संविधानाचे मारेकरी

By Sandesh Prabhudesai
06 September 2015 22:35 IST

गेल्या दोन वर्षांपासून भारतात पद्धतशीररित्या एक हत्यासत्र चालू आहे. त्याचे बळी आहेत डॉ नरेन्द्र दाभोळकर, कॉ गोविंद पानसरे व  प्रा एम् एम् कलबुर्गी. या तिन्ही दिग्गजांच्या खुनांचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील पोलीस यंत्रणेला या तिन्ही खुनांमध्ये एक साम्य दिसून येत आहे. कदाचित खुनी वेगवेगळ्या संघटनांशी संबंधित असतील वा त्या केवळ व्यक्तीच असतील, तरीही कुठेतरी वैचारिक प्रक्रिया पोलिसांना एकच वाटते अशी बातमी प्रसिद्ध झालेली आहे.  या तिन्ही विचारवंतांच्या कित्येक वक्तव्यांचा निषेध करणाऱ्या संघटना हिंदुत्ववादी वा उजव्या विचारसरणीशी संबंधित होत्या. त्यात सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती, बजरंग दल, राम सेना अशा संस्था होत्या. पण म्हणून त्यांनीच ही हत्याकांडे घडवून आणली असे सिद्ध होऊ शकत नाही. कधी कधी निषेध करणारे उघडरित्या करतात तर हत्या करणारे लपून करतात. प्रा कलबुर्गींची हत्या झाल्यावर बजरंग दल व राम सेनेशी संबंधित असलेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या जबाबदार नेत्यांनी या हत्येचे सोशल मिडियातून समर्थन केले व पोलिसांनी त्यांना अटकही केली. म्हणून तेच खुनी आहेत असा अर्थ काढून त्यांना कायदेशीररित्या अटक करणेही शक्य नाही. जास्तीत जास्त निष्कर्ष काढून त्यादृष्टीने तपास केला जावू शकतो. सध्या पोलीसही तेच करीत आहेत.

परंतु एक साम्य खात्रीने आहे. डॉ दाभोळकर, कॉ पानसरे व प्रा कलबुर्गी हे तिघेही चिकित्सक होते. संशोधक होते. आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने संशोधन करून त्याची चिकित्सा जनसामान्यांना पटणाऱ्या पद्धतीने ते मांडीत असत. त्यामुळेच तर त्यांनी आजपर्यंत आमच्यापुढे मांडल्या गेलेल्या इतिहासाला जणू आव्हानच दिलेले होते. डॉ दाभोळकर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची फारकत करून पारंपारिक कर्मकांडांचा पर्दाफाश करीत होते. कॉ पानसरेंनी तर  ‘शिवाजी कोण होता’ याची संशोधनात्मक चिकित्सा करताना शिवाजी महाराजांच्या जीवनपटलावरील हिंदू स्वराज्याची वस्त्रे टराटरा फाडून टाकली होती व एक सर्व धर्मांचा आदर करणारा व कष्टकरी रयतेला न्याय देणारा आदर्श जाणता राजा लोकांपुढे ठेवला होता. प्रा कलबुर्गींनीही बसवराजाच्या ‘वचनां’वर संशोधन करून 12 व्या शतकातील या मार्गदर्शक साहित्यनिर्मितीचा खरा अर्थ 21 व्या शतकातील लोकांपर्यंत पोचविण्याचे जणू मिशनच हाती घेतले होते. विवेकवाद व मानवतावादाच्या तत्वांवर आधारित तसेच अहिंसेच्या तत्वांचा पुरस्कार करीत व कष्टांचा आदर करीत जातिविरहित व वर्गविरहित समाजव्यवस्था उभारण्याचा संदेश या ‘वचनां’तून दिला गेला आहे.

वरवर पाहता वाटते की हे तिघेही आपल्या मनातील पारंपारिक श्रद्धेला व पूजनीय अशा व्यक्तींबद्दलच्या आदरभावनेला तडा देत होते, म्हणून त्यांची हत्या झाली. पण थोडे खोलात जाऊन पाहिले तर लक्षात येते की या तिन्ही विद्वान व्यक्ती भारत देशाच्या संविधानाची तत्वप्रणाली स्वतःही आचरत होते व लोकांपर्यंतही पोचवीत होते. भारतीय नागरिक म्हणून आपल्या संविधानाचा आदर करणे व त्यात सांगितलेल्या तत्वांनुसार जगणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. या संविधानात नागरिकाने पाळण्याची एकूण 11 कर्तव्ये दिलेली आहेत. त्यातील या विषयानुरूप आहेत ती चारः 1) भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता यांचे संरक्षण करणे. 2) धर्म-भाषा-प्रदेश-वर्ग इत्यादी भेद विसरून अखिल भारतीय जनतेत एकोपा व भ्रातृभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथा सोडून देणे. 3) आपल्या वैभवशाली एकात्मिक संस्कृतीचा वारसा जतन करणे. 4) शास्त्रीय दृष्टी, मानवता व अभ्यासू वृत्ती यांची वाढ करणे.

भारत हा केवळ एका धर्माचा देश नाही, बहुधर्मी आहे. देव व धर्म मानीत नसलेल्या निरिश्र्वरांचाही देश आहे. ही परंपरा आजची नाही, हजारो वर्षांची आहे. चार्वाकासारख्या वैचारिक बांधणीतून भौतिकतेचा प्रसार करण्याचे कार्य या जगात सिंधू संस्कृतीतूनच सुरू झालेले होते. ईश्र्वरसंकल्पनेला  नाकारून गौतम बुद्धाने नीतीमत्तेच्या आधारावरील भौतिकवादी बौद्ध विचारसरणीचा पाया याच देशात घातलेला होता. स्वामी विवेकानंदांनी तर हिंदू धर्मातील बलस्थाने सांगतानाच त्यातील फोलपणाही उघडा पाडला होता. ‘ज्या ठिकाणी वेद नाही, कुराण नाही आणि बायबलही नाही अशा ठिकाणी आपणाला मानव जातीला घेऊन जायचे आहे’ असेही ते सांगत. आणि ‘आपले देव आता जुने झालेत, आता आपल्याला नवे देव, नवा वेद आणि नवा धर्म हवा’ असे सांगून ‘माणसाला माणूस बनवतो तोच खरा धर्म’ हेही ते ठासून सांगत. ‘गाईंना माता मानणाऱ्यांचे बाप बहुधा बैल असावेत’ असा सडेतोड विचार विसाव्या शतकात खुद्द हिंदु महासभा स्थापन करणाऱ्या वीर सावरकरांनी मांडला होता. आणि ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हा तर जणू मंत्रच साने गुरुजी आम्हाला देऊन गेले आहेत. डॉ दाभोळकर, कॉ पानसरे वा प्रा कलबुर्गी याच वैभवशाली एकात्मिक संस्कृतीचा वारसा जतन करीत होते.

याच आपल्या परमपूज्य संविधानात एक फारच महत्वाचे तत्व आहे – सहिष्णुता. टॉलरन्स. सहनशक्ती. आपला भारत देश हा केवळ वेगवेगळ्या आणि कधीकधी परस्पर विरोधांचाच देश नाही तर हे सर्व पचविणारा देश आहे. पूर्वीचे कित्येक राजे-महाराजे तर अशा परस्परविरोधी विचारांची खडाजंगी दरबारात घडवून आणायचे. आज ती आपण टीव्हीवर बघतो एवढाच काय तो फरक. परंतु सर्व विचार समजून घेऊन त्यातून आपली जीवनपद्धती विकसित करायची ही आपली समृद्ध परंपरा आहे. तेव्हा डॉ दाभोळकर, कॉ पानसरे वा प्रा कलबुर्गी सारख्या विद्वानांनी आपणाला पटत नसलेला विचार मांडला तर त्यांना विचारांनी टक्कर देणे ही आपली अस्सल भारतीय संस्कृती आहे. आपणास न पटणारा विचार मांडणाऱ्याची हत्या करायची ही संस्कृती कुठल्या युरोपियन देशातून इथे आयात केली गेलेली आहे याचा शोध घेणे फारसे कठीण नाही. राष्ट्रवादाच्या नावे बहुसंख्यांक वर्गाची विचारसरणी व सत्ता सर्वांवर लादण्याचा विचार कुठल्या देशात जन्मला व त्यासाठी कुठे कुठे कशी कशी अशाच प्रकारची हत्याकांडे झाली याला या जगाचा इतिहास साक्षी आहे. तीच संस्कृती आता आपल्याही देशात रुजू लागली असेल तर मात्र आपणाला मान्य करावेच लागेल – हो, आता विचारवंतांची हत्या करणारी पाश्र्चात्य संस्कृती इथेही रुजू लागलेली आहे. आणि त्यातून तयार झालेत आपल्या संविधानाचे मारेकरी!

परंतु हे एवढ्यावर संपत नाही. खऱ्या अर्थाने वैचारिक संस्कृतीचा एक लढा भारत देशात आज सुरू झालेला आहे. उदारीकरण व जागतिकीकरणाच्या अर्थव्यवस्थेचा भारताला किती फायदा झाला याची अर्थशास्त्रीय चिकित्सा अर्थशास्त्रज्ञांनी जरूर करावी. परंतु यातून एक नवीन जाती वा धर्म विरहित समानतेची संस्कृती नव्या पिढीमध्ये मूळ धरू लागलेली आहे हे मात्र निःसंशय. मुक्त अर्थव्यवस्थेतून मुक्त विचारसरणीची संस्कृती भारतातल्या जनमानसात रुजू लागलेली आहे. ही संस्कृती भेदभावांच्या आमच्या पारंपारिक संस्कृतीला थेट छेद देते. त्यामुळेच परंपरावाद्यांच्या गोटात संतापाची लाट उसळते. मग ते तिला पाश्र्चात्य संस्कृतीचे नाव देतात. प्रत्यक्षात ती मुक्त अर्थव्यवस्थेतून निर्माण झालेली नवस्वरुपी भारतीय संस्कृती आहे हे लक्षात घेत नाहीत. त्यातूनच मग मंगळूरमध्ये पब्समध्ये बसलेल्या मुलींना फरफटत बाहेर ओढले जाते व मुलांना मारहाण केली जाते. फ्रँडशिप डे वा व्हॅलेंटाइन डे सारखे दिवस साजरे करण्याला विरोध केला जातो. गोव्यातील पब संस्कृतीचा निषेध केला जातो. तोकडे कपडे घालतात म्हणून बायकांवर बलात्कार होतात असे अपसमज पसरवले जातात इत्यादी इत्यादी.

म्हणूनच हा लढा आणखीन खोलात जाऊन समजून घेणे आवश्यक आहे. तो केवळ दाभोळकर-पानसरे-कलबुर्गींविरुद्ध नाही आहे. आजचा तरुणाईचा भारत – जो 50 टक्क्यांहून जास्त आहे – तो एका मुक्तस्वरुपी नवसंस्कृतीला कवटाळून चाललेला आहे. प्रत्येक संस्कृतीचे जसे फायदे आणि नुकसानही असते तसेच या नवसंस्कृतीचेही असणे साहजिक आहे. त्याची मिमांसाही आपणाला करावीच लागेल. पण नव्या पिढीची ही नवसंस्कृती परंपराप्रिय व रूढीप्रिय संस्कृतीला भेदून पुढे जात आहे यात संशयच नाही. आपण सर्वचजण या संस्कृतीच्या सरमिसळीत पुरते गोंधळून गेलेलो आहोत. काय खरे आणि कुणाचे खरे तेच कधी कधी समजेनासे होते ते यामुळेच. अशा वेळी हा गोंधळ दूर करणारा व मार्गदर्शन करणारा एक महत्वपूर्ण ग्रंथ आमच्याशी रेडिमेड उपलब्ध आहे. तो म्हणजे भारताचे आमचे संविधान. आणि या संविधानातील वर सांगितलेली चार कर्तव्ये. स्वामी विवेकानंदाना अभिप्रेत होता तो वेद. मानवतेची, शास्त्रशुद्ध विचारसरणीची, विवेकनिष्ठतेची आणि विज्ञाननिष्ठेची तत्वे सांगणारा व सहिष्णुतेचा मंत्र जपणारा वेद. हा संविधान-वेद आपण आपल्या मानवधर्माचा धर्मग्रंथ मानूया आणि त्याच्या आधारे सर्व गोंधळाची चिकित्सा करूया. कित्येक प्रश्र्न आपसूकच सुटतील. अर्थात, मन खुले ठेवले तरच. अन्यथा – अशक्य.

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

Sandesh, what a superb article in Marathi! Very appealing n touching. All d best..

- Arvind Gawas, Pondicherry | 06 th September 2015 23:44

 

Related Blogs