पत्रकारिता प्रॉडक्ट की प्रॉडक्टिव्ह?

By Sandesh Prabhudesai
31 October 2012 21:29 IST

कामात असताना एक दिवस अचानक एका विद्यार्थ्याचा फोन आला. “आम्हाला एक उत्पादन (प्रॉडक्ट) घेवून प्रकल्प करायला लावलाय. मी वृत्तपत्र हे उत्पादन घेवून प्रकल्प करतोय. वृत्तपत्राचा नफा तुम्ही कसा काय ठरवता हे सांगाल का?” मी सध्या कामात आहे आणि अशा गोष्टी फोनवर सांगणे शक्य नाही म्हणून सांगून मी फोन ठेवला. त्याला प्रत्यक्ष येवून भेट म्हणूनही सुचवले. पण त्याच्या त्या प्रश्र्नाने मनातली अस्वस्थता वाढायला लागली. मीच त्याला परत फोन लावला - “वृत्तपत्र म्हणजे काय? काय करते ते?” तो थोडाफार गडबडला. काही वेळ थांबला व म्हणाला – सत्य परिस्थिती सांगते. माझा लगेच प्रतिप्रश्र्न – “सत्य परिस्थितीच्या कथनाचा नफा कसा काय मोजायचा?” तो गप्पच झाला. वृत्तपत्र जर केवळ एक उत्पादन आहे तर त्यातून ग्राहकाला जे समाधान मिळते त्यावर नफ्या-तोट्याचे मोजमाप करावे लागेल. (मी त्याला माझे मत सांगीत गेलो). अर्थात, वृत्तपत्र काढण्यासाठी अर्थकारण लागतेच. वृत्तपत्राची निर्मिती व ते चालविण्यासाठी लागणारा खर्च याचा ताळेबंद करावा लागतोच. परंतु खर्च आणि उत्पन्न तसेच त्यातून मिळणारा आर्थिक नफा वा तोटा हाच वृत्तपत्राचा ताळेबंद मानायचा का?

आजकाल पत्रकारितेचे मिशन संपलेले आहे व तो निव्वळ एक धंदा म्हणून राहिलेला आहे ही टीका फार मोठ्या प्रमाणात होत असते. म्हणजेच पत्रकारिता केवळ धंदा म्हणून चालवू नये अशीच सर्वांची इच्छा आहे, अपेक्षाही आहे व वृत्तपत्रामागचे ते तत्वज्ञानही आहे. अशा परिस्थितीत आजची पिढी वृत्तपत्राकडे केवळ एक प्रॉडक्ट म्हणून पहात असेल तर बरीच मोठी गफलत होतेय. याचा अर्थ ताणायचा झाला तर पत्रकारिता हा ‘केवळ’ धंदा बनतो. आणि आम्ही त्याचे मार्केटिंग करणारे एजंट (वा बडवे). लोकांना जे आवडते तेच तेवढे द्यायचे आणि भरपूर नफा कमवायचा. सत्य परिस्थिती अजिबात सांगायची नाही. लोकांना रुचेल तीच तेवढी सांगायची. कटू सत्ये मांडायची नाहीत. सर्वांच्या बाजू मांडायच्या नाहीत. त्यावर मतप्रदर्शन करतानासुद्धा आपल्या ग्राहकवर्गाला आवडेल तेच लिहायचे. प्रत्येकाने आपापला ग्राहकवर्ग निवडायचा. त्या वर्गाचे मन मोडायचे नाही. त्याच्या मनाला रुचणार नाहीत अशा विषयांना स्पर्शसुद्धा करायचा नाही. त्यांचे विश्लेषण करायचे तर सोडूनच द्या. अग्रलेख हा प्रकारच नाही. असलाच तर तो केवळ आपापल्या ग्राहकवर्गाला खूष करण्यासाठी. लेखसुद्धा ग्राहकवर्गांच्या प्रतिनिधींचे. ग्राहको देवो भव म्हणायचे आणि आपापल्या ग्राहकवर्गाला भजत बसायचे. विचार करा – अशी पत्रकारिता सर्वत्र सुरू झाली तर काय होईल?

आता यावर कुणीही लगेच प्रश्र्न विचारेल – हे असे होत नाही का? पत्रकारिता हा धंदा बनलेला नाही का? जाहिरातदारांच्या हातचे तो बाहुले बनलेला नाही का? मालकाच्या हातातील कठपुतळी तो बनलेला नाही का? मालकाला नको असलेल्या गोष्टी तो लिहू वा दाखवू शकतो का? जाहिरातींवर पाणी सोडून तो आपल्या जाहिरातदाराचा पर्दाफाश करू शकतो का? आपापल्या वाचकवर्गाला खूष करणाऱ्या लिखाणाला त्या त्या प्रसारमाध्यमातून जास्त प्रसिद्धी मिळत नाही का? अर्थातच, होते. पत्रकारिता ही एके काळी केवळ मिशन होती. ती प्रफेशन (म्हणजे व्यवसाय, धंदा नव्हे) झाल्यापासून पत्रकारितेवरील बंधने दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत. केवळ जाहिरात हे एकमात्र उत्पन्नाचे साधन आणि दुसऱ्या बाजूने शाई धरून कागदापर्यंत सर्वांचेच आभाळाला टेकलेले दर यांची कसरत करताना वृत्तपत्र मालकाच्या अक्षरशः नाकी नऊ येतात. त्यात बेदरकार आणि बेधडक असला, परंतु 15-20 पानांचा नसला आणि रंगीत नसला तर वाचकच ते वृत्तपत्र घेत नाहीत. हे केवळ सत्यच नव्हे, परंतु कटू सत्य आहे. कौतुकाची बाब एवढीच की या सर्व कसरतीतसुद्धा पत्रकारिता अजून पूर्णतया प्रॉडक्ट म्हणून विकण्याचा धंदा बनलेली नाही (अर्थात, काही अपवाद वगळून).

या दृष्टीतून आपण गोव्याच्याच पत्रकारितेकडे बघूया. केवळ धंदा म्हणून चालवायचा असेल आणि आर्थिक तोटा झाला म्हणून बंद करायचा असेल तर गोव्यात एकही टीव्ही चॅनल चालू शकणार नाही. कारण व्यावसायिक तत्वावर चालणारे सगळे त्यातल्या त्यात मोठे टीव्ही चॅनल्स आजच्या घडीला तरी प्रचंड नुकसान सोसून चालत आहेत. जे छोटे आहेत ते मोठे झाले तर बंद पडतील. तीच परिस्थिती वृत्तपत्रांची. दोन-चार वृत्तपत्रे सोडल्यास इतर सर्व वृत्तपत्रे आर्थिक दृष्ट्या तोट्यातच चालत आहेत. त्यातील काही मालक आपला धंद्यातील थोडा नफा या प्रसारमाध्यमांत गुंतवून नुकसान सोशीत आहेत. काहीजण आपल्या मोठ्या वृत्तपत्राचा आर्थिक नफा दुसऱ्या छोट्या वृत्तपत्रात गंतवून त्यांचा तोटा भरून काढीत आहेत.  त्यात त्यांचा केवळ धंद्याचा फायदा आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. समाजासाठी आपण काही तरी करायला हवे अशी प्रामाणिक भावना काही जणांची आहे. काहींच्या मनात कदाचित पापक्षालनाचीही भावना असेल. काहीजण वेळ येईल तेव्हा आपल्या बेकायदा धंद्यांचे समर्थन करण्यासाठी त्याचा वापर करू असाही विचार करीत असतील. परंतु गोव्यातील कित्येक प्रसार माध्यमे आजच्या घडीला तरी आर्थिक तोट्यात चालली आहेत यात संशय नाही. मात्र त्याचा समाजाला फार मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे हेही तेवढेच निःसंशय.

एखादे वृत्तपत्र जास्तच सडेतोड होत आहे हे लक्षात आल्यावर त्या वृत्तपत्रमालकाच्या धंद्यातील फायली सरकार दरबारी अडवून ठेवल्याने वृत्तपत्र दुसऱ्याला विकण्य़ाचे प्रकार आपण गोव्यात पाहिले आहेत. त्याचवेळी या सरकारी अडथळ्यांची पर्वा न करता बेधडकपणे सत्ताधारी राजकारण्यांवर ताशेरे ओढीत वाचकांची मने जिंकणारे वृत्तपत्रमालकही गोव्याने पाहिले आहेत. पेड न्यूजला विरोध केला म्हणून नोकरी गमावण्याची पाळी पत्रकारांवर आलेली आहे तर केवळ पेड न्यूजवर कमाई करण्याचे प्रकारही सर्रास घडत आहेत. कालच्याप्रमाणे आज सर्वच प्रसारमाध्यमांचे मालक खाणमालक नाही आहेत. त्यामुळे खाणमालकांच्या प्रसारमाध्यमांनासुद्धा खाण धंद्यातील गैरप्रकारांची प्रसिद्धी टाळता येत नाही.

या अशा सर्व प्रकारच्या संघर्षांतून गोव्याच्या आणि भारतातीलसुद्धा पत्रकारितेचा प्रवास चालूच आहे. व्यावसायिक आणि धंदेवाईक अशा पत्रकारितेतील संघर्षात पत्रकारितेची मूल्ये जपण्याची प्रचंड धडपडही चालू आहे. अर्थात, त्यात पुढाकार आहे तो खुद्द पत्रकारांचा. पत्रकारिता जपण्याचाही आणि पत्रकारिता संपवण्याचाही. परंतु यातून पत्रकारितेची मूल्ये शेवटी जोपासायची असतील तर त्याची अंतिम जबाबदारी राहील ती केवळ वाचक आणि वाचकवर्गावरच. मुल्याधिष्ठित पत्रकारितेचे प्रयत्न वाचकांनी उचलून धरले तरच पत्रकारितेचा ‘फायदा’ होईल. अन्यथा, राहील तो केवळ – ‘नफा’!

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

Good, thanks for writing on this issue. need to be appreciated because media person has taken up this issue, normally it does not happen. " पत्रकारितेची मूल्ये जपण्याची धडपड"

- Sanjay Sawant Dessai, Curchorem Goa | 01 st November 2012 23:01

 

Most journalists and TV channels in Goa are pawns in the hands of 'miners' who are running the 'dhanda (buisness)' of Journalism in Goa.

- JayGoa, Goa | 01 st November 2012 07:08

 

Related Blogs