तो प्राथमिक क्षेत्राचा उद्योग. यात शेती, मच्छिमारी, मायनिंग असे उद्योग येतात. द्वितीय क्षेत्रात ही नैसर्गिक साधनसंपत्ती कच्चा माल म्हणून वापरला जातो व कारखान्यातून यंत्रांद्वारे नवीन उत्पादन तयार केले जाते. त्यात प्रामुख्याने यंत्राद्वारे चालणारे कारखाने व बांधकाम उद्योगांचा समावेश होतो. या दोन्ही क्षेत्रांतील उद्योग चालवण्यासाठी इतर कित्येक सेवा लागतात. उदाहरणार्थ वाहतूक, संपर्क माध्यमे, व्यापार, हॉटेल्स, मनोरंजन, रियल इस्टेट, अर्थपुरवठा व बँकिंग, माहिती तंत्रज्ञान, औद्योगिक सेवा व इतर वैयक्तिक सेवा. याला आजकाल सेवा उद्योग असे सुटसुटीत नाव देण्यात आलेले आहे. संपूर्ण भारतातच आज हा तृतीय क्षेत्रात मोडणारा सेवा उद्योग भरभराटीस आलेला आहे.

आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालानुसार गोव्यातील एकूणच प्राथमिक क्षेत्राचा उद्योग 1993 पासून 2011 पर्यंत 21 टक्क्यांवरून 11 टक्क्यांवर आलेला आहे. शेती 10 टक्क्यांवरून चक्क 3 टक्क्यांवर घसरली आहे. मच्छिमारी 4 टक्क्यांवरून केवळ 1 टक्का राहिलेली आहे. त्यातल्या त्यात वाढला आहे तो मायनिंगचा उद्योग. कायदेशीर मायनिंगचा उद्योग 1993 साली होता तेवढाच आजही केवळ 6 टक्के आहे. शेती उद्योगाला नवसंजीवनी देण्यासाठी मनोहर पर्रीकरांच्या सरकारने काही महत्वाकांक्षी संकल्प सोडलेले आहेत. त्यांच्या या संकल्पांना युवावर्गाने पाठिंबा देणे जरुरीचे आहे. बहुसंख्येने गोमंतकीय गावातून शहरात स्थलांतरीत झालेले आहेत. ते परत गावी गेले तरच ही संकल्पपूर्ती शक्य आहे. मात्र ही क्रांती गोव्यात घडली तर गोव्याचे आर्थिक चित्र पूर्णतया पालटेल हे निःसंशय.

गोव्यात खऱ्या अर्थाने वाढत चाललाय तो मात्र सेवा उद्योग. गोव्याची 51 टक्के अर्थव्यवस्था आज या उद्योगावर चालते. त्यातल्या त्यात या क्षेत्रात जास्त भरभराटीला आला आहे तो वाहतूक, संपर्क माध्यमे, रियल इस्टेट, अर्थपुरवठा, बँकिंग आणि इतर लोकसेवा. परदेशी जावून काम करायचे आणि बँकांतील ठेवी वाढवायच्या या कामात गोमंतकीय गुंतलेला आहे. या ठेवी उद्योगधंद्यात गुंतवण्याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. परंतु इथल्या व्यापार व इतर सेवांमधून कमाई करण्यासाठी फार मोठ्या संख्येने भारतातील बिगरगोमंतकीय गोव्यात येत आहे. कारण इथे संधी आहेत आणि आपण गोमंतकीय त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहोत. बिगरगोमंतकीय कामगार भराभर आपापल्या गावात जात आहे. मात्र बिगरगोमंतकीय व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने गोव्यात येत आहे. गोमंतकीय युवावर्गाला या संधींची जाणीव करून देण्याची जाणीव प्रशासनातही जाणवत नाही. सगळेच उद्योगमंत्री अजूनही कारखाने आणून रोजगार देण्याचीच भाषा बोलत आहेत. स्वयंरोजगारातून कमाई करणारा गोमंतकीय छोटा व्यापारी वा व्यावसायिक बनविण्यासाठी हवी असणारी मानसिकता घडविण्यात आम्ही मागे पडत आहोत.

गोव्याची अर्धीअधिक अर्थव्यवस्था ज्या सेवा उद्योगावर आज अवलंबून आहे तिथे आपण अर्धवटासारखे वागत आहोत. ही अर्धवट मानसिकता गोव्याची आणखीन एक बस चुकवेल आणि पर्यटनाप्रमाणेच त्याचाही फायदा भलतेच घेतील. आम्ही मात्र बसू विनाकारण सरकार आणि राजकारण्यांच्या नावे शंख करीत!!

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

Well written piece.

Who will wake the Goan youth out of their slumber and enlighten them to look out for innovative industries?

There are no industrialists and entrepreneurs who have grown without the government patronage to lead. And this government patronage has crippled the goan entrepreneurship.

You can't expect the Congress leaders to guide the youth towards progress as they are the modern day Zamindars whose base and superstructure is built on the ignorance and narrow minded thinking of the electorate.

BJP with Manohar Parrikar at at the helm of affairs too is following the similar route.

Ultimately Goa is the biggest loser.

The current situationn is grim and reminds me a of an old song in Marathi about a wily wolf.

लबाड मोनू ढोंग करतोय, गांधीगिरीच सोंग करतोय

असा ढोंग करतोय

खाणमालक नवरा अन गोवा नवरी

डोईवरून बाशिंग उतरना

मोनुच्या हुकूमशाही कारभारान

नवरीचा कोंडमारा संपेना

विष्णू वाघाचा ताशा, बंद पडलाय

कोकणीवाद्यांची पिपाणी थंड पडलीय

पण फेसबुक वरून संघवाल्यांचा ढोल

फुटला तरीबी ढमढमतोय

असा ढोंग करतोय

जुन्या शर्टाचे दाखले देवून मध्यमवर्गीयाला रीझवतोय

अल्पसंख्यांकांना उल्लू बनवून सत्तेची लालूच दाखवतोय

संघाची चड्डी, गळ्यातले जानवे हळूच लपवून

xxx मारतोय, असा ढोंग करतोय

- Gajendra Tari, Ponda Goa | 19 th November 2012 10:36

 

Related Blogs