आम्ही हुषार; की आम्हीच खरे ढ?

By Sandesh Prabhudesai
09 May 2013 12:50 IST

माझ्या ‘गोवान्यूज.कॉम’मधील एका बातमीच्या संदर्भात आयरिस रॉड्रिक्सचा फोन आला. त्या बातमीमध्ये त्याचा संदर्भ देताना त्याने एका सन्माननीय व्यक्तीवर बेताल आरोप केले होते असे मी लिहिले होते. आपले ते आरोप बेताल कसे नव्हते ते सांगण्यासाठी त्याचा फोन होता. ही व्यक्ती कधीतरी नापास झाली होती असा आरोप करून त्यांना जाहीररित्या आयरिसने नामोहरम केले होते. मी त्याला साधा प्रश्र्न विचारला – समजा ती व्यक्ती नापास झाली होती तर त्यात काय झाले? नापास होण्याची कारणे कित्येक असू शकतात. शिक्षणात हुषार असलेली मुले ऐन परीक्षेच्या वेळी मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे नापास होणे शक्य असते. वा कदाचित इतर सर्व बाबतीत हुषार असलेली मुले घोकंपट्टी कशी करावी, प्रश्नांची अचूक उत्तरे कशी द्यावीत वा पुस्तकातील उतारे तशाचे तशे प्रश्नपत्रिकेत कसे लिहावेत हे कसब विकसीत केले नसल्याच्या साध्या कारणावरून नापास ठरवली जावू शकतात. आणि मग ती सामाजीक दृष्टीने ढ, कमकुवत, अक्कलशून्य वा निरुपयोगीसुद्धा ठरवली जातात.

हुषारांना ढ ठरवणारी पद्धती म्हणजे परीक्षा असे माझे तरी प्रामाणिक मत आहे. कारण परिक्षेत आपणाला केवळ उत्तरे द्यायची असतात. तीसुद्धा अचूक. जेवढी उत्तरे अचूक तेवढे गुण जास्त. आणि मग तो मुलगा वा ती मुलगी हुषार. प्रत्यक्षात ही गोष्ट एक तर तोंडपाठ करून वा स्मरणशक्तीच्या जोरावर केली जाते. म्हणजे मुलाची स्मरणशक्ती तपासण्याची ही परीक्षा असते. पण खरोखरच केवळ स्मरणशक्ती प्रखर असेल तेच हुषार असतात? आणि ज्यांची स्मरणशक्ती कमकुमवत असते ते ढ असतात? हल्लीच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी शिक्षणाच्या मागण्यांवर विधानसभेत बोलताना फारच बोलके वक्तव्य केले. शिक्षकाला वा उत्तरपत्रिका तपासनिसाला जेवढे ज्ञान आहे त्याच्या निकषावर उत्तर लिहिणाऱ्या विद्यार्थ्याचा कस ठरविला जातो व तो हुषार आहे की नाही ते ठरवले जाते. म्हणजेच विद्यार्थ्याची हुषारी ही शिक्षकाच्या हुषारीवर ठरवली जाते. विद्यार्थ्याच्या हुषारीवर खचितच नव्हे. आणि ती हुषारी म्हणजे स्मरणशक्तीची परीक्षा.

प्रत्यक्षात मेंदू हा सर्वगुणसंपन्न असतो. शास्त्रज्ञांनी आतापर्यंत मेंदूच्या कोणत्या भागात कसल्या संवेदनांचा साठा असतो त्याची व्यवस्थित मांडणी केलेली आहे. मेंदूच्या उजव्या भागात दूरदृष्टी, कल्पनाशक्ती, संगीताची जाणीव, स्पर्शाची जाणीव, स्मरणशक्ती, सर्जनशीलता, सद्सदविवेकबुद्धी या गोष्टी असतात. डाव्या बाजूला भाषा, उच्चारशास्त्र, शुद्धलेखन, व्याकरण या गोष्टींना पूरक जाणिवा असतात. तसेच आवाज, वाचन व कल्पनेची भरारी मारण्याची क्षमताही मेंदूच्या डाव्या भागात असते. या एवढ्या सगळ्या संवेदनांतील केवळ स्मरणशक्ती म्हणजे हुषारी?

हुषारीची व्याख्याही अशीच विस्तृत आहे. माणसामध्ये असलेली नैसर्गिक क्षमता व कौशल्य म्हणजे हुषारी. एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील माणसाची क्षमता म्हणजे हुषारी. मन व शरीर वापरण्यासाठी व विकसित करण्यासाठी उपजतच असलेली शक्ती म्हणजे हुषारी. आता या सर्व गोष्टींचा विचार केला तर त्यात आपण हुषारी ठरविण्यासाठी देत असलेली परीक्षा कुठपर्यंत माणसाची हुषारी ठरवू शकते? सरड्याची धाव कुंपणापर्यंत तशी ‘हुषारा’ची धाव केवळ स्मरणशक्तीपर्यंत?

म्हणूनच तर परीक्षेत सर्वोच्च गुण मिळवणारे विद्यार्थी पुढे सामान्य (वा अतिसामान्यसुद्धा) माणसाचे जीवन जगतात तर परीक्षेत सामान्य गुण मिळवणारे वा नापाससुद्धा होणारे असामान्य कर्तुत्वी व्यक्ती म्हणून मान्यता पावतात. मात्र आपणाला ते सहन होत नाही. म्हणून मग आपण तो 40 टक्के गुण मिळवणारा विद्यार्थी होता वा तो नापास झाला होता वा शाळा मध्येच सोडून गेलेला ड्रॉप आउट होता अशा शब्दांत त्यांची अवहेलना करण्यात धन्यता मानतो. प्रत्यक्षात ती अवहेलना नसतेच मुळी. आपली सामान्य कुवत लपवून ठेवण्यासाठी त्या हुषार वा असामान्य व्यक्तीची काडी लहान करण्याचा तो केविलवाणा प्रयत्न असतो. आमीर खानने ‘थ्री इडियट्स’ व ‘तारे जमीं पर’ या दोन्ही सिनेमांतून अचूक याच गोष्टींवर बोट ठेवलेले आहे. परीक्षेच्या माध्यमातून हुषार ठरतात ते चतुर, परंतु प्रत्यक्षात हुषार असतात ते रांचो, फरहान आणि राजूच. आणि त्या सर्वांहूनही हुषार म्हणजे ‘गिव्ह मी सम सनशायन.. आय वॉँट टू ग्रो अप वन्स अगेन’ हे ह्रदय हेलावून टाकणारे गाणे म्हणणारा आणि या शिक्षणव्यवस्थेने आत्महत्येच्या नावाने मारून टाकलेला तो कल्पनाशक्तीच्या भराऱ्या प्रत्यक्षात आणणारा असामान्य मुलगा...

‘तारे जमीं पर’ हा सिनेमा तर डिसलेक्सिया झालेल्या मुलावर आधारित आहे. अशा मुलांना अक्षरे वा आकडे समजायला थोडा उशीर लागतो. त्यामुळे समवयस्कांपेक्षा ही मुले थोडी मागे पडतात. आपण त्यांना हसतो, बिनदिक्कत त्यांची थट्टा करतो आणि त्यांना स्लो लर्नर वा मतिमंदसुद्धा ठरवून मोकळे होतो. या मुलांना इतरांबरोबरच शिकवून त्यांचा आत्मविश्वास वाढवणे महत्वाचे असते, मात्र त्याचवेळी त्यांच्यासाठी ज्यादा वेळ देऊन त्यांना अक्षरे वा आकड्यांच्या प्रेमात टाकणे महत्वाचे असते. प्रत्येक वर्गात 10 ते 15 टक्के अशी मुले असतात असा एक अंदाज आहे. आमची स्वतःची मुलगी ऋचा डिसलेक्सिक होती. ती सर्वांबरोबर शिकली व तिला ज्यादा वेळही दिला गेला. आज ती ग्रंथ कसे वाटणाऱ्या पुस्तकांचा अक्षरशः फडशा पाडतेय. इतर सर्व ‘हुषार’ मुलांपेक्षा तिचे वाचन कित्येक पटींनी जास्त आहे. शिवाय तिला ‘स्मरणशक्तीच्या परीक्षेतही’ गुण जास्त मिळतात.

हाच डिसलेक्सिया झालेल्या आल्बर्ट आईन्स्टाईनने आमच्या भौतिकशास्त्राचा पाया मजबूत केला. शाळेतसुद्धा न गेलेल्या डिसलेक्सिक थॉमस एडिसनने विजेचा शोध लावला. डिसलेक्सिक लिओर्नाद द व्हिन्सीने चित्रकलेच्या क्षेत्रात क्रांती केली. जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचा अध्यक्ष झाला. विन्स्टन चर्चिल इंग्लंडचा झाला. महम्मद अलीने भल्याभल्यांना लोळवले. आगाथा ख्रिस्ती वाचणारे तिचे भक्त जगभर मिळतील. जॉन लेनॉनच्या बिटल्सने संगीताच्या क्षेत्रात क्रांती केली. डेव्हिड बेलीची फोटोग्राफी आम्हा सर्वांनाच वेडी करते. टॉम क्रूस आणि अभिषेक बच्चनसारखे अभिनेते आज हॉलिवूड आणि बॉलिवूडवर राज्य करीत आहेत.

आणि ही सर्व मुले आमच्या दृष्टीने ढ! बोंडेर!! यूजलेस!!! कधी बदलणार आम्ही आमची हुषारीची ही व्याख्या? कधी करणार आम्ही आमच्या मेंदूत असलेल्या इतर संवेदनांचा वापर? कधी वापरणार आमचाच आम्ही स्वतःचा मेंदू? आणि कधी बाहेर पडणार आम्ही या परीक्षेच्या गुणातून माणसाची गुणात्मकता, कौशल्य आणि हुषारी पारखण्याच्या ‘ढ’ पद्धतीतून?

(दैनिक हेराल्ड मध्ये प्रसिद्ध)

Disclaimer: Views expressed above are the author's own.

Blogger's Profile

Sandesh Prabhudesai

Sandesh Prabhudesai is a journalist, presently the Editor of goanews.com, Goa's oldest exclusive news website since 1996. He has earlier worked as the Editor-in-Chief of Prudent & Goa365, Goa's TV channels and Editor of Sunaparant, besides working as a reporter for Goan and national dailies & weeklies in English and Marathi since 1987. He also reports for the BBC. He is also actively involved in literary and cultural activities. After retirement from day-to-day journalism in 2020, he is into Re-Search Journalism (पुनर्सोद पत्रकारिता), focusing on analytical articles, Video programs & Books.

Drop a comment

Enter The Code Displayed hereRefresh Image


Previous Comments

gopinath gawas , keri

++++, very well said. I hope the educators and teachers are listening.

- Abdul, Valpoi | 23 rd May 2013 00:55

 

आम्ही बुषार: की आम्हीच खरे ढ ?

स्मरणशक्तीच्या जोरावर पास नपास ठरवणाऱ्या शिक्षकांना वाटतं की आम्ही शिक्षक मुलांना शिकवतो म्हणून ती शिकतात. खरे तर शिक्षक शिकवणारे कोण ? शिक्षक हा मार्गदर्शकच असतो तो शिकवत नसतो. तो जे काय शिक्षक या नात्याने वर्गात करतो ते मुलं निरिक्षणांतून शिकतात, त्याचे अनुकरण करतात, जर त्याची मनोवृत्ती ही ' हांव शिक्षक हांवच सगळें करतां अशें जर तो म्हण्टा आसत जाल्यार ' तोच खरो ढ. हातून दरेक शिक्षकान स्वतःचें आत्मपरिक्षण करचें. आज अनेक शिक्षक मुलांच्या अभिव्यक्तीला गुण न देता पुस्तकात जे आहे आणि आपण जे शिकवलेले ते विद्यार्थ्यांने लिहिले आहे त्यालाच गुण देतात. आणि म्हणूनच आमचे विद्यार्षी असीम सामर्थ्य, अफलातून विचारसरणी, तसेच आपल्या बुद्धीमत्तेचा वापर करू शकत नाहीत., म्हणूनच ते भन्नाट असे काहींच करू शकत नाहीत. कारण त्यांना शिक्षकांनी चौकटीत राहायलाच शिकवलेले असते. हीच चौकट आज आपल्या शशिकांची शिक्षण पद्धत झाली आहे.

- gopinath gawas, keri | 22 nd May 2013 11:27

 

Sandeshbhai, Apratim lekh! Shikshanpaddhativar nemake bhashya!

- pramod koyande, kankavali (sindhudurg) | 16 th May 2013 11:19

 

Related Blogs