जुने आणि नवे

By Sandesh Prabhudesai
04 October 2015 10:01 IST

जुने ते सगळेच सोने नसते. तसे असते तर नव्याचे पितळ उघडे पडले असते. उलट नवे आल्यावर जुने इतिहासजमा झाले. त्याची कार्यप्रवणता मावळली. त्या नव्याची नवलाईही जास्त काळ टिकली नाही. कारण त्यानंतर त्याहून नवे आले आणि नवे होते ते जुने झाले. लोक या नव्यांचा स्वीकार करीत गेले. कारण या नव्याने जीवन पूर्वीपेक्षा आणखीन सुखकर बनले. अजूनही बनत आहे. आणि या बदलांना कारणीभूत आहे विज्ञान. निसर्गातील भौतिकतेचा शोध घेत नवनवीन वैज्ञानिक समीकरणे रचली जात आहेत आणि त्यावर आधारित नव्यांचा शोध लावीत जगात क्रांतीचे नवनवीन टप्पे गाठले जात आहेत. ही क्रांती वेगवेगळ्या क्षेत्रात जरी घडत असली तरी तिचा थेट संबंध केवळ एकाच गोष्टीशी आहे. मानवी जीवन. आणि ही क्रांती केवळ भौतिक सुखांशी निगडित नाही. एकूणच माणसाचे जीवन बंदिवासातून मुक्त करून स्वतंत्र बनविण्यात या क्रांतीने फार मोठा हातभार लावलेला आहे. आर्थिक स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य आणि मानसिक स्वातंत्र्यसुद्धा. माणसाला स्वावलंबी, स्वाभिमानी आणि आत्मविश्र्वासी बनविण्यात या नव्याचा फार मोठा मोलाचा वाटा आहे.

उदाहरणादाखलच घ्यायचे झाल्यास इंटरनेट आणि मोबाइलचा विचार करा. केवढी मोठी क्रांती केली या दोन वैज्ञानिक शोधांनी? यावर आधारित उत्पादने बाजारात विकताना एका कंपनीने तर यामुळे मानवी जीवनावर झालेल्या परिणामांचा अचूक वेध घेणारी घोषणाच बाजारात आणली – “कर लो दुनिया मुठ्ठीमे”. संपूर्ण जग सामान्यातील सामान्य माणसाच्या मुठीत आणणारी ही क्रांती होती. एवढे मोठे जगसुद्धा छोटे बनवणारी ग्लोबल व्हिलेजची संकल्पना यातूनच जन्माला आली. एखाद्या छोट्याशा कामासाठीसुद्धा प्रत्यक्ष भेटण्याऐवजी वा पोचायला कित्येक दिवस लागणाऱ्या पत्रांऐवजी फोनवरील प्रत्यक्ष बोलणी, ईमेल, एसएसएस अशा गोष्टींतून कामांचा वेग प्रचंड वाढला. आज कोणत्याही गोष्टीचे संदर्भ शोधण्यासाठी वा खातरजमा करण्यासाठी आपण आधी वेबसाईटवर जातो वा गूगलचा आधार घेतो. बरीचशी कामे क्षणार्धात होऊन जातातही. अर्थात, अशा उपकरणांचा वा सुविधांचा गैरफायदाही घेणाऱ्या वृत्ती-प्रवृत्ती समाजात असतातच. पण त्यांच्या प्रमाणात या नव्यांचा फायदा कितीतरी पटींनी जास्त आहे हे कुणीही प्रांजळपणे कबूल करेल.

या नव्या बदलांतून नवीन आव्हाने आमच्या नवीन पिढीसमोर उभी राहिली आहेत. कारण आजची तरुण पिढी डिजिटल युगात वाढते आहे. चाळीशी वा पन्नाशी पार केलेली पिढी आणि तिशीच्या घरातली पिढी यांच्या मानसिकतेत जमीन-अस्मानाचा फरक जाणवत आहे. लहान मुलांची नवीन पिढी तर पूर्णतया डिजिटल मानसिकतेत वाढते आहे. त्या तुलनेत त्यांना शाळेत मिळणारे शिक्षण कितीतरी दशके मागे आहे. पूर्वी नव्याची माहिती मिळण्याचे आमचे एकमेव साधन होते ते शाळेतील पाठ्यपुस्तके, वाचनालयातील पुस्तके, वृत्तपत्रे व मासिके. वैज्ञानिक प्रगतीतील उपकरणे म्हणजे जास्तीत जास्त रेडियो व मर्यादित चॅनलांचा टेलिव्हिजन. आज जगात कुठे काय घडतेय व त्यातल्या त्यात नवीन काय घडतेय हे जाणून घेण्यासाठी नवीन पिढी मात्र या पाठ्यपुस्तकांवर वा वृत्तपत्रांवरही अवलंबून नाही आणि रेडियो वा टेलिव्हिजनवरही. त्याहूनही जास्त माहिती देणाऱ्या इंटरनेटवरील वेबसाईट्स; गूगलसारखी शोधयंत्रे; फेसबूक, ट्विटर, गूगल् प्लस, इन्स्टाग्राम, यू ट्यूब अशी सर्व बाजूंनी माहितीचा पाऊस पाडणारी सोशल मिडिया; आत्ता घडलेली घटना व्हिडियो शूट करून क्षणार्धात जगभर पोचवणारे व्हॉट्स ऍप अशा एक ना अनेक गोष्टी. या पार्श्र्वभूमीवर शाळेतील पाठ्यपुस्तकांतली माहिती अगदीच जुजबी आणि त्यांची उत्तरे प्रश्र्नपत्रिकेत लिहून गुण मिळविणे म्हणजे तर जाम कंटाळा. ही उत्तरे अचूक लिहिणाऱ्याला हुशार म्हणणे म्हणजे तर अक्षरशः विनोद.

 

पालक झालेली पिढी आणि शाळा-कॉलेजातून शिकणारी पिढी यांच्यामध्ये आज एक डिजिटलाइज्ड पडदा आहे. तो पडदा भेदून जे पालक पुढे जातात तेच आपल्या मुलांची मानसिकता ओळखू शकतात. ज्यांना हे जमत नाही व त्यासाठी प्रयत्नही करत नाहीत त्यांना वाटते ही नवी पिढी डिजिटलाइज्ड युगात बरबाद होत आहे. नवनव्या गॅजेट्समध्ये आपला वेळ वाया घालवत आहे. शिक्षकांचीही तीच परिस्थिती. बऱ्याच ठिकाणी शिक्षकांपेक्षा विद्यार्थ्यांना जास्त माहिती असते. अशा वेळी अवघेच काही शिक्षक त्यांच्या या ज्ञानाचे कौतुक करतात तर काही शिक्षक ‘हुषारी दाखवणाऱ्या’ (?) विद्यार्थ्यांवर डूख धरून त्यांचे मानसिक खच्चीकरण करतात. स्वतःची न वाढणारी काडी लांब ठेवण्यासाठी नव्या पिढीच्या काड्या छोट्या करून आपली प्रतिष्ठा टिकवून ठेवण्याची वायफळ धडपड करतात. आज मुलांना माहिती देणाऱ्या शिक्षणाची गरज नाही. त्यांना आधीच ठाऊक असलेल्या माहितीचा वापर करून त्यांच्या एकूणच ज्ञानात भर टाकणाऱ्या शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी प्रॅक्टिकल्स, असायनमेंट, विश्र्लेषणे, प्रॉजेक्ट, फिल्ड ट्रिप अशा कित्येक माध्यमातून त्यांची ज्ञानवृद्धी करण्याची खरी गरज आहे. परंतु शिक्षणाच्या या नव्या पद्धतींचा स्वीकार करण्याची गरज अवघ्याच काही शिक्षकांना जाणवतेय तर बाकी सर्व शिक्षक या नव्या पद्धतींच्या नावे बोटे मोडण्यातच धन्यता मानतात.

आठवीपर्यंत कुणीही विद्यार्थी नापास होणार नाही ही पद्धत रद्द करा म्हणून मागणी करण्यामागील मानसिकताही हीच. कोणताही माणूस नापास असूच शकत नाही हे मानायला कालची पिढी तयारच नाही. कारण ते पास-नापास संस्कृतीतले. नापास होणार नाहीत तर मग पास होणाऱ्यांना महत्व कसे येणार? आणि शिक्षण म्हणजे काय? पास होणे. मग चांगल्या वर्गात पास होणे. मग डिस्टिंक्शनमध्ये पास होणे. मग पहिल्या दहांमध्ये येणे. आणि मग पहिल्या तीनांमध्ये. केवळ गुणांवर गुणवंत होण्याचे दिवस संपले हे मानायलाच आजची वयस्क झालेली शिक्षक व पालकांची पिढी तयार नाही. कुणीही नापास होणार नाही अशा जिद्दीने शिकवण्याची त्यांची तयारी नाही. अमक्या टक्केवारीखाली गुण मिळविणारे विद्यार्थी कुचकामी असतात असे मानणारी ही जुनी पिढी. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही कौशल्य असतेच आणि त्या कौशल्याचा वापर करून ते आयुष्यात आपले प्राविण्य दाखवीत आत्मविश्र्वासाने जगू शकतात ही नवी संकल्पना त्यांना ठाऊकच नसते. म्हणूनच सासत्यपूर्ण व्यापक मुल्यांकन (कंटिन्युअस कॉम्प्रिएन्सिव्ह असेसमेण्ट) ही नवीन शिक्षणपद्धती ते सरळ नाकारतात. ती स्वीकारून मुलांमध्ये आत्मविश्र्वास निर्माण करण्याची शिक्षकांचीही तयारी नसते आणि पालकांचीही. म्हणूनच आज ही मुल्यांकन पद्धती सुधारण्यापेक्षा ती रद्द करा हीच मागणी दुर्दैवाने जास्त जोर धरू लागलेली आहे.

तीच गत शालेय मुलांना टेब्लेट देण्याच्या योजनेची. डिजिटलाइज्ड मानसिकतेच्या पिढीला टेब्लेट दिली तर त्यांची कित्येक कामे सोपी होऊन जातील हे कुणी लक्षातच घेत नाही. एरव्ही आपण घेतलेला स्मार्ट फोन कसा वापरावा हे आम्हाला आमची मुलेच शिकवतात. त्यांचे आपण कौतुकही करतो. परंतु तशीच टेब्लेट त्यांना दिली तर त्यांचेही काम सोपे होऊन जाईल हे मात्र आपण मान्य करायलाच तयार नाही. आपणाला त्यातले काही कळत नाही म्हणून मुले मग या टेब्लेटचा वापर केवळ गेम्स खेळण्यासाठी वा फेसबूक वा इन्स्टाग्रामसाठी वापरतात. अशा वेळी आपणही त्याचा वापर शिकून घेऊन त्यांच्यावर लक्ष ठेवुया ही आपली मानसीक तयारीच नाहीय. या छोट्याशा टेब्लेटमध्ये मुलांची सगळी पाठ्यपुस्तके जाऊ शकतात व त्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होऊ शकते हेही आपण समजून घेत नाही. त्याच टेब्लेटमध्ये शैक्षणिक गेम्स आहेत, डिक्शनरी आहे, कित्येक विषयाची व्हिडियो प्रात्यक्षिके आहेत आणि ती आपल्या मुलांच्या ज्ञानात कितीतरी पटींनी भर घालू शकतात हे तर आपणाला ठाऊकच नाही. म्हणूनच मुलांचा वेळ वाया घालवणाऱ्या या टेब्लेट्स बंद करा अशी अभूतपूर्व मागणी सध्या साक्षरतेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गोव्यातील पालकांनी आणि शिक्षकांनी केलेली आहे. आणि स्वतः प्राचार्य असलेल्या मुख्यमंत्र्यांनी तत्वतः ती मान्य करून सध्या टेब्लेट देणे बंदही केलेले आहे. या एका टेब्लेटमधून मुलांच्या ज्ञानात कितीतरी पटींनी जास्त भर घालण्याचे मार्ग शोधण्याऐवजी ही टेब्लेट योजना बंद करून आपण या डिजिटलाइज्ड पिढींची वाढ खुंटवतो आहोत हेही आपल्या लक्षात आलेले नाही.

हाच तो जुने आणि नवे यांच्यातला संघर्ष. जुन्याच्या नावे बोटे मोडायची आणि आपल्या अज्ञानामुळे नव्याला नाकारायचे अशा विचित्र परिस्थितीत गोव्याची शिक्षणव्यवस्था हाती आलेली संधी सध्या हातोहात वाया घालवीत आहे. या नव्याचा स्वीकार केला तर ज्ञानार्जानाच्या (केवळ माहिती मिळवण्याच्या नव्हे) उंबरठ्यावर येऊन उभ्या असलेल्या पिढ्या कुठच्या कुठे पोचतील. कदाचित डिजिटलाइज्ड संस्कृतीतून शिक्षणक्षेत्रात नवीन क्रांती घ़डविण्याच्या प्रक्रियेचा भारतातील श्रीगणेशा गोव्यातून सुरू होऊ शकतो. साक्षर असलेल्या छोट्या राज्याचा हा फार मोठा फायदा आहे. पण त्या राज्याहून छोटी आणि संकुचित अशी आपली मानसिकता आपण तशीच ठेवली तर मात्र हीही संधी आपण वाया घालवू. एका नव्या शिक्षणसंस्कृतीला मुकू. जुन्याच्या अज्ञानी हव्यासापाई.

(हा लेख लोकमत गोवा आवृत्तीच्या 4 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाला)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs