बेटाबेटांचे सांस्कृतिक घटक राज्य

By Sandesh Prabhudesai
31 May 2013 10:44 IST

केवळ गोवाच अजीब नाही, गोव्याचा इतिहासही अजबच आहे. गोव्याच्या आजूबाजूचे प्रदेश आणि इतर भारतावरही ब्रिटिशांचे राज्य होते त्याहून कित्येक वर्षे पूर्वीपासून गोव्यावर पोर्तुगीजांचे राज्य होते. ज्या केरळातून आफोंस द आल्बुकेर्क इथे गोव्यात आला ते केरळ राज्यसुद्धा नंतर ब्रिटिशांच्याच ताब्यात गेले. परंतु दीव, दमण व नगर हवेलीसारख्या छोट्या प्रदेशांबरोबर गोवा मात्र पोर्तुगीजांच्याच ताब्यात राहिला. पोर्तुगीजांनी मुंबई आंदण म्हणून ब्रिटिशांना दिली, परंतु गोवा दिला नाही. त्यामुळे ब्रिटिशांना हाकलून 1947 साली भारत स्वतंत्र झाला तरी आम्हा गोमंतकियांना त्याच स्वातंत्र्याची हवा खायला आणखीन 14 वर्षे वाट पहावी लागली. त्यानंतरही गोवा पूर्णतया स्वायत्त झालाच नाही. पोर्तुगीज गेले आणि दिल्लीवाले आले. संघप्रदेशाच्या नावाखाली आम्ही निवडून दिलेले आमचेच लोकप्रतिनिधी केंद्र सरकाराच्या ओंजळीतून पाणी पीतच राज्य करू लागले. त्यातून बाहेर पडून घटक राज्याचा दर्जा मिळविण्यासाठी परत गोव्याला आणखीन 26 वर्षे वाट पहावी लागली. म्हणजेच पूर्णतया स्वतंत्र भारतातील एक राज्य म्हणून वाटचाल करण्यासाठी आम्हाला एकूण 40 वर्षे वाट पहावी लागली. या उशिरा मिळालेल्या स्वायत्ततेचीच 26 वर्षे आम्ही आज पूर्ण केलेली आहेत.

त्यात भर म्हणून गोव्याचा सांस्कृतिक इतिहासही तेवढाच अजब झालेला आहे. गोव्याचे लोक बोलतात कोंकणी. त्यांचे लोकवेद कोंकणीत. परंतु कित्येक काळ व्यवहार चालले ते मात्र एक तर मराठीतून वा पोर्तुगीज भाषेतून. धार्मिक विधी चालले एक तर संस्कृतातून वा लॅटिन भाषेतून. आपल्याच प्रदेशात आपल्याच भाषेचे संरक्षण करण्यासाठी व नंतर तिला राजभाषेचा मान मिळवून देण्यासाठी गोमंतकियांना स्वकियांशीच संघर्ष करावा लागला. काहींनी तर आपली भाषा आपली भाषाच नाही असाही अट्टाहास धरला. शेवटी राजभाषा कायद्यातून यावर राजकीय उपाय काढला गेला व कोंकणी गोव्याची कागदोपत्री राजभाषा झाली. मराठीचीही दखल घेतली गेली. प्रत्यक्षात मात्र आपण इंग्रजीचीच शय्यासोबत केली. राजदरबारीही, व्यवहारातही आणि शिक्षणातही. आमचे भाषाप्रेम केवळ प्राथमिक शिक्षणापुरते. आमच्यामधले कोंकणी-मराठीचे भेदभावसुद्धा प्राथमिक शिक्षणापर्यंतच. माध्यमिक शिक्षणापासून मात्र आम्ही सगळेच एकजात इंग्रजी. आमचा कोंकणीचा मोग वा मराठीचे प्रेमसुद्धा हल्लीच्या काळात आम्ही इंग्रजीतून जास्त प्रभावीपणे व्यक्त करू शकतो.

विविध राजवटींचा गोवा

तीच परिस्थिती आमच्या गोमंतकीय संस्कृतीची. पौर्वात्य आणि पाश्चात्य संस्कृतींचा संगम म्हणजे गोवा असा एक सर्वसाधारण समज आहे. परंतु प्रत्यक्षात या संस्कृतीचा इतिहास राजकीय वा सामाजिक दृष्टीतून विश्लेषित करण्याची गरज आहे. कारण गोव्यावर 16 राजवटींनी राज्य केले. केवळ पोर्तुगीजांनी नव्हे. पोर्तुगीज इथल्या तीन तालुक्यांमध्ये – सासष्टी (आजच्या मुरगावसहित), तिसवाडी व बार्देस – 450 वर्षे राहिले व नंतर 125 ते 150 वर्षे इतर सात (आताचे आठ) तालुक्यांवर त्यांनी राज्य केले. धर्मांतर व नंतरच्या इन्क्विझिशनमधून इथल्या ख्रिश्चन समाजाची संस्कृतीच त्यांनी बदलून टाकली म्हणून आपण या एका राज्यकर्त्याबद्दल जरा जास्तच बोलतो. टी बी कुन्हासारखे विद्वानसुद्धा डिनॅशनलायझेशनबद्दल बोलतात ते यासाठीच. पण म्हणून त्यापूर्वीची सगळी संस्कृती अस्सल गोमंतकीय होती असे काही नव्हे. या 15 राजवटींच्या संस्कृतींचाही प्रभावही आमच्यावर आहे.

आजच्या इराकमध्ये मूळ सापडते ते मॅसोपोटोमियाचे असलेले सुमेरियन ही ख्रिस्तपूर्व 2200 मध्ये गोव्यावर सत्ता गाजवणारी पहिली राजवट असे इतिहासकार सांगतात. त्यानंतर उत्तरेहून आर्य आले तर दक्षिणेहून द्रविड. आजच्या बिहारमधील मगधातून आलेली मौर्य राजवट, गुजरातहून आलेले क्षत्रप व भोज, महाराष्ट्रातून आलेले शतवाहन, अभीर व शिलाहर, कर्नाटकातून आलेले चालुक्य, राष्ट्रकूट, कदंब, विजयनगर व आदिलशहा अशा कित्येक राजवटींचा यात समावेश आहे. काही राजवटी तर शंभर-दीडशे वर्षेपर्यंतसुद्धा टिकल्या. त्यातून सनातनी, बौद्ध, जैन व इस्लामीक अशा सगळ्याच संस्कृतींचा प्रभाव गोव्यावर पडलेला आहे. नंतर आलेल्या पोर्तुगीज सत्तेतून तर ख्रिश्चनांमधल्या पोर्तुगीज, स्पॅनिश व आफ्रिकन संस्कृतींचासुद्धा आपल्यावर प्रभाव आहे. त्यातूनच आपली आजची निजाची गोमंतकीय समजली जाणारी संस्कृती घडलेली आहे. केवळ पोर्तुगीज व भारतीय संस्कृतींचा मिलाफ नव्हे. अर्थात, पोर्तुगीज सोडल्यास इतर संस्कृतींचा प्रभाव भारतातील इतरही प्रदेशांवर असल्यामुळे व गोव्याच्या किनारपट्टी भागात पाश्चात्य संस्कृतीचा जास्त प्रभाव असल्यामुळे या चार तालुक्यातला गोवा इतर भारतापेक्षा जरा जास्तच वेगळा वाटतो हेही तेवढेच खरे.

भाषिकांची संस्थाने

घटक राज्याला 26 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्याने या सर्व राजकीय व सांस्कृतिक इतिहासाचा आढावा घेण्याचे कारण म्हणजे घटक राज्याचा इतिहास. तुम्ही राजभाषेचा प्रश्न सोडवा, आम्ही तुम्हाला घटक राज्य देतो असे तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधींनी सांगितले होते. भाषा आणि संस्कृतीचा प्रश्न घेवूनच राजभाषा आंदोलन झाले. केवळ कोंकणी की कोंकणीबरोबर मराठीही या प्रश्वावर धुमश्चक्री झाली आणि शेवटी केवळी कोंकणी राजभाषा व मराठीलाही जवळजवळ समान स्थान अशी राजकीय क्लुप्ती काढून हा प्रश्न सोडवला गेला. कोंकणीच्या विकासाचा पण सोडला गेला तर मराठीच्या स्थानाला झळ लागू द्यायची नाही असा तडजोडीचा मार्ग काढला गेला. यातून गोमंतकीय भाषेचा व संस्कृतीचा विकास करायचा हे खरे आव्हान गोव्यापुढे ठाकले. त्या दृष्टीने या चार हजार वर्षांच्या पार्श्वभूमीवर गेल्या 26 वर्षांचा आढावा घेणे जरुरीचे ठरेल. आपण कमावले किती व गमावले किती त्याचे सिंहावलोकन करावे लागेल. ते या छोट्याशा लेखात शक्यच नाही. गोव्याचे राज्यशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व संस्कृतीतज्ञांना जास्त खोलात जावून यावर विचार करावा लागेल. तेव्हाच काही तरी हाताला लागेल.

राजभाषेचाच विषय घ्यायचा झाला तर भाषा विकासासाठी स्थापन झालेल्या सरकारी संस्थांची आज संस्थाने झालेली आहेत. निवडणुकीनंतर सरकारपक्ष बदलले की गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष बदलण्याची राजकीय परंपरा सुरू झालेली आहे. रोमी लिपीतील कोंकणीने देवनागरी कोंकणीकडून फारकत घेतलेली आहे. रोमीची वेगळी दाल्गाद कोंकणी अकादमी सरकारी आशिर्वादाने सुरू झालेली आहे. म्हणजेच घटक राज्याच्या निर्मितीनंतर कोंकणी राजभाषेचीच शकले झालेली आहेत. गोमंतक मराठी अकादमी तर ताब्यात घेण्याची भाषा खुद्द सत्ताधारी करू लागले आहेत. कंपूशाहीचे आरोप करून त्यांच्या (गैर)कारभाराची चौकशी सुरू झालेली आहे. मराठी अकादमीची अर्धवट इमारत मराठीच्या स्थानाचे मूर्तिमंत उदाहरण बनून पर्वरीला (कशीबशी) उभी आहे. आताशी कुठे कोंकणीचा वापर विधानसभेत अधिकृतरित्या सुरू झालेला आहे. काही मुलकी अधिकाऱ्यांना कोंकणीचे मूलभूत शिक्षण देण्याची प्रक्रिया परत एकदा सुरू झालेली आहे. कधीकधी तोंडदेखला मराठीचाही वापर विधानसभेत करून राजकारणी मराठीप्रेमींना अजूनही वेडावत आहेत. मराठीला राजभाषा करण्याचे विधेयक आणण्याच्या घोषणा अजूनही चालूच आहेत. प्रत्यक्षात – इंग्रजीचे स्थान पक्के सोडाच, अढळ बनलेले आहे. हे घटक राज्याच्या 26 वर्षांचे फलित!

शैक्षणिक जातीयवाद

शैक्षणिक पातळीवर इंग्रजी शाळांना प्राथमिक स्तरावर सरकारी अनुदान द्यावे की नाही त्यावर आंदोलने चालूच आहेत. पूर्वी 1992 साली झाले आणि आता परत 2012 साली. काँग्रेसने इंग्रजीला अनुदान द्यायचे ठरवले म्हणून भाजपाने त्याचा निवडणुकीत फायदा घेतला व सत्तेवर आल्यावर त्या चर्चप्रणित प्राथमिक शाळांना आपणच अनुदान देवून टाकले. या आंदोलनाच्या निमित्याने कोंकणी व मराठीचे गट एकत्र आले व त्यांनी भाषेबरोबरच चर्च व ख्रिश्चन धर्मियांवरही हल्ला चढवला. परत एकदा भाषेच्या नावाने जातीयवाद उफाळून उठला. स्वतःला सेक्युलर म्हणवणारे जातीयवादी बनले व जातीयवादी म्हणून ज्यांच्यावर आरोप होत होते त्यांनी चर्चशी संगनमत करून सत्ता प्राप्त केली. कापाकापीची भाषा फेसबूकवरून बोलण्यापर्यंत या आंदोलनाची मजल गेली. परत एकदा जातीय सलोख्याच्या गोमंतकीय स्वाभिमानाला तडा देणारे गढूळ वातावरण तयार केले गेले.

या सर्वांचे अंतिम फलित काय? 76 कोंकणी प्राथमिक शाळांमध्ये केवळ 2000 मुले शिकत आहेत. 909 मराठी शाळांमध्ये 32,000 मुले शिकत आहेत. तर केवळ 269 इंग्रजी शाळांमध्ये 56,000 मुले शिकत आहेत. म्हणजे कोंकणीत शाळा व विद्यार्थ्यांचे प्रमाण एका शाळेमागे 26 मुले, मराठीत 35 मुले तर इंग्रजीत एका शाळेमागे 200 मुले. यातील 268 शाळांमध्ये 15 हून कमी मुले आहेत. त्यात 246 मराठी शाळा आहेत तर 17 कोंकणी शाळा आहेत. त्यातील अर्ध्या शाळांमध्ये तर दहाहून कमी मुले आहेत. किमान 50 सरकारी शाळांमध्ये पहिलीच्या वर्गात एकही विद्यार्थी नाही तर 60 सरकारी शाळांमध्ये दुसरी व तिसरीच्या वर्गातही एकही विद्यार्थी नाही. काही सरकारी शाळा तर विद्यार्थी नसल्याने कधीच बंद झालेल्या आहेत. काही शहरीकरणामुळे बंद झालेल्या आहेत तर कित्येक भागातील मुले इंग्रजी शाळांमध्ये जात आहेत म्हणून बंद पडलेल्या आहेत. ही सगळी सरकारी आकडेवारी आहे.

इतर मुले इंग्रजी शाळांतून शिकतात पण आपली मात्र कोंकणीतून शिकतात व म्हणून ती मागे पडतात अशी भावना बनून चर्चप्रणित शाळांतल्या बहुतांश ख्रिश्चन पालकांनी इंग्रजी शाळांनाही सरकारी अनुदान देण्यासाठी आंदोलन केले. याचाच अर्थ ख्रिश्चन सोडून इतर धर्मीय जास्त मुले इंग्रजी शाळांतून प्राथमिक शिक्षण घेत होती. शेवटी या 130 इंग्रजी माध्यमिक प्राथमिक शाळांना सरकारी अनुदान मिळाले. त्याची सरकारी आकडेवारी गेल्या वर्षी जुलैच्या अधिवेशनात दिली गेली ती तर सत्य परिस्थितीवर डोळे दिपावणारा उजेड टाकून गेली. प्रत्यक्षात या शाळांतूनही हिंदू मुलेच जास्त शिकतात. एकूण 77 शाळांमध्ये तर हिंदू मुलेच बहुसंख्य. सर्वच 130 शाळांमधून 15,000 हिंदू मुले व 12,000 ख्रिश्चन. तरीही इंग्रजीतून शिकून आमची संस्कृती संपवली म्हणून ओरड ख्रिश्चनांच्याच नावे? आणि त्यानंतर पाचवीपासून पुढचे शिक्षण सगळेच इंग्रजीतूनच घेणार. एकही कोंकणी वा मराठी शाळा नाही. असलीच एखादी मराठी तर त्यात अत्यल्प मुले. भाषेच्या माध्यमातून गेल्या 26 वर्षात तयार केलेली ही गोव्याच्या संस्कृतीची नवीन व्याख्या. सत्याकडे काणाडोळा करायचा, शैक्षणिक प्रश्नाला धार्मिक रंग द्यायचा, त्यावर राजकारणाची पोळी भाजायची आणि चटके मात्र सांस्कृतिक भविष्याला द्यायचे.

कलाकारांची धडपड 

गेल्या 26 वर्षात माहिती तंत्रज्ञानाने आणि दृकश्राव्य माध्यमांनी फार मोठी मजल मारली. सुरवातीला अकरावीच्या विद्यार्थ्यांना संगणक देण्यात आले, मग शिक्षकांना आणि आता तर सहावीपासून सर्वच विद्यार्थ्यांना देण्यात येतील. आता सर्वच संगणकांवर कोंकणी वा मराठी लिहिली जावू शकते. परंतु त्यांचे की बोर्ड शिकविण्याचा शिक्षण खातेही विचार करीत नाही आणि शिक्षकवर्गही. या संगणक तंत्रज्ञानातून शिक्षण सुलभ करण्यावर कसलाही भर दिलेला जाणवत नाही. हे युग आहे माहिती तंत्रज्ञानाचे आणि सरकारच्या खुद्द माहिती खात्याचीच वेबसाईट एकदा हॅक केल्यापासून गायब आहे. ई-गव्हर्नन्सच्या मोठमोठ्या बाता मारल्या जातात, परंतु प्रत्यक्षात जमिनीचे रेकॉर्ड व नकाशे वेबासाईटद्वारे देण्याव्यतिरिक्त आणखीन फारशी डोळ्यात भरणारी प्रगती दिसत नाही. पायलट प्रकल्प म्हणून हाती घेतलेला गोवा ब्रॉडबँडचा क्रांतिकारी प्रकल्प एकूण एक गाव ऑप्टिकल फायबर केबलने कनेक्ट करून तयार आहे. पण त्याचा फायदा घेण्याची कसलीच योजना पूर्ण झालेली नाही. त्यामुळे एका नवीन संस्कृतीसाठी लागणारी साधनसुविधा तयार असूनसुद्धा आम्ही परत मागेच पडणार आहोत.

इफ्फीच्या निमित्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलात्मक सिनेमा आमच्या दारात येवून उभा ठाकला. परंतु तेव्हापासून वर्षा-दोन वर्षांतून एकदा घेतला जाणारा गोवा सिनेमा महोत्सव बंदच झाला. गोव्याचा वापर इफ्फीसाठी झाला. परंतु इफ्फीचा वापर गोव्यासाठी करून घेण्याचा कसलाही प्रयत्न झाला नाही. काही कलाकार तरुणांनी पुढे येवून छोटा सिनेमा सुरू केला तर तोही बंद पाडला गेला. गोव्यात लघुपटांचे पीक यायला लागले आहे, पण त्यासाठी हवे असलेले सरकारी प्रोत्साहन पाहिजे तेवढे दिसत नाही. गोवा ही कलाकारांची भूमी आहे. परंतु शहरीकरणामुळे इथले हौशी नाटक बंद पडत चालले आहे. भारत सेवा उद्योगाच्या जोरावर जागतिक पातळीवर आपले स्थान निर्माण करीत आहे. मात्र इथल्या कलाकारांची शैक्षणिक जडण घडण करून त्यातून कला हा सेवा उद्योग म्हणून उभारण्याची कसलीही योजना सरकारपाशी नाही. हातचे सोडून पळत्यामागे तसे आम्ही औद्योगिक प्रगतीसाठी अजूनही कच्च्या मालापासून कामगार आणि उद्योजकांनासुद्धा आयात करण्याच्याच उद्योगात गर्क आहोत. गोव्याचा कलाकार मात्र अजूनही अंधारात धडपडतच आहे. या आमच्या कच्च्या मालाला पैलू पाडून त्याचे कलाकार हिरे जागतिक पातळीवर निर्यात करण्याचा प्रयत्न कुठेच दिसत नाही.

डोळ्यात भरण्यासारखी भाषिक व सांस्कृतिक पातळीवरील एक गोष्ट मात्र खरोखरच कौतुकास्पद आहे. ती म्हणजे गोव्यातील कलाकार व विद्वानांना घेवून तयार केलेले गोव्याचे सांस्कृतिक धोरण. परंतु त्यातील बहुतांश मौल्यवान भाग अजून कागदोपत्रीच धूळ खात पडलेला आहे. कला आणि संस्कृती खात्यानेही फार मोठी कामगिरी केलेली आहे. परंतु दुर्दैवाने तीही राजकारण्यांच्या लोकप्रिय योजनांच्या आहारी गेल्याने भरकटायला लागलेली आहे. एकेकाळी गोव्याचा अभिमान असलेल्या कला महाविद्यालयात आज व्याख्यात्यांची उणीव निर्माण झालेली आहे. तेवढीच अभिमानास्पद असलेली नाट्यशाळा तर रडतमरत चाललेली आहे. संगीत विद्यालय आणि महाविद्यालयांना नवीन उभारी देण्याची गरज आहे. एकूणच गोव्याच्या संगीत क्षेत्राला नवसंजीवनीची गरज आहे. त्यातल्या त्यात धडपड दिसत आहे ती खाजगी पातळीवर, व्यक्तिगत पातळीवर व संस्थात्मक पातळीवर. गोमंतकियांच्या या धडपडीने गोव्याची भाषा व संस्कृती अजूनही जिवंत व ताजीतवानी ठेवलेली आहे. ती साहित्यिकांनी ठेवलेली आहे, कलाकारांनी ठेवलेली आहे, विचारवंतांनी ठेवलेली आहे. खास करून आपणच आपला मार्ग शोधणाऱ्या युवकांसमोर तर यासाठी नतमस्तक व्हायला हवे. मात्र त्यातही राजकीय संस्कृती घुसवून तेही निर्मळ पाणी गढूळ करण्याचे उपद्व्याप चालूच आहेत.

याहूनही फार मोठ्या सांस्कृतिक धोक्यावर आपण अजिबात विचार करीत नाही आहोत तो तथाकथित गोमंतकीय आणि बिगरगोमंतकीयांमधल्या दरीचा. आमची गरज म्हणून इथे आलेला बिगरगोमंतकीय गोव्यात स्थायिक होवून 30-40 वर्षे उलटली तरी आपण त्यांना अजून आपले मानायला तयार नाही. त्यांना रहायला जमीन द्यायला आपण तयार नाही. त्यांच्या नवीन पिढ्या गोमंतकीय संस्कृतीत विलीन झाल्या तरीही. मात्र त्याचवेळी गोमंतकीय संस्कृतीशी कसलेही सोयरसुतक ठेवू पहात नसलेल्या सधन बिगरगोमंतकियांना आमच्या जमिनी विकून त्यांना मिठ्या मारण्याचे आमचे धंदे चालूच आहेत. पर्यटनापेक्षा या बिगरगोमंतकियांमुळे आज गोव्याच्या संस्कृतीला धोका निर्माण झालेला आहे. परंतु आपणसा त्याचे सोयरसुतकच नाही.

एके काळी बहुभाषिक गोवा ही गोमंतकियांची शान होती. आम्ही गोमंतकीय एकाहून जास्त भाषांवर प्रेम करायचो आणि शक्य तेवढ्या भाषा शिकायचो. परंतु आज भाषा जोडण्यापेक्षा तोडण्याचेच काम आम्ही जास्त करीत आहेत. भाषावादाने पूर्वी कोंकणी-मराठीमध्येच गोवा फोडला होता. घटक राज्यानंतर आता तो लिपी आणि धर्मामध्येही पूर्णतया फोडला गेलेला आहे. भाषांच्या नावे नवनवीन बेटे तयार होवू लागलेली आहेत. गोमंतकीय व बिगरगोमंतकीय अशी बेटे तयार होवू लागली आहेत. त्या बेटांवर आपापल्या संकुचित संस्कृतींचे झेंडे फडकू लागले आहेत. आणि आम्ही झालोत या बेटांवरचे आत्मसंतुष्ट, अल्पसंतुष्ट व आत्मकेंद्रित रहिवाशी. जे कोणी बेटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात त्यांना कुठल्या तरी बेटाच्या दिशेने एक तर ढकलले जाते वा मधल्या मध्ये गटांगळ्या खाण्याची पाळी त्यांच्यावर येते. काही जण तर त्यात बुडून मरतात सुद्धा.

हे आमचे 26 वर्षांच्या घटक राज्याचे भाषिक व सांस्कृतिक संचित! 

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs