चार्लस कुरैयांची संस्कृती

By Sandesh Prabhudesai
22 June 2015 11:28 IST

चार्लस कुरैया हे जागतिक कीर्तीचे वास्तुशिल्पकार होते आणि भारतातील पद्मविभूषणपासून परदेशातील कितीतरी आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते हे एव्हाना सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु माझ्या आयुष्यात ही व्यक्ती एक भली मोठी लाट कशी आली आणि माझं तन-मन ओलंचिंब भिजवून गेली. ते असायला हवे होते असं वाटतं ते आणखीन वास्तू बनववण्यासाठी नव्हे, तर निर्जिव वास्तू बनत चाललेल्या मानवी मनांना जिवंत ठेवण्यासाठी. एक वास्तुशिल्पकार म्हणून मला ते भावलेच, परंतु त्याहूनही एक भावपूर्ण लोकाभिमुख रसरसता इंगळा म्हणून ते माझ्या तरी मनात आयुष्यभरासाठी ठसून राहिले. माणसाकडे कौशल्य असलं की तो आपापल्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो, परंतु त्या क्षेत्रात आपला म्हणून एक खास ठसा उमटवण्यासाठी मात्र त्याच्यापाशी आणखीन काय असावं लागतं ते चार्लस कुरैया यांना शक्य असेल तेवढ्या जवळून अनुभवल्यावर बरंचसं लक्षात आलं.

चार्लस कुरैया या व्यक्तीबद्दल ऐकून ठावूक होतं. नंतर एकदा पणजीत वास्तुशिल्पकलेबद्दलचं त्यांचं व्याख्यान ऐकलं आणि त्यातल्या तांत्रिक बाजू समजत नसतानाही मी भारावून गेलो. त्याच दृष्टिकोणातनं पुन्हा एकदा कला अकादमी आणि सिदाद द गोवाच्या इमारती न्याहाळून पाहिल्या. माझ्या काही वास्तुशिल्पकार मित्रांशी चर्चा केल्यावर डोक्यात आणखीनही उजेड पडला. परंतु माझी आणि त्यांची पहिली भेट झाली ती मात्र चक्क भांडणातनं. मी ‘सुनापरान्त’मध्ये असतानाची 2004 सालची गोष्ट. गोव्यातील पहिल्याच इफ्फीच्या तयारीसाठी कला अकादमी संकुलाची मोडतोड चालली होती. ती बघून चार्लस कुरैया भडकलेत असं कानावर आलं होतं. म्हणून त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी बेती वेरें येथील त्यांच्या घरी गेलो. माझ्या प्रश्र्नांना उत्तरे देण्याऐवजी उलट त्यांनीच माझ्यावर प्रश्र्नांची सरबत्ती सुरू केली. आधी जाऊन काय काय केलंय ते पहा आणि मगच प्रश्र्न विचारा. मला त्यातलं काही कळत नाही म्हणून तुमचं मत समजून घ्यायला आलोय ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून द्यायला तासभर लागला, एवढे ते भडकले होते. मात्र नंतर त्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजावून सांगितल्या आणि कला अकादमीची केलेली दुर्दशा आमच्याही लक्षात आली.

नंतर जवळजवळ सहा-सात वर्षांनी त्यांची परत भेट झाली ती प्रादेशिक आराखड्याच्या संदर्भात. त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार केलेल्या नमुना आराखड्यावर जनमानसात गदारोळ उडाला होता. प्रत्यक्षात त्यांनी तयार केलेला आराखडा अफलातून आहे हे तो तयार करणाऱ्या टास्क फोर्सच्या सभासदांकडून समजले होते. म्हणून यावर प्रुडंट चॅनलवर सविस्तर एका तासाचा कार्यक्रम करण्याचं ठरवलं. त्या कार्यक्रमात त्यांनी ज्या पद्धतीनं आराखडा मांडला तो बघितल्यावर मी मनातल्या मनात या व्हिजनरी व्यक्तीपुढं नतमस्तक झालो. नंतर 2011 साली त्यांना गोव्यातला सर्वोच्च मानला जाणारा गोमंतविभूषण पुरस्कार प्राप्त झाला. त्यांची मुलाखत मीच घ्यावी हा त्यांचा आग्रह होता. इंग्रजी आणि हे असामान्य व्यक्तिमत्व यामुळे मी घाबरलो. परंतु चार्लस आणि मोनिका कुरैया या दोघांनाही भेटलो तेव्हा मनावरचा सगळा ताण गेला. मुलाखतही वास्तुशिल्पकला सोडून इतर गोष्टींवर होती. त्या दोघांनी ती रंगवलीही छान. मजा आली.

माझ्या त्यांच्याबरोबरच्या सहवासात मी त्यांच्या काही गोष्टी अगदी जवळून न्याहाळत होतो. त्यांच्या मुलाखतीवेळी त्यांच्या बायकोच्या पदरावर लावलेला लेपल माइक खालच्या बाजूला गेला होता. तो वरच्या बाजूला करेपर्यंत त्यांनी बायकोला बोलू दिलं नाही. मुलाखतीवेळी बाजूला स्क्रीन लावून दाखवण्याचे फोटोंचा स्लायड शो त्यांनी स्वतः बसून तयार करून घेतला होता. पुरस्कारावेळी तयार केलेला त्यांच्या जीवनपटावरील ब्रोशर त्यांनी खास मुंबईहून तयार करून आणण्यास सांगितला होता. प्रादेशिक आराखड्यावर केलेल्या टीव्ही शोवेळीही त्यांनी स्लायड्स आणल्या होत्या. शो सुरू होण्यापूर्वी परत एकदा त्यांनी सगळ्या स्लायड्स निरीक्षणपूर्वक तपासल्या होत्या. हा माणूस नुसता चांगला तंत्रज्ञ होता म्हणून मोठा झाला नव्हता. तो परफेक्शनिस्ट होता. छोट्यातली छोटी गोष्ट त्यांना मोठी वाटायची. आपण ज्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, अचूक त्याच गोष्टींकडे त्यांचा कटाक्ष असायचा. स्टीव्ह जॉब्स आपल्या ऍपल संगणकाच्या बॉक्सची आतली न दिसणारी बाजूसुद्धा काळ्या रंगाने रंगवायचा त्याची आठवण झाली. अर्थात, असली माणसे त्यांच्या कार्यालयात अजिबात लोकप्रिय नसतात. परंतु या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन हातात घेतलेली गोष्ट ती परिपूर्ण करतात म्हणूनच ती एवढी ताडमाड उंच होतात. आपण या सर्व गोष्टींबाबत कॅज्युअल असतो म्हणूनच खुजे रहातो.

हॅरिटेज म्हणजे वारसा. तो जपण्यावर सर्वत्र चळवळी चाललेल्या आहेत. आजकाल ट्रेनर म्हणून लोकप्रिय झालेला माझा मित्र प्रवीण सबनीस हाही मुळात एक वास्तुशिल्पकार. त्याने एकदा मला विचारले – वारशाचे संवर्धन करावे वगैरे गोष्टी ठीक आहेत. परंतु आपण केवळ संवर्धनच करायचे का? बदलत्या काळानुसार आगामी पिढ्यांसाठी नवीन वारसा तयार करण्याची जबाबदारी कोणाची? ही जबाबदारी चार्लस कुरैया सारख्या व्यक्तींनी घेतली होती. वारसा म्हणून जपून ठेवलेल्या सगळ्या वास्तुशिल्पांचाच केवळ त्यांनी अभ्यास केला नव्हता, तर जगातील सर्वच तत्वज्ञानांचाही अभ्यास केला होता. भारतात आकारास आलेल्या शुन्याच्या संकल्पनेवर ते भरभरून बोलायचे. रिक्तपणाला आपल्या आयुष्यात किती स्थान आहे ते सांगायचे. धरती आणि आकाश यांच्यामधली भलीमोठी रिक्त पोकळी हीच आपली उर्जा आहे आणि तीच मी माझ्या वास्तुशिल्पकलेत फ्रेम करून दाखवतो असे ते सांगत. भारतीय वास्तुशिल्पकलेतील राजांगणाची घरे हे त्याचेच कसे द्योतक आहे आणि पोर्तुगीज वा ब्रिटीश वास्तुशिल्पकारांना ही संकल्पना कधीच कशी समजली नाही ते सांगायचे. त्यांनी वारसा केवळ जपला नाही, त्याचा खोलवर अभ्यास केला आणि त्यातून चार्लस कुरैया नावाचा एक वारसा तयार केला.

युक्तिवाद करायला लागले की चार्लस कुरैया उद्धट वाटायचे. आपलं तेच खरं करणारे वाटायचे. परंतु सहवास वाढत गेला की लक्षात यायचे. प्रतिस्पर्ध्याचा मुद्दा पटत नाही तोपर्यंत ते आपला मुद्दा मांडत रहायचे. दुसऱ्याचा मुद्दा समजूनही घ्यायचे. आणि जर पटला तर बिनदिक्कत आपला मुद्दा मागे घ्यायचे. कसलाही आकस न ठेवता. दुसऱ्यांचा आदर करायची त्यांची पद्धत तर अफलातून होती. एकदा माणूस आवडला की त्याचे भरभरून कौतुक करायचे. विणकर असलेल्या त्यांच्या बायकोचे एक विणकाम अमेरिकेतील बँकेने तैलचित्र म्हणून लावण्याचा एक सोहळाच झाला होता. त्या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीचा हा वास्तुशिल्पकार आपल्या सेलेब्रिटी बायकोचे कौतुक करीत निमूटपणे मागे कुठे तरी उभा होता. त्यांच्या मते प्रत्येकाने आपल्या बायकोची तिची कौशल्यस्थाने दाखवून दुसऱ्याशी ओळख करून द्यावी, आपली बायको म्हणून नव्हे. आपण आपल्या बायकांना अरेरावी करून नव्हे तर मेहरबानीच्या वृत्तीतून खुजे करतो असे त्यांचे प्रांजळ मत.

गोवा हे जगाच्या पाठीवर शिक्षणाचे माहेरघर व्हावे ही त्यांची इच्छा कधी पूर्ण होईल ठाऊक नाही.  परंतु शिक्षणाच्या बाबतीत कुणीच मागे राहू नये ही बाजू मांडताना आपल्या स्वतःच्या कृतीमध्ये मात्र चार्लस कुरैया कधीच मागे राहिले नाहीत. त्यांनी त्यांच्या कार्यालयातील शिपाई, ड्रायव्हर आणि घरगड्यांच्या मुलांनासुद्धा स्वतःच्या खर्चाने शिकवले. ती आता कुठे कुठे पोचलीत त्याच्या सुरस कथा ते मोठ्या अभिमानाने सांगायचे. हे करण्यासाठी केवळ पैसा लागत नाही, फार मोठे आणि निस्वार्थी मन लागते. यांची मुले शिकली तर आपणाला घरगडी वा ड्रायव्हर वा शिपाई कोण याचा त्यांनी कधीच विचार केला नाही. लोकं गरीब आणि अशिक्षित रहातात ती त्यांच्या परिस्थितीमुळे की श्रीमंत आणि शिक्षितांच्या गरजेमुळं इथं या जगाच्या अर्थकारणाची खरी गोम आहे. मदर तेरेझांना भरभरून देणग्या देणारे उद्योगपती आपल्या कामगारांना कोणत्या परिस्थितीत जगवतात हा जास्त महत्वाचा प्रश्र्न आहे.

हे सर्व करण्यासाठी चार्लस कुरैयासारखी जागतिक कीर्ती संपादन करण्याची गरज अजिबात नाही. पण त्यांच्यासारखा माणूस झालो तर मात्र आपण सगळेच हे करू शकतो. अर्थात, आपापल्या परीने. फक्त ती वृत्ती हवी. ते तत्वज्ञान हवे. ते मन हवे. थोडक्यात, विरळ होत चाललेली ही संस्कृती हवी.

(हा लेख लोकमत गोवा आवृत्तीच्या 21 जून 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाला)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs