आम्ही पत्रकार पोरके झालो

By Sandesh Prabhudesai (EdiThought)
20 January 2014 12:53 IST

आमचे वरिष्ठ कॉम्रेड फ्लाव्हियान डायस गेले. आलेला जातोच. पण जाताना वैचारिक पातळीवर व प्रत्यक्ष कृतीतून जो काही तरी ठेऊन जातो तोच अमर होतो. त्याचे जीवन ही मागे राहिलेल्यांना आणि नंतरच्या कित्येक पिढींनाही स्फूर्ती देत राहते. ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ हे भा रा तांबेंचे अजरामर गीत त्यांना लागू होत नाही. पळभर हाय हाय म्हणावे आणि विसरून जावे असे डायसबाब नव्हतेच मुळी. आजच्या आत्मकेंद्रित युगात त्यांच्या जीवनशैलीचे महत्व कदाचित उमगणार नाही नव्या पत्रकार पिढीला. दुसऱ्यांसाठी जगून गेला बिचारा म्हणून हळहळतीलही कदाचित काहीजण. परंतु पत्रकारिता आणि वैयक्तिक जीवन यांचा आदर्श कसा असावा असे कोणी विचारले तर डायसबाबसारखा असे सांगण्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे मात्र त्रिवार सत्य.

साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि लोकांसाठी आयुष्य हा जीवनमंत्र कसा बाळगून जगणारे अवघेच लोक आता राहिलेत. डायसबाब त्यातले एक. स्वातंत्र्यसैनिक विश्र्वनाथ लवंदे ट्रस्टचे आम्ही दोघेही विश्र्वस्त. त्यावेळी ऑगस्टच्या सुमारास मी त्यांना ट्रस्टच्या बैठकीत शेवटचा भेटलो होतो. रोजच्या प्रमाणेच इतिहासातल्या एक-दोन गोष्टी समजून घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चाही केली होती. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाच्या या साक्षीदारापाशी गोड आणि कटू आठवणींचा खजिना होता. कोण प्रामाणिक आणि कोण दांभिक हे ते आम्हाला उदाहरणांसहित सिद्ध करूनच सांगायचे. शेवटी हाडाचे पत्रकार. त्यामुळे आतल्या गोष्टी शोधून काढण्यात आणि सांगण्यातीह वाकबगार. कोणाच्या हितसंबंधांत गुंतले नसल्याने सत्य लपवून ठेवायचीही गरज त्यांना कधी भासली नाही. तेव्हा बेधडक सत्य बोलून जायचे. आम्हाला श्रीमंत करून जायचे.

पण असे म्हणून या गोष्टींचा कधी गैरवापर केलेलाही आम्ही बघितला नाही. सर्वांशीच मिळून-मिसळून वागायचे. प्रत्येक माणसापाशी चांगूलपणा असतोच. तो आपण घ्यावा आणि समाज पुढे न्यावा अशी त्यांची धारणा. उगाचच आडवे-तिडवे प्रश्र्न विचारून राजकारण्यांना वा अधिकाऱ्यांना नामोहरम करताना त्यांना कधी बघितले नाही. मात्र वेळ आली की असे काही अचूक मर्मभेदी प्रश्र्न विचारायचे की समोरच्याची पाचावरच धारण बसायची. कधी कुणासमोर आवाज चढवलेला बघितला नाही. पण पत्रकारांवर अन्याय होतो असे वाटले तर सरळ उभे राहून तिथल्या तिथे बोलायला लागले की पुढ्यातला मुख्यमंत्रीसुद्धा आतमधून हादरायचा. अगदी मुद्देसूद, अभ्यासपूर्ण आणि सूचकपणे प्रश्र्न मांडायची त्यांची पद्धत ही शेवटी साधनेतूनच यायची. म्हणूनच त्यांचा आदर वाटायचा.

गोवा महाराष्ट्रात का विलीन व्हायला पाहिजे होता ते सांगण्यासाठी मराठीच भाषा कशी आहे आणि कोंकणी बोली कशी आहे वगैरे वा भावनिक मुद्दे सांगणारे खूप भेटले. जातीयवादी भाषा बोलणारेही भेटले. परंतु गोवा महाराष्ट्रात गेला नाही म्हणून आमचे आर्थिक नुकसान झाले हा एकच मुद्दा अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणारे डायसबाब एकमेव. मी स्वतः मार्क्सवादी चळवळीत वावरून आल्याने त्यांच्या मार्क्सवादी विश्र्लेषणाचे मला जरा जास्त आकर्षण असायचे. गोवा आणि महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या मी तरी समजून घेतला तो डायसबाबकडून. मला तो पूर्णतया पटला नसेल, परंतु त्यांचे सगळेच मुद्दे अर्थशून्य होते असे म्हणण्याचे धाडस मात्र मी करणार नाही.

आपली पत्रकारितेची ऐन उमेदीची वर्षे डायसबाबनी मुंबईत घालवली होती. फ्री प्रेस जर्नलपासून सुरवात करून नंतर ते प्रेस ट्रस्ट मध्ये गेले आणि तिथूनच प्रेस ट्रस्टचे प्रतिनिधी म्हणून गोव्यात येऊन इथेच निवृत्त झाले. स्वातंत्र्यानंतर भारत घडत होता आणि बिघडतही होता तो मुंबईत राहून त्यांनी अगदी जवळून पाहिला होता. त्यासाठी पत्रकारितेतली लेखणी चालवतानाच एक कार्यकर्ता बनूनही ते रस्त्यावर उतरले होते. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात तर ते पीटर आल्वारीसच्या खांद्याला खांदा लावून वावरले होते. मूळ वेळ्ळीचे असले तरी त्यांचे कार्यक्षेत्र आधी मुंबई आणि नंतर पणजी असेच राहिले. कम्युनिस्टांची मक्तेदारी संपवून शिवसेना गैरमार्गाने कशी मुजोर बनली त्याचे कित्येक किस्से ते सांगीत असत. त्याचबरोबर कम्युनिस्टांमधल्या दांभिक वृत्तीचेही किस्से ऐकवत. काँग्रेसवाले, समाजवादी अशा सर्वांचीच दांभिक रुपे आणि तेवढीच प्रामाणिक रुपे आम्हाला त्यांच्याकडूनच समजली. कोणत्याही विशिष्ट इझमपेक्षा मानवतावाद हाच श्रेष्ठ असतो, परंतु त्याचवेळी विज्ञाननिष्ठ नजरही तेवढीच महत्वाची असते हे पत्रकारितेच्या वैचारिक बैठकीचे बाळकडू मीं त्यांच्याकडूनच पिलो.

कधी एके काळी ते आमच्या गुज या पत्रकार संघटनेचे अध्यक्षही होते. परंतु अध्यक्षपदाच्या निवडणुका लढवण्याच्या पलीकडे गेलेला हा ट्रेड युनियनिस्ट होता. निवडणूक जवळ आली की पत्रकारांचे गट व्हायचे, एकामेकांविरुद्ध प्रचार सुरू व्हायचा, कधीकधी हमरीतुमरीसुद्धा. मग कधी हा गट तर कधी तो गट निवडून यायचा. मात्र सर्वांचाच समान दुवा एकच. फ्लाव्हियन डायस. शेवटी सगळ्या केसीस कामगार आयुक्तांपुढे त्यांनीच चालवायच्या. ज्यांना रस असेल त्यांनी त्यांच्याकडून त्या शिकून घ्यायच्या. कधीकधी ज्या पद्धतीने निवडणुका होऊन लोकं निवडून यायचे ते त्यांना अजिबात आवडलेले नसे. परंतु तो आकस ठेऊन आपण या गटाला मदत करणार नाही असा पावित्रा त्यांनी कधीच घेतला नाही. आयुर्विमाल्यासुद्धा पर्याय तयार झाले. परंतु गुजमध्ये डायसबाबना पर्यायच नव्हता. कामगारांच्या केसीस चालवण्यासाठी आणि पत्रकारांमध्ये जुंपली तर त्यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी. आज कंत्राटी संस्कृतीच्या वातावरणात ते ट्रेड युनियनिझमच लोप पावलेय म्हणून नशीब. अन्यथा डायसबाब गेल्यावर काय हा मोठा यक्षप्रश्र्नच राहिला असता. मात्र ते ट्रेड युनियन स्पिरिट असलेला कोण कॉम्रेड गुजचा रक्षणकर्ता म्हणून आता उभा राहील हा प्रश्र्न आहेच. त्या दृष्टीने गोव्याची पत्रकारिता पोरकी झालीय हे निश्र्चित.

डायसबाब केवळ एक पेन्शन फायटर स्वातंत्र्यसैनिक नव्हते. शेवटपर्यंत एक सैनिक म्हणूनच ते जगले. पत्रकारिता करताना निष्ठापूर्वक ट्रेड युनियनिझम केली. पत्रकारितेत रिपोर्टरपासून ब्युरो चीफ आणि संपादक म्हणूनही वावरले. आपल्या वैचारिक लेखणीने आमच्या डोक्यात प्रकाश टाकला. परंतु वेळ येईल तेव्हा कार्यकर्ते बनून रस्त्यावरही उतरले. भारतातला पहिला माहिती हक्काचा कायदा गोव्यात आणण्यासाठी पत्रकार संघटनेने पुढाकार घेतला तेव्हा गोवा विधानसभेच्या चाळीसही आमदारांनी मिळून पत्रकारांनाच कचाट्यात पकडणारे कलम या कायद्यात घुसवले. त्यावेळी सिटिझन्स फॉर रायट टू इन्फोर्मेशन या संघटनेचे ते अध्यक्ष होते. आम्ही गोवाभर जाहीर सभा घेत फिरलो. आरोग्याची पर्वा न करता आम्हा तरुणांना लाजवणारी उमेद घेऊन ते आमच्याबरोबर फिरले. शेवटी सर्व राजकीय पक्षांना आणि राजकारण्यांना नामोहरम करून ती लढाई आम्ही जिंकली. त्यात डायसबाबचे मार्गदर्शन शब्दांपलिकडचे होते.

आम्हा तेव्हाच्या तरुण पत्रकारांना घडविणाऱ्या आमच्या या निस्वार्थी, निष्ठावान, प्रामाणिक व तेवढ्याच लढावू कॉम्रेड शिल्पकाराला ही विनम्र श्रद्धांजली. डायसबाब चिरायू होवो.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai (EdiThought)

Sandesh Prabhudesai is the Editor of goanews.com. He has been earlier the Editor of Sunaparant (Konkani daily) and Editor-in-Chief of Pruden (TV channel). His collection of selective editorials of Sunaparant has been published as 'Goff'. He writes brief thoughts as EdiThought for goanews.com, but not on regular basis.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs