वृत्तपत्र संस्कृती

By Sandesh Prabhudesai
02 August 2015 11:56 IST

मुक्तीनंतरच्या गोव्यात बंद होणारे ‘सुनापरान्त’ हे काही पहिलेच दैनिक नाही. नववे आहे. मुक्तिपूर्व काळापासून चाललेले स्वातंत्र्यसैनिक फेलिस्यु कार्दोज यांचे ‘दिवटी’ हे रोमी साप्ताहिक आणि ह्युगो डिसोझा यांचे ‘आ व्हिदा’ हे पोर्तुगीज दैनिक एकत्र येऊन ‘दिवटी’ हे रोमी कोंकणीतील दैनिक सुरु झाले होते. पण ते लौकरच बंद पडले. चौगुलेनी मराठी ‘गोमंतक’ सुरू करतानाच स्वातंत्र्यसैनिक एव्हाग्रियो जॉर्ज यांना संपादक करून ‘उजवाड’ हे रोमी कोंकणी दैनिक सुरू केले होते. ते जास्त काळ चालू शकले नाही. ओपिनियन पोलच्या काळात ‘राष्ट्रमत’ला शह देण्यासाठी ‘गोमंतवाणी’ हे मराठी दैनिक मडगावातून सुरू केले होते. परंतु ते अवघ्या महिन्यांतच बंद पडले. पुढे विसाव्या शतकाच्या अखेरीस ‘राष्ट्रमत’ही बंद पडले. 1970 च्या अखेरीस मडगावातून तिंबलो उद्योग समूहाने सुरू केलेले ‘वॅस्ट कोस्ट टाइम्स’ हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सजलेले व पत्रकारितेत नवे पायंडे पाडणारे ब्रॉडशीट इंग्रजी वृत्तपत्रही जास्त काळ चालू शकले नाही. 1980 च्या पहिल्याच दशकात संपूर्ण गोवाभर पदयात्रा काढून लोकांच्या पैशांतून उभे केलेले व मडगावातून चालवलेले ‘नवें गोंय’ हे कोंकणी दैनिकही अवघ्या काही वर्षांतच बंद पडले. नंतर 1990 च्या दशकात फा फ्रेडी डिकॉस्टा यांनी काढलेले ‘गोंयचो आवाज’ हे ब्रॉडशीट रोमी दैनिकही असेच बंद पडले. त्याच दशकात बांदेकर उद्योग समूहाच्या साह्याने विष्णू वाघ यांनी सुरू केलेले वर्तमान हे मराठी सायंदैनिकही एक-दोन वर्षातच बंद पडले. आणि आता 28 वर्षांनंतर देवनागरी कोंकणीतील एकमेव दैनिक ‘सुनापरान्त’. म्हणजे तीन मराठी, एक इंग्लीश, चार रोमी कोंकणी आणि एक देवनागरी कोंकणी.

याचा अर्थ त्या त्या भाषांतील वाचक घटत चालला म्हणून ती बंद पडली असा नव्हे. कारण आजही गोव्यात आठ मराठी वृत्तपत्रे व पाच इंग्रजी वृत्तपत्रे चालतात. त्यातील एक इंग्रजी व एक मराठी तर गेल्याच महिन्यात सुरू झालेली आहेत. एकेकाळी गोव्यावर अधिराज्य करणारा ‘गोमंतक’ व त्याचे इंग्रजी भावंड ‘गोमन्तक टाइम्स’ ही दोन्ही वृत्तपत्रेही बंद होण्याचीच परिस्थिती निर्माण झाली होती. सकाळ समूहाने ती विकत घेतली नसती तर आणखीन एका सुवर्णयुगाचा तो अस्त ठरला असता. वृत्तपत्र बंद होण्याची कारणे अनेक असतात. त्यात वृत्तपत्राचे धोरण, एकूण गुणवत्ता, व्यवस्थापन, मार्केटिंग, उत्पन्न, वाचकवर्गाचा प्रतिसाद अशा कित्येक गोष्टींवर त्याचे भविष्य अवलंबून असते. त्यात आजसुद्धा जी वृत्तपत्रे चालतात त्यातील अवघीच वृत्तपत्रे फायद्यात चालत आहेत. त्या फायद्यावर त्यांचे दुसऱ्या भाषेतील वृत्तपत्र तोट्यात चालवणे शक्य होते. शिवाय छपाईचा वाढत चाललेला खर्च आणि दुसऱ्या बाजूने स्पर्धेत राहण्यासाठी वाढत चाललेली पानांची संख्या यांचा ताळमेळ गोव्यातील विघटित वाचकवर्गाशी घालणे ही तर फार मोठी कसरतच आहे. त्यामुळेच तर बाहेरगावातील साखळी वृत्तपत्रे आज गोव्यात घट्ट पाय रोवून उभी आहेत तर केवळ फायद्यात चालणाऱ्या गोमंतकीय मालकांच्या वृत्तपत्रामुळे गोमंतकीयांच्या मालकीची वृत्तपत्रे टिकून आहेत. अन्यथा तीही बंद झाली असती.


परंतु एकूणच वृत्तपत्र संस्कृती बदलत चालली आहे हे मात्र निश्र्चित. ओपिनियन पोलच्या काळात ‘गोमंतक’ आणि ‘द नवहिंद टाइम्स’ ही दोनच वृत्तपत्रे चालत होती. त्यातील ‘गोमंतक’ विलीनीकरणवादी होता तर ‘नवहिंद’ नरो वा कुंजरोवा. म्हणून तर विलीनीकरणास विरोध करण्यासाठी मराठी ‘राष्ट्रमत’चा जन्म झाला. अवघ्या चार पानांचे हे वृत्तपत्र विलीनीकरणवादीही वाचायचे. आणि म्हणूनच तर ओपिनियन पोलातून गोवा वेगळा राहू शकला. नंतरही हे चार पानांचे दैनिक मडगांवकरांचे दैनिक म्हणून कित्येक वर्षे चालू राहिले. वृत्तपत्रापेक्षा एक मतपत्र म्हणून त्याला जी प्रतिष्ठा होती ती ‘राष्ट्रमत’ने शेवटपर्यंत टिकवली. ‘सुनापरान्त’ही 17 वर्षे चार पानांचे ब्लॅक अँड व्हाइट वृत्तपत्र होते. नंतर 11 वर्षे ते थोडी पाने वाढवून रंगीत झाले. परंतु मतपत्र म्हणून त्याला एक प्रतिष्ठा होती. ती शेवटपर्यंत राहिली. म्हणूनच तर खप कमी असला तरी ‘सुनापरान्त’ बंद झाल्यावर गोव्यात वादळ उठले ते वेगळेच. परंतु आज चाललेल्या वृत्तपत्रीय रॅट रेसमध्ये ते टिकाव धरणे कठीणच होते. वाढत चाललेल्या खुद्द कोंकणी चळवळीने आपल्या भाषेतील एकमेव वृत्तपत्राकडे पाठ फिरवली. नाहीतर ते बंद करण्याचे धाडस त्याचे मालक दत्तराज साळगांवकरांनासुद्धा झाले नसते. कारण वाचकाची अभिरुची आज बदलत चालली आहे. ‘सुनापरान्त’ या बदलत्या अभिरुचीचा नैसर्गिक बळी आहे.

बातमी व मतप्रदर्शन या दोन गोष्टी कालपर्यंत वृत्तपत्राचा प्राण होती. परंतु टेलिव्हिजन चॅनल भारतात आले आणि वृत्तपत्रातून समजणारी उद्याची बातमी आज आणि आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजवर येऊन ठेपली. इंटरनेट आले आणि जागतिक माहितीचा खजिनाच गावपातळीपर्यंत उपलब्ध झाला. त्यानंतर ओर्कूट, फेसबूक, ट्विटर, वॉट्स ऍप असा प्रवास करीत सोशल मिडिया सर्वात जास्त बलशाली बनली आणि टीव्ही व इंटरनेटवरील बातमीपत्रेसुद्धा सोशल मिडियाच्या मागे धावू लागली. या सगळ्याच गोष्टी मोबाईलवर मिळू लागल्या आणि माहितीपत्र प्रत्येकाच्या मुठीत आणि खिशात आले. त्यामुळे आज वृत्तपत्रातील रोजच्या बातम्यांना काडीचेही महत्व राहिलेले नाही. जे या सर्वांहून वेगळी बातमी देते ते वृत्तपत्र आता लोकप्रिय होवू लागलेले आहे. त्यासाठी कालपर्यंत पत्रकार परिषदा आणि प्रेस नोटवर अवलंबून असलेली पत्रकारिता आता परत एकदा शोध पत्रकारितेवर अवलंबून रहाणे अपरिहार्य बनलेले आहे. आणि त्याहूनही महत्वाचे बनलेले आहे ते मतप्रदर्शन. तशा गावागावातील छोट्या-मोठ्या बातम्या अजूनही वृत्तपत्रातूनच मिळत होत्या. परंतु त्याही आता सोशल मिडिया आणि मोबाईलवरील वॉट्स ऍपवर यायला लागल्याने त्यांचेही महत्व कमी होत चाललेले आहे. त्यामुळे बातम्यांव्यतिरिक्त असलेली राहणीमानाची (लाइफस्टाइल) इतर माहिती वा मसालेदार वृत्ते हा वृत्तपत्रांचा प्राण बनू लागलेली आहे. पण तीही किती काळ वृत्तपत्रांच्या हाती राहतील सांगता येत नाही. त्यामुळेच वृत्तपत्रे आता हळूहळू वृत्त सोडून इतर गोष्टींची माहिती व मतप्रदर्शने देण्याचे व्यासपीठ बनत चाललेले आहे.


वाचन संस्कृती बदलली की वृत्तपत्र संस्कृती बदलते. संगणक, इंटरनेट व खास करून मोबाईलवरील सोशल मिडियामुळे वाचनसंस्कृतीत न भुतो न भविष्यती अशी वाढ झालेली आहे. ती आपणाकडे ओढून आणायची असेल तर कागदावरील छापील वृत्तपत्रांना आपली खास जागा निर्माण करावी लागेल. कुठे पोकळी आहे ती शोधून काढून भरावी लागेल. आज टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज येण्यापूर्वी सोशल मिडियावर कुणीतरी सामान्य नागरिक आपण प्रत्यक्ष बघितलेल्या घटनेची बातमी, फोटो वा व्हिडियोसुद्धा टाकतो. आजकाल याच पोस्टांच्या आधारे बातम्या तयार व्हायला लागल्या आहेत. भले भले राजकारणी तर पत्रकार परिषद घेऊन वक्तव्य करण्याऐवजी ट्विटरवर आपले मत टाकतात आणि हा हा म्हणता त्याची बातमी होते. म्हणजेच, कालपर्यंत इंटरनेटवरील प्रसारमाध्यमांच्या वॅबसाइट्स ही बातमीची आधुनिक माध्यमे होती. सोशल मिडियावरसुद्धा या वॅबसाइटच्या बातम्या झळकायच्या. परंतु आता सामान्य नागरिक बातमीदार बनलेला आहे. त्याला प्रसार माध्यमांची गरजच राहिलेली नाही. तोच बातमी टाकतो व इतर वाचक ती वाचतात, ऐकतात वा पहातात. वृत्तपत्रे, टीव्ही वा इंटरनेटवरील माध्यमांच्या वॅबसाइट्स सोशल मिडियावरील हे पोस्ट फोलो करतात. कालपर्यंत वाचक प्रसार माध्यमांच्या मागे जात होता, परंतु आज प्रसार माध्यमे वाचकांनी सोशल मिडियावर काय टाकलेय त्याचा शोध घेत असतात. सगळे चित्रच उलट्याचे सुलटे झालेले आहे.

मात्र त्याचवेळी सोशल मिडियावरील सगळ्याच बातम्या काही खऱ्या नसतात. कित्येक तर दिशाभूल करणाऱ्या असतात. उदाहरणार्थ ए पी जे अब्दुल कलाम वारले ही बातमी दहा-बारा दिवसांपूर्वीही सोशल मिडियावर आली होती. अशा वेळी बातमीतली सत्यता जाणून घेण्यासाठी प्रसार माध्यमे लागतात. म्हणजेच केवळ सत्य वृत्त देणे ही आता प्रसार माध्यमांची गरज झालेली आहे. त्याचबरोबर दिशाभूल करणारे प्रकार घडतात तेव्हा एखाद्या विषयाची सत्यासत्यता पटवून देण्याची जबाबदारी वृत्तपत्रांवर आलेली आहे. वाचकांना दिशा दाखवण्याचीही जबाबदारी आलेली आहे. याचाच अर्थ केवळ बातम्यांच्या मागे धावणारी वृत्तपत्रे आता मतपत्रे, तीही सत्यावर आधारित, बनण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही.   जे वृत्तपत्र ही आपली जागा शोधून काढेल तेच वृत्तपत्र टिकेल. ज्यांना हे जमणार नाही त्यांचा सर्वांचाच आज ना उद्या ‘सुनापरान्त’ होईल. त्याला पर्यायच नाही.

(हा लेख लोकमत गोवा आवृत्तीच्या 26 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाला)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

Good write up, Sandesh !!!!

- kaushal parsekar, guirim mapusa | 07 th August 2015 16:16

 

Related Blogs