एन्आयटी ठरेल काणकोणसाठी वरदान

By Sandesh Prabhudesai
16 December 2011 20:23 IST

भारताचे भवितव्य तंत्रज्ञानात आहे. भारतीय युवक जगभरात तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर आहे. केवळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातच नव्हे, इतरही सर्व तंत्रज्ञान क्षेत्रात. म्हणूनच तर अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या कामगिरीचा सर्वच प्रगत राष्ट्रांनी धसका घेतलेला आहे. ही धडाकेबाज प्रगती करताना भारताने एका कालपर्यंतच्या नकारात्मक गोष्टीचे सकारात्मक स्वरुपात रुपांतर करण्याचा ध्यास घेतलेला आहे. त्याला डॅमॉग्राफिक डिव्हिडंट असे सूचक नावही दिलेले आहे. लोकसंख्येचा लाभांश. कालपर्यंत भारताची प्रचंड लोकसंख्या हा आमचा कमकुवतपणा मानला जायचा. आज तीच लोकसंख्या ही आमची सर्वात मोठी ताकद मानून मार्गक्रमण सुरू झालेले आहे. त्याचा प्रमुख मुलाधार आहे शिक्षण. आजमितीस भारताची लोकसंख्या आहे १.२१ अब्ज. त्यातील अर्धा, म्हणजे किमान ६० कोटी,  हा २५ वर्षांखालील युवावर्ग आहे. तर ३७ कोटी मुले १४ वर्षांखालील आहेत. या सर्वांना खास करून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रशिक्षित केल्यास उद्या केवळ भारताचीच प्रगती नव्हे तर जगभरातसुद्धा भारतीय युवक सर्व क्षेत्रे पादाक्रांत करून शकतो. हे केवळ दिवास्वप्न नव्हे. आजसुद्धा भारतीय तंत्रज्ञ युवक जगभर हेच सिद्ध करीत फिरतोय.

हीच गोष्ट डोळ्यांपुढे ठेवून २००३ साली भारत सरकारने सरकारतर्फे चालविण्यात येणार्‍या १७ विभागीय अभियांत्रिकी महाविद्यालयांचे रुपांतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्नॉलॉजीमध्ये (भारतीय तंत्रज्ञान संस्था) केले. अलाहाबाद, भोपाळ, कालिकत, दुर्गापूर, हमरीपूर, जयपूर, जालंधर, जमशेदपूर, कुरुक्षेत्र, नागपूर, रोरकेला, सिलचर, श्रीनगर, सुरतकल, तिरुचिरापल्ली आणि वारांगळ ही अभियांत्रिकी महाविद्यालये एन्आयटी झाली. त्याशिवाय पाटणा, रायपूर आणि आगरताळाची खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयेही एन्आयटीखाली चालवायला घेतली.

त्यानंतर अकराव्या पंचवार्षिक योजने अंतर्गत आणखीन एन्आयटीचे कार्यक्षेत्र वाढविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार २३ ऑगस्ट २००९ रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखीन दहा एन्आयटी स्थापन करण्याचा निर्णय झाला. दिल्लीतील एक नवीन एन्आयटी सोडल्यास अभियांत्रिकी शिक्षणात मागे राहिलेल्या राज्यांचाच यावेळी जास्त विचार झाला. गोव्याचा अंतर्भाव करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी खुद्द केंद्रीय मानव संसाधन मंत्री अर्जुन सिंग यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना १९ जुलै २००८ रोजी पत्र पाठवून एन्आयटी हवी असल्यास तसा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले. त्याशिवाय उत्तराखंड,  पॉंडिचरी, मिझोराम, मेघालय, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम राज्यांमध्येही एन्आयटी संमत केली गेली.

गोव्यासाठी संमत झालेल्या एन्आयटीमध्ये दमण, दीव, लक्षद्वीप, दादरा व नगर हवेली या संघप्रदेशांचाही समावेश करण्यात आलेला आहे. ज्या राज्यात एन्आयटी स्थापन होईल त्या राज्यातील विद्यार्थ्यांना या एन्आयटी मध्ये ५० टक्के जागा राखीव असतील. अर्थात, इतर चार संघप्रदेशांचाही त्यात समावेश असेल. परंतु गोव्याच्या प्रमाणात (१५ लाख लोकसंख्या) या संघप्रदेशांची लोकसंख्या (दमण - १ लाख ५८ हजार, दीव - २१,५८७, लक्षद्वीप - ६४,४२९ आणि दादरा-नगर हवेली - ३ लाख ४३ हजार) एकूण ५ लाख ८७ हजार एवढीच आहे. त्यामुळे राखीव जागांचा सर्वात जास्त फायदा गोव्यालाच होईल यात शंका नाही. आयआयटी मधील तांत्रिक शिक्षणानंतर आजच्या घडीस तांत्रिक शिक्षणामध्ये नंबर लागतो तो एन्आयटीचा. त्यामुळे गोव्यासाठी तर ही सुवर्णसंधीच आहे.

यापूर्वी गोव्याच्या विद्यार्थ्यांना एन्आयटी मध्ये प्रवेश मिळत नव्हता असे नव्हे. परंतु राष्ट्रीय पातळीवरील सर्व २० एन्आयटीमध्ये मिळून केवळ ५२ जागा गोव्यातून बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना मिळत. केंद्र सरकाराच्या या नवीन निर्णयानंतर फर्मागुडीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात तात्पुरती व्यवस्था करून एन्आयटीचे तीन बीटॅकचे पदविका वर्ग सुरू करण्यात आले. प्रत्येक वर्गासाठी ३० जागा मिळून एकूण ९०, परदेशी विद्यार्थ्यांसाठी सहा व इतर मिळून गेल्या वर्षी एकूण ११३ विद्यार्थी कम्पुटर सायन्स, इलेक्ट्रोनिक्स अँड कम्युनिकेशन्स व इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रोनिक्स शाखांमध्ये शिकायला लागले. या वर्षी आणखीन १०३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे. पूर्वी ५२ जागे असूनसुद्धा गोव्याबाहेरील एन्आयटीमध्ये केवळ चाळीसच्या आसपास गोमंतकीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळायचा. परंतु यंदा एकूण ९० जागांमध्ये गोव्याच्या ५० टक्के राखीव कोटाखाली ३७ व राष्ट्रीय पातळीवरील परिक्षा देऊन २३ जागा पटकावून एकूण ६० गोमंतकीय विद्यार्थी एन्आयटीमध्ये शिकत आहेत.  गेल्या वर्षी ५३ गोमंतकीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. म्हणजे एकूण १३३ गोमंतकीय विद्यार्थी आजच्या घडीला गोव्याच्या एन्आयटीमध्ये शिकत आहेत.

उद्या स्वतःचा कॅम्पस असलेली एन्आयटी झाली तर एकूण जागा किमान ५०० होतील. आज आहेत त्याशिवाय आणखीन कितीतरी वेगवेगळे कोर्सेस येतील. ५० टक्के राखीवतेखाली किमान २०० जागा (संघप्रदेश सोडून) गोमंतकीय विद्यार्थ्यांना मिळतील. चारही संघप्रदेशातील विद्यार्थ्यांनी हवे तेवढे अर्ज केले नाहीत तर त्याही जागा गोव्यालाच मिळतील. त्याशिवाय राष्ट्रीय पातळीवर परिक्षेत प्राविण्य मिळवूनही आणखीन जागा मिळविण्याची मुभा असेल. म्हणजेच उच्चस्तरीय तांत्रिक शिक्षण घेण्याची संधी पाच पटीने जास्त गोमंतकीय विद्यार्थ्यांना मिळेल. बीटेक शिवाय पदव्युत्तर अभ्सासाठी एम्टेक व पीएच्डी करण्याचीही संधी उपलब्ध होईल. ही सर्व माहिती गोवा सरकारच्या तांत्रिक शिक्षण संचालनालयाकडून मिळालेली आहे.

आयआयटीनंतर ज्या शिक्षणीक संस्थांचा भारतात क्रमांक लागतो अशी एन्आयटी गोव्यात सुरू करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील एन्आयटी मंडळाच्या अटी आहेत त्या मामुली. गोवा सरकारकडून मोफत जमीन व पाणी, वीज, इंटरनेट अशा मूलभूत साधनसुविधा. हा एन्आयटीचा कॅम्पस त्यांना राष्ट्रीय महामार्गाजवळ हवा. शिवाय जवळपास रेल्वे स्थानक व राज्यात किमान एक विमानतळ.  याच अनुषंगाने विचार करून गोवा सरकारने बाळ्ळी-कुंकळ्ळी परिसरातील रस्त्यालगतची जमीन सुचविली होती. परंतु तेथील रहिवाशांनी विरोध केल्याने आता काणकोण तालुक्यातील लोलये गावच्या काही रहिवाशांनी हा प्रकल्प आपल्या तालुक्यात नेण्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवला आहे. त्यासाठी आता येत्या रविवारी ग्रामसभाही होणार आहे.

गोवा-कर्नाटक सीमेवरील लोलये गावातून राष्ट्रीय हमरस्ता जातो. कोंकण रेल्वेचे नवीन रेल्वे स्थानक लोलये गावातच आता सुरू होणार आहे. त्याहून मोठे रेल्वे स्थानक कारवारमध्ये अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर आहे. नगर्से, काणकोण येथे आणखी एक स्थानक आहे. एन्आयटी कॅम्पससाठी त्यांना हवी आहे ती ३०० एकर जमीन. म्हणजे सुमारे १२ लाख चौरस मीटर. त्यासाठी शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या काही रहिवाशांनी माड्डितळप येथील जागा सुचविलेली आहे. या ठिकाणी शेकडो एकर जमीन कोमुनिदादीच्या ताब्यात आहे. याच जागेत बॉक्साईट खाणीचाही पूर्वी प्रस्ताव होता. परंतु लोलयेच्या गांवकर्‍यांनी प्रखर विरोध केल्याने तो प्रत्यक्षात येवू शकलेला नाही. उद्या कोणी तरी त्यासाठी पुढे येणारच नाही याची शाश्वती नाही. परंतु एन्आयटीचा प्रकल्प झाल्यास ती शक्यता पूर्णपणे मावळेल यातही शंका नाही.

एन्आयटीच्या या प्रकल्पाला केंद्र सरकाराने डीम्ड विश्वविद्यालयाचा दर्जा दिलेला आहे. त्यात विविध शाखांसाठी वर्ग व प्रयोगशाळा, इतर सुविधा, प्रशासकीय विभाग, क्रीडा मैदाने, शिक्षक व बिगर-शिक्षकांसाठी वसती व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे असा हा प्रकल्प असेल. यात विद्याविभूषित शिक्षकांची गरज लागल्याने बराचसा शिक्षक भारतभरातून येईल यात शंकाच नाही. परंतु राज्य पातळीवर तोच शिक्षक उपलब्ध असल्यास त्यांना इथे शिकवायची आयतीच संधी मिळेल. तसेच प्रशासकीय पातळीवर रोजगाराच्या शेकडो संधी उपलब्ध होतील. त्याशिवाय असे महत्वपूर्ण शैक्षणिक प्रकल्प आल्यावर गावातही आपसूकच बाजार, मनोरंजनाच्या सुविधा व इतरही स्वयंरोजगारांना बरकत येते. त्याचाही फायदा गांवकर्‍यांना आपसूकच होईल. शिरोड्यात तीन महाविद्यालये आल्यानंतर कित्येक विद्यार्थी आज घराघरातून पेइंग गेस्ट म्हणून राहतात. तसाच प्रकार इथेही होणे साहजिक आहे.

आजपर्यंत या तालुक्याने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कित्येक डॉक्टर्स, इंजिनियर व इतर तंत्रज्ञ केवळ गोव्यालाच नव्हे तर भारत देशाला व परदेशातही दिलेले आहेत. त्यामुळे न्यूनगंड न बाळगता एन्आयटीचे स्वागत केल्यास केवळ लोलयेचा नव्हे तर संपूर्ण काणकोण तालुक्याचाच कायापालट होऊ शकतो. मात्र त्यासाठी केवळ एन्आयटीच्या प्रकल्पाला मान्यता देऊन हा प्रश्न सुटणार नाही. माड्डितळपसारख्या ठिकाणी या प्रकल्पाला जागा देताना आज तिथे असलेल्या लोकवस्तीला बाधा पोचणार नाही याची दक्षता घेणे महत्वाचे आहेच. परंतु त्याचबरोबर तेथील स्थानिकांची वसती उद्या वाढेल हे लक्षात घेऊन त्यासाठी जागा सोडणेही क्रमप्राप्त ठरेल. या प्रकल्पाच्या जवळपास बाजार, बस स्थानक, गावात इतर ठिकाणी इतर साधनसुविधांचे प्रकल्प यांचेही नियोजन करावे लागेल. तसेच पाणी, वीज, टेलिफोन, इंटरनेट तसेच गालजीबाग व तळपण पूल बांधून राष्ट्रीय हमरस्त्याचे रुंदीकरण अशा सर्वच प्रकल्पांचे योजनाबद्ध नियोजन करावे लागेल. 

काणकोणवासियांनी आजपर्यंत आपल्या गावात विकृत पर्यटनाचे प्रकल्प येण्यास सातत्याने विरोध केलेला आहे. हा निसर्गरम्य गाव उध्वस्त होऊ नये यासाठी केलेले सर्व प्रयत्न उधळून लावलेले आहेत. तेव्हा या प्रकल्पाकडेही कुणी संशयाने पाहिले तर त्यात आश्चर्य नाही. मात्र केवळ संशयाच्या आधारावर आंधळा विरोध करण्यापेक्षा डोळसपणे या प्रतिष्ठित प्रकल्पाकडे पाहून लोलये गावाचे निसर्गसौंदर्य अबाधित राखून ठेवण्याएवढे लोलयेकर दक्ष राहतील यात मुळीच शंका नाही. तसेच कोणालाही विस्थापित न करता हा प्रकल्प चालीस ठेवणे हे गोवा सरकारचे कर्तव्य राहील. तसे झाले तर मात्र या वा शेजारच्या पैंगीणसारख्या इतरही गावातून बाहेरगावी स्थलांतरीत होण्याची परंपरा खंडित होऊ शकते. गोवा मुक्तीपासून गेली ५० वर्षे काणकोण तालुका शिक्षणक्षेत्रात सातत्याने अग्रेसर राहिलेला आहे. आज तर लोलये व पैंगीण गावातून काणकोणबाहेरील मुलांसाठी वसतीगृहे चालतात. ही परंपरा पुढे नेऊन एन्आयटीच्या निमित्याने गोव्यातील महत्वपूर्ण शिक्षणक्षेत्र म्हणूनसुद्धा काणकोण तालुका विकसित होऊ शकतो. गोव्याचे ते भूषण ठरू शकते.

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

Very good analysis of NIT project. Sandesh, true Kankonkars must supports such educative projects than that of tourism projectslike Palolem . Hope all Kankonkars from Kankon & Outside will welcome the project without displacing the people staying there. If not at Loliem, then some other place at Kankon may be near Mallikarjun Temple, Shristal.

- Shekhar M. Gaitonde, Panaji | 20 th December 2011 12:40

 

Related Blogs