गोव्यात कलाकार व तंत्रज्ञांची निर्मिती व्हावी

By Sandesh Prabhudesai
06 September 2012 13:16 IST

आपल्या मातीत जे आहे ते घ्यायचे व त्यातून आपला उदरनिर्वाह करायचा हे अर्थशास्त्राचे मूलतत्व. हे तत्व विकसित करताना आपण अर्थव्यवस्थेचे उत्पादनाच्या दृष्टिकोणातून तीन भाग करतो. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र व तृतीय क्षेत्र. प्राथमिक क्षेत्रात बहुतांश निसर्गसंपत्तीचा समावेश होता. म्हणजे निसर्गसंपत्तीच बाजारपेठेचा माल बनते. म्हणजे गोव्यापुरता विचार करायचा झाल्यास इथली शेती उत्पादने, फळे, फुले, मासळी आणि खनिजसुद्धा. द्वितीय क्षेत्र हे खऱ्याखुऱ्या अर्थाने यंत्रांचा वापर करून तयार केलेले उत्पादन. म्हणजे निसर्गसंपत्ती हा या उत्पादनाचा कच्चा माल बनते व यंत्रांद्वारे कारखान्यात त्यावर प्रक्रिया करून त्यातून नवा उत्पादित माल तयार केला जातो. या दोन्ही उत्पादन क्षेत्रातील मालाची विक्री करायची असेल तर त्यासाठी बाजारपेठेची एक यंत्रणा लागते. त्यात दुकाने, वाहतूक, हिशेबतपासणी अश्या विविध गोष्टी येतात. शिवाय या अर्थव्यवस्थेतून पर्यटन, मनोरंजन, माहिती तंत्रज्ञान आणि प्रशासकीय कामकाज अशी विविध क्षेत्रे तयार होतात. यालाच आपण तृतीय क्षेत्र म्हणतो.

या दृष्टिकोणातून आपण गोव्याचा विचार केला तर आपला गोवा कोणत्या क्षेत्रात मोडतो? प्राथमिक क्षेत्रासाठी वापरण्यात येणारी आपली निसर्गसंपत्ती कोणती? यातील कोणत्या निसर्गसंपत्तीचा आपण कच्चा माल म्हणून वापरून आपण उत्पादन क्षेत्र विकसित करू शकतो? आणि तृतीय क्षेत्रात कोणकोणते उद्योग - व्यवसाय मोडतात? गोव्याची अर्थव्यवस्था विकसित करताना आपण या मूलभूत गोष्टींचा विचार केला आहे का? की जे मुळात गोव्यात नाहीच ते, केवळ अनुकरणवादाला बळी पडून आपण विकसित करण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेला आहे व अजूनही तेच करीत आहोत? औद्योगिक विकास म्हणजे जास्तीत जास्त कारखाने आणणे हा आपला एक सर्वसाधारण समज. असे कित्येक कारखाने आले, इथली सब्सिडी आणि करातील सुटी खाल्ल्या आणि उद्योग आजारी करून गेले. कारण या कारखान्यांचा कच्चा मालही इथे मिळत नाही आणि त्या उत्पादनांची बाजारपेठही येथे नाही. तरीसुद्धा नोकऱ्यांची आमिषे दाखवून नवनवी कारखाने आणण्याचा सरकारी उद्योग अजूनही चालूच आहे.

आता यातील सत्यासत्यता पडताळून पहाण्यासाठी आपण एक अगदी साधी गोष्ट करुया. सरकारमार्फत दर वर्षी प्रसिद्ध करण्यात येणारा आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल काय म्हणतो ते पाहूया. या अहवालानुसार आपल्या अर्थव्यवस्थेत प्राथमिक क्षेत्राचा वाटा आहे केवळ 11 टक्के. मायनिंग सारख्या भल्या मोठ्या क्षेत्राचा त्यात अंतर्भाव असूनसुद्धा. कारख्यान्यातून होणाऱ्या उत्पादनाच्या द्वितीय क्षेत्राचा वाटा आहे 38 टक्के. आणि तृतीय क्षेत्राचा वाटा आहे अर्ध्याहून अधिक. तब्बल 51 टक्के. यात सर्वात मोठा वाटा आहे सेवा उद्योगाचा. पर्यटन क्षेत्र आणि त्याबरोबर विकसित होणाऱ्या सर्व प्रकारच्या सेवा-सुविधांचा. आपल्या युवा वर्गाचे भवितव्य खरे तर आहे या सेवा उद्योगामध्ये.  तरीसुद्धा सर्व सरकारे, सर्व पक्ष, सर्व मुख्यमंत्री, सर्व उद्योगमंत्री आणि सर्व आमदार धावताहेत सतत आजारी पडणाऱ्या कारखान्यांमागे. प्रत्यक्षात या तृतीय क्षेत्रात वाहतूक आणि संपर्क क्षेत्राचा वाटा आहे 15 टक्के. हॉटेल व रेस्टॉरंट उद्योगांचा वाटा केवळ 10 टक्के आणि इतर सामाजिक सेवांचा वाटा अडीच टक्के. तरीसुद्धा सेवा उद्योगाचा आणि तृतीय क्षेत्राचा साधा विचारसुध्दा केला जात नाही. सोडून पर्यटन. आणि आपण मात्र बाहेरून लोक येऊन गोव्यात गब्बर होतात म्हणून त्यांच्या नावाने बोटे मोडीत बसतो. प्रत्यक्षात या क्षेत्राची क्षमता जाणून घेऊन त्यात उतरणारा गोमंतकीय अक्षरशः हातांच्या बोटांवर मोजण्याइतका.

तीच गत प्राथमिक क्षेत्राची. आजकाल सर्वत्र चर्चा चालू आहे ती मायनिंगची. कारण ही कोंबडी सोन्याची अंडी देते. एका वर्षात मायनिंगचे खनिज उत्पादन चार टक्क्यांनी घसरल्याचे आकडेवारी सांगते. प्रत्यक्षात रस्त्यावर मात्र मायनिंग लॉबीचा धुडगूस चालू आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे बेकायदेशीर मायनिंग. दुसऱ्या बाजूने शेती क्षेत्राचा विकास फक्त दोन टक्क्यांनी होतो आहे. गोव्यात 14.50 लाख लोक राहतात. त्यातील 62 टक्के म्हणजे 9 लाख लोक राहतात शहरातून. त्याशिवाय दर वर्षी 30 लाखांच्या घरात पर्यटक गोव्यात येतात. या 40 लाख लोकांना (गावातील सोडून) खाण्या-पिण्यासाठी तांदूळ, कडधान्ये, भाजी, फळे, दूध, कोंबडी, मासळी अश्या सर्वच गोष्टी विकत घ्याव्या लागतात. उदाहरणच घ्यायचे झाल्यास गोव्याला दर दिवशी तीन लाख लीटर दूध लागते. परंतु गोव्यात अर्ध्याहून कमी दुधाची निर्मिती होते. कुक्कुट पालनाशी संबंधित कोंबड्या व अंड्यांची दर आठवड्याची आपली गरज आहे 1.75 लाख. परंतु गोव्यात 50 हजारांच्या आसपास एवढीच निर्मिती होते. परंतु आम्ही गोमंतकीय या क्षेत्राकडे ढुंकूनसुद्धा बघणार नाही. उलट गावातील वडिलोपार्जित जमीन बिल्डराच्या घशात घालण्यासाठी प्रादेशिक आराखडा बदलण्यासाठी अर्ज करणार वा गावची जमीन ओसाड ठेवून सरकारी नोकरीसाठी ती गहाणसुद्धा ठेवणार.

याशिवाय आपल्या गोव्यात आणखीन एक फार मोठी गोष्ट आहे. कच्चा माल म्हणून. ही निसर्गसंपत्ती नव्हे, गोव्याला मिळालेली ही नैसर्गिक देणगी आहे. ती देणगी म्हणजे इथला कलासक्त गोमंतकीय. गोव्याला कलेची खाण म्हणतात. परंतु या खाणीतले हिरे गोव्याबाहेर गेले तेव्हाच चमकले. कारण गोव्यात तश्या संधी कधी निर्माणच केल्या गेल्या नाहीत. उलट काही ना काही कारणामुळे गोव्यातील सांस्कृतिक क्षेत्राला ओहोटी लागलेली आहे. देवदासी पद्धतीसारख्या शोषित व्यवस्थेमुळे देवळातून रोज रियाज करीत तरबेज होणारा सर्जनशील कलाकार हरवला. शहरीकरणामुळे गावातील हौशी रंगभूमी विरळ होत गेली. टक्केवारीच्या मागे लागलेल्या शिक्षण पद्धतीने शिक्षणसंस्थांतील रेडिमेड संगीताच्या अनुकरणवादाचे शॉर्ट कट शोधून काढल्याने सर्जनशीलतेचा गळाच घोटला गेला. प्रत्यक्षात प्रत्येक गोमंतकियाचा नसानसातून कलेचा स्त्रोत अखंड वहात असतो. परंतु या हिऱ्यांना पैलू पाडण्याचे तसूभरही कार्य गोव्यात जाणीवपूर्वक होत नाही. जे काही होते आहे ते केवळ हौसेखातर वा स्पर्धेखातर.  

नव्या शैक्षणिक कायद्याने आपल्या ब्रिटीश धर्तीच्या कारकुनी शिक्षणपद्धतीला फाटा देऊन व्यवसायाभिमुख सर्जनशील शिक्षणपद्धतीचा दृष्टिकोण आपणास दिलेला आहे. त्याचा वापर करून इथल्या मातीतील कलाकार नावाचे ह्युमन सॉफ्टवेअर तयार करण्याचा विचार निदान आता तरी व्हायला हवा. प्राथमिक स्तरापासून विश्र्वविद्यालायातील पदव्युत्तर आणि पीएचडी पर्यंतच्या अभ्यासक्रमात आमुलाग्र बदल करण्यावर विचार व्हायला हवा. हा कलाकार कोणत्याही क्षेत्रातील असू शकतो. साहित्यिक, भाषांतरकार, सर्जनशील कॉपी रायटर, गायक, वादक, नृत्यपटू, अभिनेता, कला तंत्रज्ञ, दिग्दर्शक, सिनेमेटोग्राफर, छायाचित्रकार, चित्रकार, संकलक, ग्राफिक डिझायनर अशा एक ना अनेक क्षेत्रांमध्ये हवे असणारे कलाकार आज संपूर्ण दुनियेला हवेत. ते इथल्या गोमंतकीय खाणीत मुबलक प्रमाणात आहेत. पण त्यांना पैलू पाडणाऱ्या शिक्षणसंस्था आपल्यापाशी नाहीत. तृतीय क्षेत्रातील सेवा उद्योगातील एक फार मोठे आणि अमूल्य स्वरुपाचे असे हे धन विकसित केल्यास गोमंतकीय युवा जगभर आपल्या कला-कौशल्याची चमक दाखवू शकेल. शिवाय इफ्फीपाठोपाठ गोवा हा सर्वच कलाक्षेत्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांचे केंद्र केल्यास इथे संगीत, नृत्य, नाट्य, चित्रकला अशा सर्व कलाप्रकारांचे चालते-बोलते विद्यापीठ गोमंतकीय कलाकारांना उपलब्ध होईल. शिवाय नोकरी व्यवसायाच्या कित्येक संधीसुद्धा गोव्यातच उपलब्ध होतील. गोव्याच्या या मातीतील या अमोल धनाचा विचार होईल काय?

दुसरी गोष्ट आहे माहिती तंत्रज्ञानाची. या क्षेत्रात केवळ तांत्रिक ज्ञान असून चालत नाही. या तांत्रिक ज्ञानाला कलात्मकता व सर्जनशीलतेची जोड मिळाल्यास तो तंत्रज्ञ जास्त सरस ठरतो. या क्षेत्रात लागणारे कलाकौशल्य गोमंतकीय युवकांपाशी आहे. परंतु त्याला चालना देण्याचे सोडून आपण आयटी पार्क आणि आयटी हॅबिटॅटच्या मागे लागलो आहोत. या पार्क आणि हॅबिटॅटमध्ये गोमंतकीय युवकांपेक्षा बाहेरील तंत्रज्ञच जास्त येतील यात शंकाच नाही. त्यापेक्षा आपण जपानी मॉडेल वापरून माहिती तंत्रज्ञानाचे क्षेत्र विकसित करण्याची शक्याशक्यता पडताळून पहायला हवी. जपानसारख्या छोट्याशा देशाने इलेक्ट्रोनिकच्या क्षेत्रात एवढी मोठी भरारी मारली ती आपल्या छोटेपणाच्या ताकदीवर. जपानमध्ये कोणत्याही इलेक्ट्रोनिक वस्तूचे उत्पादन एका कारखान्याता केले जात नाही. सर्व सुटे भाग घराघरांमध्ये तयार केले जातात. कारखान्यात फक्त त्यांची जुळणी (असेम्ब्लिंग) केली जाते.

आयटी पार्क वा हॅबिटॅट उभारली जातात ती मोठमोठ्या शहरातून. सर्व अत्याधनिक साधनसुविधा एका ठिकाणी मिळाव्यात म्हणून. प्रत्यक्षात हे माध्यमच मुळात आहे संपर्काचे. म्हणून अमेरिकेचे बीपीओ भारतातून चालवले जातात. इतरही सॉफ्टवेअर व हार्डवेअरची उत्पादनेसुद्धा भारतात तयार करून जगभर नेली जातात. त्यासाठी लागते ती उत्कृष्ट इंटरनेट सेवा व वीज सेवा. शिवाय रस्ते, वाहतूक, हॉटेल्स अशा इतर सुविधाही लागतात. गोवा छोटा असला तरी रस्ते आणि वाहतुकीचे उत्तम जाळे इथे गावागावातून पसरलेले आहे. विजेचा पुरवठाही उत्तम करणे शक्य आहे. गोवा ब्रॉडबँडसारख्या प्रकल्पातून ऑप्टिकर फायबरद्वारे इंटरनेट सेवा गावागावातून नेण्यात आलेली आहे. अशा वेळी एके ठिकाणी आयटी पार्क वा हॅबिटॅट घालून तिथे बाहेरील तंत्रज्ञ आणण्यापेक्षा जपानी मॉडेलच्या धर्तीवर गावागावातून आणि घराघरातून माहिती तंत्रज्ञानाचा व्यवसाय विकसित केल्यास गावेही सुधारतील आणि गावांतील तंत्रज्ञांची घरेही. त्यामुळे शहरांवरचा ताणही कमी होईल आणि गोव्याची आयडेंटिटी (अस्मिता) कायम ठेवणेही शक्य होईल.

असे एक ना अनेक कल्पना आपण गोव्यात राबवू शकतो. फक्त गरज आहे ती अनुकरणवाद फेकून देण्याची, गोव्याची खासियत समजून घेण्याची आणि कारखान्यांच्या उद्योगांवर विनाकारण वेळ व पैसा वाया घालवण्यापेक्षा प्राथमिक व तृतीय क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून सेवा उद्योगावर भर देण्याची. तीसुद्धा गोव्यातील निसर्गसंपत्ती आनी मानवी धनाची योग्य गोळाबेरीज करून. तेव्हाच पुढच्या दहा वर्षांत गोव्याचा चेहरामोहरा बदलू शकेल. अन्यथा ते फक्त एक कुरण म्हणून विकसित होईल. इथल्या लोकांना उपेक्षित ठेवून संपूर्ण जगाला स्वैरपणे चरण्यासाठी बनवलेले कुरण!

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

आपण कितीही टाहो फोडला तरी जाड कातडीच्या सरकारला जाग येत नाही मग ते सरकार कोणत्याही पक्षाचे असो. विधायक सूचना करणारे विरोधी आमदार जसे सरकारला नको असतात तसे समाजातील विचारवंतही नको असतात. मी आणि माझा पक्ष याला सत्ता कशी मिळेल आणि मिळाल्या नंतर ती कशी टिकेल या विवंचनेत जे असतात त्याना आपल्या स्वार्था पलीकडे काहीही दिसत नाही. निवडणुकीच्या वेळी आश्वासनांचे काही तुकडे फेकले आणि काही लोकप्रिय योजना जाहीर केल्या की आपण निवडून येऊ शकतो हां विश्वास राज्यकर्त्याना झालेला आहे आणि हेच आपल्या लोकशाहीचे दुर्दैव आहे.

- जयराम अनंत रेडकर., सांताक्रूझ गोवा. | 06 th September 2012 18:14

 

भाई, तुमचो लेख खरेंच बरो आसा. बरो अभ्यास करून बरयला अशें दिसता, पूण तुमी तो कोंकणींतल्यान बरयल्लो जाल्यार गोंयकार आनी कोंकणी मनशांक वाचूंक मेळपाचो.

तुमी मराठींतल्यान बरयल्ल्यान तुमकां महाराष्ट्रांतले वाचक मेळ्ळ्यात आसतले हातूंत दुबाव ना, पूण आमी फकत महाराष्ट्राचेच दिकेन पळोवन, आमच्या कोंकणी मनशांक विसरतात हाचेर मातशी नदर मारची. इंटरनॅटाचेर कोंकणी भास पळोवंक आनी वाचूंक खूब लोक रावतात. तातूंत कर्नाटकांतल्यान कोंकणी मनशांचो आंकडो तर सामकोच दोळे-दिपकावपी आसा. तांकां कोंकणींतल्यान बरें साहित्य आनी विचार वाचूंक मेळचे.

तुमी मराठींतल्यान बरोवचेंच, आमकां कांयच एक हरकत ना, पूण त्याच वेळार कोंकणींतल्यानूय बरोवच चालू दवरचें. त्याच विशयाचेर आनी त्याच दर्ज्याचें.

तुमकां जायतें बरें मागून

विस्वासू

सेबी फेर्नांदीश

मैसूर

- Seby Fernandes, Mysore | 06 th September 2012 17:19

 

Related Blogs