‘नाचुंया कुम्पासार’ – शिकुया सारासार

By Sandesh Prabhudesai
31 March 2015 13:48 IST

‘नाचुंया कुम्पासार’ (तालावर नाचूया) या कोंकणी सिनेमाने पुनश्र्च एक नवा इतिहास घडवला. भारतातील सर्वोच्च मानले जाणारे तीन राष्ट्रीय सिने पुरस्कार पटकावून. त्यातला केवळ एक उत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार हा कोंकणी विभागातील आहे. बाकी दोन्ही राष्ट्रीय स्तरावरील सर्व सिनेमांमधून मिळालेले आहेत. खास करून निर्मिती डिझाइनसाठी मिळालेला पुरस्कार हा ऐतिहासिक स्वरुपाचा आहे. यापूर्वी कोंकणी सिनेमांना पुरस्कार मिळालेले नाहीत असे नव्हे. 1965 साली ‘निर्मोण’ ह्या सिनेमाने प्रादेशिक विभागात प्रशस्तीपत्रक पटकावून राष्ट्रीय पुरस्कारांची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यानंतर मध्ये बराच काळ गेला तरी परत 2004 मध्ये ‘आलिशा’तून सुरवात होऊन ‘अंतर्नाद’, ‘पलतडचो मनीस’, ‘बागा बीच’ असे एकापेक्षा एक सरस सिनेमा बनवीत गोमंतकीय सिनेमाने राष्ट्रीय पातळीवर आपले स्थान निर्माण करायला सुरवात केलेली आहे. केवळ कोंकणी विभागातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरसुद्धा. त्यात ‘एका सागर किनारी’ या लघुपटाने 2005 साली राष्ट्रीय पुरस्कार पटकावून त्यातही हम कम नही हे दाखवून दिले.  

परंतु तरीही प्रॉडक्शन डिझाइनमध्ये मिळविलेले पारितोषिक हे उल्लेखनीय आहेच. निर्मिती मांडणी ही हल्लीच विकसित झालेली संकल्पना आहे. पूर्वी ती नव्हती असे नव्हे. कला दिग्दर्शनात ती मोडायची. परंतु आता तिला वेगळे असे स्वतःचे स्थान दिलेले आहे. कारण शेवटी निर्मितीच्या मांडणीवर सिनेमाचा कस लागतो. सिनेमा हे दृकश्राव्य माध्यम आहे. प्रत्येक दृष्यातली कलात्मकता आणि सर्जनशीलता यातूनच शेवटी संपूर्ण सिनेमा सर्वांगसुंदर बनतो. त्यासाठी कोणत्याही दृष्याचे ठिकाण, त्याचा परिसर, त्यातील पात्रांची वेषभूषा, त्यांचा मेकअप, त्या दृष्यात दिसणाऱ्या सर्व प्रकारच्या गोष्टी यांचा त्या प्रसंगाच्या विषयाशी आणि विषयाच्या मूडाशी ताळमेळ जुळवावा लागतो. तेव्हाच तो प्रसंग परिपूर्ण ठरतो. त्यातूनच सिनेमा परिणामकारक बनतो. ही निर्मिती मांडणी. सिनेमातील सर्वात कठीण परंतु महत्वाची गोष्ट. शेवटी सिनेमा म्हणजे काय? अभिनय, नाट्य, नृत्य, गीत, संगीत, वेषभूषा, मेकअप, चित्रकला, शिल्पकला, स्थापत्यकला, अभियांत्रिकी कला, छायाचित्र कला, संकलन कला, ग्राफिक्स अशा सर्वच कलांचा संगम होऊन त्यातून सिनेमा घडतो. या सर्व कलांचा ताळमेळ जुळवताना त्यांचा समतोल राखण्याचे कसब म्हणजे निर्मिती मांडणी. सिनेमाचा जणू काही प्राणच.

बार्डरॉय बार्रेटो हे कालपर्यंत कुणी ऐकलेही नवह्ते ते नाव अचानक या सिनेमातून आज सर्वतोमुखी झालेले आहे. परंतु या सिनेमाला एका रात्रीत यश मिळालेले नाहीय. गेली दहा वर्षे तो या सिनेमाच्या संकल्पनेवर संशोधन आणि काम करीत होता. त्याची प्रत्यक्ष निर्मिती दोन वर्षे चालली. गेली दोन दशके बार्डरॉय जाहिराती बनवण्याचा व्यवसाय करतोय. 10 सेकंद, 20 सेकंद, जास्तीत जास्त 30 सेकंदांत परिणामकारकरित्या जाहिरात बनवणे हे फारच कठीण काम असते. अचूक याच गोष्टीचा फायदा बार्डरॉयला ‘नाचुंया कुम्पासार’ बनवताना झाला.  हा सिनेमा बघताना दीड तासाने मध्यांतर होते तेव्हा घड्याळाकडे बघितल्यावर आपणच आश्र्चर्यचकित होतो. तब्बल पावणे तीन तास सिनेमा चालतो आणि तरीही तो संपू नये असेच वाटत रहाते. हा परिणाम साधण्यासाठी सिनेमातले प्रत्येक दृष्य हे कॉम्पॅक्ट असावे लागते. छोट्यातला छोटासुद्धा प्रसंग परिणामकारक असावा लागतो. पसरट झाली की कोणतीही कलाकृती थपकल मारून बसते आणि तोंडातून नकळत जांभई निघूनसुद्धा जाते. याला अजिबात वाव दिला नाही म्हणून ‘नाचुंया कुम्पासार’ हवा हवासा वाटतो. परत दुसऱ्यांदा बघितल्याशिवाय राहवतच नाही.

त्यादृष्टीने बघितले तर ‘नाचुंया कुम्पासार’ हा सिनेमा गोमंतकीय तरुण सिने कलाकारांना दिशादर्शक ठरावा. आपण सिनेमा म्हणतो आणि सरळ फीचर सिनेमालाच हात घालतो. आपणास नाटक येते तर सिनेमा करायला काय अवघड असा स्वतःचा फार मोठा गैरसमज करून घेतो. मग एक तर सपशेल आपटतो वा आपल्या निर्मितीवर आपणच खूष होऊन अल्पसंतुष्ट व आत्मसंतुष्ट बनतो. ‘पलतडचो मनीस’ या सिनेमाला टीकाकारांचा पुरस्कार टोरोण्टोतील स्पर्धा नसलेल्या आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवात मिळाला तेव्हा लक्ष्मीकांत शेटगांवकरबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. सत्यजित रे नंतर हा पुरस्कार मिळवणारा दुसऱा भारतीय दिग्दर्शक आमच्या गोव्याचा आहे म्हणून आपलीही छाती अभिमानाने फुलते. परंतु या पातळीवर पोचण्यापूर्वी लक्ष्मीकांतने लघुपट केले होते व त्या अनुभवातून शहाणा होऊनच त्याने फीचर फिल्मला हात घातला होता ही गोष्ट आपण लक्षातच घेत नाही. प्रशिक्षण, अभ्यासू वृत्ती, साधना, संशोधन, सर्जनशीलता, छोट्यातील छोट्याशा गोष्टीतसुद्धा परफेक्शन आणण्याची धडपड व त्यातूनच परिपूर्ण स्वरुपाची निर्मिती हा फॉर्म्युला आपण लक्षात घेऊ तेव्हाच आपणही असे यश मिळवू शकू. कारण यशाची गुरुकिल्ली शेवटी याच अथक परिश्रमाच्या संस्कृतीत आहे. शॉर्टकट वशिलेबाजी संस्कृतीत तर खचितच नव्हे.

गेली कित्येक वर्षे बंद पडलेला गोवा सिने महोत्सव या वर्षापासून पुनश्र्च सुरू होतोय ही फार आनंदाची गोष्ट आहे. त्यासाठी एंटरनेनमेंट सोसायटी ऑफ गोवाचे मुखत्यार दामू नाईक खात्रीने अभिनंदनास पात्र आहेत. याच आठवड्यात तो संपन्नही होत आहे. दुर्देवाने लघुपटांचा वेगळा विभाग ठेवूनसुद्धा त्यात केवळ 8 प्रवेशिका आलेल्या आहेत. त्यामानाने फीचर सिनेमा भरपूर आहेत. गोव्यात वेगवेगळ्या कलाप्रकारात प्राविण्य असलेले शेकडो कलाकार आहेत. परिपूर्ण सिनेमा बनविण्याची ताकद त्यांच्यातही आहे. परंतु त्यासाठी हवी ती दिशा सापडत नाहीय. गोवा सिने महोत्सव या दिशेतला एक मार्गदर्शी दिवा असेल. परंतु केवळ महोत्सव घेऊन आमच्या सिनेमांचा दर्जा वाढेल असे कुणी भाष्य केले तर त्याला मूर्खातच काढावे लागेल. सिनेमा हा नाटकापेक्षा वेगळा कसा आहे इथनं सुरवात करून सिनेमाच्या तंत्रात आमच्या तरुण कलाकारांना प्रशिक्षित करणे महत्वाचे आहे. इफ्फीबरोबरच इतरही वेगवेगळ्या प्रकारचे सिने महोत्सव आयोजित करून जगन्मान्य सिनेमा त्यांना दाखवणे महत्वाचे आहे.

त्याहूनही महत्वाचे आहे ती सुरवात लघुपटांपासून करण्याची. छोटा सिनेमा बनवणे हे सर्वात मोठे काम असते ही गोष्ट मनात ठसवणे महत्वाचे आहे. शिवाय लघुपटांच्या निर्मितीला आर्थिक आधार देणेही महत्वाचे आहे. म्हणजे त्यासाठी भरमसाट आर्थिक निधी देण्याची गरज नाही. आरोग्य, शिक्षण, शेती, समाज कल्याण अशा लोकसंपर्कातील कित्येक सरकारी खात्यांनी सामाजिक विषयांवरील पांच मिनिटांचे डिजिटल लघुपट बनवण्याची स्पर्धा घ्यावी. त्यासाठी लागणारा थोडाबहुत आर्थिक आधारही द्यावा. त्यातून उत्कृष्ट सिनेमा निवडावेत व ते निर्मात्यांकडून विकत घ्यावेत. सर्व सिनेमा थिएटरमधून सिनेमा सुरू होण्यापूर्वी वेगवेगळ्या विषयांवरील किमान एक सिनेमा दाखवण्याची सक्ती करावी. शाळा-कॉलेजांमधून या सिनेमांच्या डीव्हीडी पाठवून द्याव्यात. या खात्यांनीही आपल्या कार्यक्रमाची सुरवात (मंत्र्यांची वाट पाहेपर्यंत) सिनेमा दाखवून करावी. अर्थात, या सिनेकलाकारांना त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षित करावे. त्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा, सहा महिने वा एका वर्षाचे डिप्लोमा कोर्स आणि जमल्यास पदवी कोर्ससुद्धा सुरू करावेत. अशा एक नव्हे कित्येक गोष्टी कराव्यात. आणि त्यासाठी केवळ मनोरजंनासाठी बनवलेल्या सोसायटीचे नामकरण करावे – डिजिटल मिडिया सोसायटी ऑफ गोवा. यातून एक नवीन सिने संस्कृती मूळ धरेल. तीच गोव्याला नवी दिशा दाखवू शकेल. केवळ आंतरराष्ट्रीय वा राज्य पातळीवरील सिनेमा महोत्सव घेऊन नव्हे.

(हा लेख लोकमत गोवा आवृत्तीच्या 29 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाला)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs