मुख्यमंत्री पर्रीकर विघ्नहर्ता बनतील का?

By Sandesh Prabhudesai
20 September 2012 00:57 IST

ख्रिसमस आणि चवथ हे गोव्यातील दोन महत्वाचे उत्सव. हिंदू व ख्रिश्चन समाजांचे हे उत्सव असले तरी त्यातील धार्मिक भाग तेवढा त्या त्या धर्माचे लोक साजरा करतात. परंतु हे दोन्ही महत्वाचे सण जेवढे धार्मिक आहेत तेवढेच त्यांना सामाजिक व सांस्कृतिक अधिष्टानही आहे. हे दोन्ही सण सर्व गोंयकारांचे आहेत. या अधिष्ठानातूनच गोव्यातील सर्वधर्मीय एकोपा अभंग राहिलेला आहे. एकमेकांबद्दलचा आदरभाव आणि आपुलकी शाबूत राहिलेली आहे. आमचे गोंयकारपण ह्याच सणांच्या सामाजिक व सांस्कृतिक अधिष्ठानात लपलेले आहे.

चवथ हा तर केवळ धार्मिक उत्सव नव्हे. हा परिपूर्णरित्या निसर्गाचा उत्सव. पावसाचा धूमधडाका संपतो, श्रावणाच्या सरीही ओसरतात आणि पावसाळी वातावरणात येते ती चवथ. तोपर्यंत गोव्यातील निसर्गदेवता पूर्णतया नटून थटून गणपतीरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेली असते. फळा-फुलांना बहर आलेला असतो. निसर्गदेवतेला सजवणाऱ्या मातीतूनच गणरायाची मूर्ती बनवली जाते. पाना-फुलांतून गौरी-म्हादेव निर्मिले जातात. भोपळा, काकडी, घोसाळीं, चिबड, वाल, भेंडी, सिताफळ, निरफणस, पेरू आणि मिर्चीपर्यंत सर्वच फळांनी भरलेली माटोळी सजते. शिवाय रानफळे. घोश्टां, फागलां, कुड्या कात्रे, कांगणां, माट्टा कात्रे, खिळखिळे, घागरे आणि करमले. काही खाण्याची रानफळे तर काही विषारी. पूजेलाही दुर्वा, बेल आणि फुले. संपूर्ण निसर्गच घराघरातून बहरतो. मग घुमट आणि शामेळाच्या तालावर आरत्यांचा धूमधडाका. तालबद्ध रीतीने घातलेल्या फुगड्या. आणि गजर घालीत केलेले गणपती विसर्जन. कोणाचे दीड दिवस, कोणाचे पाच, सात आणि अकरा दिवसांचेसुद्धा.

पूर्वी ही सगळीच निसर्गदेवता घरामागच्या परसात वा घरामागील डोंगरावर फुलायची. लहान मुले जाणत्यांबरोबर डोंगरावर जायची. कुठली रानफळे खाण्याची व कुठली विषारी त्यांची ओळख त्यांना इथेच व्हायची. पाऊस सुरू झाला की फळांच्या बिया मातीशी दोस्ती करायच्या. कणाकणाने फुलणारी फळावळ व फुलझाडे बघतच चवथीचे वेध लागायचे. संपूर्ण निसर्गातच चवथीचा गंध पसरायचा. घुमटांवर चामडी चढवली जायची. शामेळाच्या दोऱ्या कसल्या जायच्या. घुमट-शामेळाचे पडघम चवथीपूर्वीच वाजायला लागायचे. ताल-सुरांची ओळख लहान मुलांना इथेच व्हायची. फुगडीच्या तालावर नृत्याचे धडेही इथेच गिरवले जायचे. गणपतीच्या रंगशाळेत दोन-तीन महिन्यांत मूर्तीकलेचे धडे मिळायचे. आजकाल या गोष्टी इतिहासजमा व्हायला लागल्या आहेत. सगळीच फळावळ शहरातील बाजारातून घेवून गोंयकार तयेच्या आदल्या दिवशी गावात कूच करतो. घर उघडून साफसफाई करतो. चार फळे वरती टांगून माटोळीचा सोपस्कार करतो. मखर असले तर बरे, अन्यथा थर्माकोलच्या मखरात गणपती विराजमान होतो व दीड दिवसाच्या गणपतीला विसर्जित करून कुटुंबेच्या कुटुंबे परत शहराची वाट धरतात. गोवा मुक्तीच्या काळात 80 टक्के गोंयकार गावात रहायचा. आज 80 टक्के शहरात रहातो. आपला धार्मिक उपचार गावात जावून करतो आणि चार-पाच दिवसात परत शहरात येतो.

या औपचारिक उत्सवातून कशी होणार चवथीच्या सामाजिक व सांस्कृतिक अधिष्ठानाची उपासना? कोण नेणार मुलांना रानावनात फळा-फुलांची ओळख करून द्यायला? कुठून येणार त्यांना सुगंध चवथीचा? कधी शिकणार ती घुमट शामेळ वाजवायला? कोण शिकवणार त्यांना फुगडी घालायला? कोण नेणार त्यांना गणपतीची चिकण माती थापायला आणि त्यातून मूर्ती घडवायला? कशी शिकणार ती नाजूक हाताने गणपतीचे दागिने आणि डोळे रंगवायला? त्या मानाने गावातील 20 टक्के मुले नशिबवान. त्यांच्यापुढे मग शहरातील मुले फिकी पडणार. ती मग आपला तोरा दाखविण्यासाठी फिल्मी गितांच्या चालीवर गरबा खेळणार. आमच्या पारंपारिक फुगड्यां हळूहळू इतिहासजमा होणार. एकत्र कुटुंब पद्धती गोव्यातून जवळजऴ नामशेष झालेली आहे. चवथीच्या निमित्याने एकामेकांपासून तुटलेले कुटुंब पुनश्च एकत्र येते तेही केवळ तीन-चार दिवसांसाठीच. एकामेकांना वायणां देत गणपतीच्या निमित्याने गाव फिरायचीही पद्धत आता वयस्कर मंडळीपुरतीच मर्यादित राहिली आहे. नव्या पिढीला त्यांचा गावही ठावूक नाही आणि शेजारी-पाजारीही.

चवथीच्या निमित्याने निर्माण होणारी ही सामाजिक आणि सांस्कृतिक समरसता संपवण्यास प्रामुख्याने जबाबदार आहे ते आमचे शिक्षण खाते. हे खाते शाळांना चवथीची अधिकृत सुट्टी देते फक्त दोन दिवसांची. प्रत्येक शाळेला वर्षातील 10 दिवसांची सुट्टी आपापल्या सोयीप्रमाणे घेण्याची मुभा असते. त्यातील चार दिवस चवथीच्या सुट्टीला जोडण्याचीही परवानगी असते. त्यातून मग ही सुट्टी सहा दिवसांवर नेली जाते. त्यातील एक-एक दिवस शहरात रहाणाऱ्या लोकांचा केवळ प्रवासात व बाजाररहाटीतच जातो. गावात मुलाबाळांना घेऊन ते व्यवस्थित राहू शकतात केवळ चार दिवस. या चार दिवसात ही सामाजिक व सांस्कृतिक चवथीची मजा त्यांना मिळणार कशी? दुर्गापूजेच्या सणाला पश्चिम बंगालमध्ये काय फक्त दोन ते सहा दिवसच सुट्टी असते? नवरात्रांची सुट्टी गुजरातमध्ये एवढीच असते? ओणमच्या सणाची सुट्टी केरळमध्येही अशीच असते? मग गोव्यातच चवथीची अधिकृत सुट्टी केवळ दोन दिवसांची का?आणि जी छोटी दिवाळी केवळ दोन ते तीन दिवसात संपते त्या दिवाळीची सुट्टी 15 ते 22 दिवस का? गोवा मुक्तीला 50 वर्षे उलटून गेली आणि 80 टक्के गोंयकार गावातून शहरात पोचला तरी आपण याच चुकीच्या सुट्ट्यांची पद्धत चालून ठेवणार आणि मग आमचे राजकारणी धरून शिक्षणतज्ञपर्यंत सगळेच नवी पिढी आमच्या भारतीय संस्कृतीपासून कशी तुटून चालली आहे त्यावर भाषणबाजी करीत फिरणार?

या गोष्टी लक्षात घेवून सुट्ट्यांचे नवीन वेळापत्रक काही शिक्षणतज्ञांनी तयार करून शिक्षण खात्यास दिल्यास किमान आता 10 वर्षे उलटून गेली. परंतु त्यावर कुठलाही शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री आणि शिक्षणतज्ञांचे सल्लागार मंडळही गंभीररित्या विचार करण्यास तयार नाही. ज्या कोणा शैक्षणिक अधिकाऱ्यांना हे ठावूक आहे तेही गप्प आहेत. प्रत्यक्षात या वेळापत्रकाची अंमलबजावणी केल्यास शिकविण्याचे दिवस वाढवून मिळतात आणि जूनमध्ये शाळा सुरू झाल्यावर दर दोन-तीन महिन्यांनी ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर अशा आठ-दहा दिवसांच्या सुट्ट्या मिळतात. त्यामुळे शिकणेही सहजसुलभ बनते.

हा प्रकार असाच चालू राहिला तर शिक्षणखात्याचे हे अत्यंत चुकीचे वेळापत्रक गोव्याच्या सांस्कृतिक परंपरेवर आलेले एक विघ्नच ठरेल. हे विघ्न दूर होईल तीच गोव्याची खरी चवथ. आणि हे विघ्न दूर करील तोच खरा विघ्नहर्ता. शिक्षण खाते सांभाळणारे आणि गोव्याच्या पारंपारिक संस्कृतीबद्दल येता-जाता कळवळा व्यक्त करणारे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हा विघ्नहर्ता बनतील का?

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

शाळांच्या सुट्ट्या आणि वेळा याबद्दल मी अनेकदा लिखाण केले. शिक्षक आणि शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना अनेक सूचना खात्याला केल्या पण त्याचा गांभीर्याने कुणी विचार केला नाही. वर्षाच्या ३६५ दिवसापैकी फक्त २२० शालेय दिवस असतात. त्यातील सुमारे २५ दिवस घटक चाचण्या व अन्य परीक्षा यात खर्च होतात. वार्षिक स्नेहसंमेलन, क्रीडास्पर्धा, अन्य स्पर्धा यात आणखी १० दिवस बिन अध्यापनाचे जातात म्हणजे प्रत्यक्षात १८५ दिवस अध्ययन-अध्यापनासाठी मिळतात. त्यामुळे सकस अध्ययन--अध्यापन होत नाही. शिक्षणाची गुणात्मकता घटते. यासाठी पालकवर्ग मुलांना खाजगी शिकावणी वर्गाला पाठवतात. सुट्ट्यांची संख्या कमी करणे आणि सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत शाळा चालणे आवश्यक आहे. मध्ये १ तासाची सुट्टी द्यावी ज्यात मुले आणि शिक्षक आपले जेवण उरकतील. परंतु सध्याचे वेळापत्रक सर्वांच्या एवढे अंगवळणी पडले आहे की त्यात बदल व्हावा असे ना पालकाना वाटते,ना शिक्षकाना ना शिक्षण खात्याला न सरकारला. पूर्वीची गुरुकुल पद्धती कशी योग्य होती हे आज पटते पण वळत नाही. गुणात्मक शिक्षण व्हायचे असेल तर प्रचलित अनावश्यक सुट्ट्या रद्द करून शाळेच्या वेळा वाढवणे आवश्यक आहे. अर्ध्या दिवसाचे काम मात्र पूर्ण दिवसाचे वेतन ! रिकाम्या वेळेत भलतेच उद्योग करण्याची शिक्षकांची प्रवृत्ती याला आळा बसवायचा असेल आणि शिक्षणाची गुणात्मकता वाढवायची असेल तर कुणाचाही मुलाहिजा न ठेवता सरकारला कठोर निर्णय घ्यावाच लागेल. नव्हे सरकारने तो घ्यावाच !

- जयराम अनंत रेडकर , सांताक्रूझ तिसवाडी गोवा | 20 th September 2012 10:44

 

Related Blogs