आम्ही खरोखरच सुसंस्कृत आहोत का?

By Sandesh Prabhudesai
24 May 2013 00:02 IST

गोव्यात एक फॅशन आहे. कसलाही गुन्हा घडला वा गुन्हेगारी वाढली की त्याचे खापर आधी भायल्यांच्या डोक्यावर फोडायचे. हे घाटी... करून सुरवात करायची आणि आपण गोमंतकीय किती सुसंस्कृत व सज्जन आहोत याची शेखी मिरवायची. जसे काही हे भायले लोक गोव्यात येण्यापूर्वी कधी गुन्हे झालेच नाहीत, चोऱ्या झाल्याच नाहीत, दरोडे पडलेच नाहीत, मारामाऱ्या झाल्याच नाहीत, खून झालेच नाहीत. महानंद नाईकसारखा ओढणीने गळा आवळून आपल्या प्रेयसींना मारण्याचे खून-सत्र चालविणारा नराधम तर भायलाच असला पाहिजे. तसे गोव्यात गोमंतकीय आहेतच मुळी कोण? इथले गावडा, कुणबी व वेळीप हे मूळ गोमंतकीय सोडले तर आपण सगळे भायलेच. घाटी. म्हणूनच असेल कदाचित, आपण भायल्यांना गुन्हेगार समजतो.

परंतु भायले ते गुन्हेगारी वृत्तीचे असतात आणि आपण गोमंतकीय सुसंस्कृत असतो हा गैरसमज पार धुळीला मिळवण्याचे काम परवा परवाच ऑस्वान फॅर्नांडीस या नीज गोंयकाराने केले. तेही एक नव्हे तर दोन भायल्यांचा अंगावर काटा आणणाऱ्या पद्धतीने खून करून व दोन धिटुकल्यांचाही तसाच खून करण्याचा प्रयत्न करून. त्यातल्या सहा वर्षांच्या मुलीवर तर लैंगिक अत्याचार करून एका मागोमाग एक आई व तिच्या त्या दोन लहान मुलांना अनमोडच्या दरीत फेकून देण्यात आले. तत्पूर्वी बापाला बेदम मारहाण करून खड्ड्यात अडीच मीटर खोल पुरण्यात आले. कारण? नुसती शाब्दिक चकमक.

कोण कुठला कोल्हापूरचा शिवाजी नाईक. त्याची बायको सुजाता. व त्यांची दोन लहान मुले. काय किंमत आहे त्यांना गोव्यात? त्यांनी इथे यायचे, मूग गिळून पडेल ते काम करायचे, वाट्टेल तशा दिलेल्या सुसंस्कृत व सज्जन गोमंतकीय मालकांच्या शिव्या खायच्या, मर मर मरायचे, नाही होत म्हटले तर कामावरून काढून टाकण्याचा धोका पत्करायचा. या भायल्यांना स्वाभिमान वगैरे काहीच नसतो. ते आपले गुलाम. वेठबिगार. तिथे गावात उपाशी मरतात म्हणून इथे येतात. मग करा की काम? कामचुकारपणा चालणार नाही. तो फक्त आम्हा गोमंतकीयांचा  जन्मसिद्ध हक्क. सहावा वेतन आयोग घेवून सरकारी नोकर बनून करायचा. रोजंदारीवर अनिश्चिततेच्या भोवऱ्यात काम करणाऱ्या भायल्यांना कोणी दिला हा अधिकार?

हे घाटी गरजवंत असतात. ते कसलीही कामे करू शकतात. इमारती बांधण्यापासून संडास धुण्यापर्यंतची सर्व कामे. कष्टाची व घाणेरडी म्हणवणारी सर्व कामे त्यांनी करायची. आम्ही व्हायट कॉलरवाले. आमच्या अंगाला चिखल लागता कामा नये. कधी काही गुन्हे भायल्यांच्या हातान घडले की तमाम भायल्यांच्या अंगावर चिखलफेक करण्याचा अधिकार मात्र केवळ आमचा. आम्ही गोमंतकीयांनी गुन्हे केले तर ते मात्र अपवाद. पण भायल्यांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती अपवाद असू शकत नाही. ते बहुतांश गुन्हेगार. गोव्यात आज किमान चार ते पाच लाख भायले असतील. त्यातले बहुतांश गुन्हेगार असते तर गोव्याचे काय झाले असते याचा विचार आम्ही कधीच करणार नाही. गुन्हेगारी ही वृत्ती असते आणि या भूतलावरील कोणत्याही माणसामध्ये असू शकते याचाही विचार करणा नाही. कारण – आम्ही सु-शिक्षित!

समजा हा शिवाजी नाईक व त्याचे कुटुंब गोमंतकीय असते तर केले असते का एखाद्या सुसंस्कृत गोमंतकीय ऑस्वानने हे एवढे धाडस?  कारण ते अचानक बेपत्ता झाले असते तर त्यांच्या नातेवाईकांना सुगावा लागला असता. त्यांची शोधाशोध सुरू झाली असती. आपसूकच पहिला संशयित ऑस्वानच ठरला असता. परंतु इथे गोष्ट वेगळी होती. ते इथे काम करतात हे कुणालाच ठावूक नव्हते. म्हणूनच तर दोघाही नवरा-बायकोचा खून झाल्यावर त्या दोन लहान मुलांच्या नातेवाईकांना शोधून काढण्यात पोलिसांना किती कष्ट घ्यावे लागले. आणि त्यांचे इथे कुणीच नातेवाईक नाहीत म्हणूनच तर त्यांचा गळा आवळून त्यांना दरीत फेकून देण्याचे धाडस या सुसंस्कृत गोमंतकियाला झाले. ती मुले जर जिवंत राहिली नसती आणि त्या नुवेच्या बॅनाव्हेंचर डिसोझाला पाझर फुटला नसता तर हे दुहेरी खून सहजरित्या पचलेही असते.

निदान यातून तरी आता सरकारने सतर्क बनणे गरजेचे आहे. या गोव्यात जो कोणी कामाला येतो त्याची कसलीच माहिती आपणापाशी नसते. त्यांनी रेशन कार्ड वगैरे केले तरच त्यांची सरकारदरबारी नोंदणी होते. अन्यथा या आमच्या सु-शिक्षित गोव्यामध्ये त्यांच्या सुरक्षेची कसलीच तजवीज केलेली नाहीय. त्यांना कामावर ठेवणाऱ्या मालकांवर त्यांची नोंदणी करण्याची सक्ती नाही. औद्योगिक आस्थापनांमध्ये वा भाडेकरूंच्या बाबतीत वगैरे काही कायदेशीर तरतुदी आहेत. परंतु त्याचीही ठोस अंमलबजावणी होत नाहीय. निदान या प्रसंगातून तरी आता सरकार जागे होईल काय? की एक खून झाला व आरोपींना अटक झाली एवढ्याच पराक्रमावर हे प्रकरण संपणार?

याहूनही महत्वाची आणखीन एक गोष्ट आहे. या बिगरगोमंतकीय गोमंतकीयांना आम्ही एक माणूस म्हणून हवा असलेला सन्मान देतो का? आमचेही कित्येक गोमंतकीय बंधुभगिनी परगावी जावून अशीच कष्टाची कामे करतात. आम्हाला तिथे सन्मान हवा असतो. मात्र तसाच सन्मान बिगरगोमंतकीय कष्टकरी कामगारांना देण्याची आपली तयारी नसते. ते आपली सर्व कामे करतात. ते नसले तर उद्या गोव्याची संपूर्ण अर्थव्यवस्थाच ढासळेल अशी आज परिस्थिती आहे. त्यांची आम्हाला नितांत गरज आहे. परंतु त्यांना साधे घर देण्याची आपली तयारी नसते. शेवटी प्रत्येक माणसाला घर हे हवेच असते. आम्ही बेघर झालो तर आपण काय करू याचा एकच क्षण विचार करून बघा. अशा हवालदिल परिस्थितीत त्यांनी मिळेल त्या जागेत निवारा उभा केला तर तो बेकायदेशीर ठरवून पाडला जातो. वा एखादा राजकारणी त्यांच्या निराधार परिस्थितीचा फायदा घेवून मतांचे राजकारण खेळतो आणि त्यांना तसेच वाऱ्यावर सोडतो. परंतु त्यांच्यासाठी कायमस्वरुपी घरांचा विचार कधीच करीत नाही.

गोव्यात बाहेरून येणाऱ्या श्रीमंत लोकांसाठी मेगा प्रकल्प कशाला हवेत आणि आमची मर्यादित जमीन त्यांना कशाला विकावी यावर आपण आंदोलनेसुद्धा उभी करतो. कलम 371 खाली गोव्याला खास दर्जा मिळावा म्हणून विधानसभेत एकमताने ठराव संमत करतो. परंतु गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग बनलेल्या या बिगरगोमंतकीय असलेल्या व एव्हाना गोमंतकीय बनलेल्या भायल्यांना जमीन व घर देण्यासाठी मात्र कसलीच योजना करीत नाही. त्यांना सुरक्षित वाटावे अशी योजनाच आखत नाही. हाच का आपला सु-शिक्षितपणा? आणि हाच का आपला सुसंस्कृतपणा? हीच का ती आपली सिव्हिल सोसायटी टू बी प्राउड ऑफ?

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Related Blogs