शिगम्याचा म्युझियम! शिमग्याचा मॉल!!

By Sandesh Prabhudesai
08 March 2015 20:35 IST

काणकोणातील माझ्या लोलये-पोळे गावात यंदा बहुतांश पहिल्यांदाच पाच दिवसांचा शिगमो झाला नाही. निमित्य झाले ‘विरांमेळ’ झाला नाही त्याचे. आमच्या गांवांत पांच वाड्यांचे मिळून पांच मेळ निघतात. त्यातला सर्वात प्रमुख तो ‘विरांमेळ’. सर्व मेळ एकत्र लोलयेच्या केशव देवळात नमन घालून सुरवात करतात. त्यानंतर सर्वात पुढे विरामेळ व मागे इतर मेळ घराघरातून खेळत होळीच्या आदल्या रात्री ते आपापल्या मांडावर पोचतात. तब्बल पाच दिवसांनंतर. या विरामेळात मोरपंखी पिल्ककचा धरणाऱ्या कुटुंबात मूल जन्माला आल्याने सुवेर आले, इतर कोणी पिल्लकचा धरण्यास पुढे आले नाही व त्यामुळे विरांमेळ निघालाच नाही. त्यामुळे इतरही नेळ नमनाला देवळात गेले नाहीत. पण म्हणून शिगमो झालाच नाही असे नाही. दोन-तीन दिवस आपापल्या वाड्यावर खेळून काही मेळ मांडावर गेले व मांड मोडण्याची रात्र जागवून आले. फाटा दिला गेला तो केवळ देवाशी संबंधित विधींना व संपूर्ण गावातील प्रत्येक घर खेळण्याच्या प्रथेला.

मुळात शिगमो हे देवकृत्य नव्हे. कृषिसंस्कृतीशी संबंधित असा हा शेतकऱ्यांचा उत्सव. कोणताही सामुहिक उत्सव जसा देवकार्यातून सुरू केला जातो तसा शिगमोही देवाच्या पायाशी खेळून मग गावभर खेळायला निघतो. परंतु तो देवाचा उत्सव नव्हे. गोव्यात विविध भागात विविध पद्धतीने शिगमो खेळला जातो. काणकोण, केपे, सांगे या भागातील आदिवासी कुंळबी-वेळीप जमातीतून शिगम्याची सुरवात झाली व नंतर येऊन स्थायिक झालेल्या इतर सर्वच जमातींनी ही परंपरा आपली मानून पुढे नेली. तोणया मेळ, चौरंग, तालगडी व गोफ हे चार प्रमुख प्रकार व त्यातील कित्येक उपप्रकारांतून शिगमो खेळला जातो. त्यासाठी घुमट, शेमेळ वा कांसाळ तसेच सुर्त-शेनाय यांचाही वापर केला जातो. कालांतराने काहीजणांनी त्या जागी तबला-पेटीही आणली.

मात्र यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा उत्सव संपूर्ण गावाचा असतो. प्रत्येक घरातील पुरुष मंडळी पाच दिवस घराबाहेरच असते. आपापसातील मतभेद विसरून व अबोलादेखील सोडून ते ‘गडी’ धरतात व सामुहिक भावनेने खेळत खेळत एकत्र येतात. ही एकी ही या शिगम्याची खरी स्फूर्तीदेवता. लहान मुले तर शिगम्याच्या निमित्याने संपूर्ण गाव फिरून येतात. दुपारी व रात्री कुणाच्या तरी घरी जेवण झाल्यावर वाड्यावर एकेकाच्या घरी रहाण्याची व्यवस्था. क्वचितच कुणी आपल्या घरी परत जायचा. बायकाही एकत्र येऊन जेवणाची व्यवस्था बघायच्या. प्रत्येक घरी नारळ-तांदूळ व इतर फळावळ एकत्र करीत सामुहिक जेवणावळ व्हायची. पाच दिवस वा रात्रीतील कमीत कमी दोन रात्री तरी प्रत्येकजण बाहेर काढायचाच. संपूर्ण गावाला एकत्र विणणारा एकीचा एवढा प्रभावी गोफ गोव्यात आणखीन कुठला नसेल.

दुर्दैवाने ही परिस्थिती आताशा पूर्णतया बदललेली आहे. मुळात कृषिसंस्कृतीच नष्ट झालेली आहे. आमच्या गावात तर 90 टक्के शेतजमीन ‘पडंग’ पडलेली आहे. शिकल्यावर तरुण मंडळी नोकरी-धंद्यासाठी शहरात गेली ती तिथेच स्थायिक झाली. कारण मडगाव ते पणजीपर्यंतची सगळीच शहरे काणकोण-सांगे तालुक्यांना तरी फारच दूर. रोज गावी परत येणे खर्चिकही आणि थकवणारेही. त्यात शहरीकरणाची लाट 1970 च्या दशकापासून सुरू झाली आणि 1990 च्या दशकापासून गावात काम करणारासुद्धा शहरात रहायला जाऊ लागला. गोवा मुक्तीवेळी 1960 मध्ये 85 टक्के गोवा गावात रहायचा. आज 2001 च्या जनगणनेनुसार केवळ 38 टक्के गावात रहातो. शहरात रहाणाऱ्या 62 टक्क्यातील अर्धे लोकसुद्धा शिगम्यासाठी गावात जात नाहीत. जायचेच असले तर सुट्टी टाकून जावे लागते. कारण मुलांना तर फक्त होळीची सुट्टी. शिगम्याची सुट्टी कधीच नसते. आणि तरीही आपले मायबाप सरकार संस्कृती रक्षणाच्या निर्लज्ज बाता मारीत फिरताना दिसते.

म्हणूनच माझ्या गावात शिगम्याच्या वेळी विरामेळाची समस्या उभी ठाकली तेव्हा शिगमो व्हायलाच पाहिजे अशी आग्रही भुमिका घेऊन त्यावर पर्यायी उपाय काढणारी जाणकार मंडळी जास्त नव्हती. ज्यांना वाटले ते दोन दिवसांसाठी गावात गेले व शिगम्याचा आपला ‘घोस्त’ काढून आले. मुले तर जातच नाहीत. कारण शिगम्याची सामुहिक भावना मनात तयार व्हायला ते गावात कधी राहिलेच नाहीत. शिवाय त्यांना दुसऱ्या दिवशी शहरात आपापल्या कॉलनीत होळीची सामुहिक रंगपंचमी खेळायची असते. तोणया मेळ, तालगडी, गोफ अशा विविधांगी लोककलाप्रकारांत त्यांना काडीचाही रस नसतो. आणि शिगमोच बघायचा असेल तर त्याच्या विंडो डिस्प्लेचीही व्यवस्था सरकारने करून ठेवलेली आहे. सरकारी शिमगोत्सव समितीच्या ‘शिमग्या’ने. शिगम्याची रिप्लेसमेंट म्हणून. या शिगमोत्सवात शिगम्याचे मेळही खेळवले जातात आणि शिगम्याशी संबंध नसलेले इतर लोककलाप्रकारही. हा सरकारप्रसृत गोमंतकीय लोककलांचा मॉल!

प्रत्यक्षात बहुसंख्य गोंयकार गावातून शहरात गेला तेव्हा शिगमोही शहरात जायला हवा होता. गावच्या घरांसारखाच कॉलनीत खेळला जायला हवा होता. कालची परिस्थिती आज बदललही आहे हे लक्षात घेवून मुलांबरोबर मुलींनाही सोबत घेऊन विकसित व्हायला हवा होता. गरबा आणि दांडियामध्ये पारंपारिक वेष आला तसा वेषही हवा तर तो परिधान करू शकला असता. प्रवाही सांस्कृतिक वारसा जपण्याच्या व विकसित करण्याच्या युनेस्कोने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार हा बदल व्हायला हवा होता. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना कॉन्स्टण्ट रिक्रिएशन (सातत्यपूर्ण पुनर्निमिती) होणे महत्वाचे आहे हा युनेस्कोचा दंडक लक्षात घेऊन तो शहरीकरणात विरघळून जायला हवा होता. पण शिगम्याचा हा सांस्कृतिक वारसा प्रवाही ठेवण्याऐवजी त्याचे डबके करून ठेवण्यावर लोककलेच्या क्षेत्रात जास्त भर दिला जात आहे. लोककला ही बदलायची नसते हे आमच्या डोक्यात ठसवले जात आहे. त्यामुळे त्याला कुणीच हात लावायला जात नाही.

आणि त्यासाठी आपण काय पर्याय निवडला आहे? शहरातील बहुसंख्य गोंयकारांनी गावातील अल्पसंख्यांकांचा शिगमो रस्त्यावर उभे राहून बघायचा. सोबत चित्ररथांचाही आस्वाद घ्यायचा. आणि पर्याय म्हणून शिगम्याचे शिमग्यात रुपांतर करायचे. चित्ररथांची मिरवणूक संपली की मग नवसंस्कृतींचा शिमगा. कुठे ऑर्केस्ट्रा, कुठे कॉमेडी सर्कस, कुठे गीत-गझल, कुठे कोल्हापुरी लावणी तर कुठे जादूचे प्रयोग वा असलंच काही तरी. हे सर्व आयोजित करण्यात वाईट काहीच नाही. पण लोकसंस्कृतीचा वारसा जपण्याच्या नावे हे सर्व होते आहे याचे दुःख आहे. या सर्व प्रकारांत आपली लोकसंस्कृती कुठे काय आली? आणि त्यात सामुहिक भावना वाढीस लावण्याची शिगम्याची मूळ संकल्पना कुठे विकसित झाली? आपण या गोष्टींवर सरकारी निधी उधळायचा आणि गावातून मरत चाललेला शिगमो जिवंत रहावा म्हणून साधी शाळेला सुट्टीसुद्धा द्यायची नाही? आणि लोककलासंरक्षक तज्ञांनी युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्वांच्या विरुद्ध जाऊन लोककलांची डबकी करून टाकायची? आणि मग काय? एक दिवस लोककलांचे म्युझियम?

(हा लेख लोकमत गोवा आवृत्तीच्या 8 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाला)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

Sad but a true reality painted by Sandesh. The arts form like 'gof' 'Ghodemodni', etc. associated with this festival are a class apart but to enjoy those you need a mindset, and our young generation who has embraced 'gharba' and 'holi' have clearly lost it. Just a sign of changing mindsets or something deeper? excellent analysis.

- SNP, NA | 09 th March 2015 06:26

 

Related Blogs