चिकित्सक संस्कृती रुजवुया

By Sandesh Prabhudesai
12 July 2015 21:38 IST

परवाच वॉट्स ऍपवर मी एक व्यंगचित्र फॉरवर्ड केलं. एक सामान्य माणूस मोदीचं डोकं दाखवलेलं रोपटं लावतो. त्याला नित्यनेमाने पाणी घालतो. रोपट्याला कळी आल्यावर खुलतो. पण त्याचं फूल होतं तेव्हा त्याची बोबडीच वळते. कारण व्यंगचित्रकार फुलाला मनमोहनसिंगचं डोकं दाखवतो. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदीही मनमोहनसिंगसारखे मौनीबाबा झालेत का या चर्चेवर त्या व्यंगचित्रकाराची ती मार्मिक प्रतिक्रिया होती. लगेच एकाची प्रतिक्रिया आली – “हा व्यंगचित्रकार बहुतेक कम्युनिस्ट असावा. कारण तो काँग्रेस व भाजपा दोहोंवरही टीका करतोय.” हल्लीच्या काळात हे लेबलिंगचे प्रकार वाढत चाललेत. त्यात भर म्हणून मी तेवढा एकटाच निःपक्षपाती, बाकी सगळे पक्षपाती हा इतरांबद्दलचा दुराग्रहही वाढत चाललाय. आपणच अतर्क्य निष्कर्ष काढून दुसऱ्यांना लेबलिंग करायचे आणि मग स्वतःला निःपक्षपाती म्हणायचे हीसुद्धा संस्कृती वाढत चाललीय.

मागे एकदा याच स्तंभात मोबाईलच्या आंधळ्या संस्कृतीबद्दल लिहिले होते. त्याच संदर्भात मी वॉट्स ऍपवर पोस्ट टाकला. हल्ली वॉट्स ऍपवरून अफवारुपी बातम्या पसरवण्याचे प्रकार वाढत चाललेत. (उदाः जॉनी लिवरचे निधन). अशा वेळी आंधळेपणाने फॉरवर्ड करण्यापूर्वी तुम्हाला विश्र्वसनीय वाटतो अशा एखाद्या मिडियावर जाऊन बातमीचा खरेखोटेपणा पडताळून पहावा आणि मगच तो फॉरवर्ड करावा अशी विनंती मी केली होती. त्यातली विनंती राहिली बाजूलाच, परंतु मिडिया ही आज कशी विश्र्सासार्ह राहिली नाही यावरच चर्चा होत राहिली. त्यातनं एकानं मग – काही व्यक्तिगत अपवाद सोडल्यास मिडिया ही वेश्या झालीय असंसुद्धा लिहून टाकलं. तुम्हाला विश्र्सासार्ह वाटतेय तिथे बातमीची खात्री करून घ्या अशी माझी विनंती होती हे सांगूनसुद्धा सगळे मिडियातील अविश्र्वसनीयतेवरच घसरले.

एका बाजूने पहाता या दोन्ही घटनातील निष्कर्षांमागे त्यांची काही चूक नव्हती. कारण मिडियाने विश्र्वासार्हता गमावलीय हे खंर आहे. परंतु तीच अविश्र्वसनीय मिडिया आम्ही चवीने वाचतोय वा पहातोय हेही तेवढेच खरे आहे. मिडियामधल्या कुणा संपादक वा अँकरने तुम्हाला आवडत असलेल्या पुढाऱ्याला वा पक्षाला प्रश्र्न विचारले की ते आम्हाला आवडत नाहीत. मग आम्ही लगेच त्याला पक्षपातीपणाचे लेबल लावतो. तोच संपादक मग एक दिवस लेबल लावलेल्याच पार्टीला वा पुढाऱ्याला तसेच प्रश्र्न विचारायला लागला की आपण एक तर गप्प बसतो वा त्यांनी ठरवून एका दिवसासाठी ते केलेलं फिक्सिंग आहे अशी मखलाशी करून आपल्या पक्षपाती लेबलिंगचं समर्थन करतो. इथेही लेबलिंग करणाऱ्यांची पूर्णतया चूक नाही. कारण आमच्यातले काही मिडियावाले लोक आहेतही पक्षपाती. परवाच्या लोकसभा निवडणुकीवेळी मिडियातून झालेल्या एकतर्फी प्रचारातून आम्ही ते अनुभवलेयसुद्धा. पण म्हणून हे काही अपवाद बहुसंख्य आहेत असं चित्र उभं करणं कितपत बरोबर आहे?

कारण प्रश्र्न आहे तो लेबलिंगचा वा पक्षपातीपणाचा नव्हे. प्रश्र्न आहे तो आपण स्वतः किती निःपक्षपाती आहोत त्याचा. कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वी आपण त्या विषयाचा सर्व बाजूंनी अभ्यास केलेला आहे का त्याचा. कुणीतरी आपणाला भरवणार आणि तेच आपण भरपेट जेवणार हे किती काळ चालू रहाणार? एकच बाजू ऐकून घेऊन आपण आपली प्रतिक्रिया देणार? खरं काय आणि खोटं काय हे जाणून घेण्याऐवजी मला काय आवडते आणि काय नावडते या निकषांवर सभोवतालच्या गोष्टींचं विश्र्लेषण करणार? हल्ली रेडिमेड संस्कृती वाढत चाललीय का? थोडेसे कष्ट घेऊन सगळ्या बाजू समजून घेऊन मगच निष्कर्षावर येण्याची संस्कृती इतिहासमजा होणार का? प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगलेही गुण असतात आणि काही दोषही असतात या गोष्टीवरचा आमचा विश्र्वासच उडून गेलेला आहे का? एखादा वाईट म्हणजे त्याचे चांगले गुण हे दिखावू आणि एखादा चांगला तर मग त्याच्या वाईट दोषांवरसुद्धा पांघरूण ही वृत्ती वाढत चालली आहे का?

गोव्यात 1967 साली ओपिनियन पोल झाला त्यावेळी ही संस्कृती असती तर काय झाले असते गोव्याचे? तेव्हा एकसाथ सगळा ख्रिश्र्चन समाज गोवा महाराष्ट्रात विलीन करण्याच्या विरोधात होता. परंतु तो होता केवळ 35 टक्के. टोन टक्के मुसलमानांबरोबर हिंदूंमधला अवघा दोन-तीन टक्के उच्चवर्णीय विलीनकरणाच्या विरोधात होता. म्हणजे सगळेच मिळून 40 टक्के. तरीही मतदानाच्या वेळी 54 टक्के मते विलीनीकरणाच्या विरोधात गेली. कुणी घडवला हा चमत्कार?  हिंदू बहुजनसमाजातील जवळजवळ 15 टक्के लोकांच्या मतपरिवर्तनाने. त्याचे बहुतांश श्रेय जाते विलीनीकरणाच्या विरोधात सुरू केलेल्या ‘राष्ट्रमत’ या मराठी दैनिकाला. आणि त्याहूनही जास्त विलीनीकरणवादी ‘गोमंतक’ बरोबर विलीनीकरणविरोधी ‘राष्ट्रमत’ही वाचणाऱ्या तत्कालीन चिकित्सक गोंयकाराला. दोन्ही बाजू पडताळून पहाण्याची चिकित्सक संस्कृती नसती तर विलीनीकरण थोपवणे केवळ अशक्य होते. मगो पक्ष आपणाला आवडतो म्हणून त्यांची विलीनीकरणवादी भुमिकाही आपणाला सत्य वाटते असेच सगळ्यांनी ठरवले असते तर, विचार करा, काय झाले असते?

2004 साली मी ‘सुनापरान्त’चा संपादक झालो तेव्हा स्वतः भेटून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा संघचालक सुभाष वेलिंगकर सरांना आमच्यासाठी स्तंभ लिहिण्याची विनंती केली. मी स्वतः संघाची विचारप्रणाली मानीत नाही हे ठावूक नसल्याने त्यांनाही आश्र्चर्य वाटले. परंतु हिंदुत्ववाद ही तेव्हापर्यंत भारतातली एक प्रमुख विचारसरणी बनली होती. तिची दखल घेणे हे निःपक्षपाती पत्रकार म्हणून माझे कर्तव्य होते. माझ्या या भुमिकेने कोंकणी चळवळीत प्रचंड नाराजी पसरली. कुडचड्यात दंगल झाली त्यावेळी ‘सुनापरान्त’ दंगलखोरांवर आणि त्यामागील संघशक्तींवर तुटून पडला. तेव्हा गोव्यात स्थायिक झालेल्या नंदिता हक्सर या सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकिलांच्या प्रमुखतेखाली एक सत्यशोधन समिती नेमली. त्यांनी मला न भेटता वा माझी बाजूही समजून न घेता सत्यशोधनाचा निष्कर्ष काढला – ‘सुनापरान्त’मधील वेलिंगकरांच्या लेखमालेतून कुडचड्याच्या दंगलीचे बी रुजवले गेले. प्रत्यक्षात ते स्तंभ कशावर होते ते त्या समितीतील कुणीच वाचले नव्हते. आणि त्यातल्या कुठल्या लेखाने अल्पसंख्यांकांविरुद्ध लोकांना भडकावले तेही सांगितले नव्हते. कारण हे सत्यशोधकवालेही या चिकित्साशून्य पक्षपाती संस्कृतीचे बळी होते.

प्रत्यक्षात   हे संविधान आम्ही भारतीयांनी आपणालाच अर्पून घेतल्याने त्यातील कर्तव्ये पाळणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे. राष्ट्रभक्ती, राष्ट्रसेवा, एकता, एकात्मता, सहिष्णुता, बंधुभाव, समानता, मानवता, वैज्ञानिक दृष्टिकोण, प्रत्येक मुलाला शिक्षण वगैरे वगैरे. जो कोणी या कर्तव्यांचे पालन करतो व आपले अधिकार वापरून ते अंमलात आणतो तो आपला मित्र व जो कोणी या कर्तव्यांच्या पूर्तीत बाधा आणतो तो या समाजाचा शत्रू एवढा साधा दृष्टिकोण ठेवला तरी पुरे. मग तो आपला आवडता पक्ष असो, पुढारी असो, मित्र असो, कुटुंबीय असो वा आपण ओळखत नसलेला नागरिक. अर्थात तो जे बोलतो ते तो खरेच करतो का याची शहानिशा करणेही तेवढेच महत्वाचे. नाहीतर नुसताच बोलाचा भात आणि बोलाची कडी आपण भुरकत बसणार आणि एक दिवस आपणच तोंडघशी पडणार.

अर्थात, त्यासाठी पूर्वग्रहदूषित वृत्ती आणि व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोण आपल्या मनातून हद्दपार करायला हवेत, मन खुले करायला हवे, या जगात प्रामाणिक लोक आहेत यावर विश्र्वास ठेवायला हवा आणि सर्वांच्या सर्व बाजू समजून घेऊन संविधानातील मार्गदर्शक तत्वांच्या सहाणीवर घासून विवेकनिष्ठ राहून त्यातून निष्कर्ष काढायला हवा. ही संस्कृती नवीन नव्हे, उलट आपल्या भारत देशाची महान परंपरा आहे. आजकाल आपण ती विसरत चाललो आहोत आणि वैज्ञानिक उपकरणांचा वापर अंधश्रद्धा पसरवण्यासाठी करीत आहोत. ती बंद व्हायला हवी आणि चिकित्सक संस्कृती रुजायला हवी. खुल्या मनाची, खुल्या दिलाची. दिलखुलास!

(हा लेख लोकमत गोवा आवृत्तीच्या 12 जुलै 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाला)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

Very true, most goals get carried away emotionally on matter related to church, political affiliations and blind dedication of leaders (both political and religious). Therefore, as you say, objective evaluation of everything is needed. I it possible in Goa, I doubt!

- Rupesh, Goa | 13 th July 2015 01:20

 

Related Blogs