धुमसणारी सत्तरी राणे-राज्य संपवणार?

By Sandesh Prabhudesai
29 February 2012 23:45 IST

सत्तरी तालुक्यावर प्रतापसिंग राणे घराण्याची अनभिषिक्त सत्ता चालते हा समज खोटा ठरविण्यासारखी परिस्थिती सध्या या तालुक्यातील पर्ये आणि वाळपई या दोन्ही मतदारसंघांमध्ये झालेली आहे. इथे प्रतापसिंग राणे आणि त्यांचा पुत्र विश्वजीत राणे यांचे स्थान पक्के अशे छातीठोकपणे सांगणे खुद्द काँग्रेसवाल्यांनाच कठीण झाले आहे. ‘काहीही झाले तरी शेवटी आम्हीच जिंकणारच’ असा सूर सध्या काँग्रेसच्या गोटातून ऐकू येत आहे. म्हणजेच ‘काही तरी’ झालेले आहे. आणि त्यामुळे बचावात्मक पावित्रा घेऊन गड राखण्याची परिस्थिती पिता-पुत्रांवर आलेली आहे. या दोन्ही मतदारसंघांचा दौरा केल्यावर जाणवली ती राणेंच्या गोटातील ही अगतिकता व विरोधी बाजूंची कमालीची आक्रमकता.

1972 मध्ये प्रतापसिंग राणेंनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. तेव्हापासून 2007 पर्यंत नऊ वेळा सातत्याने निवडून येणारे ते गोव्यातील एकमेव राजकारणी. 1987 मध्ये गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाला आणि 1990 च्या निवडणुकीत सत्तरी मतदारसंघाचे पर्ये आणि वाळपई असे दोन मतदारसंघ बनले. तेव्हापासून आतापर्यंत वाळपईत एक पोटनिवडणूक धरून सहा निवडणुका झाल्या. त्यात अधिकृतरित्या तीनदा काँग्रेस, दोनदा भाजपाचे नरहरी हळदणकर आणि 2007 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून विश्वजीत राणे निवडणून आलेले आहेत. 1990 मध्ये अशोक परब तर 1999 मध्ये बंडू देसाई काँग्रेसचे आमदार झालेले आहेत. परंत हल्लीच्या काळात हा मतदारसंघ विश्वजीत राणेंचाच असा एक समज पक्का झालेला होता.

मात्र यंदाच्या निवडणुकीपासून मतदारसंघांची फेररचना होऊन फोंडा मतदारसंघातील गांजे व उसगांव वाळपई मतदारसंघात समाविष्ट झालेले आहेत. खनिज मालवाहतुकीचा व्यवसाय करणारे भाजपाचे उमेदवार सत्यविजय नाईक हे याच भागातले. एकूण 23 हजार मतांचा हा मतदारसंघ. त्यातील साडे आठ हजार मते या भागात आहेत. इथे भाजपाला जास्त मते मिळतील हे काँग्रेसवालेच मान्य करतात. 75 टक्ग्यांच्या आसपास मतदान झाले तरी गांजे-उसगावमध्ये एकूण मतदान होईल साडे सहा हजार, तर राहिलेल्या वाळपईमध्ये 10 हजारांच्या आसपास. सत्यविजयना गांजे-उसगावमध्ये तीन हजारांवर रोखून धरणे हे आव्हान इथे विश्वजीतपुढे आहे. हे अशक्य आहे हे इथले काँग्रेस समर्थकही मान्य करतात.  

कारण राहिलेला पूर्वाश्रमीचा वाळपई मतदारसंघ पूर्णपणे विश्वजीतच्या मताधिक्याचा राहील अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. काँग्रेसचे माजी आमदार बंडू देसाई हे त्यांच्यापुढे इथे फार मोठे आव्हान आहे. विश्वजीतची मते फोडण्यासाठीच ते निवडणूक लढवीत आहेत यात शंकाच नाही. त्यांनी किमान तीन हजार मते मिळविली तरी विश्वजीत गोत्यात सापडतात. कारण पूर्वाश्रमीच्या वाळपईत भाजपाची किमान साडेतीन हजार मते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही हे काँग्रेसवालेच मान्य करतात. म्हणजे गांजे-उसगावमध्ये चार हजार व वाळपईत साडेतीन केल्यास भाजपाच्या पदरात साडेसात हजार मते सहजगत्या पडतात. परंतु गांजे-उसगावमध्ये भाजपास तीन हजारांहून कमी मते मिळाली तर विश्वजीतना जिंकण्यापासून कोणतेही बंडोपंत रोखून धरू शकत नाहीत. त्यात बंडू देसाईंना दोन हजारांच्या घरात रोखून धरणे हेही आव्हान विश्वजीतपुढे आहे.

ही झाली नेहमीची पारंपारिक आकडेमोड. परंतु 2007 ची परिस्थिती सध्या दिसत नाही. 2010 च्या पोटनिवडणुकीत विश्वजीतनी 83 टक्के, म्हणजे साडे अकरा हजारांहून जास्त मिळवली होती. आठ हजारांचे मताधिक्य मिळवले होते. ती परिस्थिती तर अजिबात दिसत नाही. गांजे-उसगाव बरोबरच त्यांच्या विरोधातही वातावरण बरेच तापलेले आहे. अभयारण्याच्या प्रश्नाबरोबरच त्यांची अरेरावी वाढलेली आहे असे लोक उघडपणे बोलताना आढळतात. शिवाय नोक-या देण्याचा फायदा असतो तसे नुकसानही असते. नोक-या न मिळालेले नाराज होऊन विरोधी मतदान करतात. त्याचाही काही प्रमाणात फटका विश्वजीतना बसणारच आहे. शिवाय सत्तरीत सुरू झालेला खनिज व्यवसायाचा फायदा व फटका दोन्हीही आहेतच.

त्यात आपल्या आठ आमदारांना आपण निवडून आणू व आपल्या वडिलांना मुख्यमंत्री करू अशी ‘शितापयलीं मीठ‘ खाण्याची भाषा केल्याने मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असलेले सगळेच काँग्रेस पुढारी चवताळलेले आहेत. त्यांनीही अंतर्गतरित्या वाळपई व पर्येवर लक्ष केंद्रीत केल्याची बातमी आहे. तसे झाल्यास ते आगीत तेल ठरेल. परंतु या सर्व परिस्थितीवर मात करून ते जिंकतील असे त्यांच्या विरोधकांनाही वाटते. मात्र जिंकले तरीही त्यांचे मताधिक्य कमी होईल हे निश्चित.

प्रतापसिंग राणेंच्या पर्ये मतदारसंघात मात्र वातावरण बरेच तापलेले आहे. त्यांचे वय, त्यांची मग्रूर भाषा, तुटलेला तळागाळातील लोकसंकर्प, अभयारण्याचा प्रश्न व काजूच्या लागवडीचा प्रश्न अशा सर्वच गोष्टी एकत्र आल्याने सर्वत्र आगच भडकलेली दिसते. या आगीतून सहीसलामत जिंकून येणे हे त्यांच्यासाठी अग्निदिव्य आहे. कधी नव्हे ते माजी मुख्यमंत्री व आजचे सभापती घराघरातून फिरू लागलेले आहेत यातच सर्व काही आले.

हल्ली हल्ली पर्यंत प्रतापसिंग राणेसमोर ब्र काढण्याची कुणाची बिशाद नव्हती. कुणी तरी नोकरी मागायला गेला तेव्हा एका घरात किती नोक-या द्यायच्या असा प्रश्न त्याला विचारला, तेव्हा एका घरात दोन तिकिटे देता येतात का असा प्रतिप्रश्न त्यांने राणेंना सर्वांदेखत विचारला अशी एक कथा सध्या गरमागरम चहाबरोबर चघळली जातेय. जाहीर सभांतून कितीतरी सुशिक्षित युवक येवून त्यांच्यावर बेधडक आगपाखड करीत आहेत. 1999 पासून आपली ही शेवटची निवडणूक असे सांगीत ते थापा मारीत आहेत इथपर्यंत हे प्रकरण येऊन ठेपलेले आहे. पंच-सरपंचांमार्फत कामे करणे ही प्रतापसिंग राणेंची पद्धत. परंतु तेच स्थानिक लोकप्रतिनिधी आज त्यातून केवळ आपला फायदा उठवीत असल्यानेही लोक नाराज बनलेले आहेत.

कालपर्यंत त्यांचा बालेकिल्ला मानले जाणारे केरी, पर्ये व मोर्लेचे गाव आज विभागलेले दिसत आहेत. त्यांच्या विरोधात उभा राहिलेला भाजपाचा उमेदवार हासुद्धा (विश्वजीत कृष्णराव) राणेच आहे हे ठावूक असूनही हा विरोध यत्किंचितही कमी झालेला नाही. उलट युवा आमदार पाहिजे असा सूरच सर्वत्र ऐकू येतोय. मात्र एवढे झाले तरी लोक शेवटी त्यांनाच मत देतील. कमी होईल ते केवळ त्यांचे मताधिक्य असे प्रतापसिंगांचे समर्थक छातीठोकपणे सांगताना आढळतात. लाचारी या शब्दाविरुद्ध आणि प्रवृत्तीविरुद्ध बंडखोर तयार झालेले आहेत हे खरे. परंतु त्यातील किती प्रामाणिक आहेत आणि किती केवळ राणे कुटुंबियांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्याचा वापर करीत आहेत याबाबत विरोधकही संभ्रमित आहेत.

एक मात्र खरे. कधी नव्हे ती संपूर्ण सत्तरी धुमसताना जाणवते आहे. लाचारीची राख अंगावर घेऊन जगणारे हे अंगार भडकले तर काय करतात ते सालेलीतून सर्वांनीच अनुभवलेले आहे. मात्र हे संतापाचे अंगार राणे पिता-पुत्रांना भस्म करतात की या अंगारावरील राख भस्म म्हणून कपाळी लावून दोघेही पिता-पुत्र पुनश्च विधानसभेत विधिपूर्वक प्रवेश करतात ते पहावे लागेल.

या निवडणुकीत राणे पिता-पुत्र जिंकू देत वा हरू देत; परंतु यानंतर सत्तरी वेगळी असेल हे मात्र खरे. 

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

Vinayaji, winning and loosing is part of the game you can win when people want you to serve them or bribe the to vote how his son has done in past and present.rane was part of the gang to merge goa into maharastra. Don't only think about satari think about whole goa what development he has done being the chief minister for so many times with different parties. See what his son Viswajit has done for the health ministry he detroyed it check how many people died at GMC and Hospicio in Margoa due to the negligence of the doctors and nursesand how much comm he has taken on the new hospital in Mupsa. If P Rane has done so much for Satari than the people should elect him sitting at home but why he went to visit after 5 years to beg the votes for him and his currupt congress party. After knowing this you want both the father and son elected again, anyway nothing can be done now as their future is packed in the boxes you will know 16 hrs from now hope large turnout will bring result which will bring prosperity to goans.

- domnic, navelim | 05 th March 2012 17:09

 

wining continuously 9 times from same constituency is not easy dude ...open your eyes and see the development done in sattari ... you should only give your vote to the person who is capable of doing developement ... all pplz are jealous of him ...he is the men dude ..wen BJP was in power what they did for sattari ... nothing ...opposition tried everytime to pull him dwn but no sucess .....every election in newspaper specially tarun bharat "tough fight in paryem" and everytime he wins with margin > 3000 .... grow up

- vinay, panjim | 05 th March 2012 12:58

 

how about an english translation of this piece?

- Shiv Kumar, Mumbai | 01 st March 2012 15:15

 

When you look at the arrogance, one wonders as to whether it is the wealth, the power, the family background or the super ego that makes them treat others like dirt....To earn respect from right thinking patriotic citizens, it is the values, it is respect for others, it is the honesty, it is the helping attitude, it is the love for the mother land, it is the sympathy for the poor, it is the love for the environments, that are essential...

Just greed, selfishness, joining hands with corrupt criminals and disrespecting others by arrogance or making gangs to grab power, never earn respect in the eyes of right thinking people...

- vishwas prabhudesai, loliem | 01 st March 2012 12:30

 

Family Raj is kind of Dictatorship, people must think properly and vote for good leader.

- Shantaram jalmi, Pilgao | 01 st March 2012 12:25

 

संदेश बाब, मराठीतून लिहिल्याबद्दल अभिनंदन! पूर्वी तुम्ही तरुण भारत मधून ' सदर (घुसमट?) लिहित असाल तेव्हा ते आम्ही आवडीने वाचायचो. मध्यंतरी झालेल्या भाषीक राजकारणामुळे मला वाटत तुम्ही मराठीतून लिहिणे बंद केल होतं. असो. राण्यांची मग्रुरी ह्या निवडणुकीत समाप्त होवो हि इच्छा. बाकी सगळ मतदारांचा हातात.

- Jagan Kamat, Canada | 01 st March 2012 07:16

 

If People of Sattari wants to creat a history...than Why not People from Salcete, Ponda, Tiswadi should accept family Rajya! This is the right time for all Goans to re liberate Goa from Corrupt polititions and make it free from Ilegal mining, regional plan fraud, corruption, family rajya, etc. etc.

Let's elect those candidates who will protect the interest of Goa and Goans under the leadeship of Dynamic Chief Minister.

Jai Ho, Goa KI JAI HO, FAMILY Rajya MURDABAD.

- VIVEK K. NAIK, MARGAO-GOA | 01 st March 2012 01:34

 

Related Blogs