आंधळी मोबाइल संस्कृती

By Sandesh Prabhudesai
28 June 2015 21:44 IST

आमच्या माशे गांवच्या मित्रांचा वॉट्स ऍप वर एक ग्रुप आहे. त्यात अचानक एक दिवस एकाने कुणा एका स्वामीच्या नावाचा 108 वेळा जप करणारा लांबलचक मॅसेज टाकला आणि शेवटी लिहिले – “हे मंत्र 11 ग्रुपांना पाठवा. उद्या पर्यंत चांगली गोष्ट घडेल.” अर्थात, त्यानेही तो फॉरवर्डच केला होता. आणि हे असले मॅसेजच आजकाल चिक्कार झालेत. कुणी ते फॉरवर्ड करतात, इतर लोकं दुर्लक्ष करतात. परंतु आमच्या ग्रुपवर मात्र अचानक वेगळीच प्रतिक्रिया आली. लगेचच एकाचा मॅसेज आला – “हा मॅसेज कुणी टाकलाय? हा नक्की माशेकार नाही.” त्यावर चार-पाच थम्ब्स अप इमोजी. इतक्यात आणखीन एकाचा मॅसेज – “बरोब्बर, हा माशेकार नाहीच. घालवा त्याला ह्या ग्रुपातनं.” “हो, हो, असला मेम्बर ह्या ग्रुपमध्ये नको.” त्यावर परत थ्म्ब्स अप. बघितलं तर खरंच. आमच्या कुणा एका माशेकाराच्या नावे पूर्वी तो नंबर होता. परंतु प्रत्यक्षात त्याने तो नंबर सोडून नवीन घेतलेला होता. चुकून ज्याच्याकडे जुना नंबर सेव्ह केलेला होता त्याने तो एडमिनला पाठवल्याने घोटाळा झालेला होता.

यात तसे नवीन काहीच नाही. कारण य़ा असल्या गोष्टी आजकाल चिक्कार घडतात. परंतु मला त्या प्रतिक्रियांचा अभिमान वाटला. स्वामीच्या नावाचा जप टाकला होता म्हणून आमच्या मित्रांनी प्रतिक्रिया दिलेल्या नव्हत्या. पण तोच मॅसेज 11 जणांना पाठवल्यावर तुमचे कल्याण होईल म्हणून पसरवल्या जाणाऱ्या अंधश्रद्धेला विरोध झालेला होता आणि त्याला मित्रमंडळीकडून एकमुखी पाठिंबाही मिळालेला होता. ते फक्त त्याचे एकट्याचे मत नव्हते. ही अशी अंधश्रद्धा पसरवणारी व्यक्ती आमच्या गावची असूच शकत नाही हा आत्मविश्र्वास जास्त कौतुकास्पद होता. आमच्या काणकोण तालुक्याला गोव्यातील मागासलेला म्हणून ओळखतात. का, तर तिथे आर्थिक विकास झालेला नाही. परंतु शिक्षणाच्या बाबतीत हा तालुका सर्वात पुढारलेला आहे असे प्रशस्तीपत्रक कालपरवाच मुख्यमंत्री असताना मनोहर पर्रीकरनीसुद्दा विधानसभेच्या अधिवेशनात जाहीररित्या दिले होते. काणकोणला भेट देणारे कित्येक विद्वानही आमच्या या वैचारिक संस्कृतीचं कौतुक करतात.

आमचा एक ‘लेखक’ नावाचा असाच एक वॉट्स ऍप ग्रुप आहे. तिथे केवळ साहित्य टाकले जाते व त्यावर दिलखुलास चर्चा होते. नवरा मेल्यावर विधवा झालेल्या बायकोची कशी विटंबना केली जाते, सर्वांपुढे अंगावर पाणी ओतणे, कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे अशा सर्व गोष्टी ती नको नको म्हणून ओरडत असतानासुद्धा करण्याचा आसुरी आनंद परंपरेच्या नावाने कसा घेतला जातो त्यावर एकाने कविता टाकली होती. तिथे परत तेच घडले. आमच्याच गावच्या एका लेखकाने लगेच टाकले – “आमच्या गावात या प्रथा जवळजवळ बंदच झालेल्या आहेत. ही संस्कृती आता गोवाभर पोचली पाहिजे.” अर्थात, अपेक्षेप्रमाणे त्यावर ग्रुपमध्ये चर्चाही झाली.

या आणि अशा कित्येक गोष्टींवर मी विचार करायला लागलो. कशी काय रुजली ही संस्कृती आमच्या गावात? इतर गोव्याच्या दृष्टीने तर आमचा गाव मागासलेला. मी मडगावला कॉलेजमध्ये गेलो (तेव्हा आम्हाला महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरातच जावे लागे) तेव्हा काणकोण म्हटले की प्रवेशासाठी ताटकळत रहावे लागे. परंतु प्रत्यक्षात काणकोणची संस्कृती वेगळी होती. त्याला कारणे दोन – एक, गोवा मुक्तीलढ्याची आम्हाला लाभलेली पार्श्र्वभूमी आणि त्यातनं तयार झालेले ऋषितुल्य असे स्वातंत्र्यसैनिक. दुसरे, त्यातनंच तयार झालेली वस्तुनिष्ठपणे विचार करायला लावणारी शिक्षकांची पिढी. त्यांनी आम्हाला केवळ पुस्तकी शिक्षण दिलं नाही. आयुष्याकडे बघण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोण दिला. देव, धर्माला फाटा दिला नाही, परंतु कर्मकांडांच्या थोतांडाना थाराही दिला नाही.

आमचा गाव राष्ट्रीय हमरस्त्यावर आहे. मी शाळेत शिकतानाची गोष्ट. माशेचा बाजार काढून कारवारला जाताना चढण झाल्यावर दापट नावाचे माळरान लागते. आता तिथे एस एस आंगले उच्च माध्यमिक विद्यालय आहे, निराकार मैदान आहे आणि नवीन घरे सगळी तिथेच झालेली आहेत. परंतु त्याकाळी त्या भव्य माळरानावर क्वचितच काही घरे होती. तिथे एक खुरीस होता. अचानक बातमी पसरली, की दापटातील खुरीस हलतो. आम्ही सगळेच बघायला धावलो. बघितले तर प्रत्यक्षात खुरीस हलत होता. हा हा म्हणता बातमी शेजारच्या गावातही पसरली. लोकं चालत, सायकलवरनं वा बसमधून पहायला यायला लागली. रस्त्याच्या बाजूलाच असलेला हा खुरीस बघायला कारवारला जाणाऱ्या बसेसही थांबू लागल्या. (नशीब त्याकाळी मोबाइल नव्हते. नाहीतर संध्याकाळपर्यंत ही बातमी जगभर पसरली असती.)

आमच्यासाठी हा चमत्कार होता, परंतु आमचे मास्तर-बाई अस्वस्थ होते. ते हा चमत्कार मानायलाच तयार नव्हते. शेवटी आम्हाला विज्ञान शिकवणाऱ्या साळोखे मास्तरांनी शक्कल लढवली. त्यांनी आमच्या प्रयोगशाळेतून मोजपात्र (मेजरिंग फ्लास्क) आणले. ते खुरसावर ठेऊन पाण्याने काठोकाठ भरले. आणि संपूर्ण गावाला सांगितले – है वैज्ञानिक मोजपात्र आहे आणि मी ते काठोकाठ भरले आहे. आता जरा जरी खुरीस हलला तर मोजपात्रातील पाणी खाली पडणार. आमची उत्सुकता आणखीनही वाढली. सगळेच खुरीस हलण्याची वाट पाहू लागले. आणि एवढ्यात खुरीस हलला. एकच गलका झाला. मास्तर फ्लास्काजवळ गेले. परंतु एकही थेंब खाली गळाला नव्हता. एवढ्यात परत खुरीस हलला. एकदा, दोनदा, तीनदा, खुरीस हलतच राहिला, परंतु पाणी नाही गळाले. मास्तरांची नजर मग सभोवताली फिरू लागली. झटक्यात त्यांचे डोळे चकाकले. खुरीस हलण्याचे कारण सापडले.

दोन दिवसांपूर्वी खुरसाची लादेयन होती. त्यासाठी तात्पुरता असा चुट्टांचा माटोव तिथे उभारला होता. तो एवढा काही भक्कम नव्हता. वारा आला की तो छोटासा माटोव हलायचा. परंतु आमची नजर खुरसावर असल्याने आम्हाला वाटायचे, खुरीस हलतोय. मास्तरांनी हे सांगितल्यावर आम्ही माटवाकडे बघायला लागलो. आणि खुरीस हलायचा बंद झाला. तरीही काही जणांची खात्री पटत नव्हती. म्हणून मग माटोव काढला गेला. आणि खुरीस हलायचा कायमचा बंद झाला. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या अशा आम्ही पुस्तकातनं नव्हे, तर बाहेर निसर्गाच्या सान्निध्यात शिकलो. ज्या चालीरीती समाजाच्या उद्धारासाठी अपायकारक त्या सोडायच्या आणि ज्या समाजाला एकत्र आणतात त्या पाळायच्या ही गावाची परंपरा बनली. नव्हे, आमच्या विचारवंत शिक्षक आणि नागरिकांनी ती तशी बनवली. त्याचाच परिणाम म्हणून स्वामी नामाचा जप 11 जणांना पाठवण्याच्या अंधश्रद्धेला उत्स्फूर्त विरोध झाला. इतरांना मॅसेज पाठवून आपलं चांगलं होऊ शकत नाही, आपलं चांगलं व्हायचं असेल तर आपण काही तरी चांगलं केलं पाहिजे या विचारधारेवर सगळ्यांचाच ठाम विश्र्वास होता म्हणून हे घडू शकलं.

खरं म्हणजे विज्ञान जेवढी प्रगती करतं तेवढी अंधश्रद्धा कमी व्हायला पाहिजे. परंतु प्रत्यक्षात उलटंच घडतंय. विज्ञानानं जगातले देश सोडाच, परंतु अंतराळसुद्धा जवळ आणलंय. आता अंतराळात उपग्रह सोडून त्याद्वारे आपण जगात कुठेही घडणारी घटना लायव्ह बघू शकतो. माणसानं मंगळावर स्वारी केली तो क्षणही आम्ही असेच टीव्हीवर बघत होतो. आणि दुर्दैवाने भारतातले बहुतांश टीव्ही चॅनल एकेका ज्योतिषाला आपल्या स्टुडियोमध्ये बोलावून या मंगळ ग्रहाची आम्हाला कशी बाधा होईल त्याचे भविष्य वर्तवीत होते. आणि आम्ही ते उपग्रहाद्वारे बघत होतो. भक्तीभावाने. खरं म्हणजे संपर्काची ही सर्व वैज्ञानिक उपकरणे अंधश्रद्धा मोडून काढण्याची शस्त्रे व्हायला हवी होती. परंतु प्रत्यक्षात ती अंधश्रद्धा मजबूत बनविण्याची साधने व्हायला लागलीत. संपर्क क्षेत्रात विज्ञानाने केलेल्या प्रगतीचा गैरफायदा जास्त घेतला जातोय आणि वैज्ञानिक दृष्टिकोणाला आजसुद्धा चार हात दूर ठेवणारे आम्ही त्यांना हातोहात बळी पडत आहोत. देव आणि दैव आता मोबाइलमधून येऊन आपले कल्याण करील यावर आपणच विश्र्वास ठेवीत आहोत.

टीव्ही, संगणक, इंटरनेट, मोबाईल ही संपर्काची नवनवीन साधने श्रद्धा नव्हे, अंधश्रद्धेची साधने बनत आहेत. वैज्ञानिक उपकरणे नव्हेत, आधुनिक झाडा बनत आहेत. डोळस नव्हे, आम्हाला आंधळी बनवीत आहेत. ही आहे आपली आजची मॉडर्न इन्फोटेक क्रांतिकारी संस्कृती!!!

(हा लेख लोकमत गोवा आवृत्तीच्या 28 जून 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाला)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

Sandesh, very nice article. You and your Mashem group should be the torch, flame or the source of light that will enlighten the rest of Goa from the refuge of superstition and miracle accepting mindset. If not for your science teacher, most people would have continued to believe in the "shaking khuris", and I'm sure some might still do. We need more people like your science teacher.

Clearly, rationality and scientific temper has taken a back seat for long in Goa, and the situation is particularly scary as the so-called educated and thinkers are leading the pack in these areas.

Not 'God' but 'Science' only can save Goa.

- Jayesh, Goa | 29 th June 2015 22:49

 

Related Blogs