आमच्यामधली मारेकरी प्रवृत्ती

By Sandesh Prabhudesai
11 February 2015 23:16 IST

मडगावच्या गोमंत विद्या निकेतनच्या विचारवेध संमेलनात व्याख्यान देण्यासाठी गोव्यातच स्थायिक झालेले राष्ट्रीय कीर्तीचे भारतीय लेखक सुधीर काकर आले होते. भारतातील हिंदू-मुस्लिम संघर्षावर बोलण्यासाठी. परंतु या संघर्षाचे त्यांनी सामाजिक वा राजकीय विश्र्लेषण केले नाही. मनोविश्र्लेषण करून सर्वांना एका वेगळ्याच पातळीवर नेले. त्यांच्या मते धार्मिक कलहाचा धर्माशी काहीही संबंध नसतो. ते एक निमित्यमात्र असते. या कलहाचे मूळ असते मानवी प्रवृत्तीत. एकामेकांचा द्वेष करणे, एकामेकांशी स्पर्धा करणे, एकामेकांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करणे व वेळ आल्यास एकामेकांची हत्यासुद्धा करणे हा मानवी प्रवृत्तीचा भाग आहे. यातूनच मानवी संघर्ष जगभर उभे राहिले व मानवतेला काळिमा फासणारी हत्याकांडेही झाली. कुठल्याही धर्मशास्त्रात सांगितली नाहीत ती कृत्ये मानवाने धर्माच्या नावे केली. कधीकधी वंश, भाषा, प्रादेशिकता यांच्याही नावे केली. स्वतःचे अस्तित्व प्रस्थापित करण्याच्या या लढाईमध्ये सर्वात जास्त भावनिक प्रश्र्न बनतो तो धर्मभावनेचा हेही त्यांनी उदाहरणांसहित पटवून दिले.

बोलता बोलता काकरनी आणखीन एक गोष्ट लक्षात आणून दिली. दुसऱ्या महायुद्धानंतर लोकशाही पद्धतीवरील राज्यव्यवस्था जगभर अस्तित्वात आल्या. 1937 ते 1945 चा तो काळ. त्यातून नवी राष्ट्रे उभी राहिली, वेगवेगळ्या राष्ट्रीयत्वांची संघराज्ये बनली व सर्व राष्ट्रांची मिळून संघराष्ट्रेही बनली. युनायटेड नेशन्स. परंतु एकविसावे शतक उजाडेपर्यंत ही फेडरल पद्धत कोसळत गेली. भाषा, प्रादेशिकता, राष्ट्रीयत्व अशा प्रश्र्नांतून ही संघराज्ये कोसळली. महासत्ता बनू पाहणाऱ्या सोव्हिएत रशियेची तर शकले झाली. त्यानंतर आणखीन कित्येक राष्ट्रे. मात्र या सर्वांत टिकून राहिले ते भारताचे संघराज्य. तसे पाहिले तर भारत हा जगातला सर्वात किचकट देश. विविध संस्कृती, भाषा आणि वंशांचा देश. आर्य आणि द्रविड संस्कृतीच्या मिलाफात आदिवासी संस्कृतीची भरताड, हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्र्चन, पारशी, सिंधी असे कित्येक धर्म आणि पंथांचे समूह आणि किमान 25-30 प्रमुख भाषांचे मिश्रण. तरीही आपल्या देशातील संघीय भावना अजूनही टिकून आहे. राष्ट्रीय एकात्मता उलट बळकटच बनत चालली आहे.  

हे सर्व ऐकताना एक विचार मनात आला. कालचा संपूर्ण भारत हा मुळात राजे-राजवाड्यांचा देश. कितीतरी संस्थाने, कितीतरी राजवटी, नुसती युद्धेच युद्धे. या राजसत्ता चालताना धर्म वा वंशांचा प्रश्र्न कधीच असा ऐरणीवर आला नाही. मोगलांच्या दरबारातील एकनिष्ठ सरदार हिंदू असत तर शिवाजीचे विश्र्वासू अंगरक्षक धरून खजिनदार आणि किल्लेदार मुस्लिम असत. दुसऱ्याशी लढणे, स्पर्धा करणे, दुसऱ्याला हरविणे व त्यासाठी वेळ पडल्यास हत्यासुद्धा करणे ही जर मानवी प्रवृत्तीच असेल तर या ‘किलिंग’ (मारेकरी) प्रवृत्तीची भूक शमविण्यासाठी लढाया व युद्धे असत. लढाईवर जायचे झाले की हातातला नांगर खाली ठेवून शेतकरी तलवार म्यान करून युद्धभूमीवर जायचा. त्यामुळे धार्मिक कलहाचा प्रश्र्न तिथे कधी आलाच नाही. मात्र ही संस्थाने लोप पावून जेव्हा भारत एकसंघ लोकशाही संघराज्य बनले तेव्हा या लढाया व युद्धे बंद झाली. झालीच कधी युद्धे तर ती चीन व पाकिस्तानशी. तीही जनतेने नव्हे तर लष्कराने लढलेली. यामुळे सर्वसामान्य भारतीयांच्या मनातली ती दुसऱ्याला हरविण्यात स्वानंद घेणारी मारेकरी प्रवृत्ती दबली गेली म्हणून हे धार्मिक कलह उभे राहिले का? त्यासाठीच आपण भाषा वा प्रादेशिकतेच्या नावे एकामेकांशी लढलो का? भाषावाद, प्रादेशिकतावाद, जातीयवाद, धर्मवाद या सगळ्यांचे खरे मूळ या मारेकरी प्रवृत्तीत आहे का? या संकुचितवादी लढ्यांचा खरा गाभा आमच्या अंतर्मनात दडलेल्या मारेकरी प्रवृत्तीत आहे का?

मी टीव्ही चॅनलमध्ये काम करीत असताना एकदा आमचे गोव्याचे शास्त्रीय गायक प्रवीण गावकरनी उस्ताद अमजत अली खाँ ची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांनी हल्लीच्या काळांत विचारला जाणारा एक प्रश्र्न त्यांनाही विचारला – “गीत संगीताच्या क्षेत्रात आजकाल टीव्हीवर सारेगम, इंडियन आयडॉलसारखे रिएलिटी शोज होतात. त्यात आताच अंड्यातून बाहेर आलेले गायक रंगमंचावर जातात व लोकप्रिय झाल्यास कधीकधी साधनेपासून दूर जातात. दुसऱ्या बाजूने संगीताच्या क्षेत्रातील माहीर व्यक्ती परिक्षक बनून आपली मते देतात व त्यातून सामान्य जनांची संगीताविषयीची जाणीव वृद्धिंगत होते. तेव्हा हे रिएलिटी शोस संगीताच्या भविष्यासाठी तारक की मारक?” यावर उस्तादनी जे उत्तर दिले ते फारच अंतर्मुख करणारे होते – “मला संगीताच्या भविष्याची चिंता नाही. चिंता आहे ती वेगळीच. संगीताचे रिएलिटी शो होतात, नृत्याचे होतात, विनोदाचे होतात वा बिग बॉस सारखे निव्वळ अनौपचारिक वाद-संवादांचे होतात. हे सर्व रिएलिटी शो लोक मोठ्या चवीने टीव्हीसमोर बसून बघत असतात ते त्यांना त्यामध्ये रुची आहे म्हणून नव्हे. तिथे कुणीतरी हरत असतो आणि ते हरलेले पाहणे आपणास मनापासून आवडते. दुसरा हरला की आपणास आतून आनंद होतो. या वाढत चाललेल्या मानवी प्रवृत्तीची मला जास्त चिंता वाटते.”

त्यांचे ते उत्तर ऐकून मी तरी आतबाहेरून शहारलो. खरोखरच असे आहे का की उस्तादनी उगाचच या प्रकाराला तत्वज्ञानाचा लेप दिलाय असाही विचार करू लागलो. आणि अचानक माझ्या लक्षात आले. मी पूर्वी टीव्हीवर धिरयो नावाचा एक खडाजंगीचा कार्यक्रम करायचो. नंतर इतरही वादावादीचे कार्यक्रम करू लागलो. वेगवेगळे विचार एकामेकांसमोर येवून धडकले की त्यातून एक सर्वमान्य असा विचार पुढे येतो. त्यासाठी अशा टीव्ही डिबेट महत्वाच्या असतात. परंतु आजपर्यंत मला भेटणाऱ्यांमध्ये क्वचितच कुणीतरी या युक्तिवादांवर माझ्याशी वैचारिक चर्चा केलेली आहे. भेटल्याबरोबर त्यांची प्रतिक्रिया एकच – “कितें खालो रे तुवें ताका. वालोर तुका.” आजही मला कित्येकजण सांगत असतात – “तूं बॅस्ट खातालो तांकां.” म्हणजे मी त्यांना युक्तिवादात हरवले तर पाहणाऱ्याला आनंद होतो. वा कुणीतरी वादावादीत हरतो याचा आपणाला हर्षोन्माद होतो.

आजकाल फेसबूक वा ट्विटरवरसुद्धा अशाच गोष्टींचा सुकाळ असतो. कुणी तरी एक गंभीर स्वरुपाचा मुद्दा मांडला तर त्यावर वैचारिक चर्चा फारच थोडी होत असते. परंतु त्या व्यक्तीचा मुद्दा पटत नसला तर त्यावर तुटून पडण्यात जास्त लोकांना मजा येते. त्या व्यक्तीला अक्षरशः नामोहरम केले जाते. विशेषणांपासून शिव्यांपर्यंत सर्व मार्ग मुक्तहस्ते चोखाळले जातात. त्यात त्या व्यक्तीचा मुद्दा कुठच्या कुठे हरवून जातो ती गोष्टच अलाहिदा.

या सगळ्याच गोष्टी एकमेकांत जुळवून विचार करतो तेव्हा मनाला प्रश्र्न पडतो. दुसऱ्याला हरवणे, चीत करणे, खाली पाडणे, मारहाण करणे वा जिवंत मारूनसुद्धा टाकणे ही मानवी प्रवृत्ती मुळातच आम्हा सगळ्यांमध्ये असते का? काल आपण लढायांतून स्वतःला तृप्त करून घेत असू, नंतर जात, धर्म, भाषा, प्रदेश, वंश अशा गोष्टींच्या सामुहिक आविष्कारातून स्वतःला तृप्त करून घ्यायला लागलो आणि आज टीव्हीपुढील रिएलिटी शो पहात वा सोशल मिडियावर जाऊन हल्लेखोरी करीत स्वतःची ही मारेकरी भूक भागवून घेतो आहोत का? काय आहे ही? प्रवृत्ती की विकृती? राग, रोष, क्षोभ की निव्वळ हिंसा? कोण बनतोय आपण? एका नव्या संस्कृतीचे जनक?

(हा लेख लोकमत गोवा आवृत्तीच्या 8 फेब्रुवारी 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाला)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

It has been scientifically proved that 97% of people do not want others to succeed, 1% want others to do well and 2% just do not care about either so there is nothing new there.

Isn't it obvious that 'organized' religions extolling superiority of their faith are responsible for most of the global problems of the day? do you hear violence due to Buddhist or Jain faith?

- Sandesh, Mumbai | 15 th February 2015 17:17

 

Related Blogs