ही संस्कृती पाश्र्चात्य की भारतीय?

By Sandesh Prabhudesai
13 April 2015 18:54 IST

समाजात आजकाल वाढत चाललेली स्वार्थी वृत्ती, आत्मकेंद्रितपणा, असंवेदनशीलता, बाहेरख्याली वृत्ती, गुन्हेगारी वृत्ती, बलात्कार, खून तसेच वेषभूषेतले बदल, स्वच्छंदी वृत्ती, चंगळवादी वृत्ती अश्या सगळ्याच बदलत्या वातावरणासाठी दोन गोष्टींना जबाबदार धरण्याची प्रथा हल्ली प्रचलित झालीय. 1) पाश्र्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव 2) आपण विसरत चाललेली आपली भारतीय संस्कृती. दिल्लीतल्या निर्भया प्रकरणानंतर तर मुलींचे हसणे-खिदळणे, रात्री-बेरात्री फिरणे व त्यांच्या वेषभूषेवरसुद्धा भलेभले लोक तुटून  पडायला लागलेत. त्यात एखाद्या मंत्र्याची बायकोही तशीच बोलली व तिच्या नवऱ्याने तिचे समर्थन केले तर मग ती नॅशनल हेडलाइनच होते. त्याहूनही पुढे जावून कॉन्व्हेण्ट शाळांना यासाठी जबाबदार धरल्यावर तर वेगळेच वादळ उठते. खास करून हिंदुत्ववादी विचारांचे समर्थन करणारे सरकार सत्तेवर असते तेव्हा तर बिगर-हिंदुत्ववाद्यांना चेव चढतो आणि दुसऱ्या बाजूने येता-जाता प्रत्येक गोष्टीसाठी अल्पसंख्यांकांच्या डोक्यावर खापर फोडणाऱ्यांची माथीच फिरायला लागतात. ते बेभान बनतात. सध्या असलाच सगळा प्रकार गोव्यात व भारत देशातही चाललाय.

ही पाश्र्चात्य संस्कृती म्हणजे नेमकी कुठली? भारत देशाच्या पश्र्चिमेला असलेली? परंतु आमच्या पश्र्चिमेला तर आशिया खंडातले पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि कुवेट, सौदी अरेबियापासून इराक, इस्रायलपर्यंतचे आखाती देश आहेत. आशियेच्या थोडे वर डोक्यावर पश्र्चिमेला युरोपियन देश आहेत. आशिया खंडापलिकडे पश्र्चिमेला गेल्यास खालती दक्षिण अमेरिका आहे तर वरती अमेरिका, कॅनडा सारखे देश. यातल्या आशिया खंडातल्या इस्लामी राजवटीच्या पाश्र्चात्य देशांच्या संस्कृतीचा भारतावर प्रभाव पडलाय असे म्हटले तर तो विनोद होईल. कारण ते आपणापेक्षाही कर्मठ आहेत. त्याच्या पलिकडचे दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, पेरू, बोलिव्हिया, चिली अशा देशांना आपल्या नव-संस्कृतीसाठी जबाबदार धरले तर आपणालाच राग येईल. कारण आजकाल आपण त्यांना मागासलेले व स्वतःला पुढारलेले समजायला लागलोत.  

म्हणजे आपणाला भारताच्या डोक्यावर पश्र्चिमेला असलेले युरोपियन देश अभिप्रेत आहेत. वा त्यालाच समांतर पलिकडे असलेली अमेरिका. या देशांमध्ये बहुतांश लोकसंख्या ख्रिश्र्चन धर्मीय आहे. आमच्या गोव्यातही 26 टक्के ख्रिश्र्चन धर्मीय आहेत. आमच्या देशावर या युरोपातील ब्रिटिशांनी दोन दशके राज्य केले होते तर गोव्याच्या विविध भागांवर पोर्तुगिजांनी दीडशे ते साडेचारशे वर्षे. त्यातून युरोपियन संस्कृतीचा आपणावर प्रभाव पडलेला आहे. आमच्या देशावर इस्लामी राजवटींनीही कित्येक शतके राज्य केले होते. तेही परदेशातूनच आले होते. परंतु त्यांच्या संस्कृतीचा पडला नाही त्याहून खचितच जास्त प्रभाव भारतावर युरोपियन संस्कृतीचा पडत गेला. आपल्या राहणीमानात आमूलाग्र बदल घडत गेला. का? त्या राजवटी ख्रिश्र्चन होत्या म्हणून? की त्यांनी आपल्या देशाचे अर्थकारण बदलले म्हणून?

याचा परामर्ष घेण्यापूर्वी आपण थोडे भारतीय संस्कृतीकडे वळूया. भारतीय संस्कृती म्हणजे कुणाची संस्कृती? इथल्या मूळ आदिवासींची? दक्षिणेकडल्या द्रविडांची? ग्रीक आणि पर्शियन टोळ्यांतून इथे येवून सिंधू संस्कृतीवर कब्जा केलेल्या आर्यांची? इस्लामी आक्रमणांतून इथेच स्थायिक झालेल्या मुसलमानांची? इथेच रुजून मोठा झालेल्या सनातन धर्माची? या सनातनी विचारांना विरोध करून याच भूमीत तयार झालेल्या बौद्ध, जैन वा शीख धर्मांची? या सर्वच विचारांच्या पलिकडे जावून भौतिकवादावर आधारित संस्कृतीचा विचार मांडणाऱ्या चार्वाकाची? ब्रिटीश इथे येवून राज्य करण्यापूर्वी इथे अस्तित्वात असलेल्या व रामायण-महाभारतासारख्या पुराणकथांतून संदर्भ सापडतात त्या अफगाणिस्तान, इराण, इराक ते श्रीलंका, नेपाळ, भूतान वगैरे सर्व प्रदेशांना व्यापणाऱ्या भारतवर्षाची? की ब्रिटिशांनी केलेल्या विभाजनानंतर लोकशाही राज्य स्थापन झालेल्या भारत देशाची? या भारतातल्या कुणाची? इथल्या शीख, बौद्ध, जैन, मुसलमान, ख्रिश्र्चन अशा इतरही धर्मांची मिळून बनलेली भारतीय संस्कृती, की केवळ हिंदू संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती? आणि आज ही युरोपियन संस्कृती प्रभाव टाकतेय ती केवळ हिंदू धर्मावर की भारतातल्या इतरही धर्मियांवर? आणि जर हा प्रभाव सर्वांवरच पडत असेल तर ही संस्कृती ख्रिश्र्चन धर्मीय आहे की आर्थिक?

तर मग संस्कृती म्हणजे नेमके काय? सर्वच विद्वानांच्या मते संस्कृतीची साधी सरळ व्याख्या म्हणजे जीवनपद्धती. दैनंदिन जगण्याची पद्धत. अर्थातच तिचा सरळ संबंध असतो आपल्या आर्थिक स्थितीशी आणि सभोवतालच्या आर्थिक परिस्थितीशी. जगाच्या विविध भागात जंगलात राहणाऱ्या आदिवासींची संस्कृती बघितल्यास आज आपणालाच अचंबा वाटतो. अंगावर अत्यल्प कपडे घालून ते सर्रास वावरतात. बायकासुद्धा (तरीही त्यांच्यावर बलात्कार होत नाहीत). त्यांच्या गरजाही मर्यादित असतात. कारण उत्पादनही मर्यादित स्वरुपाचे. जमिनीतून पीक काढून त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या कृषी संस्कृती तर आदिवासी संस्कृतीपेक्षा वेगळीच. खाजगी आणि सार्वजनिक असे जीवनपद्धतीचे दोन भाग घेतले तर आदिवासी संस्कृतीत सामुहिक जास्त तर खाजगी आयुष्य मर्यादित असते. कृषी संस्कृतीत खाजगी आयुष्य जास्त असते. आजच्या औद्योगिक संस्कृतीत खाजगी आयुष्य जास्त व्हायला लागलेय. इथेच नेमका आत्मकेंद्रितपणा आलाय.

भारतात या कृषी संस्कृतीत आणखीन एक टप्पा आला. तो म्हणजे सरंजामशाहीचा. राजेशाहीचा. त्यातून दोन संस्कृती उभ्या राहिल्या. एक राजेशाही संस्कृती आणि दुसरी त्यांच्या वेठबिगारांची वा प्रजेची. मालक आणि चाकर अशी संस्कृती तयार झाली. मालक सांगेल ते पटले नसले तरी मान्य करायचे. इथे मालक असतो तो राजा, सरदार, सावकार त्याचप्रमाणे घरातला ‘कर्ता’ पुरुषही. तिथे राजांचे चाकर सरदार, सरदारांचे सावकार, सावकारांचे शेतकरी आणि सर्वत्र पुरुषांची चाकर स्त्री. त्यातूनच वेठबिगारी आली, कूळ-मुंडकार तयार झाले, देवळांचे महाजन झाले, एका विशिष्ट समाजाला देवदासी बनवून भोगले गेले, स्त्रियांना पडदाशीन बनवले गेले, विधवांचे मुंडन केले गेले, बालविवाहातून धिटुकल्या मुलींच्या सगळ्या इच्छाच मारल्या गेल्या, तिला शिक्षणापासून वंचित केले गेले, वेश्याव्यवसाय समाजमान्य केला गेला, अंगवस्त्र प्रतिष्ठित बनवले गेले, स्त्री ही केवळ भोगण्याचे आणि राबवण्याचे यंत्र बनवले गेले. महाभारतात भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण केले गेले तेव्हा चुपचाप मान खाली घालून बसलेल्या पांडवांचेसुद्धा समर्थन केले गेले. ही आमची महान भारतीय संस्कृती!!!

कालांतराने इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली. उत्पादनाचे संबंध बदलले. शेतीचे उत्पादन हा कच्चा माल बनला व यंत्रातून वेगळी उत्पादने यायला लागली. त्यांची वेगळी जागतिक बाजारपेठ तयार झाली. आमचे सोने-चांदी लुटून नेऊन ब्रिटिशांनी आपल्या या नव्या यंत्रयुगी उद्योगात गुंतवली. भांडवल, कच्चा माल व विक्रीची बाजारपेठ या तिन्ही गोष्टींसाठी वसाहतवादी भारत राबवण्यात आला. या उद्योगांची गरज असलेला नोकरदारही नव्या शिक्षणपद्धतीचे उत्पादन म्हणून तयार होऊ लागला. परंतु त्याच शिक्षणातून स्वातंत्र्याची जाणीव तयार झाली. स्वातंत्र्यसंग्राम उभा राहिला. भारत स्वतंत्र झाला. परंतु ब्रिटिशांनी घडवलेली शहरातील मध्यमवर्गीय आणि कामगार संस्कृती आणि ग्रामीण भागातील सरंजामी संस्कृती असा मिश्र भारत तयार झाला. यातल्या स्त्री-पुरुष भेदाभेद नष्ट करणाऱ्या औद्योगिक संस्कृतीला आम्ही ‘पाश्र्चात्य संस्कृती’ असे नाव दिले तर स्त्रीला पुरुषांचा गुलाम मानणाऱ्या ग्रामीण सरंजामी संस्कृतीला ‘भारतीय संस्कृती’.

साधे एकच उदाहरण घेउया. पाश्र्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने मुली तोकडे कपडे घालतात म्हणून बलात्कार होतात असा युक्तिवाद सध्या सर्वत्र चालू आहे. काय तर्कशास्त्र आहे या युक्तिवादामागे? पुरुष हे वासनासक्तच असणार. तो त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यांची वासना भडकावण्याची कोणतीही कृती करू नका. तोकडे कपडे घालू नका. म्हणजे दोषी स्त्री. वासनेने बरबटलेला पुरुष मात्र पूर्णतया निर्दोष. तोकडे कपडे घातलेल्या मुलीवर त्याने बलात्कार केला तर त्याची चूक काहीच नाही. परंतु प्रत्यक्षात काय? तोकडे कपडे घालणाऱ्या बोल्ड मुलींना हे वासनावीर घाबरून त्यांच्या वाऱ्यालासुद्धा उभे रहात नाहीत. अंगभर कपडे घातलेल्यांवरच बलात्कार जास्त. अगदी अंगभर झगा घालणाऱ्या व देवाच्या सेवेला वाहून घेतलेल्या नन्सवरसुद्धा बलात्कार. आणि त्यासाठी भारतीय संस्कृतीच्या नावे समर्थन. म्हणजे कशाचे? एकेकाळी अंगावरचा वरचा भाग उघडा ठेवणाऱ्या आदिवासी संस्कृतीचे, केवळ कंचुकी घालणाऱ्या सरंजामी संस्कृतीचे की ‘चोपून-चापून’ लुगडे नेसून शरीराचे सर्व भाग व्यवस्थित दाखविणाऱ्या काल-परवाच्या भारतीय संस्कृतीचे? आणि दोष मात्र तोकडे कपडे घालणाऱ्या मुलींचा?

काल-परवापर्यंत या भेदभावविरहित संस्कृतीचे केंद्रस्थान होते या औद्योगिक अर्थकारणाचे केंद्रस्थान असलेले युरोपियन देश वा अमेरिका. (पाश्र्चात्य संस्कृती). परंतु आज माहिती तंत्रज्ञानाने एक नवीन क्रांती केली आहे. ज्ञानाची महासत्ता ही नवीन संकल्पना त्यातून आकार घ्यायला लागलीय. आणि तिचे केंद्रस्थान बनतेय परत एकदा आपला भारत देश. या माहिती तंत्रज्ञान क्रांतीने मुक्त संस्कृतीची लाट भारतात अक्षरशः त्सुनामीसारखी उसळलीय. आपल्या भारतातही चांगल्या मानवी संस्कृतीची बीजे आहेत. केवळ शोषित संस्कृतीची नव्हेत. ‘इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्र्व तरावे’ असे मंगेश पाडगावकर उगाच म्हणत नाहीत. तेव्हा आपल्या भारतीय संस्कृतीतल्या भेदभावविरहित चांगल्या गोष्टी आणि औद्योगिक संस्कृतीतल्या (तथाकथिक पाश्र्चात्य) चांगल्या गोष्टी यांचा समतोल राखून नवीन संस्कृती उभी करणे हे आपणापुढील खरे आव्हान आहे. त्याऐवजी एकामेकांची उणीदुणी काढणे ही निव्वळ वैचारिक दिवाळखोरी आहे.

(हा लेख लोकमत गोवा आवृत्तीच्या 12 एप्रिल 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाला)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

फार सुंदर लेख . पण ढोंगी संस्कृती रक्षक जागे होतील का? सनातनी प्रवृत्तीचे बाबा- गुरु आणि त्यांनी निर्माण केलेले गट आधुनिकतेच्या विरोधात आहेत. युरोप - अमेरिकेतून जे आलंय त्या प्रत्येक गोष्टीचे त्यांना वावडे . मग ते शौचालय, मोबाईल फोन, टेबल, खुर्च्या, चड्ड्या , ब्रेसियर, अशा अनेक नित्योपयोगी कोणत्या न्यायाने वापरतात?

इस्लाम आणि युरोपिअन संस्कृतींची भारतीय जीवन पद्धतीशी देवाण -घेवाण झाल्याने आमचे जीवन समृद्ध झाले आहे हे विसरून कसे चालेल? तबला, सतार, शिवलेले कपडे हे इस्लामी संस्कृतीमुळे आले. पोर्तुगीजांनी तर मिरची, बटाटा, पपई, टमाटे, अननस, काजू यासारखी पिके भारतात रुजवून एक नवीन खाद्य संस्कृती निर्माण केली. या सर्व गोष्टीना विसरून सनातनी कृतघ्न पणे बरळत आहेत.

जगात सर्वत्र धर्मांध आणि सनातनी प्रवृत्ती वाढल्या आहेत. एका बाजूने इस्लामी दहशत वाद्यांना विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूने भगवा आतंकवाद जोपासायचा असा हा दुतोंडीपणा आहे. तुमच्या सारखे पुरोगामी आणि विवेकवादी पत्रकार सद्याच्या काळात दुर्मिळ झाले आहेत. सातत्याने अशा मागासलेपणा जपणाऱ्या शक्तीविरुद्ध लिहिल्याबद्दल तुमचे अभिनंदन.

- Gajendra Tari, Ponda | 16 th April 2015 10:40

 

Related Blogs