कंटाळलेत देवही...
Posted By सदगुरू पाटील | 19 February 2016 11:50 IST
रात्री भेटले
देव मला
घामाघूम झालेले
मंदिरे सोडून
एकत्र आलेले
महाजनांचे वाद
निधीवरून तंटे
देवळातील चोर्या
देवस्थान जमिनींबाबत खटले
भक्तजनांमधील हेवेदावे
सगळ्यालाच कंटाळलेत देव
आता देवांनीच ठरवलेय
संघटित होऊन
सर्वांसाठी एकच देऊळ
बांधायचे.
सर्व देवांनी
मूर्तीच्या रूपात
एकाच देवळात बसायचे
अन् अध्यात्मिक शांतता म्हणजे
नेमके काय ते अनुभवायचे
निवडणुकाही नकोत अन्
महाजनही नकोत
माणसांना तर देवळात
प्रवेशच नको
देवांनी, देवांसाठी बांधलेले
फक्त देवांचे देऊळ
देऊळ बांधकामासाठी
देवांनी प्रसाद लावला
प्रसाद होऊ नये म्हणून माणसांनी
आटापिटा केला
पण देऊळ साकारले
देवांचा हा लोकशाही निर्धार
मला फार आवडला
आता माझ्या गावचे श्रेष्ठ
अन् कनिष्ठ,
जातपात विसरून
संघटित झालेत
देवांमध्ये फूट कधी पडेल
याची वाट पाहत आहेत
देवांमध्ये भांडण लावण्यास
निमित्त शोधत आहेत