कोसंबी घराण्याचा ‘वारसा’ सांगणारी मीरा

By Sandesh Prabhudesai (EdiThought)
27 February 2015 19:53 IST

कधी कधी काही नाती अचानक जुळतात आणि आयुष्यभर टिकतात. ती शब्दांनी सांगता येत नाहीत. असंच एक आमचं नातं मीरा कोसंबीशी जुळलं होतं. 2007 साली त्या डी डी कोसंबी कल्पना महोत्सवाच्या उद्घाटनात आपल्या वडिलांवर व्याख्यान देण्यासाठी गोव्यात आल्या तेव्हापासनं. अर्थात दुवा होता या महोत्सवाच्या अध्यक्ष व स्वतः डीडी फॅन मारिया आवरोरा कुटो यांचा. पण मी आणि माझी बायको प्रशांती (तळपणकार) त्यांच्याशी मराठीतनं बोलायला लागलो आणि मारियाबाय बाजूला पडल्या. दामोदर धर्मानंद कोसंबीवरच्या त्यांचं व्याख्यान अप्रतिमच होतं. आणि त्यावर मग आमची चर्चा.

डी डी कोसंबीवर लोकं बोलतात तेव्हा मला कधीकधी आंधळे आणि हत्तीच्या गोष्टीची आठवण होते. एकेकाच अवयवाला हात लावून त्याला हत्ती म्हणणारे. डीडींच्या विद्वत्तेचे पैलूच एवढे की ते एका भाषणात वा एका लेखात पकडताच येत नाहीत. गोव्यातील सांकवाळ गावात धर्मानंद कोसंबीसारख्या विद्वानाच्या घरी जन्मलेली ही व्यक्ती गणितज्ञ होती, नाणेतज्ञ होती, इतिहासकार होती, समाजशास्त्रज्ञ होती, वैज्ञानिक होती, अणुतज्ञ होती की आणखीन काय याचा अंदाजच येणे कठीण. मग प्रत्येकजण आपापल्या सोयीप्रमाणे त्यांच्या एक-दोन पैलूंवर बोलतात. पण मीरा कोसंबींनी आपल्या 45 मिनिटांच्या भाषणात संपूर्ण डीडी उभे केले होते. त्या डीडीच्या कन्या होत्या म्हणून त्यांना ते शक्य झालं असं जर कुण म्हटलं तर तो मूर्खपणाच ठरेल. डीडींची ही कन्या तेवढ्याच उंचीची होती म्हणून त्यांना आपला बाप बाजूला ठेऊन संपूर्ण डीडी उभा करणं शक्य झालं.

डीडींच्या कन्या शोभाव्यात असाच त्यांचा स्वभावही होता. जेवढा प्रेमळ तेवढाच तापट. आत-बाहेर काहीच नाही. पण बोलायला लागल्या की या बाईने आयुष्यात काय कमावलंय त्याची कल्पना यायची. गेली दोन-तीन वर्षे त्यांची तब्येत ठीक नव्हती. परंतु तशाही परिस्थितीत त्या दोन वर्षांपूर्वी इंटरनॅशलन सँटर गोवाच्या गोवा आर्ट अँड लिटररी फॅस्टिव्हलला आल्या होत्या.   धर्मानंद कोसंबीच्या वेंचक लेखांचं संकलन केलेल्या त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनसाठी. मारियाबाय बरोबर होत्या तरीही आम्ही दोघांनीही त्यांना ओळखलं नाही एवढ्या बदलल्या होत्या. अचानक आम्ही ओळखून डोळे मोठे केले तर सरळ सरळ आमच्यावर डाफरल्याच. ओळखलं नाही म्हणून अपसेट झाल्या. – तुझ्यासाठी मुद्दाम माझं नवं पुस्तक आणलं होतं. देणार नाही मी तुला आता – असंही ठणकावून सांगितलं. पंडिता रमाबाईवरचं त्यांचं ते नवं पुस्तक मी अक्षरशः हातापाया पडूनच घेतलं.

हे पुस्तक वाचून मी हादरलोच. गेल्या वर्षी परत लिट फेस्टसाठी आल्या त्यावेळी त्यांच्याबरोबर या पुस्तकावर चर्चाही केली. एकोणिसाव्या शतकात स्त्री मुक्तीचा ध्यास घेऊन जगलेली ही पंडिता त्यांनी ज्या अभ्यासपूर्ण रीतीने उभी केली आहे त्याला तोड नाही. भारतातले सगळेच कर्मठ विद्वान आनी खास करून कर्मठ महाराष्ट्र त्यांच्यावर तुटून पडला होता तेव्हा पंडिता रमाबाईंनी दिलेला लढा असामान्य होता. खास करून लोकमान्य टिळकांच्या कर्मठ विचारांची मीराबाईंनी केलेली चिरफाड डोके भणाणून सोडणारी होती. आज आपण जे गोडवे गातो त्या महाराष्ट्रातील विद्वान स्त्री-पुरुष भेदभावाच्या परंपरा मोडायला निघाल्यावर किती खालच्या पातळीवर जात ते जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी मीराबाईंचं हे पंडिता रमाबाईंवरचं पुस्तक वाचावं. सगळी ‘टरफले’ उघड्यावर पडतील.

जसा बाप तशी मुलगी असंच काहीसं मीराबाईंचं व्यक्तिमत्व होतं. समाजशास्त्रज्ञ असल्यामुळं कुठलाच विषय वर्ज्य नव्हता. महात्मा गांधी आणि स्वतःचे आजोबा धर्मानंद कोसंबी ते मराठी साहित्यातील, नाटकातील आणि सिनेमातील स्त्री इथपर्यंत आणि पंडिता रमाबाईंपर्यंत सर्वत्र त्यांची धाव होती. कुठलंही विधान नुसता अंदाज बांधून करायचं नाही ही त्यांची भुमिका एका संशोधकाला शोभण्यासारखीच होती. आपणास ठाऊक नसलेली गोष्ट समजून घेताना एखाद्या विद्यार्थ्यासारख्या नम्र होत. परंतु एखादी गोष्ट पटली की मग अजिबात मागे-पुढं पहात नसत. कुणाचाही मुलाहिजा न बाळगता बेधडकपणे ती समाजापुढं मांडत. जेवढ्या कणखर तेवढ्याच आग्रही. अभ्यासातनं माणसामध्ये एक वेगळाच आत्मविश्र्वास निर्माण होतो म्हणतात. कुठल्याही विषयावर बोलायला लागल्या की शब्दाशब्दातून तो जाणवायचा.

त्या अकाली गेल्या. परंतु जाताना भरभरून देऊन गेल्या. धर्मानंद आणि दामोदरांच्या परंपरेला जागून गेल्या. आमच्या गोव्याची तर मान उंचावूनच गेल्या. आयुष्यभर स्मरणात राहील अशा या आयर्न लेडीला मी तरी भावपूर्ण श्रद्धांजली देणार नाही. त्यांचे साहित्य जमा करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचं हीच माझी तरी त्यांना श्रद्धांजली राहील.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai (EdiThought)

Sandesh Prabhudesai is the Editor of goanews.com. He has been earlier the Editor of Sunaparant (Konkani daily) and Editor-in-Chief of Pruden (TV channel). His collection of selective editorials of Sunaparant has been published as 'Goff'. He writes brief thoughts as EdiThought for goanews.com, but not on regular basis.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs