शिक्कामारू संस्कृती

By Sandesh Prabhudesai
25 October 2015 11:19 IST

का कोण जाणे, परंतु हल्लीच्या काळात प्रत्येक गोष्ट नेऊन राजकीय विचारसरणीशी जोडण्याची एक नवीन संस्कृती समाजात मूळ धरू लागलेली आहे. आता ही राजकीय विचारसरणी धोरणात्मक दृष्टीने असेल तर ती फारच चांगली गोष्ट आहे. आपला समाज हळूहळू प्रगल्भ होत चाललेला आहे आणि प्रत्येक गोष्टीचे विश्र्लेषण तो धोरणात्मक दृष्टिकोणातून करू लागलेला आहे असाच त्याचा अर्थ होतो. परंतु राजकीय विचारसरणी म्हणजे राजकीय पक्ष एवढीच जर त्या विचारांची धाव असेल तर मात्र ते चुकीचे सोडाच, अन्यायकारकही आहे. दुर्दैवाने छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या प्रश्र्नांपर्यंत सध्या हाच दृष्टिकोण दिसतो आहे. उदाहरणादाखलच घ्यायचे झाल्यास साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करण्याच्या प्रकारांवरील प्रतिक्रिया घेऊया. हे पुरस्कार परत करणारे साहित्यिक कोणा राजकीय पक्षाचे समर्थक नव्हते आणि एका भागातीलही नव्हते. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्र्चिमेपर्यंत पसरलेल्या विविध भाषांतील एकामेकांना वैयक्तिक पातळीवर ओळखतही नसलेल्या या विद्वान साहित्यिकांनी निषेध म्हणून लागोपाठ पुरस्कार परत केले. तर लगेच त्यांच्यावर शिक्कामोर्तब सुरू झाले. हे सर्व काँग्रेसवाले आहेत. हे काँग्रेसचे कटकारस्थान आहे.

डॉ नरेन्द्र दाभोळकर, कॉ गोविंद पानसरे आणि प्रा एम् एम् कलबुर्गी या तीन लेखकांच्या गोळ्या घालून हत्या करण्यात आल्या. जात्यातले भरडले जातात तेव्हा सुपातले केवळ हसतच असतात असे नव्हे, परंतु अस्वस्थ होत असले तरी गप्प असतात. त्यांच्या लेखनातून ते व्यक्तही होत असतात. आपापल्या सर्जनशील पद्धतीने. आपापल्या साहित्यिक माध्यमातून. तेच तर त्यांचे खरे भाष्य असते. परंतु निर्भिडपणे आपले विचार मांडणाऱ्या लेखकांनाच मारले जाऊ लागले आणि इतर लेखकांना धमक्या देण्याचे सत्र वाढू लागले. अस्वस्थता वाढू लागली. कलबुर्गी हे साहित्य अकादमीच्या सर्वसाधारण मंडळाचे सदस्य होते. त्यांच्या शोकसभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, परंतु त्यांच्या हत्येचा साधा निषेधही झाला नाही तेव्हा तर ही अस्वस्थता शिगेला पोहोचली. त्याचाच स्फोट पुरस्कार परत करण्याच्या प्रतिक्रियेतून झाला. असे म्हणून पुरस्कार परत करणे हीच एकमेव निषेधाची तह्रा असावी असेही काही नाही आणि पुरस्कार परत करणे म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्र्वभूमीवर नरेन्द्र मोदींवर शरसंधान करणे असेही नव्हे. संवेदनशील साहित्यिक आजूबाजूला घडणाऱ्या सगळयाच घटनांमुळे व्यथित होतो. कोण पुरस्कार परत करतो तर कोणी निषेधाचा आवाज उठवतो. पण म्हणून ते काँग्रेसवाले का?

यातील कित्येक लेखक हे आपल्या लोकशाही व्यवस्थेतील अलोकशाही गोष्टींवर सातत्याने लिखाण करणारे आहेत. त्यांचे साहित्य हा त्याचा खणखणीत पुरावा आहे. कोणता पक्ष सत्तेवर आहे ते लक्षात घेऊन लेखन करणे हा त्यांचा पिंडच नव्हे. कारण जातिवंत साहित्यिक राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांच्या पलिकडे जाऊन साहित्य निर्मिती करीत असतो. म्हणूनच तर त्यांच्या साहित्यकृती अजरामर होतात वा कोणत्याही प्रकारची ‘...शाही’ असली तरी त्या चिरंजीव राहतात. कारण त्यांचे विचार हे राजकीय पक्षांच्या सोडाच, परंतु राजकीय व्यवस्थेच्याही पलिकडे जाऊन मानवी संवेदनांना हात घालणाऱ्या असतात.

पूर्वीच्या काळात या सर्व प्रकारच्या साहित्यकृतींचा आपण आदर करायचो. आपल्या मनाला पटले नाही तरी तो विचार मांडण्याचे लेखकाचे स्वातंत्र्य मान्य करायचो. या विचारांना विरोध करणारेही मग त्यावर आपले विचार मांडायचो. त्यावर चर्चा करायचो, लिहायचो, वादावादी करायचो, परंतु सगळे काही लोकशाही मार्गाने. अलोकशाही मार्गाने जाऊन विरोधी विचार मांडणाऱ्यांच्या हत्या करण्याचे असे प्रकार कधी झाले नाहीत. आणि त्यांच्या हत्यांचा निषेध केला तर त्यांच्यावर विरोधी राजकीय पक्षांचे शिक्कामोर्तबही कधी झाले नाही. परंतु आता ते सर्रास होताना दिसते. काँग्रेसच्या अमदानीत विरोध केला तर त्याला भाजपावाला म्हणायचे आणि भाजपाच्या सत्ताकाळात झाला तर काँग्रेसवाला. जणू काही भाजपा आणि काँग्रेस सोडून (कधी कधी कम्युनिस्टही) या जगात आणखी काहीच अस्तित्वात नाहीच. स्वतंत्र विचार करण्याची तर जणू काही कुणाची क्षमताच नाही. सगळे साहित्यिक हे कुणा ना कुणा पक्षाच्या दावणीलाच बांधलेले असतात हीच ठाम धारणा.

या नवसंस्कृतीत आणखीनही एक मजेशीर गोष्ट आहे. दुसऱ्यांना हे पक्षांचे लेबलिंग करताना आपण कसे स्वतंत्र विचारांचे आहोत ते मात्र आवर्जून सांगायचे. याचाच अर्थ आपण तेवढे स्वतंत्र विचारांचे ‘बांगर बैल’, इतर मात्र सगळी पक्षांच्या दावणीला बांधलेली लाचार गुरे. आपण तेवढे प्रामाणिक, इतर सर्व पक्षपाती, लाचार, अप्रामाणिक, ढोंगी, संधीसाधू वगैरे वगैरे. आणि हे फक्त साहित्यिकांच्याच बाबतीत आहे असे काही नाही. पत्रकार, कलाकार, सरकारी नोकर वा अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता आणि नुसते आपले प्रामाणिक मत व्यक्त करणारा सामान्य नागरिकसुद्धा. आपणापेक्षा वेगळे मत व्यक्त केले की सरळ जाऊन त्याच्या छाताडावरच पक्षाचा शिक्का मारायचा आणि मोकळे व्हायचे. कॉल द डॉग मॅड अँड शूट हिम. जसे काही या दोन-तीन पक्षांशिवाय या जगात दुसरे काहीच अस्तित्वात नाही.  लोकशाहीवादी विचार नाही, मानवतावादी भावना नाही, सारासार विचार करण्याची पद्धत नाही, विवेकवादी विचारसरणी नाही, वैज्ञानिक दृष्टिकोण नाही – आहे ती केवळ दोन-तीन पक्षांना असलेली निष्ठा. आधी आपण आपली निष्ठा वस्तुनिष्ठ (ऑबजेक्टिव्ह) न ठेवता व्यक्तिनिष्ठ (सबजेक्टिव्ह) बनवायची आणि आंधळे पक्षनिष्ठ व्हायचे. मग नंतर त्या पक्षाची सत्ता चालू असताना घडणाऱ्या अन्यायकारक गोष्टींविरुद्ध कुणी आवाज काढला की त्यांना विरोधी पक्षांचे पक्षनिष्ठ ठरवायचे. कदाचित आपण जसे आंधळे पक्षनिष्ठ तसेच इतरही असणार या गैरसमजुतीतूनही हे होत असेल की काय कोण जाणे.


हा प्रश्र्न एवढ्यावरच संपत नाही. आपणाशी नसणारा दुसऱ्याचा विचार ऐकून घ्यायचा, सजमून घ्यायचा, मानवतावादाच्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोणाच्या सहाणीवर घासून त्याची शहानिशा करायची ही खरी शास्त्रशुद्ध पद्धत. ती राहिली दूरच, परंतु दुसऱ्याच्या प्रामाणिक भावनांविषयीसुद्धा शंका व्यक्त करणारी संशयी वृत्तीही आताशा दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसते. आपणाला आजकाल दुसऱ्यांविषयी विश्र्वास वाटत नाही, संशयच जास्त येतो. मग ते आपले सहकारी असोत, सवंगडी असोत, आप्तेष्ट असोत वा कुटुंबियसुद्धा असोत. सर्वांकडेच संशयाने पहाण्याची वृत्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसते. त्यामुळे आपण कुणाच्याच जवळ जाऊ शकत नाही. सर्वांनीच आपणासभोवती अदृष्य कुंपणे घालून घेतलेली आहेत. त्यामुळे सगळीच नाती कृत्रिम बनायला लागलीत. नात्यांतला ओलावा हळूहळू आटत चाललाय. आणि हा ओलावा दाखवणारे मूर्ख ठरायला लागलेत. समाज आजकाल त्यांनाच दूर ठेवायला लागलाय. स्वतःचे इप्सित साध्य करून घेण्यासाठी तेवढे नाते जमवायचे. कार्यभाग सिद्ध झाला की नातेही संपले. सगळाच निर्विकार कारभार. आपण स्वतः प्रामाणिक नाही म्हणून आपणाला दुसऱ्याच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका येतेय? की सगळा समाजच व्यवहारी बनत चाललाय म्हणून ही संशयी वृत्ती बळावत चाललीय? आणि या वातावरणातून समाजातील सख्य वाढायला लागलेय की आपण सर्वच एकामेकांपासून दूर दूर चाललोय? आणि भावनिक सख्य जोडायला धडपडणारे परग्रहावरचे ‘पीके’ होत चाललेत?

‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ ही म्हण आता आपण ‘उचलली जीभ लावली गैरवृत्तीला’ अशीशी काही केली तर? कारण जी गोष्ट आपल्या विचारांशी जुळत नाही ती गोष्ट करणारा माणूस हा गैरवृत्तीचाच असला पाहिजे अशीच भावना आजकाल दृढ होत चाललेली आहे. त्याच्या अध्येमध्ये दुसरे आणखीन काही असूच शकत नाही. म्हणूनच मग आपण त्यांना कधी पक्षांची लेबले चिकटवतो, कधी जात-पात-धर्माची तर कधी स्वार्थ-भ्रष्टाचार वगैरेंची. त्याने असे केले तो या जातीचा म्हणून वा त्या धर्माचा म्हणून, वा त्याचा त्यात अंतस्थ हेतू वेगळाच आहे म्हणून वा तो भ्रष्टाचारी आहे म्हणूनच. आणि परत – हे सर्व करताना आपण तेवढे एकच धुतल्या तांदळासारखे स्वच्छ, निस्वार्थी, सॅक्युलर, निष्पक्ष वगैरे वगैरे सदगुणांचे पुतळे. इतर सर्व एक तर दुर्गुणी आणि दुर्जनसुद्धा. तसा सगळा समाज सदगुणांनी भरलेला निस्वार्थाचा पुतळा आहे असे काही नव्हे. पण म्हणून आपण सोडून इतर सगळे दुर्जन हीही भावना कितपत बरोबर? आणि तसे असते तर एव्हाना या समाजात बजबजपुरी माजली नसती का? केवळ अशांतता नांदली नसती का? अराजकता माजली नसती का? परंतु सुदैवाने अजून इथे लोकशाही आहे आणि तिचे संरक्षण करणारे मानवी मूल्यांचे संविधानही आहे. ठेवायचीच असेल निष्ठा तर या संविधानावर ठेवुया आणि मानवी दृष्टिकोणातून सगळ्या गोष्टींकेड पाहुया. कसलाही किंतु मनात न बाळगता खुल्या मनाने दुसऱ्यांच्या कृतींकडे पाहुया. कारण आपणच आपणाभोवती बांधलेली ही अदृष्य कुंपणे मोडण्याची ताकद केवळ याच दृष्टिकोणात आहे. कुंपणे उभारण्याच्या मनोवृत्तीत तर खचितच नव्हे.

(हा लेख लोकमत गोवा आवृत्तीच्या 25ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाला)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

पूर्वीच्या काळात या सर्व प्रकारच्या साहित्यकृतींचा आपण आदर करायचो. आपल्या मनाला पटले नाही तरी तो विचार मांडण्याचे लेखकाचे स्वातंत्र्य मान्य करायचो.

Really? How about Vijay Tendulkar and his writings? How about Salman Rushdie who had to run away from India.

- Madhav, Goa | 27 th October 2015 19:02

 

'Trust but Verify'-- Ronald Regan

So there is nothing bad to feel suspicious of other peoples activities. It is a sign of changing times, accept it.

You never know who can stab you in the back--it may be your close one!

- Rajeev kamat, UAE | 26 th October 2015 18:15

 

Related Blogs