लोककलांची नवनिर्मिती होईल?

By Sandesh Prabhudesai
19 February 2015 10:44 IST

युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहाय्याने मंगळूरच्या विश्र्व कोंकणी केंद्राने एक महत्वपूर्ण प्रकल्प हाती घेतलेला आहे. भारतभर पसरलेल्या कोंकणी समाजाची इन्टॅन्जिबल कल्चरल हॅरिटेज जपण्याचा व विकसित करण्याचा. इन्टॅन्जिबल याला अचूक शब्द अजून सापडत नाही. खुद्द इंग्रजीनेच तो जपानी संज्ञेतून घेतलेला आहे. परंतु आपण त्याला अमूर्त (निराकार) वा प्रवाही असे म्हणू शकतो. म्हणजे प्रवाही सांस्कृतिक वारसा जपणे व विकसित करणे. ज्या गोष्टी नुसत्या स्थावर स्वरुपाच्या नसतात तर त्याच्या निर्मितीसाठी मानवी हस्तक्षेपाची गरज असते व त्याची आंतरिक अनुभूती घ्यायची असते अशा गोष्टी या वारशात मोडतात. म्हणजे मौखिक परंपरा, सादरीकरणाच्या कला, सामाजिक रीतीरिवाज, उत्सव वा निसर्गाशी संबंधित परंपरा. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहणारा हा वारसा. त्यात लोकगीते, लोककथा, लोकसंगीत, लोकनाट्य, लोककला, हस्तकला, खाद्य संस्कृती, लोकभाषा, वार्षिक उत्सव अशा गोष्टी मोडतात. बदलत्या काळात त्या जपूनच ठेवणे नव्हे तर त्या सातत्याने प्रवाही ठेवणे हा या प्रकल्पाचा गाभा आहे. प्रत्यक्षात, आजची परिस्थिती पाहिल्यास हे एक आव्हानच आहे.

युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायण्टिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. संयुक्त राष्ट्रांच्या 195 देशांची ही संस्था शिक्षण, विज्ञान व संस्कृतीच्या क्षेत्राद्वारे न्याय, मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यासाठी कार्य करते. त्यासाठी काही करारनामेही करते. प्रवाही सांस्कृतिक वारशाचे संवर्धन व विकासाचा करारनामा मागच्याच दशकात, म्हणजे 2003 साली झाला होता. आमच्या भारत देशानेही तो मान्य केलेला आहे. त्यामुळे त्यादृष्टीने कार्य करणे आपणा सर्वांवरच बंधनकारक आहे. हे आपण म्हणजे – सरकार, या विविध संस्कृती पाळणारा समाज व त्यासाठी कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्ती.

कालच्यापेक्षा आज जग फारच झपाट्याने बदलत चालले आहे. त्यात जागतिकीकरणाच्या व वैश्र्विक नवसंस्कृतीच्या लाटेत खास करून अल्पसंख्यांकांच्या संस्कृती नामशेष होण्याची भीती वाढू लागली आहे. भारतभर व जगभर पसरलेला असला तरी कोंकणी समाज अगदीच अत्यल्प आहे. 120 कोटींच्या भारतात तर केवळ 25 लाख. म्हणजे 0.24 टक्के. पाव टक्कासुद्धा नाही. तोही लोकसंस्कृतीच्या दृष्टीतून पाहिल्यास बहुतेक गोवा, कर्नाटक व केरळात विभागलेला. कर्नाटकातील कोंकणी समाजाने आजपर्यंत कोंकणी भाषा व लोकसंस्कृती टिकवून ठेवलेली असली तरी आधी कन्नड व हल्ली विश्र्वसंस्कृतीच्या प्रभावामुळे नवीन पिढी तिच्यापासून दूर जाऊ लागली आहे. गोव्यात तर विश्र्वसंस्कृतीबरोबरच झपाट्याने चाललेले शहरीकरण व पर्यटन व्यवसायामुळे तरुण पिढी लोकसंस्कृतीकडे पाठ फिरवू लागलेली आहे. त्यात भर म्हणून लोकसंस्कृतीच्या क्षेत्रात वावरणारे तज्ञ हा सांस्कृतिक वारसा पुढे नेताना त्यात तसूभरही बदल होता कामा नये अशा अट्टाहासी वृत्तीने वागत आहेत. त्यामुळे तेलही गेले, तूपही गेले, हाती आले धुपाटणे अशी परिस्थिती येण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.

या पार्श्र्वभूमीवर मंगळूरच्या विश्र्व कोंकणी केंद्रात गेल्या रविवारी 8 फेब्रुवारीला झालेला ‘प्रवाही सांस्कृतिक वारशा’वरील राष्ट्रीय परिसंवाद हा बुडत्याला काडीचा आधार कसा वाटला. परिसंवादापेक्षा प्रत्यक्षात ही कार्यशाळाच होती. युनेस्कोच्या भारतातील सहाय्यक सरसंचालक शुभा चौधरी यांनी यावेळी बोलताना सांस्कृतिक वारशाविषयीचे बरेचसे गैरसमज दूर केले. सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे म्हणून कितीही टाहो फोडला तरी शेवटी तो जपायला हवा तो त्या त्या समाजाने. अन्यथा सगळे पालथ्या घड्यावर पाणी ठरेल हे त्यांनीही टाहो फोडूनच लक्षात आणून दिले. आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट सांगितली ती जवळजवळ कानपिचक्यांसारखीच. युनेस्को केवळ सांस्कृतिक वारशाचे संवर्धन मानीत नाही, बदलत्या काळानुसार त्यात सातत्यपूर्ण बदल होत जातील हे सत्यही मानते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना हा सांस्कृतिक वारसा प्रवाही राहिला पाहिजे व त्यासाठी कॉन्स्टण्ट रिक्रिएशन (सातत्यपूर्ण पुनर्निमिती) महत्वाचे आहे असे खुद्द करारनाम्यातच नमूद करण्यात आलेले आहे. सभोवतालच्या वातावरणाशी सुसंगत पद्धतीने ही पुनर्निमिती होणे आवश्यक असते व त्यातूनच आपली अस्मिता टिकून रहाते असेही युनेस्को सांगते.

सत्तरीतील काही तरुण साहित्यिक व सांस्कृतिक कार्यकर्ते ‘साहित्य मंथन’ नावाचा एक छोटासा कार्यक्रम सातत्याने करीत असतात. हाच कार्यक्रम गेल्या वर्षी एप्रिलमध्ये आम्ही आमच्या माशे गावात आमच्या घरी आयोजित केला होता. त्यावेळी ‘लोककलाः दायज काय आयज’ असा परिसंवाद ठेवला होता. दीड तास चर्चा रंगली. लोककलांच्या धाटणीमध्ये बदलत्या काळानुसार थोडाफार बदल यावा की नाही यावर. महिलांनी शिगमो खेळावा की नाही यावर तर अक्षरशः खडाजंगी झाली. लोककला तज्ञांच्या मते बायकांनी धालो-फुगडी खेळाव्यात तर पुरुषांनी शिगमो. तेही पारंपारिक वेषभूषेतच. त्यावेळी ह्रषिकेष कदम या नव्या दमाच्या तरुणाने विचारलेला प्रश्र्न अजूनही डोक्यातून जात नाहीय. त्याचा प्रश्र्न साधा सरळ होताः “तुमच्या तोणया मेळ वा तालगडीपेक्षा गुजरात्यांचा गरबा व दांडिया मला माझी संस्कृती का वाटते?” आज युनेस्कोचे विचार ऐकल्यावर डोक्यात प्रकाश पडतोय. तिथे कॉन्स्टण्ट रिक्रिएशन आहे. बदलत्या वातावरणानुसार संगीतात थोडेफार बदल झालेले आहेत व खास करून पुरुष व महिला एकत्र येवून खेळत असल्याने ही लोकसंस्कृती गुजरातमध्ये टिकून राहण्याचे सोडाच, गोव्यातील मुला-मुलींनाही आपली संस्कृती वाटायला लागली आहे. अर्थात, त्यातला डिस्को दांडिया असावा की नसावा हा वादाचा विषय आहे.

परंतु या दांडियापेक्षाही खेळण्याचे विविध व आकर्षक प्रकार आपल्या तोणया मेळ, तालगडी व गोफामध्ये असूनसुद्धा तरुण पिढी त्याकडे आकर्षित होत नाही. कारण युनेस्कोच्या शुभा चौधरी सांगतात त्याप्रमाणे आपण हे लोककलाप्रकार गोठवून टाकलेले आहेत. आज आपण ज्यांना पारंपारिक वेषभूषा म्हणतो ती धोतर-पैरणही एकेकाळी आधुनिकच होती. परंतु तत्पूर्वी केवळ काश्टी वा कासोटा मारणाऱ्या पिढीने ही आधुनिक सातत्यपूर्ण पुननिर्मिती मान्य केली होती. तोणया मेळामध्ये पूर्वी घुमट-शामेळ नसायचे. कालांतराने ते आले. तालगडीत सूर्त-शहनाई आली. त्याच धर्तीवर आज त्याला की बोर्डची साथ देऊन नवीन गीतरचना केली तर ते जास्त आकर्षक होणार नाहीत का? आणि शिगमो फक्त पुरुषांनीच खेळायला हवा हा अट्टाहास सोडून दिल्यास समान हक्कांच्या या आधुनिक वातावरणात वावरणारी तरुण पिढी हे तोणया मेळ-तालगडी-गोफ डोक्यावर घेऊन नाचणार नाहीत का? कोंकणी भाशा मंडळाच्या गोवा युवा महोत्सवात तरुण-तरुणी ढोल-ताशेही वाजवतात व नाचतातसुद्धा. मग ते पारंपारिक शिगम्यात का होऊ नये? चुकीच्या, अंधश्रद्धांवर आधारित अवैज्ञानीक चालीरीती या लोककलांतून आपण काढून टाकल्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोणातून व समानतेच्या तत्वावर आधारित मुलामा त्यावर चढवला तर ही संस्कृती टिकून राहील की नष्ट होईल?

या विचारांना विरोध होईल याची मला पुरेपूर कल्पना आहे. परंतु शेवटी युनेस्कोसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेने सांस्कृतिक वारशाच्या भविष्याचा विचार करूनच ही संकल्पना मांडलेली आहे हे आपण लक्षात घेऊया. भारत सरकारनेही ही संकल्पना मान्य केलेली आहे आणि कित्येक राज्यातून आणि देशांतून त्याची कार्यवाही होऊ लागलेली आहे हेही जाणून घेऊया. शेवटी प्रश्र्न आपल्या सांस्कृतिक वारशाच्या अस्तित्वाचा आहे. या वारशाच्या मूळ गाभ्याला इजा पोहोचणार नाही अशा प्रकारे आपण या सर्वच वारशांची पुनर्निमिती केली व नव्या वातावरणाशी त्याची सांगड घातली तरच हा वारसा जनमानसांमध्ये टिकून राहील; अन्यथा हा वारसा केवळ पुस्तके, फोटो, व्हिडियो आणि पुराणवस्तू संग्रहालयामध्ये स्थानापन्न होईल याची जाणीव असूद्या.

 (हा लेख लोकमत गोवा आवृत्तीच्या 15 फेब्रुवारी 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाला)

 

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs