केवळ पुस्तक म्हणजेच साहित्य?

By Sandesh Prabhudesai
20 December 2015 11:52 IST

गोव्यातील नामवंत साहित्यिक, पत्रकार, वक्ते व कोंकणी चळवळीचे पुढारी उदयबाब भेंब्रे यांना वयाच्या 76 व्या वर्षी यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. तोही कॉलेजमध्ये असताना संशोधन करून त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षी लिहिलेल्या ‘कर्णपर्व’ या नाट्यकृतीसाठी. इतक्या उशिरा का? कारण त्यांच्या या नाट्यकृतीचे पुस्तक दोन वर्षांपूर्वी संजना पब्लिकेशनने प्रसिद्ध केले. आणखीन पुस्तके नव्हती का? होते, केवळ एकच. ‘चान्न्याचे राती’ या नावाने 1986 साली अपुरबाय प्रकाशनन  प्रसिद्ध केलेला त्यांच्या काही वेचक कविता व गीतांचा संग्रह. ही दोन कोंकणी पुस्तके. त्यापूर्वी ओपिनयन पोलाच्या काळात गोमंतकीयांचे मतपरिवर्तन करण्यात मोलाची भुमिका बजावलेल्या व ‘राष्ट्रमत’ या दैनिकातून प्रसिद्ध होणाऱ्या ‘ब्रह्मास्त्र’ या स्तंभातील लेखांचा मराठी संग्रह. अत्यंत संवेदनशील मन असलेल्या व जनमानसाच्या काळजाला हात घालण्याच्या शैलीत लिहिणाऱ्या या साहित्यिकाचे एवढेच का संचित? अर्थात, खात्रीने नाही. परंतु त्यांच्या लिखाणाची पुस्तके आली नाहीत. आली तीही वेळेवर आली नाहीत. म्हणून त्यांनीच लिहिलेल्या नाट्यकृतीच्या पुस्तकाला, कोणत्याही साहित्यिकाला मुकुटमणी वाटणारा साहित्य अकादमीचा पुरस्कार, तब्बल 55 वर्षांनंतर मिळाला. ही थट्टा कुणाची? उदयबाबांच्या साहित्यकृतीची, की एकूणच साहित्यिक संकल्पनेची?

कारण साहित्य अकादमी पुस्तकाला पुरस्कार देते व पर्यायाने तो पुरस्कार साहित्यिकाला मिळतो. छापील पुस्तक नसले तर साहित्य अकादमी त्या साहित्यिकाची दखलच घेत नाही. मग त्या साहित्यिकाने कितीही साहित्य निर्मिती करू दे. त्याचे साहित्य जनता जनार्दनाने डोक्यावर घेऊ दे. लोकांच्या जिभेवर ते घोळू दे. म्हणजे संत तुकारामाच्या काळात जर साहित्य अकादमी अस्तित्वात असती तर त्यांचे अभंग सनातनी ब्राह्मणांनी इंद्रायणी नदीत बुडविले, तेव्हा आता त्यांच्याजवळ लिखित स्वरुपात काहीच नाही म्हणून त्यांनी सरळ कायद्यावर बोट देऊन संत तुकारामांना साहित्य अकादमी पुरस्कार नाकारला असता. नुसते हस्तलिखितसुद्धा चालत नाही. छापून आलेले पुस्तक हाच एकमेव निकष. छपाई परवडत नसेल तर साहित्य अकादमीच्या लेखी तो साहित्यिकाच्या रांगेत बसण्याला लायकच होत नाही. मग त्यानंतर मिळणारा साहित्य अकादमीचा ‘फेलो’ हा बहुमान व भाषा सन्मान पुरस्कार तसेच साहित्य साधनेसाठी देण्यात येणारा भारत सरकाराचा सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार यांची बात तर सोडूनच द्या. दुर्दैवाने हेच निकष मग राज्य पातळीवरील शासकीय संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या राज्य साहित्य पुरस्कारांसाठीही वापरले जातात. साहित्य लोकांसाठी लिहिले जाते. परंतु लोकमान्यता हा पुरस्कारासाठी निकष होऊ शकत नाही. छापील पुस्तक हाच मूलभूत निकष असतो.

प्रातनिधिक स्वरुपात आपण उदयबाबांचेच उदाहरण घेऊया. त्यांचे ‘चान्याचे राती, माडांचे सावळेत’ हे गीत आज गोव्याचे लोकगीत बनलेले आहे. कित्येकांना तर ते उदयबाबांनी लिहिलेले आहे हेसुद्धा ठाऊक नाही. हाच तर साहित्यिकाचा खरा बहुमान असतो. ‘मंद वाऱ्यार दर्या ल्हारार, गोंयां तुजी याद येता’ हे मुंबईत शिकत असताना लिहिलेले त्यांचे गीत रामदास कामतनी अजरामर केले आणि आजही कित्येक गायक वेगवेगळ्या चालींतून ते संगीतबद्ध करीत असतात. आशालताने गायलेले ‘रॉकी शूत शूत कितें कोत्ता’ हे गीत वाजले तर आजही आपले पाय बसल्या ठिकाणी नाचू लागतात. शान या तरुण गायकाने गायलेली ‘यो यो साळोरे यो’ वा ‘आगा आगा तारया’ तसेच शंकर महादेवने गायलेले ‘वयर वयर दोंगरार, सैमा देवा तुज्या माथ्यार’ या त्यांच्या गीतांवर नृत्य करीत गोव्याची संपूर्ण तरुणाई गोवा युवा महोत्सवाच्या माटवात नुसती थिरकते. वर्षा भावेंनी संगीतबद्ध केलेले ‘हांसुया खेळुंया’ हे बालगीत  कित्येक लहान मुले येता-जाता गाताना आढळतात. उदयबाबांनी अशी एकूण 60 गीते लिहिलेली आहेत. त्यातील किमान 40 एक तर रेडियोवर ध्वनिमुद्रित झालेली आहेत, एचएमव्हीने त्याच्या एलपी रेकॉर्डस् काढलेल्या आहेत वा आता दीप कारापूरकरपासून सिद्धनाथ बुयांवपर्यंत कित्येक निर्माते सीडींच्या स्वरुपात ती लोकांसमोर घेऊन येत आहेत.

 

अशा वेळी या गीतांचे पुस्तक आले नाही या एकमेव कारणासाठी त्यांना साहित्यिक मानले जाणार नाही का? शेवटी कोणतीही साहित्यकृती कुणी लिहिली याचा दस्तावेज उपलब्ध असणे महत्वाचे असते. अन्यथा कुणीही त्याच्यावर मालकी हक्क सांगू शकतो. 1960 पासून आजपर्यंत उदयबाबांच्या नावावर कित्येक अजरामर गीते नोंद झालेली आहेत. आज साहित्य अकादमी पुरस्कार लाभलेल्या त्यांच्या ‘कर्णपर्व’ या नाटकाला गोवा कला अकदमीच्या नाट्यस्पर्धेत पुरस्कार लाभले होते. त्याचे इतरत्रही प्रयोग झाले होते व या वादग्रस्त नाट्यकृतीवर उलट-सुलट झालेही चर्चाही गाजली होती. नंतर हे नाटक चंद्रकांत केणी यांनी ‘ऋतू’ या नियतकालिकात प्रसिद्धही केले होते. उदयबाबांनी मायनिंग क्षेत्रातील अंधश्रद्धेवर आधारित आणखीन एक नाटक लिहिलेले आहे. शिवाय कविता व कथाही लिहिलेल्या आहेत. त्यातल्या सगळ्याच प्रसिद्ध झालेल्या नसतील. परंतु सादरीकरणाच्या कलेशी निगडित असलेली गीते व नाटके सादरीकरणाच्या माध्यमातून अधिकृतरित्या त्यांच्या नावे लोकांसमोर गेलेली आहेत. तेव्हा त्या साहित्यकृती ठरत नाहीत का? आपल्या गीतरचनेतून जगण्याचे तत्वज्ञान सांगणाऱ्या गुलजारना कवी मानायला तयार नसणारे साहित्यिक मी पाहिलेले आहेत. वृत्तपत्रातून वा मासिकातून प्रसिद्ध झालेले साहित्यसुद्धा अधिकृत साहित्य मानायला आपण कधीकधी तयार नसतो. हा सगळा अधिकृत दस्तावेज ठरत नाही का? केवळ पुस्तक आणि पुस्तकच हा साहित्यकृतीचा निकष ठरतो का?

या जगात स्वरांवर आधारित संगीताचा जन्म आधी झाला व त्यानंतर हजारो वर्षांनी, ख्रिस्तपूर्व 2000 सालात अक्षराचा जन्म झाला. तोपर्यंत भाषा तयार झाली होती परंतु अक्षरबद्ध केली जात नव्हती. त्यातूनच लोकवेदाची निर्मिती झाली व गीत, संवाद, नृत्य अशा कित्येक कलाप्रकारांतून ती सादरही झाली. वेद हा शब्दच मुळी ‘वद’ (बोलणे) यातून निर्माण झाला. आधी मर्यादित स्वरुपात वापरल्या जाणाऱ्या ब्राह्मी लिपीचा शोध लागला व त्यानंतर 2800 वर्षांनी, 800 व्या शतकात दक्षिण पूर्व आशियात उच्चारशास्त्रावर आधारित नागरी लिपीचा शोध लागला. छपाईचे तंत्रज्ञान 1452 साली उदयास आले आणि आशिया खंडातला पहिला छापखाना गोव्यात पोर्तुगिजांनी 1556 साली आणला. त्यानंतर कित्येक वर्षांनी भारतीय लिपीतील खिळे तयार झाले. तोपर्यंत बहुतांश भाषातील साहित्य छापायचे झाल्यास रोमी खिळ्यांच्याच आधारे छापले जायचे. रोमी लिपीतून. म्हणजे शब्दाचा इतिहास हजारो वर्षांचा, अक्षराचा इतिहास 4015 वर्षांचा तर छपाईचा इतिहास केवळ 450 वर्षांचा. तरीही हे छपाई तंत्रज्ञान आजच्या साहित्य विश्र्वावर अनभिषिक्त सत्ता गाजवीत आहे. त्यापूर्वीच्या सादरीकरणाच्या कलेतून साहित्य लोकांसमोर नेणाऱ्या सर्व माध्यमांना अक्षरशः ठोकरून. हे कितपत योग्य आहे?

आणि आज इलेक्ट्रोनिक तंत्रज्ञानामुळे परत एकदा सादरीकरणाची माध्यमे बळिष्ठ बनू लागलेली आहेत. परंतु भारतातील साहित्यविश्र्व त्यांची दखल घ्यायला तयार नाही. हल्ली विसाव्या शतकात रेडियो, ग्रामोफोन, चित्रपट, टेलिव्हिजन, टेप रेकॉर्डर, कॅसेट्स, सीडी, डीव्हीडी, एम्पी थ्री, एम्पी फोर, ईमेल असा सादरीकरणाच्या नवनवीन माध्यमांचा प्रवास अव्याहत चालूच आहे. त्यातून साहित्याचा प्रसार करायला आजकाल रेडियो आणि टीव्हीचीही गरज राहिलेली नाही. संगणक, टेब्लेट व मोबाईलद्वारे साहित्य अक्षरशः स्फोट करीत जनमानसामध्ये व पुनश्र्च एकदा अत्यंत परिणामकारकरित्या निरक्षरांमध्येसुद्धा रुजू लागलेले आहे. अक्षरांचीसुद्धा बंधने तोडून ऑडियो बूक्स कितीतरी पटींनी जास्त साहित्यरसिकांपाशी जाऊ लागलेले आहेत. भाषांची बंधने तोडून सर्जनशील साहित्यकृती ऑडियो-व्हिज्युअल माध्यमांतून जगभर फिरू लागलेली आहेत. छापखान्याचे तंत्रज्ञान दुय्यम ठरवून ई-बूक्स वाचनसंस्कृतीवर राज्य करू लागले आहेत. माहिती तंत्रज्ञानामुळे अवघ्या सेकंदात या साहित्यकृती संपूर्ण विश्र्वाला गवसणी घालून जातात. तरीसुद्धा केवळ पुस्तक म्हणजेच साहित्य हा अट्टाहास कितपत बरोबर? अर्थात, पुस्तकाचे महत्व आजही अनन्यसाधारणच आहे. पण म्हणून पुस्तक हाच एकमेव निकष साहित्याची अधिकृतता ठरविण्यासाठी लावणे कितपत योग्य आहे यावर साहित्यविश्र्वाने विचार करायची वेळ आलेली आहे. तो विचार साहित्य अकादमीनेही करावा आणि गोव्यातील साहित्याशी संबंधित अधिकृत संस्थांनीही करावा.

चला, राष्ट्रीय पातळीवरील एका नव्या साहित्य संस्कृतीची सुरवात गोव्यातून होऊ दे.

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

मला वाटतं या न्यायाने कोणी अत्यंतिक सुंदर व्याख्यान दिलं तर ते साहित्यात मोडतं ? साहित्य लिखितच असावं ? व्याख्या कशी करतो आपण त्यावरच सर्व अवलंबून असतं . लोककथा साहित्यच पण मग ते तोंडी उरलं तर ? ते कोणी संकलित केलं तर संकलित पुस्तक म्हणून पुरस्कार मिळतो!

- Anand Masur, Madgao | 21 st December 2015 22:09

 

Related Blogs