मुलांमधल्या एकलकोंडेपणाला कोण जबाबदार?

By Sandesh Prabhudesai
13 January 2015 00:11 IST

हल्ली एक नवीन ट्रेंड आलाय. स्पेशलायजेशनचा. स्पेशलिस्ट डॉक्टर, स्पेशलिस्ट ट्युशन टीचर, मॉलमधले स्पेशल स्टॉल्स, प्रदर्शनेसुद्धा स्पेशलायज्ड. स्वतःला सामाजिक म्हणवणाऱ्या संघटनाही स्पेशलायज्ड. महिलांची, बाल कल्याणाची, पर्यावरण रक्षणाची, पर्यटनविरोधातली वगैरे वगैरे. आधुनिक सोसायटीतल्या नवीन जातीसंस्थाच जणू काही. अशा वेळी कोंकणी भाशा मंडळासारखी एक भाषिक संस्था महिलांसाठी म्हणून ‘चित्रंगी’ घडवते, पुरुषांनाही सोबत घेते, भाषिक अभिनिवेष न बाळगता समाजातील विविध प्रश्र्नांवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांना व अज्ञांना बोलावून मनमोकळी चर्चा करते तेव्हा आपसूकच “व्वा” असा उद्गार तोंडातून निघून जातो. जानेवारीच्या पहिल्याच शनिवार-रविवारी पेडण्यात झालेला चित्रंगी मेळावा म्हणूनच असेल कदाचित, परंतु स्मरणात राहण्यासारखा झाला. त्यात भर म्हणून राज्यभरातून शेकडो युवक-युवतींनी उपस्थिती लावली आणि त्यात रंगत आणली.

या मेळाव्यातील एक सत्र – शेवटचे – फारच उद्बोधक होते. खास तरुणाईसाठी ठेवलेले. तेही युवा पिढीमध्ये वाढत चाललेल्या एकलकोंडेपणावर. सत्रात भाग घेतला मानसोपचारतज्ञ डॉ अनिल राणे, मनसल्लागार (कौन्सेलर) वैष्णवी हेगडे, लेखक-कलाकार साईश पाणंदीकार व दोन युवती – कृतिका मांद्रेकार व अनार भंडारी यांनी. दिलीप प्रभुदेसाय सूत्रसंयोजक. कृतिका आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. तिनं सांगितलं ते अंतर्मुख करणारं होतं. पाचवीच्या वर्गात पहिल्याच दिवशी गेल्यावर तिला तिच्या पालकांनी पहिल्याच बाकावर बसवलं अन् ते गेले. इतक्यात एक मुलगा आला आणि तिला तिथनं उठवलं. म्हणाला, हा माझा बाक आहे. तू दुसरीकडे बस. “मला असलं ऐकायची सवय नव्हती. घरात सगळं काही माझं एकट्याचं होतं. आपलं आहे ते दुसऱ्यालाही द्यायचं असतं हे ठाऊकच नव्हतं. कधी काही मागितलं तर नाही म्हणून ऐकायचीही सवय नव्हती. पण मग शाळेत मैत्रिणी भेटल्या व हळूहळू मी सोशल बनले. पूर्वी मनातलं बोलून दाखवण्यासाठी कुणीच नव्हतं, आता मैत्रिणींपाशी सगळं काही बोलते.”

परंतु सर्वांनाच असे मित्र-मैत्रिणी भेटतात का? आणि नाही भेटले तर? तर मग एकलकोंडेपणा वाढत जातो का? घरात आई-वडिल सोडले तर आणि कुणीच नसतं त्यामुळं एकलकोंडेपणा सुरू होतो का? 10 वर्षांपूर्वी ‘सुनापरान्त’ मध्ये काम करताना नववीच्या वर्गात शिकणाऱ्या युगा आडारकरनं लिहिलेली कविता मला आठवली – “देवा, वण्टीक म्हजेकडेन उलोवपाक शिकय.” आई-वडील सोडा, घरात भाऊ असूनसुद्धा माझ्याशी बोलत नाही अशी तक्रार करीत तिनं लिहिलेली कविता अंगावर शहारे आणणारी होती. या सत्रावेळी युगाही प्रेक्षकांमध्ये होती. ती म्हणाली – “मी आरशात बघून अजूनही स्वतःशीच बोलते.” विद्यापीठात पीएचडी करणाऱ्या तन्वी बांबोळकरनं तर विचारांचं चक्रच झटका देऊन उलटं फिरवलं – “मी काका-काकी-भाऊ-बहिणी असलेल्या एकत्र कुटुंबात राहते. तरीही मला एकटं वाटतं. म्हणजे एकलेपणा ही परिस्थितीची परिणती आहे की मनाची अवस्था?”

सगळ्याच प्रश्र्नांना डॉक्टर आणि मनसल्लागारांपाशी उत्तरं होतीच असं नव्हे. परंतु एकलेपणाचे प्रकार वाढत चालले आहेत यावर मात्र सगळ्यांचंच एकमत होतं. वैष्णवीनं सांगितलेला एक अनुभव तर आणखीनच अंतर्मुख करणारा होता. तुम्ही मुलांशी रोज बोलत चला, त्यांचं मन समजून घ्या असा सल्ला जेव्हा तिनं एका केसमध्ये पालकांना दिला तेव्हा पालकांनी तिलाच विचारलं – काय बोलायचं आम्ही तिच्याशी? बोला म्हटलं तर काय बोलायचं तेही ठाऊक नव्हतं. वैष्णवीनं मग प्रेक्षकांना स्वतःचाच अनुभव सांगितला. आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ व्यंकटेश हेगडे व संगीता हेगडेंची ती मुलगी – “लहानपणापासूनच रात्री जेवण झाल्यावर किमान पाच-दहा मिनिटे आम्ही सर्वजण एकत्र बसून गप्पा-गोष्टी करीत असू. त्यातनं मी घडत गेले. ती पाच-दहा मिनिटे किती मौल्यवान होती ते मला आज समजतंय.”

वर्षपद्धतीप्रमाणे मी 31 डिसेंबरला संकल्प दिन साजरा करण्यासाठी सत्तरीत गेलो होतो. यंदा तो झिलू गांवकर सरांच्या सांखळीच्या घरात होता. तिथे भाजपाचे आमदार डॉ प्रमोद सावंत व त्यांची शिक्षक पत्नी सुलक्षणा आले होते. त्यांच्या लहान मुलीला घेऊन. संपूर्ण कार्यक्रमात ती वडिलांच्याच मांडीवर होती. कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येकाने आपला नववर्षाचा संकल्प सांगायचा असतो. सुलक्षणा सावंतांनी सांगितलं – “आमच्या दोघांच्या कामाच्या रगाड्यात आमचं मुलीकडे दुर्लक्ष होता कामा नये. म्हणून यानंतर मी जाणीवपूर्वक मुलीसाठी क्वॉलिटी (गुणवर्धक) वेळ द्यायचं ठरवलंय.” मला स्वतःला तरी हा संकल्प फारच महत्वाचा वाटला. रोज घरी येवून आज शाळेत काय काय घडलं ते सविस्तर बडबडणारी आमची मुलगी ऋचा मला आठवली. आम्ही घरी नसलो तर फोन करून बडबडते. 24 तासांतली केवळ पाच मिनिटं. फार फार महत्वाची असतात ती. माझ्या पत्रकारितेच्या रगाड्यात मी माझ्या मोठ्या मुलाला वेळ दिला नाही याचं मला आजही दुःख आहे. त्याचं कसलंही समर्थन अर्थशून्य आहे.

डॉ राणेंच्या मते या एकलकोंडेपणाचे परिणाम फारच गंभीर होऊ लागलेत. मनावर ताण असणारे तरुण पेशंट वाढायला लागलेत. आपण कोण या शोधयात्रेत तरुण पिढी भरकटलीय. यातून मुलं तिरसट होतात, तुटक बोलतात, खोटं बोलायला लागतात, कधीकधी हिंसकही बनतात, व्यसनांच्या नादी लागतात, ड्रग्सच्या आहारी जातात आणि मग एक दिवस सरळ उठून आत्महत्याही करतात. त्यांच्या मते आत्महत्येचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा गोव्यात दुप्पट आहे. आणि त्यात तरुण मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. का होतंय हे असं? त्यांच्या मते पूर्वी गावात मुलांना जी अंतर्भूत स्वरुपाची सपोर्ट सिस्टम (मदत यंत्रणा)  होती – एकत्र कुटुंब, आजी-आजोबा, शेजारी-पाजारी, भटकण्यासाठी मोकळा गाव – ती आजकाल शहरात राहणाऱ्या गोव्यात पूर्णतया कोलमडलेली आहे. ट्युशनला पाठवून, टीव्हीसमोर बसवून वा मोबाईल-टॅब्लेटसारखी गॅजेट्स देऊन हा प्रश्र्न सुटणार नाही. मुलांना आपलं मन समजून घेणारा मित्र मिळवून देणे हाच त्यावरील रामबाण उपाय.

परंतु गोव्याची संस्कृती झपाट्याने बदलत आहे. 1960 वर्षी 85 टक्के लोक गावात तर 15 टक्के शहरात रहायचे. आज केवळ 35 टक्के गावात तर 65 टक्के शहरात राहतात. त्यातले कित्येक आजी-आजोबा गावातच राहतात. एकत्र कुटुंब पद्धती जवळजवळ पूर्ण कोसळलीय. फ्लॅट संस्कृतीत शेजार हरवलाय तर घरातही केवळ एकच मुलगा वा मुलगी. त्यात भर म्हणून आम्ही पालक मुलांच्या बाबतीत अतिसंवेदनशील आणि ओव्हप्रॉटेक्टिव्ह झालोय. हसत-खेळत-चालत सोबत शाळेत जाणे व येणे पूर्णतया बंद झालेय. मुलांना एकटे सोडायला आम्ही घाबरतोय. स्वतंत्र बनवण्यात बिचकतोय. त्यांना सोबत द्यायला आमच्याशी वेळ नाही. वेळ असलाच तरी आई-वडिलांची वयस्कर सोबत आम्हाला तरी आमच्या लहानपणी कुठे पाहिजे होती? गोव्याची ही नवी संस्कृती आम्हाला कुठे नेतेय? एकलेपणाकडे? एकलकोंडेपणाकडे? वैफल्यग्रस्ततेकडे? व्यसनाधीनतेकडे? आत्महत्येकडे? की आपल्या कुटुंबाच्या आत्मघाताकडे?

 

(हा लेख लोकमत गोवा आवृत्तीच्या 11 जानेवारी 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाला)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

वर्तमानपत्र चाळता चाळता एका बातमीवर नजर खिळून राहिली , इयत्ता ७ वी एका मुलीची नापास झाल्यामुळे आत्महत्त्या !बातमी वाचताच अंगावर सरसरून कांटा आला . मनात विचारांचं काहूर उठलं -वय फक्त १२ वर्षे !

आयुष्याची सुरुवात होण्याआधीच शेवट ?असं का ? विचार करून मेंदूचा भुगा झाला . उत्तर काही सापडेना . मन

भूतकाळात गेलं . शाळा-कॉलेजातील दिवस , परीक्षा , निकाल ,पास -नापास … सगळे दिवस डोळ्यासमोरून गेले .

नापास झाल्यामुळे आत्महत्त्या ? छे ! असं कधी घडलंच नव्हतं , पण मग आताच का ?बालपणाचा असा अंत का करतात ही मुलं ?का अपयशाला पाठ फिरवितात ?

लहानपण देगा देवा म्हणून मागून घेतेलेलं बालपण !घट्ट मुठीत धरून ठेवता आलं असत तर ?मनाची निरासगता , कोवळेपणा , निष्पापवृत्ती मोठेपणी काळाच्या ओघात वाहून जाते . मन कोऱ्या पाटीसारख असतं . छक्केपंजे नसतात

आजूबाजूला काय चाललयं हे कळायचं ते वयही नसतं . दुखः चिंता या शब्दापासून तर ते कोसो दूर असतं , तर मग

मृत्यू या शब्दाशी त्यांची ओळख कशी ?रात्रीच्या अंधारात आईच्या पदराचा आडोसा घेणारी कोवळी मनं या वाटेला

जाण्यासाठी का धजावतात ?काय चाललयं त्यांच्या मनात ?"मरण "या शब्दानेच थोरामोठ्यांची वाचा बसते , अस काय घडतं त्यांच्या आयुष्यात की त्यांना पुढचं आयुष्यही नकोसं वाटत . कुठून धैर्य आणतात की समोर असलेल्या संकटाला तोंड द्यायचं सोडून ही पळवाट शोधून काढतात .

शाळा -कॉलेजातील परीक्षा या अंतिम परीक्षा नव्हेत , यापुढेही जीवनात याही पेक्षा अनेक कठीण परीक्षांना तोंड द्याव लागणार आहे हे कोण सांगणार या मुलांना ?यश पचविण फार सोपं पण अपयश महाकठीण -म्हणूनच यावेळी पाठीवरून मायेचा ,धीराचा फिरविणारा हात हवा . अपयश यायच्या आधी ते येणार या भीतीने चुकीची पावले उचलणारी आजची पिढी -इतकी कमकुवत मनाची ?

अशा मुलांना समजवायचं तरी कसं ?त्यासाठी कुटुंबात सुसंवाद हवाच . नोकरीच्या निम्मिताने आई-वडील दिवसभर बाहेर । जन्मापासून बालपण एकतर पाळणाघरात किंवा कोणीतरी बाई ठेऊन मुलाचं संगोपन केलं जातं . आताशा तर आजी आजोबा फक्त स्वप्नातले ! ज्यांना ही नातीगोती मिळाली ती मुलं नशीबवानच . नाहीतर एकटेपणाचं ओझं घेऊन ही मुलं तशीच लहानाची मोठी होतात . पैशाने त्यांच्या गरजा भागतातही पण जबाबदारी संपते का ?त्यातून सदोष परीक्षा पद्धत्ती . एखाद्या कारखान्यातून माल बाहेर पडावा तशी शिकलेली मुलं बाहेरच्या स्पर्धेच्या जगात मात्र सैरभैर होतात । मग अयशस्वी मुलांचं काय ?सुकाणू तुटलेल्या जहाजासारखी ती भरकटत जातात आता खरी परीक्षा असते पालकांच्या मानसिकतेची . मुलांचं अपयश मुलांपेक्षा पालकांनाच पचवीणं जड जातं . समाजात लोक काय म्हणतील हा प्रश्न त्यांना मान खाली घालायला लावतो . मुलांच्या अपयशाबद्दल जर पालकच खचून जाऊ लागले तर मग त्या मुलांचं काय ?पालकांच्या तिरस्कारयुक्त नजरा ,भीती त्यामुळे येणारी अपराधीपणाची ! याचवेळी जर कोणी त्यांना समजून घेणारा नसेल तर मग त्याच्या मनातील भावनांचा उद्रेक होतो . चांगलं काय , वाईट काय हे विचार करण्याची शक्तीच नाहीशी होते . मन एका टोकाच्या भूमिकेला जातं आणि मग कदाचित नको हा जीव हा विचार मनात प्रबळ होतो आणि आत्महत्या करायला ती प्रवृत्त होतात आणि जी मुलं ह्या मार्गाने जायला धजावत नाहीत ती मग दारू ,सिगारेट्स ,ड्रग्स वगैरे व्यसनांच्या आहारी जातात. मग अशा वेळी त्यांना गरज असते कोणाकडे तरी आपलं मन मोकळं करणं , आधार हवा असतो जवळच्यांचा , पण तोच त्यांना मिळत नाही ही आजची शोकांतिका . कारण आज मोडकळीस आलेली कुटुंबपद्धती . म्हणूनच आजची मुलं एकलकोंडी झाली आहेत ,त्यांच्यात तुटकपणा जाणवतो , ह्या जगाशी आपला काहीच संबंध नाही अशी ती वागतात . मग यावर उपाय काय ?समजून घेणारे ,आधार प्रोत्साहन देणाऱ्या पालकत्वाची आज नितांत गरज आहे .पाठीवर यशाची थाप देतांना कधीतरी येणाऱ्या अपयशालाही खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी त्यांच्या मनाला उभारी द्या . बालपण जगू द्या त्यांना !

- उर्मिला लोलयेकर, माशें, काणकोण, गोवा | 14 th January 2015 12:51

 

Related Blogs