भाषा नाही तर दिशा नाही

By Sandesh Prabhudesai
30 August 2015 19:47 IST

भाषा हे मुळात संपर्काचे माध्यम असते. माणसाच्या हातातील एक प्रभावी साधन असते. दुर्दैवाने गोव्यात मात्र ते साधन म्हणून कमी आणि साध्य म्हणून जास्त वापरले गेले. माझी भाषा अमकी अमकी हे साध्य करण्यासाठी जनजागरणे झाली, जनआंदोलने झाली, निवडणुकासुद्धा झाल्या. आणि याचा फायदा घेऊन भाषा हे साधन म्हणून वापरले ते केवळ राजकारण्यांनी. आजही भाषा ही राजकारण्यांच्या हातातील हुकमी एक्का म्हणूनच वापरली जाते. माणसाचे जनजीवन समृद्ध करण्यासाठी भाषेचा वापर कमी आणि स्वतःच्या वा पक्षाच्या समृद्धीसाठी जास्त असा सगळा उलटा प्रकार गोव्यात सुरवातीपासूनच चालत आलेला आहे. भाषेबद्दलचे प्रेम कमी, मात्र भाषेच्या नावाने माथेफिरुपणा (फॅनॅटिसिझम) जास्त असाही प्रकार गोव्यात आहे. भाषा म्हटली की आपल्या डोक्यांत अक्षरसाहित्य नाचत नाही, भावभावनांचा आणि द्वेषाचा कल्लोळ माजतो यातच सगळे काही आले.

भारताच्या इतर राज्यांपेक्षा गोव्यात तर कोंकणी ही आपली भाषा आहे हे सिद्ध करण्यातच दोन-तीन पिढ्यांचे आयुष्य जास्त खर्ची गेले. साहित्य निर्मिती झाली त्यातही ही पोटतिडक जास्त असायची. मराठी ही भाषा आणि कोंकणी ही बोली हा वाद तर 1975 मध्ये राष्ट्रीय साहित्य अकादमीने कोंकणी भाषेला मान्यता देऊनसुद्धा कित्येक वर्षे चालूच राहिला आणि 1986 साली झालेल्या राजभाषा आंदोलनावेळी तोच वाद परत पेटला. त्यात मग धर्म घुसडला गेला, जात घुसडली गेली आणि जाती-धर्माच्या बुरख्याआडून राजकारण्यांनी आपले राजकीय युद्ध सुरू केले. त्यासाठी एकच कोंकणी, परंतु अमक्या  धर्मातील लोकांची ती भाषा तर तमक्या धर्मातील लोकांची ती बोली असलेही अजब शोध लावले गेले. मराठी भाषेतून आपण सुसंस्कृत बनतो तर कोंकणी भाषेतून पोर्तुगीजधार्जिणे बनतो असा आणखीन एक प्रचार, तर केवळ कोंकणी भाषा स्वाभिमान शिकवते व मराठी परधार्जिणेपणा शिकवते असा प्रति-प्रचार यांचेही युद्ध सुरू झाले. त्यावेळी मराठी मातृभाषा म्हणणाऱ्यांसाठी कोंकणी अराष्ट्रीय होती तर मराठी राष्ट्रीयत्वाचे प्रतीक होती. दुसऱ्या बाजूने कोंकणी मातृभाषा म्हणणाऱ्यांसाठी कोंकणी हा स्वाभिमान होता तर मराठी ही स्वाभिमानशून्यता होती. या युद्धात संस्कृतीची तर लक्तरेच फाडली गेली.

1991 साली अचानक शिक्षणक्षेत्रात प्राथमिक स्तरावरील भाषा माध्यमाचा प्रश्र्न उचकला आणि एकामेकांना राष्ट्रीय-अराष्ट्रीय म्हणणारे कोंकणीवादी व मराठीवादी एकामेकांच्या गळ्यात गळा घालून इंग्रजी माध्यमाचा पुरस्कार करणाऱ्यांना अराष्ट्रीय म्हणायला लागले. कर्मधर्मसंयोगाने हा प्रश्र्न त्यावेळी राजकीय पातळीवरच लढला गेला. काँग्रेसची सत्ता गेली होती आणि थोडे ‘कोंकणी’ काँग्रेसवाले ‘मराठी’ मगोवाल्यांशी हातमिळवणी करून राज्य करायला लागले होते. त्यांनीच इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना शिक्षकी पगाराचे सरकारी अनुदान न देण्याचा निर्णय घेतला. 1986 साली सत्तेवर असताना कोंकणी व मराठीच्या नावाने गळा काढणारे व आता विरोधी बनलेले कोंकणी-मराठी काँग्रेसवाले अचानक इंग्रजीवाले झाले. कोंकणी-मराठी विरुद्ध इंग्रजी असे नवे युद्ध सुरू झाले. परंतु चर्च पुरस्कृत डायोसेसन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळा कोंकणी बनल्या व या युद्धाच्या फुग्यातील हवाच गेली.

याचवेळी आणखीन एकाही इंग्रजी माध्यमाच्या खाजगी प्राथमिक शाळेला परवानगी देणार नाही व सरकारी पातळीवर इंग्रजी माध्यमिक प्राथमिक शाळा चालवणार नाही असा निर्णय घेतला गेला होता. या दोन्ही निर्णयांना हळूहळू सगळ्याच पक्षांनी व सरकारांनी पाने पुसली व शेकडो इंग्रजी शाळांना परवानगी दिली गेली. निम्न-सरकारी बाल भवनने तर स्वतःच इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा सुरू केली. काँग्रेस, मगो, भाजपा असे सगळेच पक्ष सत्तेत असताना यात सामील झाले. अशा प्रकारे इंग्रजी शाळांचे भरमसाट पीक आल्यावर दुसऱ्या बाजूने कोंकणी माध्यम इंग्रजी करण्यासाठी चर्चवर पालकांचा दबाव वाढायला लागला. सरकारी मराठी शाळा ओस पडायला लागल्या. त्यासाठी मग 2011 साली – तब्बल 20 वर्षांनी – परत आंदोलन सुरू झाले. या आंदोलनात काल कोंकणी असलेली चर्च इंग्रजीचा पुरस्कार करायला लागली आणि सत्ताधारी काँग्रेसने त्यांच्यापुढे लोटांगण घालून त्यांच्या इंग्रजी माध्यमाच्या केलेल्या खाजगी शाळांना अनुदान चालूच ठेवले. हा निर्णय बदलण्याच्या घोषणा करीत 2012 साली भाजपा सत्तेवर आली. त्यांच्या विजयात चर्चचा महत्वाचा वाटा होता व अल्पसंख्य वर्गाचे आमदारही होते. त्यामुळे भाजपानेही काँग्रेसचीच री ओढली व गेली साडेतीन वर्षे हे अनुदान त्यांच्या इंग्रजी शाळांना चालूच आहे.

आता चर्च पुरस्कृत शाळा इंग्रजीचा पुरस्कार करीत असल्यामुळे राष्ट्रीयत्वाचे नारे देत कोंकणी-मराठीवाल्यांचे नवीन आंदोलन सुरु झाले तेच मुळी संपूर्ण अल्पसंख्य वर्गाला अराष्ट्रीय ठरवून. चर्चच्या शाळा इंग्रजी होण्यापूर्वी शेकडो इंग्रजी शाळांतून बहुसंख्यांक वर्गाची हजारो मुले इंग्रजी शिकत होती हे ते साळसूदपणे विसरले. प्रत्यक्ष चर्चच्या शाळांतूनसुद्धा शिकणारी बहुतांश मुले बहुसंख्यांक वर्गाचीच आहेत याकडेही जाणूनबुजून काणाडोळा केला गेला. पूर्णतया धार्मिक पातळीवर चालवल्या गेलेल्या या आंदोलनात केवळ अल्पसंख्य इंग्रजीचा पुरस्कार करीत आहेत असा डंका पिटवला गेला. केवळ चर्चच्या शाळांतून शिकणाऱ्या, केवळ अल्पसंख्यांक वर्गाच्या मुलांना व पालकांना, अराष्ट्रीय ठरवले गेले. मात्र तेवढ्याच संख्येने असलेल्या, परंतु अनुदान न घेता चालणाऱ्या इंग्रजी शाळांतील बहुसंख्यांकांच्या मुलांना मात्र कोणीच अराष्ट्रीय म्हटले नाही. ते राष्ट्रीयत्वाचे उद्याचे आधारस्तंभ बनले. आजही हा लढा याच अंधेर नगरी पातळीवर चालूच आहे.

हे आमचे गोव्याचे भाषेसाठी दिलेले भरीव योगदान. या आंदोलनांत दोन्ही बाजूंनी हजारो लोक रस्त्यावर उतरतात. भाषेच्या नावाने गळा काढतात. त्याची सांगड संस्कृतीशी घालतात. आणि संस्कृतीची राष्ट्रीयत्वाशी घालतात. मात्र भाषा टिकवून ठेवण्यासाठी साहित्यिक वा सांस्कृतिक पातळीवर कार्यक्रम, मेळावे, सभा-संमेलने होतात तेव्हा यातील अर्धे लोकसुद्धा त्या सभागृहात वा मंडपात दिसत नाहीत. त्याउलट या कोंकणी वा मराठी गटातील संस्था बळकावण्यासाठी राजकारण्यांनाही लाजविणारी राजकारणे साहित्यिक आणि कलाकार खेळतात. माध्यमाच्या प्रश्र्नावर वा राजभाषेच्या प्रश्र्नावर आंदोलने पेटली की शेकडो शिक्षक रस्त्यावर उतरतात व पालकांनाही आपणामागे ओढतात. परंतु भाषांचा घसरत चाललेला दर्जा परत उंचावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाले तर तिथे यातले अर्धे लोकसुद्धा फिरकत नाहीत.

एकेकाळी सुशिक्षित गोमंतकीयाला कोंकणी, मराठी, हिंदी, पोर्तुगीज व इंग्रजी अशा पाच-पाच भाषा यायच्या. आज पोर्तुगीज तर गेलीच, परंतु इंग्रजीच्या हव्यासापोटी घरीसुद्धा कोंग्लीश बोलली जाते. म्हणजे कोंकणी पद्धतीने इंग्लीश. मराठी जाणणारी पिढी लयालाच जात आहे म्हणायला हरकत नाही. कोंकणी व्यवस्थित जाणणारीही पिढी कमी होत चालली आहे. आणि या सर्वांनाच इंग्रजी व्यवस्थित येईल याची काहीच गॅरंटी नाही. कारण आपण आमच्या अभ्सासक्रमातूनच शास्त्रशुद्धरित्या भाषा शिकवण्याची पद्धत हद्दपार केलेली आहे. कुठलीच भाषा शाळेतून शास्त्रीय पद्धतीने शिकवली जात नाही. त्यामुळे एकेकाळी बहुभाषिक असलेला गोवा आता भाषेच्या एक ना धड भाराभर चिंध्या  लांबवीत फिरताना दिसत आहेत. जे काही थोडे प्रामाणिकपणे विविध भाषा शिकतात व शिकवतात तेवढेच काय ते आशेचे किरण. अन्यथा भाषेच्या नावाने अंधारयात्रेत सामील झालेले यात्रेकरूच भरमसाट.

भाषा ही माध्यमातून शिकता येत नाही, ती भाषा हा विषय म्हणून शिकून संपादन केली जाते ही जाणीवच नष्ट होत चाललेली आहे. भाषा शिकण्यासाठी केवळ भाषेची पाठ्यपुस्तके शिकून  चालत नाहीत तर त्यासाठी त्या त्या भाषेतील साहित्य वाचले पाहिजे, त्या त्या भाषेतील कार्यक्रम केले वा पाहिले पाहिजेत, त्या त्या भाषांचा सांस्कृतिक वारसा पुढे चालवला पाहिजे आणि त्यासाठी आपणही वेगवेगळ्या भाषांतून लेखन केले पाहिजे ही जाणीव तर नष्टच होण्याच्या मार्गावर आहे. केलाच कुणी तर तो एकाच भाषेचा पाठपुरावा. बहुभाषिकता ही संकल्पनाच मानायला कित्येक लोक तयार नाहीत. एक भाषा शिकताना दुसऱ्या भाषेचा द्वेष करायचेही प्रकार सुरू झालेत. कारण आपण आजकाल भाषेची सांगड धर्माशी वा जातीशी घालायला लागलो आहोत. विविध भाषा शिकणे हा माझा धर्म व वेगवेगळ्या भाषांवर प्रेम करणे ही माझी जातकुळी ही विशाल दृष्टिकोणाची भावनाची नष्ट होत चाललेली आहे. जेवढ्या जास्त भाषा आपणाला येतील तेवढ्या संधी जास्त ही साधी गोष्ट तर आपण लक्षातच घ्यायला तयार नाही. सगळंच काही दिशाहीन! भाषा नाही तर दिशा नाही हे आपणाला समजणार तरी कधी?

(हा लेख लोकमत गोवा आवृत्तीच्या 30 ऑगस्ट 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाला)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

As usual beautiful and perfect analysis. Why blame politicians alone? I believe that the current situation is a result of 'saraswatization' of Konkani and in-fighting of Konkani and Marathi protagonists. Doghanche Bhnadan ani tisrayacchaa laabh.

- jsb, Goa | 31 st August 2015 22:38

 

Related Blogs