हा व्होट नव्हे; व्हॅटो पावर

By Sandesh Prabhudesai
15 March 2012 17:37 IST

निवडणूक हा केवळ भावना, विचार, धोरणे, कार्यक्रम, लाट अशा गोष्टींचाच परिपाक नसतो. या गोष्टी महत्वाच्याच. परंतु सरतेशेवटी निवडणूक हा आकड्यांचा खेळ असतो. अटीतटीची लढत होऊन उमेदवार केवळ एका मताने जरी जिंकला तरी शेवटी तो आमदार वा खासदार होतो व तेवढाच बलाढ्य प्रतिस्पर्धी हा पराभूत उमेदवार. हरलेला. नाकारलेला. 2012 च्या ह्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण करताना या सर्वच गोष्टींचा परामर्ष घेणे आवश्यक आहे. कुणाला आवडो वा नावडो, परंतु सत्य परिस्थिती लक्षात घेऊनच त्याची कारणमिमांसा करणे आवश्यक आहे. अन्यथा ती सत्य स्थिती व इतिहासाशी केलेली प्रतारणा ठरेल.

यंदाची ही निवडणूक ऐतिहासिक स्वरुपाची झाली हे हरलेल्यासुद्धा प्रत्येक उमेदवाराला व पक्षाला मान्य करावेच लागेल. परिवर्तनाच्या लाटेत भले भले बुडाले. ते कायमचे बुडोत हीच इच्छा. या परिवर्तन लाटेचे सर्वाधिक श्रेय जाते ते कॉंग्रेसला व त्यांच्या नालायक बनत गेलेेल्या माजलेल्या पुढार्‍यांना. त्यांचे 100 अपराध भरले तेव्हा कृष्ण बनून मतदाराला त्यांचे शरसंधान करावेच लागले. पर्यायच नव्हता. म्हणूनच तर सर्व रेकॉर्ड ब्रेक करणारे 82 टक्के मतदान करीत गोव्याचा जागृत मतदार बाहेर पडला आणि त्याने सर्वांचीच यथेच्छ धुलाई केली. त्यात कित्येक नको असलेले चेहरे गेले तर काही राहिलेसुद्धा. शेवटी आकड्यांचा खेळ. त्यात भर म्हणून उद्या तेवढेच महाग पडणारेही निवडून आलेत हेही मान्य केलेले बरे.

थोडक्यात सांगायचे तर एकूण 14 आमदार पडले. त्यातले केवळ दोन राष्ट्रवादीचे (जुझे फिलीप डिसोझा व निळकंठ हळर्णकर) आणि भाजपाचे दामू नाईक. इतर सर्व 11 कॉंग्रेसचे. एकाहून एक रथी महारथी. चर्चिल आलेमांव, ज्योकीं आलेमांव, रवी नाईक, आलेक्स सिक्वेरा, बाबू आजगांवकर, फिलीप नेरी रॉड्रिगीस  हे सर्व मंत्रीगण. शिवाय दयानंद नार्वेकर, फ्रांसिस्को सिल्व्हेरा, आग्नेल फॅर्नांडीस, श्याम सातर्डेकर हे आमदार. त्याशिवाय राजेश पाटणेकर आणि दयानंद सोपटे हे भाजपा आमदारकीचा राजिनामा देऊन गेलेले नवकॉंग्रेसवादी. तसेच प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर, चर्चिलची अती लाडावलेली मुलगी वालांका, ज्योकीचा युवा आयकॉन बनवलेला पुत्र युरी असे आणखीन कित्येक...

केवळ भाजपा सत्तेवर यावी म्हणून गोव्याच्या मतदाराने हा सगळा चमत्कार केला असे म्हटले तर ती मतदाराच्या भावनेशी केलेली प्रतारणा ठरेल. खास करून कालपर्यंत कधीही भाजपाला मतदान न केलेला व या निवडणुकीत बहुसंख्येने येऊन कमळाचा बटन दाबलेला अंगारी मतदार. भाजपा हवी यापेक्षा ही भ्रष्ट,  मुर्दाड व फॅमिली बिझनेसवाली कॉंग्रेस नको ही भावना या निवडणुकीत जास्त प्रबळ होती. त्याचबरोबर मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री म्हणून हवेत हीही भावना तेवढीच प्रामाणिक होती.

पर्रीकर लाट तशी 2007 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही होती. परंतु ही लाट कोणतेही तुफान आणू शकली नाही. उलट भाजपा आमदारांचीच संख्या 17 वरून 14 वर घसरली. विधानसभा कार्यकाल संपून नवी निवडणूक येईपर्यंत ती 11 वर घसरली. राजेश पाटणेकर, दयानंद सोपटे व तिकीट वाटपावेळी विजय पै खोत यांनी राजिनामे दिले. त्यात पेडणे व पैंगीण हे भाजपाचे दोन गड मतदारसंघ पुनर्रचनेत इतिहासजमा झाले. धारगळचा पेडणे झाला. तरीही या सर्वांवर मात करून केवळ भाजपाचे 21 आमदार निवडून आले. म्हणजे किमान 10 नव्या आमदारांची भर. त्यात नऊ माजी आमदार तर 10 नवीन चेहरे तर राजेंद्र आर्लेकर व माथानी साल्ढाणा पुनश्र्च आमदार. हा विजय खचितच सामान्य नाही.

या विजयांचे पृथःकरण तीन प्रकारात होऊ शकते. पहिला प्रकार, जिथे भाजपा आमदारांनी वा उमेदवारांनी आपल्या कर्तुत्वाच्या बळावर विजय मिळविला. दुसरा प्रकार म्हणजे कॉंग्रेसविरोधी लाटेवर स्वार होऊन आश्र्चर्यजनकरित्या मिळविलेला विजय. तिसरा केवळ मतांच्या विभागणीतून मिळविलेला विजय. पहिल्या प्रकारात मोडतात ते पणजीत मनोहर पर्रीकर, म्हापश्यात फ्रांसिस्को झिसोझा, साळगावात दिलीप परुळेकर व शिरोड्यात महादेव नाईक. या आमदारांना केवळ स्वकर्तुत्वाच्या बळावर निवडणूक लढवावी लागली आणि कॉंग्रेसविरोधी लाटेमुळे त्यांच्या मताधिक्यात कमालीची वाढ झाली.

विश्र्वजीत विरोधी लाट 

यात आणखीन एक पोटप्रकार आहे. उमेदवारांच्या कर्तुत्वाबरोबरच पक्ष वा खास करून व्यक्तिविरोधी लाटेचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होऊन ते विजयी झाले. खास करून विश्र्वजीत राणेंच्या विरोधातील लाटेवर स्वार होऊन हे उमेदवार मतदाराच्या मनातील सर्व संभ्रम दूर करून सहजगत्या निवडून आले. केवळ त्यांचा विरोधक हा विश्र्वजीत राणेंचा खास माणूस आहे म्हणून. ते म्हणजे मांद्रेत दयानंद सोपटेना आपटून आलेले लक्ष्मीकांत पार्सेकर, उदय पालयेकरांना पराभूत करून आलेले दयानंद मांद्रेकर, मयेत रुद्रेश चोडणकरना हरवून आलेले अनंत शेट व काणकोणात इजिदोर फॅर्नांडीसना पाणी पाजून विजयी झालेले रमेश तवडकर. या चारही माजी आमदारांचे काय होईल हा प्रश्र्न खुद्द विश्र्वजीत राणेंनी झटक्यात सोडवला. विश्र्वजीतचा माणूस नको ही लाटच एवढी जबरदस्त होती की इतर बारीक सारीक विरोध कुठच्या कुठे गुल झाले.

या लाटेत विश्र्वजीतची माणसे अशी काही धुऊन गेली की विश्र्वजीत व त्यांचे सतत दहाव्यांदा निवडून आलेले पितामह प्रतापसिंग राणे हे जिंकले खरे, परंतु प्रत्यक्षात विश्र्वजीतचा पराभवच झाला. कारण सत्तरीचा गड आला, पण त्यांच्या सगळ्या सिंहांचा बुरखा पांघरलेल्या उमेदवारांना कुई कुई करीत पळावे लागले. खास करून यासाठी गोव्याच्या सुजाण व जागृत मतदाराला शतशः अभिवादन. एकाही प्रसार माध्यमाने यावर काही लिहिले वा काही दाखविले नाही. तसा कुणी विश्र्वजीतविरोधी असा खास प्रचारही कुणी केला नाही. लेकिन... लोकांनी पुनश्र्च एकदा सिद्ध केले... ये पब्लिक है, यह सब जानती है !

कारण विश्र्वजीत राणे व बाबूश मोंसेरातांची युती ही काही साधी युती नव्हती. सर्व अधिकृत व अनधिकृत युतींवर मात करणारी ही पाताळयंत्री युती होती. हे एक फार मोठे षडयंत्र होते. 24 कोटी रुपयांच्या कमिशनापाई आयकर खात्याने त्यांना पाठविलेली नोटीस हे गोवा उत्तर भारतीय लँड शार्कना विकण्याच्या कटकारकास्थानातील केवळ एक उदाहरण. अशा कित्येक प्रकरणांतून कोट्यावधी रुपयांचे हस्तांतरण झाले होते. परंतु तो प्रादेशिक आराखडा 2011 रद्द झालेला होता. तेव्हा नवीन आराखड्याच्या विरोधातील वातावरणाचा फायदा घेऊन हासुद्धा आराखडा रद्द करण्याचा व त्या जमनी रुपांतरित करण्याचा हा फार मोठा धूर्त डाव होता.

त्यासाठीच पांडुरगं मडकईकरांबरोबरच त्यांचे बंधू धाकूना काहीही संबंध नसताना प्रियोळात उमेदवारी मिळाली होती. कसलीही विनॅबिलिटी नसताना रुद्रेश चोडणकर व आशिश शिरोडकरना मये व म्हापश्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादीची तिकिटे मिळाली होती. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामतींच्या सर्व प्रयत्नांवर मात करून विजय पै खोतांना डावलून काणकोणात इजिदोर फॅर्नांडीसचे नाव पक्के झाले होते. व्हिक्टोरिया फॅर्नांडीसची सोनिया गांधीबरोबर यशस्वी बैठक होऊनसुद्धा दोन्ही मोंसेरातना तिकिटे मिळाली होती. पाटणेकर, सोपटे व पालयेकर हे सुद्धा याच माळेचे मणी. सु-शिक्षित मतदारात्या एकाच हिसक्यात हे सगळे मणी तटातट तुटले व आता त्यांच्या हाती राहिलाय केवळ सत्तरी व ताळगांवचा दोरा.

गोवा फॅमिली राज विरोधी?

आलेमांव कुटुंबाचे चारही सदस्य पराभूत झाले म्हणून तसा सगळीकडे जल्लोषच आहे. असावाही. त्यात रवी नाईक व त्यांचा पुत्र रितेशचाही पराभव झाला. पांडुरंग मडकईकरांचे बंधूराज धाकू यांनी तर प्रियोळमध्ये डिपॉझिट गमावले. साळगावकर कुटुंबाचे सावर्डेतील अपक्ष अर्जुन व मांद्रेतील तृणमूलचे समीरही पराभूत झाले. पण म्हणून संपूर्ण गोव्याने समभावनेने फॅमिली राजच्या विरोधात मतदान केले असे म्हणणे संयुक्तिक ठरेल का? कारण स्वतः मडकईकर निवडून आले. राणे कुटंबाचे पिता-पुत्र, मोंसेरात कुटुंबाची नवरा-बायको व मडकईकर बंधुराज भरघोस मतांनी निवडून आले. जर फॅमिली राजच्या विरोधात लाट होती तर ती या सात मतदारसंघांमध्ये अदृश्य कशी काय झाली?

या निवडणुकीत एकूण सात कुटुंबातील 16 मतदारांना उमेदवारी दिली गेली होती. त्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मगो, तृणमूल व अपक्ष उमेदवारीचासुद्धा आधार घेतला गेला होता. तरीही सात जणांसहित अडीच कुटुंबे जिंकली तर नऊ उमेदवारांची साडेतीन कुटुंबे पराभूत झाली. आता अर्ध्या भरलेल्या ग्लासावर खूष व्हावे की अर्ध्या रित्या ग्लासासाठी रडावे? लाटच असती तर सगळेच गेले नसते का?  मडकईकरांना मतविभागणीचा फायदा मिळालातर राणे पिता-पुत्रांना सत्तरीची लाचार मानसिकत हरवू शकली नाही असा मुद्दा कदाचित पुढे येईल. तर मग मोंसेरातांना कसा काय विजय मिळाला? याचाच अर्थ मतदाराची मानसिकता अजूनही परिपक्व झालेली नाहीय. काही ठिकाणी ती भावनिक झाली, काही ठिकाणी नाही एवढेच. ती अजूनही वैचारिक व्हायचीय असाच त्याचा अन्वयार्थ काढावा लागेल. नाईलाज आहे.

परंतु या निवडणुकीनंतर कालची सत्तरी आज राहिलेली नाही हे मात्र पक्के. कालपर्यंत लाचारीच्या छायेत वावरणार्‍या मतदाराने प्रतापसिंग राणेंवर घरोघर फिरण्याची पाळी आणली. नमस्कार-चमत्कारांना भाग पाडले. तीन-चार हजारांचे त्यांचे रोजचेच ठरलेले मताधिक्य अवघ्या अडीच हजारांवर आणून ठेवले. 2007 च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणूक लढवूनसुद्धा विश्र्वजीतना 61 टक्के मते मिळाली होती. 2010 च्या पोटनिवडणुकीत ही टक्केवारी 83 टक्क्यांवर गेली होती. या निवडणुकीत ती 53 टक्क्यांवर घसरली. त्यासाठी त्यांना अथक परिश्रम करावे लागले. सत्तरीने कोणालाही निवडून द्यावे. प्रतापसिंग व विश्र्वजीतनाच पाहिजे तर परत परत आणावे. परंतु या निवडणुकीने त्यांना दिलेला आवाज, स्पष्टवक्तेपणा, बेधडकपणा व लाचारी नाकारण्याची स्वाभिमानी वृत्ती मात्र लोप पावू नये एवढीच इच्छा.

ही निवडणूक अपक्षांची

कधी नव्हे ते या निवडणुकीत 15 प्रबळ अपक्ष उमेदवार होते. त्यातील पाच जिंकले, आठ उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर निवडणूक हरले तर तिघांनी तिसर्‍या क्रमांकारवरसुद्धा जबरदस्त लढत दिली. डिचोलीत नरेश सावळ, पर्वरीत रोहन खंवटे, फातोर्ड्यात विजय सरदेसाई, नावेलीत आव्हेर्तान फुर्तादो व वेळ्ळीत बेंजामीन सिल्वा विजयी झाले. पक्षीय उमेदवारांशी दोन होत करीत दुसर्‍या क्रमांकावर अटीतटीची लढत देत निवडणूक हरले ते साळगावात तुलियो डिसोझा, मयेत प्रवीण झांट्ये, सांताक्रूझमध्ये रुडॉल्फ फॅर्नांडीस, कुंभारजुवेत निर्मला सावंत, प्रियोळमध्ये गोविंद गावडे, कुडतरीत डॉमनिक गांवकार, केपेंत प्रकाश शंकर वेळीप व सावर्डेत अर्जुन साळगांवकर. त्याशिवाय कुंकळ्ळीत जॉन मोंतेरो व सांगेत प्रसाद गांवकर यांनीही भरघोस मते मिळविली.

आजपर्यंतच्या गोव्याच्या निवडणुकीच्या इतिहासात असे कधीही घडलेले नाही. कारण ही निवडणूक लढली गेली ती कॉंग्रेस नको म्हणून. केवळ भाजपाच हवी म्हणून नव्हे. अर्थात या पंधरातील किमान चार ठिकाणी भाजपानेच अपक्षांना पाठिंबा दिला होता. कुंभारजुवे, नावेली, कुडतरी व वेळ्ळीत. राजकीय डावपेचांच्या दृष्टीने तिथे पर्यायच नव्हता. कारण त्या ठिकाणी भाजपापेक्षा अपक्षच जास्त बलवान होते. भाजपाचा उमेदवार तिथे असता तर मतविभागणीचा फायदा बसल्या ठिकाणी कॉंग्रेसला झाला असता व आज दिसते ते चित्र कदापि दिसले नसते.

तरीही अपक्षांचा फटका परिवर्तन लाटेला बसलाच. कुंभारजुवेंत फादर बिस्मार्क डायसनी 1996 मते काढली आणि निर्मला सावंतचा 1575 मतांनी पराभव झाला. दाबोळीत मगोची तिकीट नाकारलेल्या तृणमूलच्या प्रताप म्हार्दोळकरनी 849 मते घेतली आणि कॉंग्रेसचे मॉविन गुदिन्हो केवळ 944 मतांनी जिंकले. अन्यथा चित्र कदाचित वेगळे असते.

मात्र त्याच वेळी केवळ अपक्षांमुळेच भाजपाचे काही उमेदवार निवडून येऊ शकले. खास करून कुंकळ्ळीत जॉन मोंतेरोनी कॉंग्रेसची 4830 मते घेतली नसती तर फक्त 1313 मतांनी निवडून आलेल्या भाजपाच्या राजन नाईकना ही मते मिळाली असती की काय ही शंका आहे. मुरगांवमध्येही नाझीर खाननी कॉंग्रेसच्या संकल्प आमोणकरांची 1710 मते खाल्ली व भाजपाचे माजी आमदार मिलिंद नाईक अवघ्या 913 मतांनी निवडून आले. सांगेतही अपक्ष प्रसाद गांवकरनी भाजपाची 5737 मते घेतली. परंतु त्याच वेळी दुसरे अपक्ष मिंगेलीन डिकॉस्टानी 880 मते घेतली नसती तर अवघ्या 483 मतांनी पडलेल्या युरी आलेमांवना अडवणे भाजपा आमदार सुभाष फळदेसाईंना शक्य नव्हते. म्हणजेच भाजपाच्या किमान तीन आमदारांना अपक्षांनी निवडून दिलेले आहे. अन्यथा भाजपाला 18 वर समाधान मानावे लागले असते.

भाजपा, सावधान!

निवडणूक डावपेचांच्या दृष्टीतून भाजपाने आणखीन एक चांगली गोष्ट केली. 28 मधल्या सहा उमेदवार्‍या अल्पसंख्यांक ख्रिश्र्चन समाजाला दिल्या. आणखीन तीन ख्रिश्र्चन अपक्षांना सासष्टीमधे पाठिंबा दिला. त्यातले सहाही भाजपा उमेदवार आणि दोन अपक्ष मिळून आठ ख्रिश्र्चन निवडूनसुद्धा आले. त्याशिवाय भाजपाची हिंदुत्ववादी व जातीयवादी म्हणून असलेली प्रतिमा पुसून काढण्यात याचा भरपूर फायदा झाला. भाजपाची जातीयवादी प्रतिमा तयार करणे कॉंग्रेसलासुद्धा शक्य झाले नाही. यातील म्हापश्याचे फ्रांसिस्को डिसोझा व कुडचडेचे निलेश काब्राल सोडले तर इतर सहा ठिकाणी भाजपाला अन्यथा आज असलेले जाग्यांचे मताधिक्य मिळणे कदापि शक्य नव्हते. यानंतरही हिंदू-ख्रिश्र्चन-मुसलमानांचा फॉर्म्युला एवढाच पटण्यासारखा परिमाणमकारक वापरला नाही तर भाजपा सत्तेवर येणे केवळ अशक्य आहे.

आजची कॉंग्रेस ही पूर्वीची कॉंग्रेस राहिली नाही म्हणून आम्ही तिचा पाडाव केला असे सांगणारे कित्येक कॉंग्रेसविरोधी मतदान करणारे कॉंग्रेसवाले आज पावलोपावली भेटतात. तशी गोव्यातील कॉंग्रेस ही मूळ कॉंग्रेस म्हणून गोव्यात कधी रुजलीच नाही. त्या कॉंग्रेसचा पाडाव मगो आणि युगोवाल्यांनी 1963 मधील पहिल्याच निवडणुकीत केला होता. त्यानंतर 1980 च्या निवडणुकीत मगो व युगोवाले दिल्लीला सलाम करीत कॉंग्रेसमध्ये गेले व कॉंग्रेसच्या नावे 20 आवळ्या-भोपळ्यांची मोट बांधली गेली. हळू हळू निष्ठावान आवळे बाजूला फेकत गेले व भोपळ्यांच्या मक्तेदारीवर कॉंग्रेसचा कारभार चालू लागला. विनॅबिलिटी व पैसा हा कॉंग्रेसचा विजयाचा मंत्र झाला. त्याचाच परिपाक म्हणून 35 वर्षांनी आज कॉंग्रेसचे पूर्ण पानिपत झाले.

आज भाजपानेही सत्तेवर येण्यासाठी अशीच आवळ्या-भोपळ्यांची मोट बांधलेली आहे. त्यातील कित्येकांना भाजपाची वैचारीक बैठक ठावूकच नाही तर काहींना स्वतःची अशी काही विचारसरणीच नाही. कॉंग्रेसविरोधी हवेचा अंदाज घेऊन आपला स्वार्थ साधू बघणारे अनेक संधीसाधूही भाजपात घुसलेत व निवडूनही आलेत. उद्या तेच विनेबल बनतील. कदाचित गब्बरही होतील. जात तीच. त्यांच्यासाठी फक्त वाईनची बाटली बदललीय. उद्या हे मातब्बर बनले तर त्यांना रोखणे पर्रीकरांनाही कठीण जाईल. सत्तेच्या मोहात एकदा भाजपाने मोंसेरात आणि मिकींना बाहुपाशात घेतले होते. त्याचीच पुनरावृत्ती झाली तर आज कॉंग्रेसची झालीय तीच स्थिती उद्या भाजपाची होईल.

कारण यंदाचे हे मतदान पक्षाच्या नव्हे तर मानवी मुल्यांच्या रक्षणासाठी झालेले आहे. त्यांना अण्णा हजारेंच्या चळवळीचे अधिष्ठान आहे. शिक्षणातून आलेल्या समजाचे सामर्थ्य त्यांच्यापाशी आहे. युवा वर्गाचे बेधडकपण त्यात काठोकाठ भरलेले आहे.  या विजयातून त्यांचा आत्मविश्र्वास वाढलेला आहे. मतदानातून आपणास हवा तो बदल घडविण्याचा प्रयोग यशस्वी होऊ शकतो याची त्यांना खात्री पटलेली आहे. तेव्हा आता यानंतर मतदार 30-35 वर्षे वाट पाहणार नाही. पाच वर्षांतच तो काय तो निर्णय घेईल. मतदाराने वापरलेय ते व्होट नव्हे; तो व्हॅटो पावर आहे हे लक्षात असू द्या. 

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

Sandesh excellent as ever. very straight forward analysis. Would havVe written to you in Marathi, but my keyboard will not allow me to do so. Just want to reiterate your view that the vote was not totally a pro-BJP but more of anti-congress. It is a historic vote more so given the fact especially that Goan Catholics have begun to think outside the framework. That politics and social life is beyond the parameters of religion and religion alone, which the congress had made them to think. The biggest victory for me is not the BJP has won or that the Congress was defeated, but the fact that GOAN CATHOLICS HAVE BEGUN TO THINK AS INDIAN CITIZENS. This is a warning also for Parrikar as you have mentioned in your view.. BHAJAPA SAVDHAN!!!!!. As i have said before if the Alemao Family had it's way we would have been seeing the formation of SALCETTE INTO SALMAO. Salcette has used used their veto against this.

Thanks for inviting me to read your article although in Marathi...... facts are facts whether in Marathi, Konkanni or English.

- jaret de silva, overseas | 18 th March 2012 05:01

 

संदेश बाब ,

आपले विश्लेषण अती सुरेख आणि मूदयाला धरून आहे. आपल्या गोआ आणि बाकी स्टेट मधील निवडणुकीत एक गोष्ट प्राकर्षाने जाणवते ती म्हणजे "जाती / बिरादारी " ला लोकानि दिलेले झुकते माप. या निवडणुकीत कुठेच जात आणि रिज़र्वेशन च्या मुदयावर लोकानि मतदान केले नाही. आता लोकाना बदल हवा आहे "प्रगतीचा" , "भरभराटीचा" . नरेन्द्र मोदी नि दाखवून दिले आहे की प्रगती करा आणि वर्शोन वर्षे मत मिळावा. मनोहर पर्रिकरानि पण हाच फॉर्मुला वापरला तर गोवेकराना परत कॉंग्रेस पक्षाचे तोंड बघण्याची गरज वाटणार नाही. आणि हे असेच होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना. .........

- Mahesh Thali, Thane | 16 th March 2012 00:26

 

Sandeshbab

Kudos to u for xcllent post election analysis.

hopefully "the powers to be" will read same and be cautious

It is more of Parrikar wave but personally I still believe that it's "EK -KHAMBI TAMBU".CM cannot afford to disregard his personal security and of course his health

- Hemant Ramani, Panaji goa | 15 th March 2012 20:46

 

Well balanced and incisive analysis. Sandesh, you are as good as ever

- Kalidas Laxman, Panaji Goa | 15 th March 2012 18:56

 

अगदी निष्पक्ष आणि संग्रही ठेवान्यजोग विश्लेषण. धन्यवाद आणि अभिनन्दन, संदेशबाब.

Goes to show that Goan society has evolved and started to respect human values and morality.

May this trend continue, and hope the Goans rise above petty things such as caste, religion, and pseudo-culturlism.

- Jagan, Canada | 15 th March 2012 18:52

 

Nice and pragmatic analysis of the elections....When the voters become aware and conscious of what is happening around him and how he is being taken for a ride---he votes decisively....Good for the healthy democracy......

- vishwas prabhudesai, loliem | 15 th March 2012 17:50

 

Related Blogs