एकलव्य, द्रोणाचार्य व धृतराष्ट्र

By Sandesh Prabhudesai
19 October 2012 00:03 IST

अपंगांना आजकाल अपंग म्हणत नाहीत, तर खास क्षमतेचे लोक म्हणतात. त्यांनी इतरांच्या सहानुभूतीवर नव्हे तर स्वतःच्या खास क्षमतेवर जगून आत्मविश्वास कमवावा हे त्यामागील तत्वज्ञान. तरीही त्यांना आपण दिखावू स्वरुपात खास क्षमतेचे लोक म्हणतो, मात्र मनातून त्यांना अपंग मानण्याचा दांभिकपणा करीत असतो. प्रत्यक्षात अपंग म्हणवणाऱ्यांपाशीच खास क्षमता असते व प्रत्यक्षात आपण अपंग असतो. मंगेश कुट्टीकर हा त्यातलाच एक. तो एका पायाने अधू आहे. परंतु या अधूपणावर मात करून आयुष्यात पुढे जायचा त्याचा आत्मविश्वास, अपंगत्वावर मात करण्याची जिद्द आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी सर्व प्रकारचे कष्ट करण्याची तयारी बघितली तर माझ्यातल्या अपंगत्वाची माझी मलाच लाज वाटते.

मंगेशचा गाव कुडका. तेथून पिलार म्हणजे किमान पाच-सहा किलोमीटर. एका पायाने सायकलवर पेडल करीत पिलार कॉलेजमध्ये येवून त्याने आपली पदवी मिळवली. आज तो मार्मागोवा पोर्ट ट्रस्टमध्ये काम करतो. परंतु त्याची पदवी आणि त्याची नोकरी या वर्तुळात सुखासमाधानात जगण्याचे आपणासारखे अर्थशून्य जीवन तो कधी जगलाच नाही. धावण्यात तो सर्वात तरबेज. पणजीमध्ये रन फॉर फन सारखी मॅरेथॉन असली तर सर्वात पुढे धावणाऱ्यांच्या धडधाकटांच्या बरोबर मंगेश सतत दिसतो. त्याच्याइतकी जोरात सायकल चालवणे धडधाकट सर्वसामान्यांना क्वचितच जमते. अर्थात, पटाईत सायकलस्वार सोडून.

पोहण्याचे शिकणार असे ठरवले तर पणजीतील कांपालवरील स्विमिंग पूलवरील अधिकाऱ्यांनी “तुझ्यासारख्या अपंगांना शिकविण्यासाठी हा पूल बांधलेला नाही” असे सांगून त्याला परत पाठवले. पण त्याने जिद्द सोडली नाही. कुडकाहून वाहणारी नदी शिरदोनमार्गे जावून समुद्राला मिळते. मंगेश कुडकाला या छोट्याशा नदीत उडी मारायचा आणि एका पायाने पोहण्याचा सराव करीत शिरदोनला वर यायचा. मग जावून शिरदोनच्या किनाऱ्यावर समुद्रात पोहायचा. याच सरावाच्या आधारावर त्याने एक दिवस सहजरित्या मांडवी नदी पार केली. त्यातून आत्मविश्वास तयार झाल्यावर त्याच्या पराक्रमांना सीमाच राहिली नाही. गोव्यातील सर्वात कठीण असा दोनापावला ते वास्को हार्बर पर्यंतचा समुद्रमार्ग त्याने पार केला. नंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांना जायचा सपाटाच लावला. कुठे कांस्य, कुठे रौप्य तर कुठे सुवर्णपदकेसुद्धा पटकावली. एक दिवस मग धावणे, सायकलिंग आणि पोहणे असा ट्रायॉथॉलॉन सुद्धा केला.

गेल्या दोन-तीन वर्षात मंगेशला नवीन वेड लागले ते आर्चरी, म्हणजे तिरंदाजीचे. तिरंदाजीसाठी पायांची गरज लागत नाही. परंतु एकाग्रतेची लागते. अचूक निशाणबाजीचे कसब लागते. अथक परिश्रमांशिवाय हे साध्य करणे अशक्यच. परंतु मंगेशने तेही शक्य करून दाखवले. पॅरालिंपिक्सच्या स्पर्धांतून पदके पटकावीत त्याने जागतिक पॅरालिंपिक्स तिरंदाजी खेळांत भारताचे प्रतिनिधित्व करण्य़ापर्यंत मजल मारली. परंतु हे सगळे करताना या स्पर्धेसाठी लागणारे साधे धनुष्य-बाणसुद्धा त्याच्याजवळ नव्हते. पोर्ट ट्रस्टमधून दीड लाख रुपयांचे कर्ज काढून धनुष्य-बाण त्याने विकत घेतले. घरची परिस्थिती अजिबात सुखवस्तू नाही. कोणत्याही सामान्य समाजातील घरासारखीच बिकट परिस्थिती. तरीही कुटुंबाने हातभार लावला आणि मंगेश आपले कसब दाखवीत तिरंदाजीची पदके पटकावीतच गेला. अजूनही पटकावीत आहे.

ज्याला आपण मनातून अपंग म्हणतो ते लोक खरोखरच खास क्षमतेचे असतात आणि धडधाकटांना लाज वाटावी असे पराक्रम ते करू शकतात हा सिध्दांत तंतोतंत खरा ठरविणारे सर्व पराक्रम मंगेश करीतच चाललेला आहे. धावण्यामध्ये, पोहण्यामध्ये, सायकलिंगमध्ये आणि आता तिरंदाजीमध्ये. मात्र त्याच्या या यशासाठी लागणारी सर्व मदत देण्याची ज्यांची नैतिक व शासकीय जबाबदारी आहे ते गोवा सरकार व खास करून गोवा क्रीडा प्राधिकारण मात्र मंगेशला पदोपदी निराश करीत चालले आहे. तिरंदाजीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंगेशला त्याच्या यशासाठी आर्थिक मदत करण्याचे तर सोडाच, परंतु तिरंदाजीसाठी लागणारे साधे साहित्यसुद्धा देण्याचे तारतम्य प्राधिकारण वा क्रीडा खात्याने दाखवलेले नाही. तिरंदाजीतील त्याच्या सर्व सहभागाची नोंद करणारी पत्रे गोवा पॅरालिंपिक्स असोसिएशनने अधिकृतरित्या सरकारदरबारी गेली तीन वर्षे सातत्याने पाठवलेली आहेत. तरीसुद्धा कसलेही कागदपत्र सादर केले नसल्याचा खोटा खुलासा करीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या कार्यालयाने त्याच्यावर चुकीची माहिती देवून सरकारची दिशाभूल केल्याचा आरोप केलेला आहे. मध्येच काही क्रीडा अधिकाऱ्यांनी त्याच्यासाठी जुजबी रक्कम संमत करून घेतली होती तेवढेच काय ते सरकारचे अनंत उपकार.

उलट तिरंदाजीसाठी सरकारपाशी साधनसामुग्री नसल्याने आपण त्याला जास्त काही मदत देवू शकत नाही असा खुलासा त्याच्याच समाजातून वर येवून क्रीडामंत्री झालेले व स्वतः क्रीडापटू असलेले रमेश तवडकर करीत आहेत. मंगेशच्या या अवहेलनेविषयी सांत आंद्रेचे आमदार विष्णू वाघ यांनी विधानसभेत आवाज उठवला तेव्हा त्वरित उभे राहून तवडकरांनी मंगेशला सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिलेले होते. ते आश्वासन क्रीडा खात्याच्या असंवेदनशील अधिकाऱ्यांच्या चालबाजीत कुठे विरून गेले ते त्यांचे त्यांनाच माहीत. म्हणूनच आज मंगेशवर आपल्या घरामागील जंगलात जावून एकटाच तिरंदाजीचा सराव करण्याची पाळी आलेली आहे. तिरंदाजीसाठी त्याने केलेला बोर्ड बघितला तर कुणाचेही अंग शहारून जाईल. गोणपाटामध्ये गवत भरून त्यावर टायरचे ट्यूब लटकावले आहेत व त्याच्या मधोमध पांढरा कागद चिकटवून मंगेश सराव करतो व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके पटकावून येतो.

हे सर्व बघितले की एकच गोष्ट पुनश्च एकदा सिद्ध होते. केवळ काळ बदलतो. पात्रे बदलतात. परंतु उच्चवर्गीय सत्ताधीश आणि नीचवर्गीय जिद्दी युवक यांचा संघर्ष चालूच रहातो. कालच्या महाभारतातील एकलव्य भिल्ल जातीचा होता म्हणून आंधळ्या धृतराष्ट्राच्या राज्यातील उच्चवर्णीय द्रोणाचार्यांनी त्याची तिरंदाजी खलास करून टाकण्यासाठी त्याचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून घेतली आणि अर्जुनाला इतिहासातील उत्कृष्ट तिरंदाज म्हणून अजरामर केले. आज एकाच वर्णाश्रमातील मंगेश आणि तवडकर एकलव्य आणि द्रोणाचार्य बनलेले आहेत. कारण आजच्या काळात श्रीमंत आणि गरीब हे नवीन वर्णाश्रम तयार झालेले आहेत. श्रीमंत क्रीडापटूंच्या गोतावळ्यात गुंतलेल्या द्रोणाचार्यांना मंगेश नामक गरीब एकलव्य दिसतसुद्धा नाही. आणि आंधळ्या धृतराष्ट्राचे अनुकरण करणाऱ्या मुख्यमंत्री पर्रीकरांच्या कार्यालयाने तर जखमेवर मीठ चोळावे तसा दिशाभूलीचा आरोप त्याच्यावर केलेला आहे. नववर्णियांचे महाभारत आजही चालूच आहे. मंगेशकडून कसली गुरुदक्षिणा घेवून हे नवमहाभारत हे नवद्रोणाचार्य आणि नवधृतराष्ट्र संपवणार आहेत?

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

Tumcho LEKH mhanaje '' Dolyat Aanjan'', pun prashashan che Dolech KUDDE....Aani Katdi GENDYA chi..

Hats off for efforts, though........!

- Jayant Katkar, panaji | 22 nd October 2012 18:08

 

Do you have to expect everything from the Govt.?

What is his local association (whatever, Archery may be), doing to help him. Why don't you go after them? You want Govt. to tackle every damn thing under the sun ha?

- JayGoa, Goa | 22 nd October 2012 04:36

 

Tujo lekhnicho tiir amche serkar ani empregado hanchea red tapecher boslo.

- Prabhakar Timble, Modgannv | 20 th October 2012 17:49

 

Related Blogs