नवसंस्कृतीला हवेत कल्पना-पंख

By Sandesh Prabhudesai
23 February 2015 18:09 IST

कल्पना ही प्रत्यक्षात बाहेर कुठेच अस्तित्वात नसते. ती केवळ आपल्या मनात असते. आपण ती इमॅजिन करतो. नंतर त्यावर व्यवस्थित विचार करतो. ती अस्तित्वात आणणे शक्य आहे का याचा. विज्ञान आणि इतर भौतिक  सिध्दांतांशी या कल्पनेची सांगड घालण्याचा प्रयत्न करतो. त्यालाच आपण प्रयोग म्हणतो. एक्स्पिरिमेंट. कधीकधी हा प्रयोग यशस्वी होतो, कधी कधी फेल. यशस्वी होते तेव्हाच कल्पना अस्तित्व धारण करते. ती नवीन सिद्धांत बनते. तिला वैचारिक बैठक प्राप्त होते. ती प्रत्यक्षस्वरुपी बनते, वा ती ‘विचार’ बनते. एकूण = कल्पना ही विचाराची जननी असते. कल्पना हा विचार नसतो. आधी कल्पना व नंतर त्यातून विचार असा हा प्रवास असतो.

कल्पना अनिर्बंध असते, परंतु विचार बंधनात जोखडलेला असतो. कल्पनांना मर्यादा नसते, मात्र विचारांना चौकट असते.  चौखूर उधळते ती कल्पना, पण लगामाच्या बंधनात अडकवला जातो तो विचार. विचार विकसित होऊ शकतो, परंतु त्यासाठी त्या वैचारिक चौकटीच्या बाहेर जाण्याची कल्पनाशक्ती पाहिजे. अशा कल्पनाशक्तीला सुरवातीस बहुतेकजण वेडेपणा म्हणतात. मात्र ही कल्पनाशक्ती प्रत्यक्ष स्वरुपात अस्तित्वात येऊन तिचा फायदा होऊ लागला की हे सगळे अतिशहाणे त्या अस्तित्वात आलेल्या कल्पनेला मिठी मारून बसतात.

दामोदर धर्मानंद कोसंबीच्या नावे गोव्यात चालतोय तो फॅस्टिव्हल ऑफ आयडियास. याचे कोंकणी वा मराठीत भाषांतर करताना सर्वांनीच त्याला नाव दिलेय – वैचारिक महोत्सव. कारण शब्दकोशात आयडिया या शब्दाचा अर्थ जसा कल्पना हा दिलाय तसाच विचार हाही दिलाय. त्याचा संदर्भ लक्षात न घेता आपण या फॅस्टिव्हलास वैचारिक पातळीवर (म्हणजे बंदिस्त) आणून ठेवले आहे.  अनिर्बंध कल्पनांना वैचारिक चौकटीत बसविण्याची ही धडपड आहे हे आपल्या कदाचित लक्षातही आलेले नसेल. नावाला अर्थ असतो आणि अर्थाला नाव असते. इथे या निरर्थक भाषांतराने कल्पनांच्या संकल्पनांचा गर्भपात होतोय हे आपल्या लक्षातच येत नाहीय. हा विचारांचा नव्हे तर कल्पनांचा महोत्सव आहे हेही आपण लक्षात घेत नाहीय.

या चुकीच्या भाषांतराला छेद देणारी दोन व्याख्याने यंदा लागोपाठ झाली. जाहिरात विश्र्वातील गुरू आणि भारतीय इंग्रजी रंगभूमीचे जनक अलेक पदमसी व राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठानाचे जनक व उपाध्यक्ष प्रा अनिल कुमार गुप्ता. पदमसी बोलले तेच मुळी आयडियेशनवर. म्हणजे माणसाच्या कल्पनाविलासाच्या शक्तीवर. आणि गुप्ता बोलले मनाच्या मशागतीवर. मायनिंग द माइंड. खरे म्हणजे ते बोलले ते मशागतीपेक्षाही पुढचे. मन सतत आत आत खणत राहणे किती गरजेचे असते व त्यातूनच कल्पनांचा खजिना कसा बाहेर निघतो ते प्रत्यक्ष उदारहणांतून त्यांनी पटवून दिले. दोघांचीही व्याख्याने भन्नाट होती. कारण ती मुळात होतीच चौकटी मोडून चौखूर उधळलेली. या सर्व कल्पना तज्ञांच्या डोक्यातून नव्हे तर ज्यांना आपण अकुशल म्हणतो त्या लोकांच्या डोक्यातून व खास करून लहान मुलांच्या डोक्यातून कशा तयार झाल्या आहेत तेही गुप्ता यांनी दाखवले. जाता जाता गोव्याच्या मुलांकडून शेकडो कल्पना घेऊनही गेले.

जगात सर्वात पहिला यंत्रशोध लागला तो चाकाचा. तेव्हापासून मानवाच्या कल्पनाशक्तीचे चक्र फिरायला लागले. आजपर्यंतचे सगळे शोध हे अशा भन्नाट कल्पनांतूनच लागलेले आहेत. सगळ्या संकल्पना या कल्पनांतूनच साकारलेल्या आहेत. त्याला विज्ञानाचा पाया आहे, तंत्रज्ञानाची जोड आहे व आवश्यक त्या साधनसुविधांची साथ आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन भारत सरकारने मार्च 2000 साली राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान स्थापन केलेले आहे. नवनव्या कल्पना घेऊन पुढे येणाऱ्यांना हे प्रतिष्ठान मदत देतेच, परंतु त्याहून महत्वाची अशी एक स्पर्धा हे प्रतिष्ठान घेते. केवळ बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी. स्पर्धेचे नाव आहे इग्नाइट. म्हणजे पेटवणे. चेतना पेटवणे. माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या वाढदिवसाचे निमित्य घेऊन 15 ऑक्टोबर रोजी या स्पर्धेचे विजेते जाहीर केले जातात. 2008 पासून सुरू झालेल्या या स्पर्धांतून प्रतिष्ठानाने 2014 पर्यंत दोन लाख नवप्रवर्तने (इनोव्हेशन्स) संग्रहित केलेली आहेत व 600 नवप्रवर्तकांना मदत केलेली आहे. त्यात विद्यार्थीही आहेत आणि पारंपारिक ज्ञानाचा वापर करून नवप्रवर्तन करणारे गावकरीही आहेत.  

अपघात होऊच शकत नाही असे वाहन, आपोआप कचरा व्यवस्थापन यंत्र, पावसाचे पाणी साठवणारी छत्री, आपोआप जेवण करणारे यंत्र, शॉक एब्झॉर्बर, घंटा आणि दिवा असलेली कुबडी, पाऊस आल्याबरोबर आपोआप कपडे काढणारी यंत्रणा, नळातला पाण्याचा अलार्म, स्कूल बसचा अलार्म, दुमडता येणारी सीट असलेली ट्रॅव्हल बॅग, नाडीच्या ठोक्यांतून मोबाईल चार्जिंग, अलार्म वाजवणारे पाण्याचे घड्याळ, संडासाच्या दारावर चालणारा फ्लॅश, अननस सोलणारी सुरी, लिहिताना बॅटरी चार्ज करणारे पेन, बोलणारे आणि रिमांइडर देणारे भिंतीवरील कॅलेंडर, ध्वनी प्रदूषणरहित हॉर्न, दृष्टिदोषांना वाचण्यात मदत करणारे यंत्र, पाईप साफ करणारे यंत्र, हॅल्मेटशिवाय सुरू न होणारी मोटरसायकल, औषधांची एक्स्पायरी तारीख संपली म्हणून सांगणारी यंत्रणा, औषधांची आठवण करून देणारे यंत्र, तांदळातील कचरा वेंचणारे यंत्र, पायऱ्यांवर चालू शकणारा वॉकर, खुर्ची-टेबल-पायऱ्या-बेड-हॅमॉक मल्टियुजर, किती चाललो ते सांगणारे बूट, लहान-मोठ्या पिन्सचा स्टेपलर. या आणि अशा कित्येक नवनिर्मितीकारांना इग्नाइटने सन्मानित केलेले आहे.

या अशा शोधांसाठी माणसाची अडचण समजावी लागते, गरज जाणावी लागते आणि चौकटीबाहेर जाऊन कल्पनाशक्तीची भरारी मारावी लागते. पिंक पिंक आवाज करणाऱ्या बुटामधून हवा बाहेर जात असेल तर ती आतही येणारच, तेव्हा त्याचा व्हॅक्यूम क्लीनर करावा अशी संकल्पना यातूनच लहान मुलाच्या डोक्यातून साकार झालेली आहे. न चिकटणारे गम तयार करणार अशी विरोधाभासी कल्पना एकाने केली व त्यातून आजकाल आपण सर्रास पुस्तकात वा भिंतीवर वापरतो ती स्टिक-ऑन्स तयार झाली. अशक्य गोष्टींचा विचार केला तरच कोणतीही नवीन गोष्ट निर्माण करणे शक्य होते. पण त्यासाठी हवीत चौकटीबाहेर जाऊन कल्पना करणारी मने. आणि ती सर्रास सापडतात लहान मुलांमध्ये. यासाठी प्रत्येक शाळेत नवप्रवर्तन क्लब स्थापन करावेत अशी खुद्द प्रतिष्ठानाचीच धारणा आहे.

प्रत्यक्षात घरी व शाळेतही वेगळीच संस्कृती राबवली जातेय. लहान मुलांनी अकल्पित स्वरुपाचा प्रश्र्न विचारला की त्याला गप्प करणे ही आपली संस्कृती झालीय. कारण त्याचे उत्तर देताना आपली दमछाक होते. आपण कमी पडतो. आपली कल्पनाशक्ती थिटी पडते. आणि मग आपण त्या मुलांना द्वाड, मिसबिहेविंग चाइल्ड, उर्मट मुलगा अशा पदव्या बहाल करतो आणि त्याला झिडकारत रहातो. (प्रत्यक्षात ती आपण शोधलेली पळवाट असते.) गोव्यात शाळेत जाण्याचे प्रमाण अपेक्षेबाहेरील आहे. परंतु तिथे आपण मुलांना केवळ शोध लागलेल्या गोष्टींची आणि विचारांची माहिती देतो. परंतु त्यांच्या कल्पनाशक्तीला भरारी मारू देणारे पंख देत नाही. त्यांचे मन खणत राहणारी पहार देत नाही. त्यांच्या अचंबित करणाऱ्या प्रश्र्नांची उत्तरे तर अजिबात देत नाही.

ही नवसंस्कृती शिक्षणात रुजली (शाळेत व घरातही) तर असे कित्येक इग्नाइटेड माइंड्स गोव्यात तयार होऊ शकतात. फॅस्टिव्हल ऑफ आयडियासचा (कल्पना महोत्सवाचा) थेट परिणाम शाळा-शाळांतून परावर्तित होऊ शकतो. प्रा गुप्तांनी सांगितल्याप्रमाणे मग याच महोत्सवात त्यांच्या कल्पनांचे प्रदर्शनही दर वर्षी होऊ शकते. ही अशी नवसंस्कृती आपण घराघरातून व वर्गावर्गातून रुजवली तर काय होईल गोव्याचे? विचार नव्हे; कल्पना करून पहा. पटली कल्पना तर ती प्रत्यक्षात आणा. नुसत्या विचारांतून नव्हे, कृतीतूनसुद्धा. कल्पनेतून भरारलेला हा कृतीबद्ध विचार गोव्याला कुठच्या कुठे नेऊन ठेवील.

 

(हा लेख लोकमत गोवा आवृत्तीच्या 22 फेब्रुवारी 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाला)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

Very well written. But a real tribute to the father and son Kossambis who made Goa and India proud would be by reading their books and debating their ideas. Clearly both the father and son were way ahead in thinking of their respective generations.

- Sandesh, Mumbai | 26 th February 2015 21:38

 

Related Blogs