विकृत राजकीय संस्कृती

By Sandesh Prabhudesai
13 September 2015 14:06 IST

डॉ विल्फ्रेड डिसोझा यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले आणि सर्वच थरातून एकच प्रतिक्रिया आली – एका पर्वाचा अंत! हे असे म्हणण्याची एक पद्धत आहे. प्रत्येक माणूस जाणार तेव्हा एक एक पर्व कसे काय संपणार? परंतु डॉ विलींच्या बाबतीत तसे नव्हते. खरोखरच तो एका पर्वाचा अंत वाटला. जेव्हा सध्याचे पर्व पूर्वीच्या पर्वापेक्षा वेगळे असते तेव्हाच ही अशी भावना आपल्या मनात तयार होते. विली यांनी बाबू नायकांसमवेत केवळ ख्रिश्र्चनांचा म्हणून शिक्का असलेला युनायटेड गोवन्स पक्षाचा एक गट नेऊन राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन केला होता. डॉ जॅक सिक्वेरांचा गट जनता पक्षामध्ये विलीन झाला होता. आणिबाणीच्या पार्श्र्वभूमीवरील ही घटना होती. त्यातून 1977 च्या निवडणुकीत काँग्रेसने भरघोस यश मिळवले तर लगेचच झालेल्या 1979 च्या निवडणुकीत मगोची 17 वर्षांची सत्ता संपवून राष्ट्रीय पक्षाच्या सत्तेचे नवे पर्व सुरू केले. तरीही डॉ विलींना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही. बाबू-विलींच्या भांडणात प्रतापसिंग राणेंचा लाभ झाला आणि त्यांनी सतत 10 वर्षे गोव्यावर सत्ता गाजवली. या राजकारणात विलींनी काँग्रेसवर आपले वर्चस्व टिकविण्यासाठी धार्मिक कार्डाचा वापर केला व गोव्यातील ख्रिश्र्चनांचे पुढारी अशीच त्यांची प्रतिमा शेवटपर्यंत राहिली.

परंतु प्रत्यक्षात व्यक्तिगत पातळीवर हा माणूस धर्मांध अजिबात नव्हता. राजकारणातील त्यांच्या खेळी धार्मिक पातळीवरील असल्या तरीसुद्धा. मुसलमानांसाठी वेगळे राष्ट्र मागणारे बॅरिस्टर जिना जसे वैयक्तिक जीवनात धार्मिक सोडाच, नास्तिक होते तसाच काहीसा प्रकार. त्यामुळे ते सत्तेवर आल्यावर आता ख्रिश्र्चनांचे राज्य आले अशी भावना जरी तयार झाली तरी प्रत्यक्षात राज्यकारभारात ती उतरली नाही. त्यांचे राजकीय सल्लागार, निकटची राजकीय मित्रमंडळी आणि प्रशासनातील त्यांच्या विश्र्वासातील अधिकाऱ्यांमध्ये सर्वधर्मियांचाच भरणा अधिक होता. जात वा धर्मापेक्षा कार्यक्षमतेवर जास्त भर देणारा हा कुशल प्रशासक होता. दिलदार होता. खुल्या मनाचा होता. त्यांचे दिलखुलास हसू अजून डोळ्यासमोरून जात नाही. विरोधकांवर तुटून पडणाऱ्या या खतरनाक राजकारण्याने ही दुष्मनी वैयक्तिक पातळीवर कधीच बाळगली नाही. त्यामुळेच त्यांचे विरोधकसुद्धा त्यांच्याकडे सदोदित आदरभावनेनेच पहात होते. विली हा तेवढाच हाडाचा डॉक्टर होता. मुख्यमंत्री असतानासुद्धा आणिबाणीच्या प्रसंगी भर मध्यरात्री जाऊन शस्त्रक्रिया करणारा जातिवंत सर्जन. आपल्या सामाजिक पतप्रतिष्ठेपेक्षा मन मोठे असणारा माणूसच हे करू शकतो.

डॉ विलींच्या पिढीची राजकीय संस्कृतीच वेगळी होती. ही संस्कृती आपणाला गोव्यासारख्या छोट्याशा राज्यात पहायला मिळायची आणि राष्ट्रीय पातळीवरही. पी नरसिंह राव प्रधानमंत्री आणि अटलबिहारी वाजपेयी विरोधी पक्ष नेते असताना संसदेत एकामेकांवर अक्षरशः तुटून पडत आणि रोज सकाळी सोबतच हसत खेळत मॉर्निंग वॉकला जात. दोघेही जेवढे बुद्धिमान तेवढेच खुल्या दिलाचे राजकारणी होते. भाऊसाहेब बांदोडकर आणि डॉ जॅक सिक्वेरा यांच्याही दोस्तीच्या अशा काही सुरस कथा कधीकधी ऐकायला मिळतात. तसा एक प्रसंग आमच्या पिढीनेही 1992 मध्ये गोवा विधानसभेत पाहिलेला आहे. गोव्यासाठी स्वतःचे उच्च न्यायालय हवे या विषयावर मगोचे डॉ काशिनाथ जल्मी आणि युगोडेपाचे राधाराव ग्रासियस एकामेकांवर असेच तुटून पडले होते. एका क्षणी जल्मींना राग एवढा अनावर झाला की त्यांनी भावनेच्या भरात हातातील पिन बॉक्स राधारावांवर भिरकावून मारले. ते बरोबर नाकावर आपटून राधारावांच्या नाकातून रक्त वहायला लागले. सभापतींनी विधानसभा तहकूब केली व ते राधारावांना घेऊन आपल्या केबिनमध्ये गेले. त्यांच्या पाठोपाठ धावले ते डॉ जल्मी. आम्ही पत्रकार आत जाऊन पहातो तो काय? डॉ जल्मी राधारावांना धरून व स़ॉरी सॉरी म्हणत ढसाढसा रडत आहेत तर राधाराव एका हाताने नाकातून वहाणारे रक्त पुशीत दुसऱ्या हाताने जल्मींचे सांत्वन करीत आहेत. ही ती विली पर्वाची संस्कृती!

 

गोव्याच्या राजकारणातून दुर्दैवाने ही संस्कृती हळूहळू लयाला जात आहे. वरवर भांडणारी परंतु आतून एकामेकांविषयी जिव्हाळा असणारी ती तेव्हाची पिढी, तर वरवर एकामेकांशी हसत खेळत वागणारी परंतु आतून एकामेकांचा काटा काढण्याचे मांडे रचणारी आजची पिढी. राजकीय दुष्मनी सूडबुद्धीवर नेणारी नवसंस्कृती. त्या काळी सूडबुद्धीने वागणारे राजकारणी नव्हते असे नव्हे. होते. परंतु ते अल्पसंख्य होते. आणि ती सरसकट संस्कृती बनली नव्हती. आजही राजकीय वैर वैयक्तिक पातळीवर आणल्याशिवाय राजकारण करणारे राजकारणी नाहीत असे नव्हे. निश्र्चितच आहेत. परंतु आतल्या गाठीची सूडबुद्धी ही हळूहळू राजकीय संस्कृती बनू लागलेली आहे. आपल्या प्रमुख राजकीय वैऱ्याला सोडाच, परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांनासुद्धा आपल्या बाजूला वळवून घेण्यासाठी त्यांच्या सग्यासोयऱ्यांच्यासुद्धा दूरदूर बदल्या करायच्या, त्यांच्या आस्थापनांवर उगाचच धाडी घालायच्या, त्यांच्यामागे चौकशी सत्र लावायचे, त्यांच्याबद्दल खोट्यानाट्या अफवा पसरवून त्यांना सामाजिकदृष्ट्या बदनाम करायचे अशा प्रकारांतून दहशतीचे वातावरण तयार करण्याची एक राजकीय संस्कृती मूळ धरू लागलेली आहे. आणि ही केवळ एका पक्षापुरती मर्यादित नाही. सर्वच पक्षांमध्ये ती व्हायरस कशी पसरत चाललेली आहे.

वैचारीक राजकारण हळूहळू लोप पावत चाललेले आहे. कॉल द डॉग मॅड अँड शूट हिम (ऑर हर) ही संस्कृती पुढाऱ्यांकडून कार्यकर्त्यांमध्ये पसरू लागलेली आहे. एखादा राजकीय पुढारी आपला वैचारीक विरोधक असला तर त्याच्या सद्गुणांमध्येसुद्धा खोट शोधायची आणि त्याची शक्य असेल तेवढी वाईट प्रतिमा तयार करीत फिरायचे हा जणू आता राजकीय धंदाच बनलेला आहे. विरोधकांच्या सद्गुणांचे कौतुक करून त्याच्या राजकीय दोषांवर तुटून पडण्याचे धाडस कुणामध्ये आता राहिलेच नाही की काय असा प्रश्र्न निर्माण होण्यासारखी परिस्थिती सभोवताली दिसत आहेत. आणि केवळ बदमानी, अवहेलना आणि खिल्ली उडवण्यासाठी सोशल मिडियातील नवनवीन माध्यमांचा तर सर्रास वापर केला जात आहे. गंभीर विषयांवरील लिखाणापेक्षा ही खिल्लीवजा लिखाणे वा चित्रे जास्त मिटक्या मारून फॉरवर्ड करण्याची प्रवृती एकूणच जनमानसामध्ये मूळ धरू लागलेली आहे. प्रत्यक्षात ही प्रवृत्ती नव्हे, तर विकृती आहे. परंतु ही विकृती संस्कृती बनू लागलेली आहे. आणि यालाच राजकारण म्हणतात असेच नव्या पिढीला वाटत आहे. तीच प्रवृत्ती मग सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक व वैयक्तिक जीवनामध्येसुद्धा परावर्तित होऊ लागलेली आहे. त्यामुळे संपूर्ण समाजाचीच संस्कृती गढूळ बनत चाललेली आहे.

अर्थात, या संस्कृतीचा फायदा अल्पकालीन असतो. दहशत, दबाव, विनाकारण मानहानी वा बदनामी यांचा वापर आजपर्यंत दीर्घकाळासाठी कधीच फायद्याचा ठरलेला नाही. ही संस्कृतीच समाजातील असंतोषाची जनक असते. त्यातूनच मग बंड, उठाव, क्रांती अशा विविध स्वरुपात प्रतिक्रिया उमटतात. त्यातून या दहशतवादी संस्कृती चालकांना धूळ चारली जाते. हा जगाचा इतिहास आहे. जिथे लोकशाही नाही तिथे तो बंड वा क्रांतीच्या स्वरुपात परावर्तित होतो. जिथे लोकशाही आहे तिथे जनक्षोभ आणि शांतपणे मतदानातून परिवर्तित होतो. आताशा मतदानाचे सामर्थ्य जनमानसाला पुरते समजले आहे. तेव्हा जनताही पाच वर्षांसाठी ही दहशत आणि ही विनाकारण मानहानी वा बदनामी सोसून घेते आणि शांतपणे मतदानातून या सांस्कृतीक दहशतवाद्यांना सहजगत्या उलथून पाडते. ही लोकशाहीची ताकद आहे. तेव्हा या नवसंस्कृतीच्या आहारी जाणाऱ्या राजकारण्यांनी या इतिहासातून शिकायचे की आपणहून आपला खड्डा खणायचा हे त्यांनी ठरवायचे आहे. परंतु या संस्कृतीमुळे समाजातील एकूणच वातावरण दूषित बनत चालले आहे ही जास्त खेदाची गोष्ट आहे. ती समाजाच्या उन्नतीसाठी घातक आहे हे तर निश्र्चित.

म्हणूनच डॉ विली गेले तेव्हा वाटले, एका पर्वाचा अस्त होतोय. तो होऊ नये एवढीच इच्छा. कारण राजकारणी केवळ सत्ता पटकावणारे स्वार्थी व भ्रष्टाचारी कोल्हे नसतात. समाज त्यांना फॉलो करतो. त्यातून सामाजिक संस्कृती तयार होते. ती मग आपल्या दैनंदिन जीवनात सगळीकडे आपणा सर्वांनाच विळखा घालून बसते. भयानक असली तर मग ड्रॅगनसारखी आपणा सर्वांनाच गिळंकृत करून टाकते. परंतु मानवतावादी, खुल्या दिलाची, मोठ्या मनाची आणि वस्तुनिष्ठपणे विचार करणारी असेल तर त्यातूनच एक सभ्य, सुसंस्कृत आई, वडील, सगेसोयरे, भाऊ, बहीण आणि मुलगा व मुलगी घडते. अन्यथा ही सगळी नाती-गोती विकृत राजकीय संस्कृतीला बळी पडून विकृत संस्कृतीची जन्मदाती होतात. तेव्हा राजकारण्यांनी जबाबदार व्हावेच, परंतु बेजबाबदार संस्कृतीहीन राजकारण्यांना नाकारणारा धाडसी समाजही – म्हणजेच आपण – निर्माण होणे हीसुद्धा आमचीच गरज आहे हे लक्षात असूद्या. एवढेच.

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

Appreciate your incisive comment. The hate culture is a serious threat to democracy

- Ramakant khalap, Goa | 16 th September 2015 22:59

 

Exactly. U have expressed Goan's true feelings. Only Sandesh could have written such an article. I feel such article was long due from u. Thanks for expressing your inner voice. May God bless u.

- Arvind Gawas, Pondicherry | 13 th September 2015 15:54

 

हे सगळे शिक्षण नाही म्हणून. होते. ह्या साठी लोकप्रतिनिधींना कमाल शिक्षण असायलाच हवे. तेव्हाच तो वैचारिक पातळीवर विचार करु शकतो

- महेश आंगले , पणजी | 13 th September 2015 14:35

 

Related Blogs