मोबाइल संस्कृती ही वाचन संस्कृतीच

By Sandesh Prabhudesai
28 April 2015 18:55 IST

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्याने गोवा सरकार उत्कृष्ट ग्रंथपाल व उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार देते. हा सोहळा यंदाही झाला. या सोहळ्यात बोलताना रोजचेच रडगाणे परत लावले गेले – दिवसेंदिवस वाचन कमी होत चालले आहे. नवीन पिढी वाचत नाही. वर्तमानपत्र उघडत नाहीत. ग्रंथालयातली पुस्तके धूळ खात पडलेली आहेत. वाचेल तोच वाचेल ह्या मंत्राचा प्रसार करायला हवा. नव्या पिढीला वाचायला लावायला हवे. अन्यथा या देशाचे भवितव्य अंधःकारमय आहे वगैरे वगैरे. पूर्वी ही वाचनसंस्कृती कमी होण्याचे खापर टीव्हीवर फोडले जायचे. आता दोष द्यायला नवीन उपकरणे सापडली आहेत. मोबाइल, टेब्लेट व संगणक. आजची पिढी दिवसभर त्यातच गुंग असते. फेसबूक आणि वॉट्स ऍप हेच त्यांचे जीवन झालेले आहे. पुस्तकाकडे कुणी ढुंकूनसुद्धा पहात नाही हा सूर याही समारंभात लावला गेला आणि अप्रत्यक्षरित्या पुस्तकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या रडगाण्यामध्ये तथ्य आहेही आणि नाहीही. परंतु त्यातून शब्दनिष्ठ अनुमान काढायचे असेल तर सर्वात आधी काही मूलभूत गोष्टी समजून घेणे महत्वाचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे पुस्तक याचा दुसरा अर्थ वाचन का? की हे दोन वेगवेगळ्या अर्थांचे शब्द आहेत? दुसरी गोष्ट - पुस्तक हे खात्रीने वाचण्यासाठी असते, परंतु वाचन केवळ पुस्तकातूनच होऊ शकते का? आणि शेवटी - वाचन कशासाठी करायचे? वाचण्यासाठी की ज्ञानसंपादनासाठी? अर्थात, ज्ञानसंपादनासाठी (आणि मनोरंजनासाठीही.) याचा अर्थ पुस्तक म्हणजेच ज्ञानसंपादन आणि ज्ञानसंपादन म्हणजे केवळ पुस्तक? बाकी सर्व संपर्काची माध्यमे ही अज्ञान पसरवणारी असतात का? आणि पुस्तकाची निर्मिती होण्यापूर्वी या संपूर्ण जगात घोर अज्ञान पसरले होते का? आणि याच अज्ञानी लोकांनी पुस्तकाचाही शोध लावला? ज्ञानेश्र्वरी काय पुस्तके छापून प्रसारित केली गेली? नामदेव, तुकाराम, कबीरासारखे संत काय आपल्या अभंगांची पुस्तके विकत असत? लोकगीत, लोककथा, लोकनृत्य, लोकनाट्य असा लोकवेदांचा गर्भश्रीमंत खजिना हजारो वर्षे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कोणत्या पुस्तकांतून पोचवला गेला?

1452 साली, म्हणजे अवघ्या साडेपाचशे वर्षांपूर्वी, छपाई तंत्रज्ञानाचा शोध लावला गेला. त्यानंतर पुस्तकांची छपाई सुरू झाली. आपल्या आशिया खंडातील पहिला छापखाना पोर्तुगीजांनी गोव्यात 1556 साली आणला. त्यानंतर पुस्तक या प्रकाराशी आपली हळूहळू ओळख व्हायला लागली. हळूहळू एवढ्यासाठी की हे छापील पुस्तक वाचण्यासाठी साक्षर असणे गरजेचे होते. आणि त्या काळात भारतात आणि गोव्यातही साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प होते. भारतात आणि गोव्यातही साक्षरता वाढली ती या 50 वर्षांत. आजच्या घडीला गोव्याची साक्षरता 88 टक्के तर भारताची 74 टक्के आहे. याचा अर्थ सगळेच साक्षर सु-शिक्षित आहेत असे नव्हे आणि सगळेच निरक्षर अ-शिक्षित आहेत असेही नव्हे. उलट या पुस्तकाचा संबंध ज्ञानाशी लावून आपण सगळा घोळच करून टाकलेला आहे. जो निरक्षर आहे तो अडाणी आणि जो साक्षर आहे तो ज्ञानसंपन्न अशी दिशाभूल करणारी संस्कृती आपण इथे रुजवली आहे. त्यामुळेच तर आपण जागतिक स्पर्धेत मागे पडत गेलो. आत्ता कुठे या अंधश्रद्धेतून आम्ही बाहेर पडत आहोत. ज्ञान आणि साक्षरता यांचा थेट संबंध असतोच असे नव्हे याचा साक्षात्कार आताशा आम्हाला होवू लागलेला आहे.

आमचे प्राचीन भारतवर्ष वा सिंधु प्रदेश तर ज्ञानक्षेत्रामध्ये एके काळी जागतिक पातळीवर संपन्न प्रदेश मानला जायचा. या भारतवर्षाला मौखिक साहित्याची परंपरा अक्षरशः हजारो वर्षांची आहे. कथाकथन, गीतगायन, समूहगायन, समूहनृत्य, नृत्यनाट्य, संवादनाट्य, व्यक्तीचित्रण, म्हणी, उखाणे अशा विविध मौखिक परंपरांतून भारतीय साहित्य आजही समृद्ध आहे. या साहित्याचा प्रसार पुस्तकातून नव्हे तर सादरीकरणाच्या कलेतून झालेला आहे. मध्ये पुस्तकाने वा छापील साहित्याने येऊन आपले हे समृद्ध विश्र्व काही काळ काबीज केले होते हे खरे असले तरीही आज रेडियो, टेलिव्हिजन व सिनेमाच्या माध्यमातून ते परत सादरीकरणाच्या कलेकडे आलेले आहे. पूर्वी आपण या कला पाहण्यासाठी एका ठिकाणी एकत्र जमायचो तर आज आपापल्या घरातच बसून पाहू शकतो वा ऐकू शकतो. यातील कोणत्याही कलेचे सादरीकरण साहित्यनिर्मितीशिवाय होऊ शकत नाही आणि कोणतीही साहित्यकृती ही विचार मांडल्याशिवाय होऊ शकत नाही. हेच सादरीकरण आता आपण एलपी रेकॉर्ड, टेप, सीडी, चित्रफिती, डीव्हीडी असा प्रवास करीत एम्पीथ्री आणि एम्पीफोर फायल्स वाजविणारे एम्पीथ्री प्लेयर, संगणक आणि मोबाइलपर्यंत येऊन पोचलेलो आहोत. ज्ञानसंपादनाचे कितीतरी मार्ग आणि कितीतरी माध्यमे या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात निर्माण होत आहेत. त्यामुळे पुस्तक या एकमेव माध्यमाकडून लोक दुसरीकडे गेले म्हणून आपली वाचनसंस्कृतीच नामशेष होत चाललेली आहे असा कंठशोष करणे हा शहाणपणा आहे की मूर्खपणा?

आणि शेवटी आपण आताच्या नव्या माध्यमांमार्फत – म्हणजे संगणक, इंटरनेट, टेब्लेट, मोबाइल या सर्वांचा वापर करून नक्की करतो काय? म्हणजे मोबाइल मूलतः बोलण्यासाठी वापरतात आणि संगणक इतरही कित्येक गोष्टींसाठी वापरतात हे जरी खरे असले तरी साध्या मोबाइलवरील एसएमएस आणि स्मार्ट फोनवरील वॉट्स ऍप, फेसबूक, ट्विटर तसेच सगळी वृत्तपत्रे, मासिके आणि पुस्तकेसुद्धा डाउनलोड करून वाचण्यासाठीच आपण ही आधुनिक उपकरणे वापरतो ना? एखादा चांगला विचार, एखादी चांगली कविता, एखादे गाणे वा एखादा चांगला प्रसंग हे सगळेच काही वाचनीय, ऐकीव आणि दृष्यसदृष्य साहित्य आपण एकामेकांना फॉरवर्ड करतो ते काय वाचण्यासाठी नाही का? त्यातून आपल्या ज्ञानात भर पडत नाही का? उलट ज्या गोष्टींसाठी आपणास सीडी, डीव्हीडी वा पुस्तके विकत घ्यावी लागत असत ती आता आपल्या खिशात ठेवलेल्या छोट्याशा मोबाइलमध्ये सहज मावू शकतात व त्यातले कुठलेही गाणे, सिनेमा वा पुस्तक मागच्या पानावरून कधीही सुरू करून आपण वाचू, ऐकू वा पाहू शकतो. शेकडो पुस्तके, हजारो गीते आणि चित्रपटसुद्धा एवढ्याशा मोबाइलमध्ये साठवू शकतो.  एवढेच नव्हे, तर ही ई-पुस्तके, ही गाणी वा दोन-तीन तासांचे चित्रपटसुद्धा आपण कुठल्याही दुकानावर न जाता ऑनलाइन विकत घेऊ शकतो. तेही दुकानापेक्षा स्वस्तात वा कधीकधी चक्क फुकटसुद्धा. ही वाचन संस्कृतीची अधोगती आहे की क्रांती?

आणि म्हणून पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमी झाले आहे हे तर निव्वळ थोतांड आहे. याउलट या आधुनिक माध्यमांमुळे आपल्यामधली वाचनाची आवड परत वाढू लागली आहे. त्याचाच परिणाम म्हणून केवळ मोबाइल वा टेब्लेटवर वाचण्यापेक्षा पुस्तके हातात घेऊन वाचण्याची संस्कृतीही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यासाठी गोव्याचेच एक उदाहरण घ्यायचे असेल तर सेंट्रल लायब्ररीचे घेउया. तीन वर्षांपूर्वी भव्यदिव्य नव्या इमारतीत आल्यापासून झालेल्या बदलाची ही छोटीशी झलक. पूर्वी ही लायब्ररी वर्षाकाठी 2 ते 3 हजार पुस्तके विकत घ्यायची, आता वर्षाकाठी 10 हजार पुस्तके विकत घेते. तीन वर्षांपूर्वी या लायब्ररीचे केवळ 8000 सभासद होते, आता हाच आकडा 22 हजारांवर गेलेला आहे. म्हणजे जवळजवळ तिप्पट. पूर्वी रोज 80 ते 100 पुस्तके वाचण्यासाठी न्यायचे, आता दिवसाकाठी 350 ते 500 पुस्तके बाहेर जातात. ही वाढ पाच पटीहूनही जास्त आहे. इथल्या लहान मुलांच्या विभागात तर रोज 100 मुले येऊन वाचतात तर गेल्या तीन वर्षांत गोवाभरच्या 25 हजार मुलांनी या लायब्ररीला भेट दिलेली आहे. ही काय वाचनसंस्कृती लयाला गेल्याची लक्षणे आहेत?

आणि शेवटचा एकच मुद्दा. वाचन संस्कृती ही निर्माण करायची असते. मुलांमध्ये ती निर्माण करण्याची जबाबदारी शाळेत शिक्षकांवर आणि घरात पालकांवर असते. आजच्या किती शिक्षकांची पाठ्यपुस्तके सोडून इतर अवांतर वाचन ही संस्कृती आहे? किती घरातून फावल्या वेळात वाचणे आणि रात्री झोपण्यापूर्वी रोज वाचणे ही संस्कृती रुजतेय? किती घरांमध्ये पुस्तकांची कपाटे आहेत? आणि जे लेखकही या पिढीच्या नावे बोटे मोडतात त्यातले किती लेखक आजच्या पिढीची ज्ञानाची भूक भागविणारे लेखन करतात? नवीन पिढीच्या ज्ञानसंपादनाच्या वेगाशी स्पर्धा करणे किती लेखकांना जमते? आणि आज विविध विषयांची माहिती विद्यार्थ्यांना जास्त आहे की शिक्षकांना? मुलांना जास्त आहे की पालकांना? अशा घरांमध्ये आणि अशा शाळांमध्ये जर वाचन संस्कृती नांदत नसेल तर मग त्याला जबाबदार कोण? लहान मुले आणि आजकालची तरुण पिढी, की.... ?

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

खूपच छान केले आहे वाचन संस्कृती चे विश्लेषण ...खरोखरच आजच्या तरुण पिढीचे डीजीटल माध्यामाद्वारा वाचन खूपच वाढले आहे आणि तेही फक्त कथा कादंबऱ्या पुरते मर्यादित न राहता सर्व विषयांना स्पर्शणारे असे चौफेर झाले आहे..वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे असे म्हणणार्यांना आपल्या मार्मिक लेखातून चांगलीच चपराक बसली आहे पण त्यांनी मात्र हा लेख वाचावयास हवा..?

- खूपच छान केले आहे वाचन संस्कृती चे विश्लेषण ...खरोखरच आजच्या तरुण पिढीचे डीजीटल माध्यामाद्वारा व, पुणे | 15 th January 2017 14:24

 

Related Blogs