ऋतुस्त्रावाची रंगपंचमी

By Sandesh Prabhudesai
02 March 2015 09:54 IST

सॅलॅब्रेट द रॅड

 मुलींची मासिक पाळी म्हणजे विटाळ. अस्वच्छ. अशुद्ध. अपवित्र. आमच्या कोंकणी भाषेत तर ‘भायर’. मासिक पाळी सुरू झाली की मुलगी सगळ्या दैनंदिनीतून बाहेर. त्याविषयी बोलायचं नाही. लिहायचं तर नाहीच नाही. देवघरात जायचं नाही. प्रार्थनासुद्धा करायची नाही. सणासमारंभात सहभागी व्हायचं नाही. स्वयंपाकघरात शिरायचं नाही. लोणच्याच्या तर बरणीलासुद्धा हात लावायचा नाही. ते नासेल. भांडी घासायची नाहीत. कपडे धुवायचे नाहीत. चार-पाच दिवस बाहेर. रक्तस्त्राव संपला की मग आंघोळ करायची आणि शुद्ध होऊन घरात यायचं. ही आमची संस्कृती. थोर परंपरा. विविधतेने नटलेल्या या भारतीय परंपरांचा आम्हाला अभिमान आहे. वडिलधाऱ्यांकडून चालत आलेली ही परंपरा राखण्याचा आपण सदोदित प्रयत्न करायचा आहे. कारण शाळेत दररोज आपण तशी प्रतिज्ञाच केलेली आहे.

परंतु माझ्या या देशाला एक संविधानही आहे. जगातील सर्वोत्कृष्ट ग्रंथ अशीही त्याची गणना केली जाते. या संविधानात प्रत्येक नागरिकाने – म्हणजे तुम्ही आणि मी – पाळायची एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. त्यातील एक कलम सांगतेः माझ्यातला वैज्ञानिक दृष्टिकोण, मानवतावाद, शोधक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा विकास करणे हे माझे कर्तव्य आहे. हे कलम कधीकधी शाळेतल्या त्या प्रतिज्ञेला छेद देते. म्हणूनच तर कायदा आणून आपण सतीची परंपरा बंद केली, बालविवाहाची परंपरा पुढे नेणे हा गुन्हा मानला, हुंडा घेण्याच्या परंपरेला कारावासाची शिक्षा ठोठावली, विधवांना ‘बोडकी’ करून त्यांना अंधाऱ्या खोलीत रहायची सक्ती करणे म्हणजे छळवाद ठरवला. अशा कित्येक परंपरा कायद्याने गैर ठरवल्या. कारण शोधक दृष्टिकोण आणि सुधारणेच्या दृष्टिकोणातून पाहिल्यावर आपल्या लक्षात आले की या परंपरा पूर्णपणे अवैज्ञानिक आहेत आणि अमानवीही आहेत.

आज तोच वैज्ञानिक व मानवतावादी दृष्टिकोण ठेऊन आपण मुलींच्या मासिक पाळीवेळी पाळण्यात येणाऱ्या या प्रथांकडे शोधक दृष्टिकोणातून व सुधारणेच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. तेव्हाच आपल्या लक्षात येईल की वर सांगितलेल्या मासिक पाळीतल्या सर्व प्रथा म्हणजे आताच उमलू लागलेल्या आमच्याच पोटच्या मुलीवर केवळ अन्यायच नव्हे, अत्याचार आहे. तिची सृदृढ वाढ खुंटविणारे हे अमानुष प्रकार आहेत. तिला मानसिकदृष्ट्या खचविणारे किळसवाणे प्रकार आहेत. पुरुष-महिलांना समान स्थान देऊन त्यातून या देशाला ज्ञानाची महासत्ता बनवण्याच्या मार्गातील हा एक प्रमुख अडसर आहे.  

काय असते ही मासिक पाळी? मुलगा वयात आला की त्याचा वीर्यपात होतो त्याच प्रकारे मुलगी वयात आली की तिची मासिक पाळी सुरू होते. दुर्दैवाने मुलाच्या वीर्यापाताला, जो कधीही होऊ शकतो, आपण विटाळ वा अपवित्र मानत नाही. सरासरी दर 28 दिवसांनी होणाऱ्या मुलीच्या मासिक पाळीला मात्र नाके मुरडतो. प्रत्यक्षात हा निसर्गाचा क्रम आहे व या दोन्ही गोष्टी आपली मुले वयात आल्याचे लक्षण आहे. जननप्रक्रियेशी त्यांचा थेट संबंध आहे. पूर्वी 14 ते 18 वर्षांचं वय झालं की मासिक पाळी सुरू व्हायची. आजकाल पालन-पोषण व्यवस्थित होत असल्याने नऊ वर्षानंतर कधीही मासिक पाळी सुरू होऊ शकते. हा निसर्गाचा नियम आहे. आणि त्याहूनही जास्त महत्वाचे म्हणजे माता होण्याचा तो शास्त्रीय संकेत आहे.

विज्ञान सांगते त्याप्रमाणे मासिक पाळी सुरू होणे म्हणजे दर महिन्याला मुलीच्या गर्भाशयात पेशी आणि रक्तवाहिन्यांचे एक अस्तर (भिंतीसारखा पापुद्रा) तयार होणे. यातून मुलीच्या स्त्रीबीज ग्रंथीतून एक परिपक्व स्त्रीबीज तयार होते. या स्त्रीबीजाचा पुरुषाच्या शुक्राणूशी जर संयोग झाला तर त्यातून गर्भधारणा होते. म्हणजे मूल जन्माला येण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू होते. त्या मुलाला या अस्तरातील रक्तवाहिन्यांकडून रक्तपुरवठा होतो. या पेशींतून पौष्टिके मिळतात. आणि त्यातून मुलाची वाढ होऊ लागते. म्हणजे आपण सर्वचजण जे जन्माला आलो आहोत ती या अस्तराची कृपा. हे अस्तर म्हणजे आपला पोषणकर्ता. आणि त्यालाच आपण अपवित्र, अशुद्ध, अस्वच्छ व विटाळ मानायचे म्हणजे जेवणाच्या भरलेल्या ताटाला लाथ मारण्यासारखाच प्रकार झाला.

मात्र हे स्त्रीबीज आणि पुरुषाचा शुक्राणू यांचा संगम झाला नाही तर गर्भाशयातील हे अस्तर तिथेच ठेवले जात नाही. ते बाहेर ढकलले जाते. ते तसेच राहिले तर कालांतराने अशुद्ध बनू शकते. कारण त्यात रक्तवाहिन्यांतील रक्तही असते आणि पेशींतील रंगरहित द्रवही असतो. तोच दर महिन्यात बाहेर येतो. त्यालाच आपण रक्तस्त्राव म्हणतो, मासिक पाळी म्हणतो वा दर महिन्याला होतो म्हणून ऋतूस्त्रावही म्हणतो. यातील रक्त हे अशुद्ध मुळीच नसते, उलट ते पूर्णतया शुद्ध असते. ह्रदयातून संपूर्ण शरिरात प्राणवायूयुक्त (ऑक्सिजन असलेले) रक्त पुरविणाऱ्या रोहिणीच्या नीलांतून आलेले हे शुद्ध रक्त असते. शिवाय पेशींतून आलेली पौष्टिकेही असतात. ती फ्लश आवट केली जातात. पुढच्या महिन्यात परत बीजारोपण झाले तर तेवढाच पौष्टिक आहार व शुद्ध रक्त गर्भाशयातील बाळाला मिळावा म्हणून. हा निसर्गाचा चमत्कार आहे. तो जेवढा शुद्ध आहे तेवढाच पवित्रही आहे.

मात्र पाच-सात दिवसांची ही प्रक्रिया थोडीफार त्रासदायक असते. गर्भाशयातून या अस्तराला बाहेर ढकलताना पेटके येतात. पोटात खूप दुखतं. डोकं दुखायला लागतं. अशक्तपणा येतो. काही मुलींच्या बाबतीत वेंधळेपणा येऊ शकतो. हातातून वस्तू पडायला लागतात, फुटायला लागतात, तिला अपराधी वाटायला लागतं. आठवण कच्ची होऊन विसरभोळेपणा येऊ शकतो. अचानक मूड बदलू शकतो. भांडखोर होऊ शकतो. वा कधीकधी जास्तच छान छान वाटायला लागतं. काहीवेळा तर एकदम निराश देखील वाटायला लागतं. अशावेळी मुलीला जपणं व तिला समजून घेणं फार म्हणजे फारच महत्वाचं असतं. तिच्या भावना समजून घेऊन तिला मानसिक आधार देणं महत्वाचं असतं. त्याऐवजी आपण तिला ढकलून देतो, एकटी ठेवतो आणि अपवित्र मानतो. तिला आपल्यात घेत नाही, तिला आवडणाऱ्या गोष्टींपासून वा समारंभांपासून दूर ठेवतो. तिला थेट नैराश्येच्या गर्तेतच ढकलून देतो. केवढा अमानुषपणा!

पहिल्यांदाच मासिक पाळी होते तेव्हा तर शरीरातील या महत्वपूर्ण बदलांचा मुलीवर भावनिक परिणामही होतो. ती गोंधळते, घाबरते, रडायला लागते, खचून जाते. यावर उपाय एकच. ही नैसर्गिक प्रक्रिया काय आहे याची आपण सुशिक्षितांनी आपल्या तेवढ्याच सुशिक्षित मुलीला आणि कुटुंबातील इतरही मुला-मुलींना व्यवस्थित माहिती देणे. शाळेतील शिक्षकांनी पाचवीला पोचेपर्यंत मुलींना ही प्रक्रिया शास्त्रशुद्धरित्या सविस्तर समजावून सांगणे. आणि प्रत्यक्षात मासिक पाळी होते तो आनंदोत्सव म्हणून साजरा करणे. आमच्या मुलीला पहिली मासिक पाळी झाली तेव्हा आम्ही सगळेचजण तिला घेऊन हॉटेलात जेवायला गेलो. तिची जननक्षमता साजरी करण्यासाठी. तिच्या थोरल्या भावालाही तिचे मूड स्विंग्स समजावून सांगितले.

मासिक पाळी ही स्त्रीच्या जीवनातील एक आनंददायी अनुभुती असते. ती सविस्तररित्या समजावून सांगणारे नामवंत पत्रकार आश्र्विन तोंबट यांचे इंग्रजी पुस्तक - पिरियड पेन्स - गोव्यातील टीन्स मिडियाने प्रकाशित केले आहे. तेवढेच नामवंत साहित्यिक विश्राम गुप्ते यांनी ‘मासिक पाळीची चाहूल’ या नावाने ते मराठीत भाषांतरित केले आहे. हल्लीच फेसबूकवर ‘स्पीक अगेन्स्ट मॅन्स्ट्रुअल एक्स्लुजन’ (सेम) या नावाने एक ग्रूप तयार झालेला आहे. या ग्रुपची तरुण मुले-मुली शाळा-महाविद्यालयातून जाऊन त्यावर फारच परिणामकारक असा स्ट्रीट प्ले करतात व नंतर सर्व मुला-मुलींशी संवाद साधतात. गेल्याच रविवारी मडगावात झालेल्या पाचव्या सामाजिक परिषदेत तर यावर तासभर चर्चा झाली व बाहेर ठेवण्याच्या या अमानुष प्रकारांविरुद्ध आवाज उठविण्याचा ठरावही संमत झाला. (देवापाशी जायचं नाही म्हणून सांगितल्यावर नाटकातील एक मुलगी देवासोबत असलेल्या देवीला मासिक पाळी होत नाही का असा निरागस प्रश्र्न विचारते तो तर कित्येक प्रश्र्नांची उत्तरे देऊन गेला.)

विज्ञानानेच आजपर्यंत आपले डोळे उघडलेले आहेत. आपण सुशिक्षित आहोत म्हणून हा लेखही वाचत आहोत. इंटरनेटवर या विषयावर भरभरून लिहिले गेलेले आहे. त्यातून शहाणे होऊन आपल्या मुलीला मानसिक अत्याचारातून वाचवूया. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही भारत देशाची नवीन घोषणा आहे. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आधी आपण ‘पढूया’. आणि रक्तस्त्रावाचा हा लाल रंग साजरा करुया. होळीच्या दिवसातच सुरवात करूया. ऋतुस्त्रावाची ही रंगपंचमी आनंदोत्सव म्हणून साजरी करून.

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs