तियात्रः गोमंतकाचा स्वाभिमान

By Sandesh Prabhudesai
06 February 2015 17:16 IST

तोमाझिन कार्दोझ हे जसे एक राजकारणी, शिक्षक, विचारवंत तसेच एक तियात्रिस्टही. आपण लिहून दिग्दर्शित केलेल्या एकूण 20 तियात्रांच्या संहितांची पाच पुस्तके त्यांनी एकाच वेळी प्रकाशित केली आहेत. तियात्राच्या क्षेत्रातीलच नव्हे, तर गोव्याच्या नाट्यसृष्टीतील हा बहुतेक विक्रमच असावा. 1974 पासून कला अकादमी आयोजित करीत असलेल्या तियात्र स्पर्धेत ते भाग घेतात व नाविन्यपूर्ण प्रयोग करीत बक्षिसेही पटकावून जातात. शिवाय व्यावसायिक पातळीवरही आपल्या सोयीनुसार प्रयोग लावतात. आतापर्यंत लिहिलेल्या एकूण 32 तियात्रातील वेचक 20 तियात्र त्यांनी आता पुस्तकरुपाने प्रसिद्ध केलेले आहेत. यातील काही तियात्रांची रोमी वा देवनागरी लिपीत पुस्तके प्रसिद्ध झाली होती. परंतु ती आता उपलब्ध नाहीत. तियात्रांची पुस्तके काढण्याची पद्धत नसल्याने तियात्राच्या इतिहासाचा शोध घेताना अनंत अडचणी येतात म्हणून आपण ही पुस्तके छापली आहेत असे तोमाझिनबाबाचे म्हणणे. दुसऱ्याची संहिता घेऊन प्रयोग करण्याची प्रथा तियात्र संस्कृतीत प्रचलित नाही. त्यामुळे पुस्तकाला तसे जास्त महत्वही नसते.

परंतु या वीसही संहितांवर नजर फिरवली तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते. यातील एकही संहिता काल्पनिक स्वरुपाची नाही. एक तर फार्सिकल स्वरुपाची संहिताही प्रभावीपणे सामाजिक विषय मांडीत जाते. त्यांचे बहुतेक सगळेच तियात्र सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रातल्या ज्वलंत विषयांवर आहेत. चोगमच्या पार्श्र्वभूमीवरील ‘म्होवाळ वीख,’ राजकीय पर्दाफाश करणारे ‘समाजसेवा’, ‘अर्थ’ वा ‘सांखळ्यो,’ उमेदवाराला नाकारण्याच्या आणि परत बोलावण्याच्या हक्कांची गरज पटवून देणारा ‘नवी दिशा,’ त्याशिवाय समाजातील भोंदूगिरी, मुंडकारांचे हक्क, ड्रग्सचे विपरित परिणाम, आंतरधर्मीय लग्न, महिला मुक्ती, अपंगांची ताकद, राष्ट्रभक्ती आणि मानवी मूल्यांवर आधारित अनेक विषय तोमाझिनबाबनी आपल्या तियात्रातून हाताळले आहेत. मुळात समाजातील ज्वलंत विषयांवर प्रकट होणे हाच तियात्राचा मूलभूत मंत्र आहे.

दुर्दैवाने गोव्याच्या नाट्यक्षेत्रात तियात्राच्या या प्रकाराला हवा तो दर्जा मिळत नाही. काही नाट्य दिग्गजांच्या मते तियात्र हा लोकनाट्यातून विकसित झालेला प्रकार आहे. शिवाय तियात्रांची वैचारिक व प्रायोगिक पातळी खूपच खालच्या दर्जाची असते. प्रत्यक्षात, एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस सुरु झालेला तियात्र ही आज एकविसाव्या शतकातील संपूर्ण भारतातील सर्वात यशस्वी व्यावसायिक रंगभूमी आहे. एकाच दिवशी एकाच थिएटरमध्ये तीन वेगवेगळ्या तियात्रांचे हाउसफुल्ल प्रयोग होण्याचे रेकॉर्ड केवळ तियात्राच्याच रंगभूमीवर होतात. 1980 साली ‘डायव्होर्स’ या तियात्राने सलग 100 प्रयोगांचा विक्रम केला होता. त्यानंतर कित्येकजण सँच्युरी किंग बनले. प्रिन्स जाकोबच्या ‘पाद्री’ने तर 315 प्रयोगांचा विक्रम केला. वर्षाकाठी गोव्यात तियात्रांचे 3000 प्रयोग होतात. मडगावाच्या गोमंत विद्या निकेतनमध्ये तर महिन्यात 45 प्रयोग करण्याचा विक्रमही केवळ तियात्रांनीच केलेला आहे.

लोककलेच्या प्रकारातून तियात्राचा जन्म झाला हे निव्वळ थोतांड आहे. 1890 च्या आसपास बार्देस तालुक्यातल्या आसागावचा लुकाझिन रिबेरो हा संगीतप्रेमी तरुण मुंबईत इटालियन ऑपेराच्या कंपनीत बॅकस्टेज कलाकार म्हणून कामाला होता. त्याने त्यांच्या ‘इटालियन बॉय’ या ऑपेराचा ‘इटालियन भुरगो’ असा अनुवाद करून त्याचा पहिला प्रयोग मुंबईच्या न्यू आल्फ्रेड थिएटरमध्ये 17 एप्रिल 1892 रोजी सादर केला. त्या काळात मुंबईत काम करणारे दक्षिण गोव्यातील गोंयकार आपला पारंपारिक खेळ (फेळ) करायचे तर उत्तर गोव्यातील जागोर. या दोन्ही लोककलाप्रकारांतील खालच्या पातळीवरील विनोदांमुळे त्यांचा दर्जा खालावला होता म्हणून लुकाझिनने हा दर्जेदार नाट्यप्रकाराचा पर्यायी उपाय शोधून काढला होता. त्यानंतरही रिबोरे व इतरांनी इंग्रजी ऑपेरा आणि नाटकांचे अनुवाद कोंकणीतून सादर केले. ‘अल्लादिनाचा जादूचा दिवा’, ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’ आणि ‘हॅम्लेट’ सुद्धा. त्याला ते ‘थियेट्रो’ म्हणायचे, तियात्र नव्हे. पोर्तुगीज भाशेत थिएटरला ‘तियात्रो’ म्हणतात. त्यातून तियात्र हा शब्द रूढ झाला तो 1959 मध्ये.

‘इटालियन भुरगो’च्या प्रयोगत वेगवेगळ्या प्रसंगांचे नेपथ्य बदलायला वेळ हवा होता. त्यावर उपाय म्हणून त्यातल्या संगीतप्रेमी पुढचा दुसरा पडदा टाकून कथानकाशी काहीही संबंध नसलेली गाणी म्हणायचे ठरवले. ड्रम, व्हायोलीन, ट्रम्पेट, सेक्साफोन वाजवणारे होतेच. त्यातून अभिवन अशा कांतारांचा जन्म झाला. गरजेपोटी. परंतु हा प्रकार एवढा लोकप्रिय झाला की सात प्रवेशांच्या मध्ये (सात पड्डे) किमान तीन ते चार कांतारां म्हणण्याची प्रथाच सुरू झाली. एकाने गायचा तो सोलो, दोघांचे ड्युएट, तिघांचा ट्रियो आणि चौघांचो चवको असे चार गीतप्रकार तयार झाले. गंभीर, नर्मविनोदी, संवादात्मक आनी नाट्यात्मक असेही प्रकार तयार झाले. त्याशिवाय आपल्या ऐतिहासिक मराठी नाटकांतून असतात तसा प्रवेशाच्या पडद्यापुढचा धमाल विनोदी ‘सायड शो’ सुरू झाला. या दोन्ही प्रकारांतून कितीतरी सामाजिक प्रश्र्नांना वाचा फुटू लागली. सात प्रवेश व त्यांच्यामध्ये 21 ते 28 कांतारां असा हा संगीत नाटकाचा अभिनव आणि आधुनिक प्रकार भारतात एकमेव आहे. याच प्रकाराने आजपर्यंत रंगभूमीवरील संगीत टिकवून ठेवले आहे. कोंकणीतील तर हे पहिलेवहिले संगीत नाटक यात संशयच नाही.

मात्र केवळ इंग्रजी ऑपेरांचा अनुवाद करण्याची प्रथा रिबेरोबरोबरच असलेल्या जुवांव आगुस्तीन फॅर्नांडीस यांनी मोडून काढली व गोव्यातील सामाजिक प्रश्र्नांना वाचा फोडणारी स्वतंत्र कोंकणी नाटके लिहिण्यास सुरवात केली. त्यांच्या या तियात्रांची त्यांनी पुस्तकेही छापली होती. हा प्रकार कल्पनेबाहेर यशस्वी झाला व त्यातून गोवा-मुंबईची ही व्यावसायिक रंगभूमी उभी राहिली. आता तर ती परदेशात व खास करून आखाती देशांचेही दौरे करते.

काही वर्षांपूर्वी इंत्रूजच्या वेळी होणाऱ्या खेळांच्या धर्तीवर रंगमंचावर एकांकिका होऊ लागल्या होत्या. दोन एकांकिकांचे मिळून तियात्राच्या धर्तीवर प्रयोगही होत होते. त्यातून 1980 च्या दशकात बाणावलीच्या रुझारियो रॉड्रिक्स यांनी एकच कथानक असलेल्या नॉन-स्टॉप खेळ तियात्रांचा प्रयोग केला होता. काही काळ हा प्रयोग चालला, परंतु स्वतंत्र विषयांवरील कांतारां नसल्याने तो लोकप्रिय झाला नाही. परत एकदा सात पड्ड्यांच्या तियात्राचे अनुकरण पुढेही चालू राहिले. खेळ या लोककलेतून विकसित झालेला खेळ तियात्र संपला.

तियात्र या भारतातील सर्वात जुन्या आणि आजही लोकप्रिय असलेल्या एकमेव नाट्यप्रकारावर महाराष्ट्रातील दिवंगत प्रमोद काळे यांनी संशोधन केले होते. गोवा विद्यापीठातले इंग्रजीचे प्राध्यापक डॉ राफाइल फॅर्नांडीस यांनी तर याच विषयावर शोधप्रबंध सादर करून डॉक्टरेट मिळवली आहे. मात्र मराठी रंगभूमी जशी पौराणिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, प्रायोगिक अशी संगीत नाटकातून गद्य नाटकांपर्यंत विकसित होत गेली तशी तियात्र रंगभूमी झाली नाही. आहे तो प्रकार व्यावसायिक पातळीवर यशस्वीरित्या चालत असल्याने ते धाडसही बहुदा कुणी केले नाही. व्यावसायिकतेच्या नावे मराठी नाटकांचे विषय सुखवस्तू समाजाच्याच सुख-दुःखामध्ये व त्यांची तिकिटे परवडणाऱ्यांच्या थिएटरांमध्ये बंदिस्त झाले. परंतु तियात्राचे तसे झाले नाही. सर्वसामान्य लोकांचे प्रश्र्न व राजकीय ढोंगबाजीचा पर्दाफाश यातून तियात्र अजूनही जनसामान्यांची व्यावसायिक रंगभूमी म्हणून गर्वाने मिरवत आहे. गोव्यातील ही खरीखुरी लोकांची रंगभूमी आहे. तियात्राला कमी लेखणे म्हणजे बहुजन समाजाच्या भावविश्र्वाला कमी लेखणे होय. या व्यावसायिक गोमंतकीय रंगभूमीचा आपण सर्वांनीच खचितच स्वाभिमान बाळगायला हवा.

(हा लेख लोकमत गोवा आवृत्तीच्या 1 फेब्रुवारी 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाला)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

Tiatro will never rise at least the direction and the current form it is in, because it lacks the quality required for a stage art form. Most of the time it is put together amateurishly screaming only social and political messages relevant to a particular section of society.

The music or the kantara are like reading newspapers with some background music in it. As such it will be restricted to only a particular section of the society and will never rise to the levels of other stage forms. Just my two cents!!

- Sandesh, Mumbai | 09 th February 2015 06:04

 

Related Blogs